Friday, 23 October 2020

श्री तुळजाभवानी देवीजींची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव-2020






            उस्मानाबाद,दि.24 : शारदीय नवरात्र महोत्सवात  शनिवारी दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. 

            श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुरचा वध केला व सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते.  

वैदिक होम व हवनास विधीवत पुर्णाहुती

 

                 आज श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. यामध्ये पहाटे 2 वाजता वैदिक हवनास सुरुवात झाली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम, भवानी सहस्त्रनाम, नवग्रह, याचे हवन करण्यात आले. व सकाळी 7 वा. 05 मि. पूर्णाहुती करण्यात आली. नंतर कोल्हापूर संस्थान व हैद्राबाद संस्थान येथे पूर्णाहुती करण्यात आली. श्री गणेश विहार मध्ये हैद्राबाद संस्थान तर्फे अनंत कोंडो हे सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते. कोल्हापूर संस्थानच्या वतीने उपाध्ये प्रतीक प्रयाग सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते. नंतर श्री तुळजाभवानी देवीची पाद्य पूजा, आरती, मा. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात येऊन ब्रह्मवृंद यांच्या हस्ते आशीर्वाद देण्यात आले. हा धार्मिक विधी आनंदाने पार पडला. यावेळी मंदिर संस्थानचे तहसीलदार श्री सौदागर तांदळे व मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले यांच्यासह नागेशशास्त्री नंदीबुवा, राजाराम नंदीबुवा, श्रीकृष्ण नंदीबुवा, श्रीराम नंदीबुवा, सुनील लसणे, भालचंद्र पाठक, बंडोपंत पाठक, सुमेध पाठक, शैलेश पाठक, महेश प्रयाग, मकरंद प्रयाग, प्रल्हाद पैठणकर, प्रसाद लसणे, अशोक ओवरीकर, शरद कांबळे, बाळासाहेब शामराज, संजय पाठक, रवी पाठक, नागेश शितोळे, श्री भोसले, हे उपस्थित होते,

उद्या (दि. 25 रोजी) महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा दुपारी 12 वाजता होमावर धार्मीक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक होणार आहे.   

 

****

Thursday, 22 October 2020

श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव-2020





         

उस्मानाबाद,दि.22: शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. 

          श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मला (मळ) पासून दोन दैत्य उत्पन्न झाले त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत. ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी  विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन श्रीस जागविले व विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी  मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष शैया श्रीस विश्राम करण्यासाठी दिले. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते.

शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या दि. 23 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 24 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.    

दरम्यान, काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.

****

Wednesday, 21 October 2020

सर्व शक्तीपणाला लावून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 





उस्मानाबाद,दि.21(जिमाका):- मी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला आलो  असून या भागातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी खचलेले आहेत. शेतकऱ्यांनी खचून न जाता त्यांनी धीर धरावा. सरकार म्हणून आम्ही सर्व शक्तीपणाला  लावून त्यांना मदत करून पुन्हा उभे करणार असल्याचा  विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांशी संवाद साधताना दिला.

तुळजापूर तालुक्यातील कात्री या गावी अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची व खरडून वाहून गेलेल्या जमिनीची दि.21 ऑक्टोबर रोजी ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांनी पाहणी केली आणि गावातील शेतकऱ्यांशी ग्रामपंचायतच्या प्रागंणात  संवाद साधुन त्यांची आसवे पुसत त्यांना धीर दिला. यावेळी  राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे,खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.राणाजगजितसिंह पाटील,आ.कैलास घाडगे-पाटील,आ. ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,  कात्रीचे सरपंच किशोर गोडगिरे,  अपसिंगाचे सरपंच वैशाली गोरे,उपसरपंच दिपक सोनवणे आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सद्या ताबडतोबीने काय करायचे ? आम्ही  या भागातील कुठून व कशा प्रकारचे नुकसान झाले आहे हे पाहीले असल्यामुळे  एकही नुकसानग्रस्त शेतकरी पीक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही यासाठी व्यवस्थीतरित्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असून निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करेल असे आश्वासनही  त्यांनी दिले.

