उस्मानाबाद,दि.१७:- शेतकऱ्यांनी
स्वावलंबी व्हावे व जलयुक्त शिवारचे काम आणखी जोमाने करावे, शासन नेहमीच
शेतकऱ्यांसोबत आहे, जिथे गरज पडेल तिथे शासन नेहमीच शेतकऱ्यांना मदतीसाठी तयार
आहे, असे प्रतिपादन दारफळ येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांशी सुसंवाद साधताना जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांनी केले.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, आत्माचे प्रकल्प
संचालक केशव मलगुंडे, तहसिलदार सुजीत नरहरे, उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर
कोळेकर, तालुका कृषी अधिकारी ए.जी. देशमुख, मंडळ कृषी अधिकारी ए.पी. चिक्षे,
जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. जगताप यांची प्रमुख
उपस्थिती होती.
यावेळी
बोलताना जिल्हाधिकारी श्री. गमे म्हणाले की, ऊस लागवडीबाबत शेतकऱ्यांनी आपल्या
भूभागाचा व पाणी उपलब्धतेचा अभ्यास करुन पिक पध्दतीचा अंर्तमुख होवून विचार करायला
हवा, तसेच शेतकऱ्यांनी शेतीपूरक
व्यवसायाकडे वळले पाहिजे. बळीराजा चेतना अभियानांतर्गत मिळालेल्या निधीचा योग्य तो
विनियोग करायला हवा. एका शेतकरी उत्पादक गट कंपनीला एक कोटी पर्यंत अनुदान मिळू शकते,
त्यादृष्टीने गावकऱ्यांनी शेती गटाकडे सकारात्मक पध्दतीने पाहावे. नदी खोलीकरणासाठी
व नरेगाच्या कामासाठी शक्य तेवढी मदत करण्यात येईल. कामाची प्रगती पाहून शासकीय
कर्मचारीही श्रमदानात सहभागी होतील, असा विश्वासही यावेळी श्री. गमे यांनी व्यक्त
केला.
जिल्हा
अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले यांनी यावेळी शेतीबाबतचे विविध उपक्रम व योजना
तसेच अनुदानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी
श्री. गमे यांनी नदी खोलीकरण, विहीर पुनर्भरण भूमीपूजन, श्री. संत कोकणे महाराज
मठास भेट दिली. तसेच पोलीस पाटील कार्यालयाचीही पाहणी केली.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक आदित्य गोरे यांनी केले. प्रज्ञा जयराम शेटे हिने छत्रपती शिवाजी
महाराजांवर पोवाडा सादर केला.