Saturday, 10 March 2018

दो बूंद जिंदगी के “राष्टीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा लाभ घ्यावा-डॉ. एकनाथ माले




उस्मानाबाद. दि. 10:- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दि. 11 मार्च रोजी राबविण्यात येत आहे. यामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे.   यासाठी उस्मानाबाद जिल्हा शहरी विभागात एकूण 168 लसीकरण बूथ (केंद्र) ची सोय करण्यात आलेली आहे. अनुक्रमे – उस्मानाबाद येथे 59, तुळजापूर-23, नळदूर्ग-18, उमरगा-19, मुरुम-15, कळंब-18, भूम-8, परंडा-8 या प्रमाणे लसीकरण बूथ केंद्राची सोय करण्यात आलेली आहे.
याशिवाय बसस्थानक, बाजार, बांधकाम, टमटम स्टॅन्ड, सेल्स इत्यादी ठिकाणी ट्रान्झीट टिमची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तरी सर्व पालकांनी दि. 11 मार्च, 2018 रोजी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पोलीओचे डोस अवश्य पाजून घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी केले आहे.   

Friday, 9 March 2018

शेतकऱ्यांनी स्वत:च्या विकासाबरोबर जिल्हयाच्या विकासासाठीही पुढे यावे-जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे








उस्मानाबाद. दि. 9:- उस्मानाबाद जिल्हयात विकासासाठी नवनवीन मार्ग उपलब्ध होत आहेत. त्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सूचना प्राप्त होत आहेत. अशा परिस्थितीत या योजनांचा अभ्यास करुन, समजून घेवून शेतकऱ्यांनी स्वत:च्या विकासाबरोबरच जिल्हयाच्या विकासासाठीही पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथील जिल्हा कृषी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेच्या सदस्य उषा उर्फ सुरेखा यरकळ, नवनाथ अप्पा जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष चोले, प्रकल्प संचालक (आत्मा) केशव मलगुंडे, कृषी विकास अधिकारी डॉ. चिमणशेटये आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गमे म्हणाले की, या जिल्हयात शेतकरी संघटित होऊन खूप चांगले काम होवू शकते. या जिल्हयात शेतकरी गट, शेतकरी कंपन्या याबाबतचे संघटनात्मक काम उत्तम झाले आहे मात्र त्या तुलनेने दृश्य स्वरुपाचे काम दिसून येत नाही. जिल्हयात जलयुक्त शिवारची कामे चांगली झाली आहेत, आता पिक पध्दतीवर लक्ष देवून समजून काम करणे आवश्यक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करुन आधुनिक पीक पध्दती, अवजारे, यांत्रिक ज्ञान मिळवून शेती विकास आणि पर्यायाने जिल्हयाचा विकास घडवावा, असे श्री. गमे यांनी शेवटी सर्व उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले.
या उद्घाटन सोहळयाप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांचीही समयोचित भाषणे झाली.
यावेळी गौरवशाली शेतकऱ्यांचा, पत्रकारांचाही यथोचित सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये भिमराव शेंडगे-काजळा, अनुपमा कुलकर्णी-नळदूर्ग, प्रकाश चव्हाण-अणदुर, धनंजय घोटाले-तावशीगड, आनंदराव देशमुख-ईट, तात्यासाहेब गोरे-आंतरगाव, भैरवनाथ ठोंबरे-रांजणी, पांडुरंग आवाड-आवाडशिरपुरा, दत्तप्रसाद उर्फ राजेंद्र मुंदडा-शिराढोण, श्रीमती शकुंतलाबाई मारेकर-माडज, श्रीमती केशरबाई भागुडे-म्होतरवाडी, श्रीमती गीता चव्हाण-म्होतरवाडी, श्रीमती सुरेखा जाधव-चिलवडी, श्रीमती किरण निंबाळकर-उस्मानाबाद, सुभाष कदम-पानवाडी, सुधाकर जाधवर-ताडगाव, तसेच शेतकरी गटामध्ये लोककल्याण फुड उत्पादक शेतकरी गट पाडोळी संजय पवार, मुख्यमंत्री मित्र रेशीम उत्पादक गट पाडोळी बालाजी पवार, कृषी वैभव शेळी फार्म क. तडवळे धनाजी नाळे, कृषी सखी महिला शेतकरी गट देवसिंगा अर्चना भोसले, जय भगवान शेतकरी गट सोनगिरी धर्मराज कुटे, ओडिएसएफ शेतकरी उत्पादक कंपनी वरुडा ॲड अमोल रणदिवे, व्हीआरडी शेतकरी उत्पादक कंपनी सारोळा कैलास पाटील, एनएनजी शेतकरी उत्पादक कंपनी कानेगाव नितीन घुले, भवानी शंकर शेतकरी उत्पादक कंपनी बारुळ सुधीर सुपनर, मराठवाडा शेतकरी उत्पादक कंपनी कळंब बाळासाहेब गिते, पत्रकार मल्लिकार्जून सोनवणे, प्रज्योत मसाले प्रॉडक्ट्सच्या ज्योती सपाटे, शिवार संसद आणि शेतकरी मित्र केंद्राचे विनायक हेगाणा, आनंद डिजीटलचे धनंजय शिंदे, जगदंबा एन्टरप्राईजेसचे हनुमंत वडवले, कॉन्ट्रॅक्टर सचिन भिसे, पोरे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने तसेच जागृती फौंडेशन जनसेवा कलापथकाच्या सिध्दार्थ सावंत आणि सहकार्यांच्या शेतकरी गीत गायनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष चोले तर आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक (आत्मा) केशव मलगुंडे आणि सूत्रसंचालन आशीष लगाडे यांनी केले.  कार्यक्रमाचा समारोप शेतकरी गीताने करण्यात आला.  
हा कृषी महोत्सव दि. 9 ते 13 मार्च या कालावधीत होणार असून जास्तीत-जास्त संख्येने या महोत्सवास शेतकऱ्यांनी, जनतेने आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या कार्यक्रमास सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, शेतकरी, पत्रकार बांधव यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.      

