Saturday, 2 May 2026

कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ; एआयच्या माध्यमातून लाभार्थी वाढवा पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी नियोजन,दुष्काळ तयारी, बी-बियाणे,खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर

कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ; एआयच्या माध्यमातून लाभार्थी वाढवा पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी नियोजन,दुष्काळ तयारी, बी-बियाणे,खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर धाराशिव,दि.२ मे (जिमाका) केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. अनेक शेतकरी आजही योजनांपासून वंचित आहेत.त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून योजनांची माहिती प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व तयारी २०२६ आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजीतसिंह पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,आमदार कैलास पाटील,आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड,महिला व बालकल्याण समिती सभापती पूजा शिंदे तसेच कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती भाऊसाहेब खरसडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की,कृषी विभागाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषीविषयक ॲप विकसित करून शेतकऱ्यांना त्यात सहभागी करावे.यामुळे पारदर्शकता वाढेल आणि योजनांची माहिती अधिक व्यापक पातळीवर पोहोचेल.हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता असून पर्जन्यमान कमी राहू शकते.परिणामी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.त्यामुळे आतापासूनच व्यापक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणीटंचाई,उशिरा होणारा पाऊस आणि संभाव्य संकट लक्षात घेऊन प्रशासनाने जनजागृतीसह उपाययोजनांची पूर्वतयारी ठेवावी,असेही त्यांनी सांगितले.राज्य शासनाने ३०० कोटी वृक्षलागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून पुढील वर्षी जिल्हा नियोजन समिती निधीतून यासाठी तरतूद केली जाईल. वृक्षलागवडीसाठी आवश्यक रोपे जिल्ह्यातच तयार व्हावीत,नर्सरी उभारणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे आणि यासाठी ठोस आराखडा तयार करावा,अशा सूचनाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या. आमदार कैलास पाटील यांनी प्रत्येक गावात कृषी विभागाचे ‘चावडी वाचन’ झाले पाहिजे,अशी भूमिका मांडली.यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या योजनांचा लाभ मिळाला,याची पारदर्शक माहिती गावपातळीवर उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी किट,वेळेत निविष्ठा,पेरणीविषयक मार्गदर्शन आणि १०० टक्के बीज प्रक्रिया उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाने पार पाडावी,असे त्यांनी सांगितले.बहुवार्षिक पिकांसाठी शेततळे योजनेचे प्रभावी नियोजन करून निधी उपलब्ध करून द्यावा,अशीही मागणी त्यांनी केली. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मार्च ते मे या कालावधीत घटणारा पाणीसाठा आणि संभाव्य दुष्काळी स्थितीवर आतापासूनच नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांची योजनानिहाय माहिती उपलब्ध करून दिल्यास लाभार्थ्यांवर अधिक प्रभावी देखरेख ठेवता येईल,असे त्यांनी सांगितले. आमदार प्रवीण स्वामी यांनी कृषी विभागाच्या माहिती प्रसारणातील त्रुटींवर बोट ठेवत अनेक शेतकरी आजही योजनांपासून वंचित असल्याचे नमूद केले.वंचित शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना प्राधान्याने योजनांचा लाभ द्यावा,अशी मागणी त्यांनी केली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोकरा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले. संबंधित गावांतील एकही शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही,यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.मोरे यांनी खरीप हंगाम २०२६ संदर्भातील सविस्तर माहिती सादर केली.त्यांनी सांगितले की,६ लाख ५० हजार २९ हेक्टर क्षेत्रासाठी १ लाख २९ हजार ८०८ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली असून त्यात सर्वाधिक १ लाख २४ हजार १६३ क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा समावेश आहे.९५ हजार ६०० मे.टन खतांची मागणी करण्यात आली असून सध्या ५८ हजार ८५२ मे.टन खत उपलब्ध आहे. उर्वरित ३६ हजार ७४८ मे.टन खतांची आवश्यकता आहे.एनपीके खताचा सर्वाधिक वापर होत असल्याने ४२ हजार ४०० मे.टन एनपीके खतांची मागणी करण्यात आली आहे.युरिया व डीएपी खतांचा १२०३ मे.टन संरक्षित साठा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय सन २०२५ मधील पर्जन्यमान, मार्च २०२६ मधील अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीमुळे झालेल्या शेती नुकसानीचा आढावा,ऊस उत्पादनात एआयचा वापर,तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांतील लाभार्थी व वितरित निधी याबाबतची माहितीही बैठकीत श्री.मोरे सादर केली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी नियोजन,तंत्रज्ञानाचा वापर,योजनांची पारदर्शक अंमलबजावणी आणि संभाव्य दुष्काळावर उपाययोजना यांवर केंद्रित झालेली ही बैठक जिल्ह्यातील कृषी व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरली. प्रारंभी पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजनांची माहिती व योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या धाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन केले. ******

आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहने पालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहने पालकमंत्र्यांनी केले लोकार्पण धाराशिव,दि.२ मे (जिमाका) जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक वाहनांचे पूजन व लोकार्पण १ मे रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड,पोलीस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात पूरस्थिती,दुष्काळ,आग किंवा इतर नैसर्गिक संकटांना वेगाने तोंड देण्यासाठी “गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या योजनेअंतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर आवश्यक साहित्य,यंत्रसामग्री आणि वाहने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली देण्यात आली होती.शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव,जिल्हा नियोजन समिती यांच्या निर्देशानुसार ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.या निविदा प्रक्रियेतून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासाठी शोध व बचाव कार्यासाठी जिल्हास्तरीय पथकाकरिता एक चारचाकी क्रूझर वाहन तसेच एक हायड्रॉलिक लॅडर वाहन खरेदी करण्यात आले आहे. चारचाकी क्रूझर वाहनामुळे आपत्कालीन परिस्थितीत दुर्गम,पूरग्रस्त किंवा आपत्तीग्रस्त भागात तातडीने पोहोचणे शक्य होणार आहे. दोरखंड,लाईफ जॅकेट,बोट व इतर बचाव साहित्य वाहून नेण्यासाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.आपत्तीच्या काळात जलद प्रतिसाद देण्यासाठी अशा सक्षम वाहनांची आवश्यकता महत्त्वपूर्ण मानली जाते.तसेच हायड्रॉलिक लॅडर वाहनामुळे उंच इमारती,टॉवर किंवा आग लागलेल्या स्थळी अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मोठी मदत मिळणार आहे. अग्निशमन,शोध व बचाव मोहिमा अधिक वेगाने आणि सुरक्षिततेने राबविण्यासाठी हे वाहन प्रभावी साधन ठरणार आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी ही वाहनसुविधा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यातील संकटसमयी नागरिकांच्या जीवितरक्षणासाठी प्रशासन अधिक सज्ज राहणार आहे.आधुनिक साधनसामग्रीच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात अधिक गतिमान,सक्षम आणि परिणामकारक बनत असल्याचे या उपक्रमातून दिसून येत असून,यामुळे जिल्ह्याची आपत्कालीन प्रतिसाद क्षमता अधिक प्रभावी होणार आहे. *******

Friday, 1 May 2026

"माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवू पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन * आरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा * माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा

"माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवू पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन * आरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा * माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा धाराशिव,दि.१ मे (जिमाका) आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी समाज घडविणे हीच प्रगतीची खरी दिशा आहे.नव्याने उभारलेल्या आरोग्य संस्थांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल,तर ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून प्रत्येक गाव निरोगी,सक्षम आणि स्वावलंबी करण्याचा संकल्प शासनाने हाती घेतला आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. आज १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री श्री.सरनाईक बोलत होते.यावेळी मंचावर मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील,आमदार कैलास पाटील घाडगे,आमदार प्रवीण स्वामी,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषा गायकवाड,महिला व बाल कल्याण समिती सभापती पूजा शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री.सरनाईक म्हणाले की,धाराशिव हा मराठवाड्यातील आकांक्षित जिल्हा असून दुष्काळप्रवण परिस्थिती,ग्रामीण लोकसंख्या आणि वाढती आरोग्य गरज लक्षात घेता आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण अत्यंत आवश्यक होते. लोहारा तालुक्यातील माकणी व कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह विविध आरोग्य उपकेंद्रांचे लोकार्पण ही जिल्ह्यासाठी महत्त्वाची पायरी आहे.या सुविधांमुळे माता-बाल आरोग्य,लसीकरण आणि प्राथमिक उपचार अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचतील. महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०२६ पासून सुरू केलेले ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान हे गावागावात स्वच्छ,निरोगी आणि सशक्त समाज घडविण्याचे व्यापक पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.या अभियानांतर्गत क्षयरोग,कुष्ठरोग,हिवताप, डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजारांवर नियंत्रणासोबतच मधुमेह,उच्च रक्तदाब, कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान,गर्भवती मातांची काळजी,बालकांचे लसीकरण आणि कुपोषण निर्मूलनावर विशेष भर दिला जाणार आहे.असे सांगितले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत,आरोग्य कर्मचारी,स्थानिक स्वराज्य संस्था,स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे सांगत पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी प्रत्येक गावाने स्पर्धात्मक भावनेने या उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन केले.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य,विभाग आणि जिल्हास्तरावर पुरस्कार दिले जाणार असल्याने गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी चालना मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “चला,आपण सर्व मिळून ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवूया आणि धाराशिव जिल्ह्याला निरोगी,सक्षम व आदर्श जिल्हा बनवूया, ”असे आवाहन करत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आरोग्य सुविधांचा प्रभावी वापर करून प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम सेवा पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. श्रीमती.अर्चना पाटील म्हणाल्या की,या अभियानाची आज सुरुवात होत आहे.दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व चार उपकेंद्रचे आज लोकार्पण होत आहे.जवळपास १७ कोटी रुपयांची ही कामे आहेत.सर्व गावांनी "माझ गाव आरोग्य संपन्न गाव " या अभियानात सहभागी व्हावे.धाराशिव हा आरोग्य सेवेत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.संस्थांतर्गत होणाऱ्या बाळंतपणावर आशाताईंना प्रत्येकी सहाशे रुपये देणारी ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद आहे. त्यामुळे आरोग्य संस्थेत बाळंतपणाचे प्रमाण वाढले आहे.मुलींचा जन्मदर देखील चांगला आहे.जिल्ह्यात आशाताई व आरोग्याच्या योजनांमुळे मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढले आहे.आशाताईंना आणखी सुविधा देऊन आरोग्य सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असे त्या म्हणाल्या. आरोग्य उपसंचालक डॉ.श्रीमती.रेखा गायकवाड यांनी ऑनलाइन सहभागी होऊन मार्गदर्शन केले. माकणी व कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ऑनलाईन पद्धतीने आयोजित या लोकार्पण सोहळ्याला लोकप्रतिनिधीनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले.कार्यशाळेला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्याला संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.तर जिल्हा नियोजन समिती सभागृहातून विविध विभागाचे अधिकारी -कर्मचारी आणि आशा सेविका उपस्थित होत्या. ******

जनगणना २०२७ स्वगणनेत धाराशिव जिल्हा राज्यात अग्रेसर ठरावा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे नागरिकांना आवाहन