 

यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. यामध्ये अपसिंगा येथील अर्चना युवराज पाटील, सुवर्णा लोके, हिराबाई दत्तु कटकधोंड यांना तात्पुरत्या स्वरूपात  प्रत्येकी  30 हजार रूपयांचे धनादेश देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुख्यमत्रयासह सर्व मंत्री महोदयांनी अपसिंगा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला

***

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या बाहेरूनच घेतले श्री तुळजाभवानीचे दर्शन

 





 उस्मानाबाद/तुळजापूर, दि.21(जिमाका):- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पीक नुकसानीच्या पाहणीसाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा दौर्‍यावर आले असताना श्री तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरुनच श्री तुळजाभवानी मातेचे त्यांनी दर्शन घेतले व तुळजाभवानी मातेला शेतकरी बांधवावर आलेले संकट दूर करण्याचे साकडे घातले. 

    यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, श्री मिलिंद नार्वेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिर संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला.

***

शेतकऱ्यांनी धीर धरावा, शासन खंबीरपणे पाठीशी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 



 *शासनाकडून शेतकऱ्यांना समाधानकारक मदत करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार*

*मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार दीर्घकालीन उपाय योजनांचे प्रस्ताव सादर करावेत*

*पावसाचा पॅटर्न बदलत आहे, त्याप्रमाणे प्रशासनाने तयारी ठेवावी*

*उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी व पुरामुळे 128 लोकांचे जीव वाचवल्याबद्दल मुख्यमंत्र्याकडून प्रशासनाचे कौतुक*


उस्मानाबाद, दि.21(जिमाका):- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून येत आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची दैनंदिन माहिती प्रशासनाकडून घेतच होतो. परंतु आज येथील शेतकरी बांधवांना भेटून त्यांना दिलासा दिला आहे. तरी शेतकऱ्यांनी धीर धरावा शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांना समाधान मदत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत च्या आढावा बैठकीत केले.

         या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा परिषद चे अध्यक्ष अस्मिता कांबळे, आमदार सर्वश्री ज्ञानराज चौगुले, राणाजगजितसिंह पाटील, कैलास घाडगे -पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक केएम मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी कौस्तुभ

 

दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांच्यासह जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

         मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचली पाहिजे.  त्यासाठी प्रशासनाने शासनाकडे सर्व प्रस्ताव त्वरित पाठवावेत. शासनाकडून शेतकऱ्यांना समाधानकारक दिलासा देऊन लवकरच सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

      मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना सुचवाव्यात व त्याबाबतचा जिल्हा आराखडा तात्काळ सादर करावा तसेच हा आराखडा करत असताना त्यात कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे त्याचाही काम निहाय क्रम कामनिहाय क्रम ठरवून घ्यावा. मराठवाड्याच्या लातूर उस्मानाबाद हा भाग भूकंपप्रवण आहे त्या शक्यतेचा विचार करून प्रशासनाकडून पुढील काळात या भागात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यावरील उपाय योजना सुचवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

       संपूर्ण राज्यात पावसाचा पॅटर्न बदलत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडून त्याचे आपत्तीत रूपांतर होईल याचा अंदाज बांधता येत नाही. काटगाव तालुका तुळजापूर येथील पुलावरून आठ ते दहा फूट इतके पाणी गेले त्यामुळे या भागातील पिकांची मोठी हानी झाली असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी पुढील काळात ठेवावी लागेल असेही सांगितले.

      सोयाबीन गंजी च्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून विमा संरक्षण मिळण्याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल. तसेच जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी व या पुराच्या

 

काळात जिल्ह्यातील 128 नागरिकांचे प्राण वाचून जीवित हानी होऊ दिली नाही त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कामाचे तसेच नुकसानीच्या पंचनाम्याचे काम चांगले सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले.

           राज्यातील मंदिरे खुली करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोविड चा प्रसार होऊ नये यासाठी मंदिरे सुरू केलेली नाहीत. एकाच वेळी सर्व गोष्टी सुरू केल्याने परदेशांमध्ये कोविडची पुन्हा मोठी लाट आलेली दिसून येत आहे. तसेच सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी माझे कुटुंबाची जबाबदारी मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन कोविड चा प्रतिबंध करावा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

     यावेळी महसूल मंत्री थोरात यांनी अतिवृष्टीने सोयाबीन तूर ऊस कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुरामुळे जमिनीही खरडून गेलेल्या आहेत. तरी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे विहिरीमध्ये गाळ साठलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेतून तो गाळ काढता येईल असे सांगितले तसेच रोहियो तुन पाणंद व शेत रस्ते घेता येतील असेही त्यांनी सूचित केले.

     पालकमंत्री शंकराव गडाख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यतील 3 लाख 74 हजार हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीन हे पीक होते व अतिवृष्टीने या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले असून आतापर्यंत 50 ते 60 टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी जवळपास 50 ते 60 कोटी खर्च येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार राणाजगजितसिंह सिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या

 

समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही मराठवाड्यातील पाटील जिल्ह्यातील अतिवृष्टी व पंचनाम्याची माहिती सादर केली.

    जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी ची माहिती देऊन ऑक्टोबर महिन्यात दोनशे मिलिमीटर पाऊस  झाल्याचे सांगितले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील एक लाख 56 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याची प्राथमिक माहिती असून प्रशासन आतापर्यंत एक लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचून पंचनामे पूर्ण केलेले आहेत उर्वरित पंचनामे पूर्ण करण्याची कार्यवाही वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

        प्रारंभी उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात वीज पडून दोन नागरिकांचे प्राण गेले त्यामुळे प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश देण्यात आले. 

*काटगाव तालुका तुळजापूर येथील पीक नुकसानीची पाहणी*

         मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक नुकसान या पाहणी ची सुरुवात काटगाव तालुका तुळजापूर येथील शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून झाली. यावेळी येथील पुलावरून आठ ते दहा फूट पाणी गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी देऊन यामुळे  सोयाबीन, ऊस व द्राक्ष या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी येथील शेतकऱ्यांना धीर दिला व शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असून या नुकसानीबाबत लवकरच मदत देणार असल्याचे सांगितले यावेळी हरिदास माळी व इतर शेतकर्‍यांची मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. तसेच काटगाव ग्रामस्थांची भेट घेऊन आज येथे तुम्हाला भेटण्यासाठी व या आपत्तीच्या परिस्थितीत दिलासा देण्यासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. तसेच यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कात्री अपसिंगा तालुका तुळजापूर या गावास भेट देऊन तेथील पीक नुकसानीची पाहणी केली.

Tuesday, 20 October 2020

श्री तुळजाभवानी देवीजींची रथ अलंकाराने महापूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव-2020



         उस्मानाबाद, दि. 20 :- तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आजपासून चौथ्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची ललित पंचमी निमित्त श्री देवीजींची नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. 

          ललीता पंचमी निमित्त आज रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.                 

दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.  यात, उद्या दि. 21 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 22 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 23 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 24 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल (सोमवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.

          तत्पूर्वी रात्री तिसऱ्या माळेच्या दिवशी मंदिर संस्थानचे तहसीलदार श्री सौदागर तांदळे व मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात नंदी वाहनावरून  छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्शाळ पूजा झाली.

 

 ***

Monday, 19 October 2020

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव-2020




 

         उस्मानाबाद,दि.19: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज तिसरी माळ.

        तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 09 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.  श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 20 ऑक्टोबर (उद्या) पासून सुरुवात हो आहे. यात, दि.20 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 21 ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.22 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 23 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.24 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.

            तत्पूर्वी रात्री दुसऱ्या माळेच्या दिवशी मंदिर संस्थानचे तहसीलदार श्री सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात अश्व वाहनावरून  छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्शाळ पूजा झाली.

*****

Sunday, 18 October 2020

राज्याचे मंत्री देशमुख,बनसोडे यांच्यासह खा.शरद पवार यांनीनुकसान ग्रस्त भागाची केली पाहणी संबधितांना पंचनामे करण्याचे दिले निर्देश






उस्मानाबाद दि. १८ (जिमाका) -  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकासह  काढून ठेवलेल्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गुरे ढोरे व घरे पडून घरातील संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेले आहे. अतिवृष्टी, दुष्काळ व रोगराई यामुळे  जे नुकसान होते ते वर्षभरासाठी होत असते. मात्र या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांबरोबरच शेतातील माती देखील वाहून गेलेली  असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना पुन्हा शेती वाहीत करण्यासाठी किमान पाच ते सात वर्षे लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी आपत्ती असून अशा वाईट व अडचणीच्या काळात शेतकऱ्यांनी धीर धरावा. आम्ही निश्चित शेतकऱ्यांना व गावांना उभे करण्यासाठी धोरण ठरवून त्यांना नक्कीच मदत मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यामातून प्रयत्न करू असे प्रतिपादन  माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना संबोधित करताना केले.

 खा. शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा व उमरगा  तालुक्यातील अवकाळी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली. 

प्रारंभी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 163 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगून उमरगा तालुक्यात मागील पाच दिवसात 235 मिलिमीटर तर लोहारा तालुक्यात 200 तुळजापूर तालुक्यात 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली जिल्ह्यातील 42 महसूल मंडळापैकी 15 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून उर्वरित महसूल मंडळात पूर परिस्थितीमुळे पिके वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. 