Thursday, 8 March 2018

जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 13 मार्च रोजी होणार विशेष ग्रामसभा



उस्मानाबाद. दि.8:- उस्मानाबाद जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 13 मार्च रोजी विशेष ग्रामसभा होणार आहे. या ग्रामसभेत जि.पी.डी.पी. आराखडयात बदल आवश्यक असणाऱ्या ठिकाणी ठराव घेणे, अद्याप अंमल न झालेल्या गावांमध्ये एकत्रीकरण योजना राबविणे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारसाठी आवश्यक गावांमध्ये ठराव घेणे, वृक्ष लागवड 2018 साठी प्रचार-प्रसिध्दी करणे, स्थळ निश्चीती करणे व खड्डे खोदण्याचे नियोजन करणे, पालकमंत्री शेत/ पाणंद रस्ते योजना, बळीराजा चेतना अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडील शेळी गट वाटप करण्यासाठी लाभार्थी निवड इत्यादी बाबींवर चर्चा करुन ग्रामसभेत आवश्यक ते ठराव घेण्यात यावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिल्या आहेत.

चांगला समाज घडविण्यासाठी महिलांनी मोठया प्रमाणावर मतदान करावे -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे








                                                                   
उस्मानाबाद. दि.8:- भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून आपल्या लोकशाहीला अधिक बळकट करून चांगला समाज घडविण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहीजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील महसूल भवन येथे जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमती. शिल्पा करमरकर, माजी सरकारी अभियोक्ता श्रीमती. विद्या साखरे, महिला उद्योजक श्रीमती. किरण देशमाने, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी (उमरगा) निलेश श्रींगी, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, तहसिलदार सुजित नरहरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. गमे म्हणाले की, विकासासाठी सर्वांनी पुढे येणे काळाची गरज असून महिला पुढे आल्या की विकास नक्कीच होईल असून लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान केले तर चांगला समाज घडण्यास मदत होणार आहे. मुली स्वत:च्या कर्तृत्त्वाने पुढे  येतात त्यामुळे त्यांना संधी मिळाली की त्या स्वत: पुढे जातात व इतरांनाही पुढे घेऊन जातात. महिला ज्या क्षेत्रात पुढे आहेत त्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येतात. यावर्षीच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे घोषवाक्य प्रेस फॉर प्रोग्रेस असून याला अनुसरुन महिलांनी विकासासाठी मागणी करुन पुढे यावे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून यावर्षी प्रयत्न करण्यात येतील. 
जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर ही चिंताजन बाब असून त्याबाबत ठोस पाले उचलणे गरजेचे असून प्रशासकीय यंत्रणा काम करीतच आहे मात्र  सामाजिक जाणीवेने महिलांनीही त्यादद्ल काम करणे अपेक्षित आहे. आत्महत्याग्रस्त 15 हजार कुटुंबापैकी 2 हजार 500 महिलांना पुढच्या उपचारांची गरज आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. तसेच किशोरवयीन मुलींच्या सुदृढतेवर भर दिला जाणार आहे. महिलांची मतदान नोंदणी करुन घेण्यासाठी प्रशासन जास्तीत जास्त प्रयत्न करीत. सोशल मिडीयातून महिलांविषयी चुकीच्या पोष्ट व्हायरल होणे ही चिंताजनक बाब असून त्यावर सामूहिक उपाययोजना आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी यावेळी सांगितले. 
