उस्मानाबाद. दि.8:- भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून आपल्या
लोकशाहीला अधिक बळकट करून चांगला समाज घडविण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला
पाहीजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील महसूल भवन येथे जागतिक महिला दिनानिमित्त
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा
सौ. अर्चनाताई पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमती. शिल्पा करमरकर, माजी सरकारी अभियोक्ता
श्रीमती. विद्या साखरे, महिला उद्योजक श्रीमती. किरण देशमाने, निवासी
उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी (उमरगा) निलेश श्रींगी,
उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत,
तहसिलदार सुजित नरहरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. गमे म्हणाले की, विकासासाठी सर्वांनी
पुढे येणे काळाची गरज असून महिला पुढे आल्या की विकास नक्कीच होईल असून लोकशाहीला
बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान केले तर चांगला समाज घडण्यास मदत होणार आहे. मुली
स्वत:च्या कर्तृत्त्वाने पुढे येतात
त्यामुळे त्यांना संधी मिळाली की त्या स्वत: पुढे जातात व इतरांनाही पुढे घेऊन जातात. महिला
ज्या क्षेत्रात पुढे आहेत त्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येतात. यावर्षीच
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे घोषवाक्य “प्रेस फॉर
प्रोग्रेस” असून याला अनुसरुन महिलांनी विकासासाठी
मागणी करुन पुढे यावे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून यावर्षी प्रयत्न करण्यात
येतील.
जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर ही चिंताजनक बाब असून त्याबाबत ठोस पाऊले उचलणे गरजेचे
असून प्रशासकीय यंत्रणा काम करीतच आहे मात्र
सामाजिक जाणीवेने महिलांनीही त्यादद्ल काम करणे अपेक्षित आहे.
आत्महत्याग्रस्त 15 हजार कुटुंबापैकी 2 हजार 500 महिलांना पुढच्या उपचारांची गरज
आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. तसेच किशोरवयीन मुलींच्या
सुदृढतेवर भर दिला जाणार आहे. महिलांची मतदान नोंदणी करुन घेण्यासाठी प्रशासन जास्तीत
जास्त प्रयत्न करीत. सोशल मिडीयातून महिलांविषयी चुकीच्या पोष्ट व्हायरल होणे
ही चिंताजनक बाब असून त्यावर सामूहिक उपाययोजना आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी श्री. गमे
यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, महिलांनी
स्वत: सक्षम होवून इतर महिलांना सोबत घेवून पुढे गेले पाहिजे. आपले एक मतदान न
केल्याने काय फरक पडतो म्हणून मतदान न करण्याची प्रवृती ग्रामीण भागात देखील वाढत
चालली आहे. त्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती यांनी महिलांमध्ये मतदानासाठी
जागृती करावी. चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी व लोकशाहीला बळकट करण्यासाठी
मतदान केले पाहिजे.
उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यावेळी म्हणाल्या की, महिलांनी निर्णय घ्यायला
शिकले पाहिजे, योग्य निर्णय घेण्यासाठी सतत जारूक राहिले पाहिजे. स्त्री ही कुठल्याही संकटाला सक्षमपणे
तोंड देते, त्यामुळे स्त्रियांनी एकत्र राहिले पाहिजे.
एक एक मत महत्त्वाचे असून प्रत्येकाने आपले मतदानाचे कर्तव्य बजावले पाहिजे,असे मत माजी सरकारी अभियोक्ता
श्रीमती. विद्या साखरे यांनी व्यक्त केले.
महिला उद्योजक श्रीमती. किरण देशमाने म्हणाल्या की, राज्यघटनेने दिलेला
मतदानाचा हक्क सर्वांनी बजावणे, योग्य व्यक्तीला मत देणे आवश्यक आहे. प्रत्येक
क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने काम करतात त्याप्रमाणे महिलांनी पुरुषाच्या
बरोबरीने मतदानासाठीही पुढे यावे, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचे धनादेश जयाबाई लक्ष्मण रसाळ, कोंडाबाई लिंबाजी
जाधव, उज्ज्वला विलास थोरात, सुनिता रामहरी शिन्दे यांना देण्यात आले. तसेच महिला नवमतदारांना मतदान
ओळखपत्राचे वाटपही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नायब तहसिलदार प्रियंका लोखंडे यांनी केले तर
प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी यांनी केले. आभार उपविभागीय अधिकारी चेतन
गिरासे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी महसूल विभागासह इतर विभागातील महिला अधिकारी-कर्मचारी,अंगणवाडी कर्मचारी मोठया संख्येने
उपस्थित होत्या.