Wednesday, 7 March 2018

शासकीय योजना नीट समजून घ्या, जिल्‍हयाला कृषी वैभव प्राप्त होईल-जिल्हाधिकारी गमे





   

उस्मानाबाद, दि.7:- शेतकरी बांधवांनी शासकीय योजना नीट समजून घ्या, कुठल्या योजनेतून कुठले काम करता येईल, हे नीट समजून घ्या, असे केल्याने या जिल्हायाला कृषी वैभव नक्कीच प्राप्त होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
            महसूल भवन येथे जिल्हयातील कृषी मित्रांसाठी कृषी विभागामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष चोले, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, प्रकल्प संचालक (आत्मा)  केशव मलगुंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.चिमणशेटये,शिवार संसद आणि शेतकरी मित्र केंद्राचे विनायक हेगाणा हे उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी गमे म्हणाले की, सदयस्थितीत या जिल्हयातील शेतकऱ्यांनी येथील भौगोलिकृ सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करणे ही काळाची गरज बनली आहे. 2500 वर्षापूर्वी या जिल्हयातील तेर हे गाव उद्योगध्ंदयाचे महत्वाचे केंद्र होते त्यावेळी रेशीम उद्योगास अनुकूल असे वातावरण होते.
            या जिल्‍हयात रेशीम शेतीला अत्यंत पोषक असे वातावरण आहे त्याचा लाभ घेवून शेतक-यांनी जून पूवी्र  प्रत्येक गावात किमान 100 एकर तुती लागवड करावी, असे आवाहन श्री. गमे यांनी उपस्थितांना केले. ते पुढे म्हणाले,जिल्हा रेशीम काया्रलयाकडे रोपांची मुबलक उपलब्धता आहे. याचे योग्य नियोजन केल्यास रेशीम शेती शेतकऱ्यांना अत्यंत लाभदायक ठरु शकते. या पिकाला दुष्काळाची भीती नाही, रोगराईची भीती नाही, एक चांगला व्यवसाय या शेतीच्या माध्यमातून होऊ शकतो, या शेतीबरोबरीनेच चंदन शेती हाही एक उत्तम पर्याय असल्याचे सांगून श्री. गमे यांनी गटशेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे,   आतापर्यंत जिल्हयात 750 एकर शेतात तुती लागवड झाली असून  किमान या जूनपूर्वी आणखी 100 एकर शेतीत तुतीची लागवड करावी ,असे आवाहनही श्री. गमे यांनी उपस्थित कृषीमित्रांना केले.
            यावेळी मुख्यमंत्री मित्र बालाजी पवार तसेच बापू नहाने या यशस्वी,प्रगत शेतकऱ्यांनी रेशीम शेती विषयी  तसेच शेतीतून आपण यशस्वी जीवन कसे जगू शकतो यावर आपले मनोगत व्यक्त केले.जिल्हा कृषि अधीक्षक श्री. चोले यांनी शेतकऱ्यांसाठीच्या योजनाविषयी माहिती देऊन 9 मार्च ते 13 मार्च या कालावधीत होणाऱ्या कृषी महोत्सवाचे सर्वांना निमत्रंण दिले.
 जिल्‍हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी यावेळी लोकराज्य मासिक, महान्यूज वेबसाईट तसेच शासन योजना जाणून  घेण्यासाठी शासनाच्या उपयुक्त अशा वेबसाईटविषयी उपस्थितांना माहिती दिली .जिल्हा रेशीम अधिकारी श्री. मुल्ला यांनी प्रास्ताविक केले तर आभार केशव मलगुंडे यांनी मानले.