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, महिलांनी स्वत: सक्षम होवून इतर महिलांना सोबत घेवून पुढे गेले पाहिजे. आपले एक मतदान न केल्याने काय फरक पडतो म्हणून मतदान न करण्याची प्रवृती ग्रामीण भागात देखील वाढत चालली आहे. त्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती यांनी महिलांमध्ये मतदानासाठी जागृती करावी. चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी व लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान केले पाहिजे. 
उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यावेळी म्हणाल्या की, महिलांनी निर्णय घ्यायला शिकले पाहिजे, योग्य निर्णय घेण्यासाठी सतत जारूक राहिले पाहिजे. स्त्री ही कुठल्याही संकटाला सक्षमपणे तोंड देते, त्यामुळे स्त्रियांनी एकत्र राहिले पाहिजे.
एक एक मत महत्त्वाचे असून प्रत्येकाने आपले मतदानाचे कर्तव्य बजावले पाहिजे,असे मत माजी सरकारी अभियोक्ता श्रीमती. विद्या साखरे यांनी व्यक्त केले.
महिला उद्योजक श्रीमती. किरण देशमाने म्हणाल्या की, राज्यघटनेने दिलेला मतदानाचा हक्क सर्वांनी बजावणे, योग्य व्यक्तीला मत देणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने काम करतात त्याप्रमाणे महिलांनी पुरुषाच्या बरोबरीने मतदानासाठीही पुढे यावे, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचे धनादेश जयाबाई लक्ष्मण रसाळ, कोंडाबाई लिंबाजी जाधव, उज्ज्वला विलास थोरात, सुनिता रामहरी शिन्दे यांना देण्यात आले. तसेच महिला नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नायब तहसिलदार प्रियंका लोखंडे यांनी केले तर प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी यांनी केले. आभार उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी महसूल विभागासह इतर विभागातील महिला अधिकारी-कर्मचारी,अंगणवाडी कर्मचारी  मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Wednesday, 7 March 2018

देवेंद्र भुजबळ यांना राष्ट्रीय जनसंपर्क पुरस्कार





उस्मानाबाद,दि.7- भारतातील जनसंपर्क क्षेत्रातील सर्वोच्च संस्था समजल्या जाणाऱ्या पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय, विधायक आणि दिशादर्शक काम करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.शासकीय जनसंपर्क गटातील यंदाच्या  "नॅशनल चाणक्य अवार्ड - कम्युनिकेटर ऑफ द ईयर पब्लिक कम्युनिकेशन गर्व्हंनमेंट पीआर" या पुरस्कारासाठी श्री. देवेंद्र भुजबळ यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक 9 व 10 मार्च 2018 रोजी पुणे येथे होणाऱ्या "ग्लोबल कम्युनिकेशन कॉनक्लेव्ह" मध्ये देण्यात येईल. या दोन दिवसीय कौन्सिलने विविध चर्चासत्र, कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शासकीय योजना नीट समजून घ्या, जिल्‍हयाला कृषी वैभव प्राप्त होईल-जिल्हाधिकारी गमे





   