     तसेच जिल्ह्यातील 223 बंधारा पैकी 140 बंधारे ओव्हर फ्लो झालेले होते. या दृष्टी मुळे जिल्ह्यातील 118 जनावरे वाहून गेले असून 84 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अतिवृष्टी व पुरामुळे अडकलेल्या 126 नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी देऊन यापूर्वीच प्रशासनाला व विमा कंपनीला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख,राज्यमंत्री संजय बनसोडे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर,  आ. ज्ञानराज चौगुले, आ. विक्रम काळे, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार, माजी आ. मधुकरराव चव्हाण, राहुल मोटे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उमरगा उपविभागीय अधिकारी उमेश उदमले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, कृषी विकास अधिकारी डॉ. टी.जे. चिमणशेटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना खा. शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, आडवा ऊस पडल्यामुळे त्याची विल्हेवाट लावता येणार नाही. कारण तोडणी सुरू केली तरी ऊस वाहतूक करण्यासाठी रस्ते नाहीत. माती वाहून गेल्यामुळे एका वर्षाचे नुकसान झाले नसून या संकटाला तोंड देऊ या असे आवाहन करून ते म्हणाले की, अशा अस्मानी संकटाच्या काळात राज्य सरकार तर निश्चितच मदत करील. मात्र या मदतीसाठी राज्यावर मर्यादा असल्यामुळे केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.   त्यासाठी मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात येणार असून  पुढील दहा दिवसात दिल्लीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन याबाबत भरीव मदतीची मागणी  करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या उद्भभवलेल्या परिस्थितीमुळे जे अतोनात नुकसान झाले आहे ते भरपाई देण्यासाठी राज्याचे कायमस्वरूपी धोरण ठरवावे लागेल ? तसेच पीक, जमीन, गुर-ढोर, घर व घरातील सामान वाहून गेले आहे. त्याची नुकसान भरपाई तुमच्या पदरात टाकली जाईल असे  आश्वासन देऊन ते म्हणाले की, भूकंपाच्या वेळी हजारो माणसे गेली त्या संकटावर  आपण मात केली आहे. तशीच मात या संकटावर ही  करा असे भावनिक आवाहन देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. 

यावेळी जीवनराव गोरे म्हणाले की, भूकंपावेळी ज्याप्रकारे आपले पुनर्वसन केले त्याच धरतीवर यावेळी शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. तसेच जलसंधारणाचे बांध वाहून गेल्यामुळे त्यासाठी विशेष निधी द्यावा शेती वाहून गेल्यामुळे ते दुरूस्त करण्यासाठी विशेष निधी दयावा, आमदार चौगुले म्हणाले की शेतकर्‍यांना जीवदान देण्यासाठी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा नदी पात्रात नुकसान झालेल्या शेतीची व पिकांची तर सास्तूर चौक, लोहारा व लोहारा खुर्द,माकणी, सास्तुर शिवार, एकोंडी (लो), राजेगाव, कवठा (खु), औसा तालुक्यातील आशिव, उजनी व उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा व करजखेडा या ठिकाणी नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी व शेतकऱ्यांशी नुकसानीबाबत संवाद साधत त्यांची निवेदने देऊन त्यांना धीर दिला.

पाहणी दौऱ्यानंतर खा.शरद पवार यांनी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली त्यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे,खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. विक्रम काळे, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, सुरेश बिराजदार, माजी आ. राहुल मोटे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले की, मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी 163 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगून उमरगा तालुक्यात मागील पाच दिवसात 235 मिलिमीटर तर लोहारा तालुक्यात 200, तुळजापूर तालुक्यात 212 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील 42 महसूल मंडळापैकी 15 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून उर्वरित महसूल मंडळात पूर परिस्थितीमुळे पिके वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. 

     तसेच जिल्ह्यातील 223 बंधाऱ्या पैकी 140 बंधारे ओव्हर फ्लो झालेले होते. या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील 118 जनावरे वाहून गेली असून 84 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी अतिवृष्टी व पुरामुळे अडकलेल्या 126 नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी देऊन यापूर्वीच प्रशासनाला व विमा कंपनीला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

*****

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा

 शारदीय नवरात्र महोत्सव-2020



          उस्मानाबाद,दि.18: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ.

        तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 09 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.   श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 20 ऑक्टोबर पासून सुरुवात हो आहे. यात, दि.20 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 21 ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.22 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 23 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.24 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.

            तत्पूर्वी, काल (शनिवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.