उस्मानाबाद, दि.7:- शेतकरी बांधवांनी शासकीय योजना नीट समजून घ्या, कुठल्या योजनेतून कुठले काम करता येईल, हे नीट समजून घ्या, असे केल्याने या जिल्हायाला कृषी वैभव नक्कीच प्राप्त होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
            महसूल भवन येथे जिल्हयातील कृषी मित्रांसाठी कृषी विभागामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष चोले, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, प्रकल्प संचालक (आत्मा)  केशव मलगुंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.चिमणशेटये,शिवार संसद आणि शेतकरी मित्र केंद्राचे विनायक हेगाणा हे उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी गमे म्हणाले की, सदयस्थितीत या जिल्हयातील शेतकऱ्यांनी येथील भौगोलिकृ सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करणे ही काळाची गरज बनली आहे. 2500 वर्षापूर्वी या जिल्हयातील तेर हे गाव उद्योगध्ंदयाचे महत्वाचे केंद्र होते त्यावेळी रेशीम उद्योगास अनुकूल असे वातावरण होते.
            या जिल्‍हयात रेशीम शेतीला अत्यंत पोषक असे वातावरण आहे त्याचा लाभ घेवून शेतक-यांनी जून पूवी्र  प्रत्येक गावात किमान 100 एकर तुती लागवड करावी, असे आवाहन श्री. गमे यांनी उपस्थितांना केले. ते पुढे म्हणाले,जिल्हा रेशीम काया्रलयाकडे रोपांची मुबलक उपलब्धता आहे. याचे योग्य नियोजन केल्यास रेशीम शेती शेतकऱ्यांना अत्यंत लाभदायक ठरु शकते. या पिकाला दुष्काळाची भीती नाही, रोगराईची भीती नाही, एक चांगला व्यवसाय या शेतीच्या माध्यमातून होऊ शकतो, या शेतीबरोबरीनेच चंदन शेती हाही एक उत्तम पर्याय असल्याचे सांगून श्री. गमे यांनी गटशेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे,   आतापर्यंत जिल्हयात 750 एकर शेतात तुती लागवड झाली असून  किमान या जूनपूर्वी आणखी 100 एकर शेतीत तुतीची लागवड करावी ,असे आवाहनही श्री. गमे यांनी उपस्थित कृषीमित्रांना केले.
            यावेळी मुख्यमंत्री मित्र बालाजी पवार तसेच बापू नहाने या यशस्वी,प्रगत शेतकऱ्यांनी रेशीम शेती विषयी  तसेच शेतीतून आपण यशस्वी जीवन कसे जगू शकतो यावर आपले मनोगत व्यक्त केले.जिल्हा कृषि अधीक्षक श्री. चोले यांनी शेतकऱ्यांसाठीच्या योजनाविषयी माहिती देऊन 9 मार्च ते 13 मार्च या कालावधीत होणाऱ्या कृषी महोत्सवाचे सर्वांना निमत्रंण दिले.
 जिल्‍हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी यावेळी लोकराज्य मासिक, महान्यूज वेबसाईट तसेच शासन योजना जाणून  घेण्यासाठी शासनाच्या उपयुक्त अशा वेबसाईटविषयी उपस्थितांना माहिती दिली .जिल्हा रेशीम अधिकारी श्री. मुल्ला यांनी प्रास्ताविक केले तर आभार केशव मलगुंडे यांनी मानले.

Monday, 5 March 2018

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्ज स्वीकारण्या करीता दि,15 मार्चपर्यंत मुदतवाढ



उस्मानाबाद,दि.5:-अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्ज स्वीकारणे करीता दि. 15 मार्चपर्यंत  मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकेत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्याआधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी ही  योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10 वी, 12 वी पदवी परीक्षेमध्ये 50% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.अटी, व शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच अर्ज करावेत ,अर्जाचा विहित नमुना http://mahaeschol.maharashta.gov.in  http://sjsa.maharashta.gov.in, http://www.maharahtra.gov.in  या संकेतस्थळा वर उपलब्ध केला आहे. सोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह अर्ज  सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण उस्मानाबाद, प्रशासकीय इमारत उस्मानाबाद या कार्यालयामध्ये समक्ष, टपालाद्वारे अथवा dswo2000@yahoo.com या  ई मेल वर दि.15 मार्च 2018 पर्यंत दाखल करावेत असे आवाहन समाज कल्याण उस्मानाबाद चे  सहाय्यक आयुक्त श्रीमती मते  यांनी केलं आहे.    

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात सर्पमित्राने पकडली “धामण”



उस्मानाबाद,दि.05: मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारता सर्पमित्र मुकेश अर्जुन नरवणे (वय वर्ष 23) यांनी धामण हा सर्प आज पकडला. शाहू नगर येथे राहणारा हा युवक ॲडहान्स कॅम्पुटर  कॉलेज च्या बॅचलर ऑफ कॅम्पयूटर ॲप्लिकेशनचा विद्यार्थी आहे. गेल्या तीन वर्षापासून जवळपास 100 सर्प त्यांने पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडले आहेत. मुकेश अर्जुन नरवणे या सर्प मित्रांचा संपर्क क्र.9834415656 आहे.

Sunday, 4 March 2018

गरजू रुग्णांवर शिबिराच्या माध्यमातून मोफत उपचार - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन






        गरजू रुग्णांवर शिबिराच्या माध्यमातून मोफत उपचार
-         वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
उस्मानाबाद,दि.4:- महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असून ग्रामीण भागातील वाडी, वस्तीवर राहणाऱ्या तसेच दुर्गम भागातील लोकांना आरोग्य उपचार मिळावेत म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व जागतिक महिला दिनानिमित्त उस्मानाबाद येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष हे बोलत होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आरोग्य राज्य मंत्री विजय देशमुख, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने,  जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, आरोग्य संचालक डॉ.शिनगारे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, मिलिंद पाटील, सुधीर पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल खोचरे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, राजेश्वर महाराज नंदगावकर, डॉ.सुधीर देशमुख, आरोग्य दूत रामेश्वर नाईक, होमिओपॅथीक कॉन्सील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.अजित फुंदे, संदीप जाधव, डॉ. निकुंभ आदींची  प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले की,  प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा  मिळत नाहीत अशा सामान्य गरीब नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  ग्रामीण आणि दुर्गम भागातील  नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्याची गरज आहे. सेवाभाव म्हणून आरोग्य  शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  गरीब, वंचितांची सेवा हा भाव मनात ठेऊन सर्व लोकप्रतिनिधी,  प्रशासन यांना सोबत घेऊन हे काम करण्यात येत आहे.  या आरोग्य शिबिरात येणाऱ्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करुन त्यावर पुढील उपचार करण्यात येणार असून येणाऱ्या खर्चाची जबाबदारी ही शासन उचलणार आहे. अशा शिबीरांच्या कार्यातून प्रत्येक जिल्ह्यात  स्वयंस्फूर्तीने काम करणारे नवीन कार्यकर्ते तयार होत आहेत. शिबिरात येणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी कितीही खर्च आला तरी प्रत्येक गरजू रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येईल व रुग्ण बरा होईपर्यंत त्याच्यावर संपूर्ण उपचार करण्यात येतील, असेही श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.
उस्मानाबाद येथे पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. त्याचबरोबर  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मेडीकल कॉलेज सुरु करण्याचा सरकारचा संकल्प आहे. लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मागणी संदर्भात बोलताना ते म्हणाले की, मराठवाडयासाठी महत्वाचा असलेल्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसून या प्रकल्पाला गती देण्यासाठी पर्यावरण खात्याची दिल्लीहून परवानगी आणली असून दरवर्षी या प्रकल्पासाठी 12 कोटी रुपयांचा निधी देऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून आता कामांना वेग आला असून यासाठी पुढील काळात निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.हा प्रकल्प पूर्ण करुन शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल.त्याचबरोबर निम्न तेरणा प्रकल्पासाठी देखील 7 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.
सहकार मंत्री सुभाष देशमुख राज्यात सर्वत्र अशा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून राज्याचे आरोग्य सुधारण्याचे कार्य करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 50 कोटी जनतेचा आरोग्य विमा उतरविण्याचा संकल्प देखील राज्य सरकारने केला असून गरीब व गरजू रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी राज्यसरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम करण्यात येणारअसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य राज्य मंत्री विजय देशमुख म्हणाले की, दुर्लक्षित असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा या शिबिराच्या माध्यमातून पुरविली जाणार असून आजार संपूर्ण बरा होईपर्यंत त्यांना मदत केली जाणार आहे. ज्यांना  ज्या आरोग्य उपचाराची गरज आहे त्या गरजेची पूर्तता करण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उस्मानाबाद येथील  शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी लवकरच बैठक घेऊन ते पूर्ण केले जाईल.
शिबिरात येणाऱ्या  नागरिकांसाठी मोफत औषधे आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. या सामाजिक कामासाठी अनेक  दानशूर व्यक्ती, संघटना, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, शासनाचे विविध विभाग आदींचे सहकार्य शिबिरासाठी मिळाले. स्थानिक डॉक्टरांसह  सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांनी यासाठी सहकार्य केले.
आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पद्मश्री डॉ.लहाने, वैद्यकीय शिक्षण  विभागाचे संचालक डॉ. शिनगारे, हभप बोधले महाराज यांनी यावेळी  मनोगत व्यक्त केले. या शिबिरात पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, डॉ.चंदनवाले, डॉ.पानशेतकर, डॉ. रणजित जगताप, डॉ. चौरसिया, डॉ. जयश्री  तोडकर, डॉ. रागिणी पारेख आदीसह पुणे, मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, लातूर, आंबेजोगाई, उस्मानाबाद  येथील तज्ञ डॉक्टरचा सहभाग होता. या शिबिरात जवळपास 1 लाख 22 हजार  रुग्णांची तपासणी व औषध उपचार करण्यात आले. यानंतरच्या टप्प्यात ज्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी पाठविण्याबाबत शिफारस केली आहे त्यांना दिनांक 7, 8, 9 मार्च 2018 रोजी सर्व जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा बोलाविले जाणार असून त्यांच्या पुर्नतपासणीनंतर त्यांना शस्त्रक्रिया किंवा पुढील आवश्यक उपचारांसाठी पाठविले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी महाआरोग्य शिबिराच्या संकल्पनेविषयी  माहिती दिली. या शिबिरात  जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून महिला व बालक मोठया संख्येने उपस्थित होते.