जनगणना २०२७ स्वगणनेत धाराशिव जिल्हा राज्यात अग्रेसर ठरावा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे नागरिकांना आवाहन धाराशिव,दि.१ मे (जिमाका) महाराष्ट्र दिनाच्या ऐतिहासिक पर्वापासून राज्यात जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत असून जिल्ह्यातील नागरिकांनी घरबसल्या डिजिटल स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा गौरवशाली दिवस म्हणून साजऱ्या होणाऱ्या १ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यात जनगणना-२०२७ चा टप्पा क्रमांक १ सुरू होत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार सन २०२६-२७ मधील ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे.याअंतर्गत १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्व-गणना (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या स्वतःची माहिती अचूकपणे नोंदविण्याची संधी मिळणार असून प्रशासनाची कार्यक्षमता आणि पारदर्शकता अधिक वाढणार आहे.डिजिटल प्रणालीमुळे वेळेची बचत होऊन जनगणना प्रक्रिया अधिक वेगवान, सुटसुटीत आणि प्रभावी होणार आहे.जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेत डिजिटल स्वगणना पूर्ण करून राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी तसेच जिल्ह्याला राज्यात अग्रक्रमावर नेण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,असेही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नमूद केले. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग जिल्ह्याच्या प्रगतीचा नवा आदर्श निर्माण करेल,असा विश्वासही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ******

मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅबमुळे आरोग्य सेवेत नवी क्रांती ; नागरिकांना जलद,अचूक आणि विश्वासार्ह निदान सुविधा पालकमंत्री प्रताप सरनाईक पीसीआर मॉलिक्युलर व स्किल लॅबचे उद्घाटन

मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅबमुळे आरोग्य सेवेत नवी क्रांती ; नागरिकांना जलद,अचूक आणि विश्वासार्ह निदान सुविधा पालकमंत्री प्रताप सरनाईक पीसीआर मॉलिक्युलर व स्किल लॅबचे उद्घाटन धाराशिव दि.१ मे (जिमाका) आज ‘मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅब’ सारख्या अत्याधुनिक सुविधांविषयी बोलताना अत्यंत आनंद होत आहे.आरोग्य क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झालेली प्रगती ही आपल्या समाजासाठी मोठी देणगी आहे.आजच्या काळात आजारांचे निदान जितके लवकर आणि अचूक होईल,तितके उपचार अधिक प्रभावी होतात.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. आज १ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या पीसीआर मॉड्युलर लॅब व स्किल लॅबचे उद्घाटन पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मंचावर मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की, मॉलिक्युलर लॅबमध्ये DNA, RNA आणि जनुकीय स्तरावर तपासण्या केल्या जात असल्यामुळे आजारांचे निदान जलद, अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने करता येते.कोविड-१९, क्षयरोग (TB), एचआयव्ही,हिपॅटायटिस यांसारख्या गंभीर आजारांचे वेळेत निदान होणे अत्यंत गरजेचे असून ही सुविधा ते शक्य करून देते.या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकाच वेळी अनेक जंतू आणि विषाणूंची ओळख पटवता येते.एका पॅनेलमध्ये २५ ते १०० पर्यंत सूक्ष्मजंतू शोधण्याची क्षमता ही या प्रणालीची ताकद आहे.त्यामुळे रुग्णाला नेमका कोणता संसर्ग झाला आहे,हे त्वरीत समजते आणि योग्य उपचार देणे शक्य होते.असे श्री.सरनाईक यांनी सांगितले. विशेष म्हणजे,मल्टिप्लेक्स PCR पॅनेलच्या माध्यमातून श्वसन संक्रमण,जठरांत्र संक्रमण,मेंदूज्वर,सेप्सिस,ट्रॉपिकल फीव्हर यांसारख्या विविध आजारांचे एकाच वेळी परीक्षण करता येते असे सांगून श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,ही सुविधा आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि परिणामकारक बनवते.तसेच, अँटिबायोटिक प्रतिकार तपासणी ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज ठरत आहे.mecA, NDM, KPC यांसारख्या जनुकांची तपासणी करून औषधांना प्रतिकार करणारे जंतू ओळखता येतात.यामुळे डॉक्टरांना योग्य औषधोपचार निवडता येतात आणि रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होते.असे श्री.सरनाईक यावेळी म्हणाले. श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ४० पेक्षा अधिक तपासण्या एका प्लॅटफॉर्मवर करता येत असल्याने ही केवळ वैद्यकीय प्रगती नसून समाजाच्या आरोग्य सुरक्षेची हमी बनली आहे.अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता आणि गती दोन्ही वाढणार आहेत.सरकारच्या वतीने आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.नागरिकांना दर्जेदार, जलद आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आरोग्य सेवा अधिक व्यापक,सक्षम आणि परिणामकारक करण्याचा आमचा संकल्प असून प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील राहील,असेही पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले,या लॅबच्या माध्यमातून आजाराचे अचूक निदान होण्यास मदत होणार आहे. मोठी गुंतवणूक या लॅबसाठी झाली आहे. त्याचा परिपूर्ण उपयोग जिल्ह्यातील रुग्णांच्या आजारावरील निदानासाठी झाला पाहिजे.वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाची अडचण आहे,त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.चौदाशे ते पंधराशे बेड इथे उपलब्ध होणार आहे.त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई येथे बैठक घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून माहिती देताना अधिष्ठाता डॉ.चौहान म्हणाले की,जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ही लॅब रुग्ण सेवेच्या दृष्टीतून महत्त्वाची ठरणार आहे. कोविडसारख्या १०० हजाराचे निदान या मॉलिक्युलर लॅबच्या माध्यमातून होणार आहे.वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी या प्रयोगशाळेचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे फीत कापून प्रयोगशाळेचे उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान उपस्थित होते. कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस दलात नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस दलात नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होणार धाराशिव,दि.१ मे (जिमाका) जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता,गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नव्या वाहनांचे लोकार्पण आज १ मे महाराष्ट्र दिनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलिस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ च्या निधीतून ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे.या उपक्रमामुळे पोलीस विभागाच्या दैनंदिन कामकाजासह विशेष बंदोबस्त व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे.पोलीस दलासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या वाहनांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासाठी ५ स्कॉर्पिओ क्लासिक वाहने,प्रथम प्रतिसाद पथक (First Mobile) साठी ६ बोलेरो निओ वाहने,डायल ११२ अंतर्गत दुय्यम प्रतिसाद पथकासाठी १४ बोलेरो बेसिक मॉडेल वाहने तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी १ अशोक लेलँड ट्रकचा समावेश आहे. ही वाहने पायलटिंग,एस्कॉर्ट सेवा, व्हीआयपी बंदोबस्त,जयंती उत्सव, यात्रा बंदोबस्त तसेच विशेष सुरक्षा नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. नव्या वाहनांमुळे घटनास्थळी जलद पोहोचणे,आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत,कायदा व सुव्यवस्था राखणे आणि मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रभावी समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः डायल ११२ आणि प्रथम मोबाईल सेवांसाठी उपलब्ध होणारी वाहने नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित प्रतिसाद देण्यास उपयुक्त ठरणार असून ग्रामीण व शहरी भागातील पोलीस यंत्रणा अधिक बळकट होईल.आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध ट्रकमुळे नैसर्गिक आपत्ती,दुर्घटना किंवा बचावकार्याच्या वेळी आवश्यक साधनसामग्री त्वरीत पोहोचविणे शक्य होणार आहे.या वाहनांच्या लोकार्पणामुळे पोलीस दलाची आधुनिकता वाढून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम,सज्ज आणि प्रभावी यंत्रणा निर्माण होण्यास मदत होणार आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नव्या पोलीस वाहनांचे लोकार्पण केल्यानंतर नव्याने पोलिस दलात समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांपैकी स्कॉर्पिओ हे वाहन स्वतः पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी चालवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमस्थळी आगमन झाले.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर तसेच अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना ह्या सोबत होत्या.नव्या वाहनातून वरिष्ठ प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. वाहनांच्या लोकार्पण प्रसंगी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने पोलीस मैदानावर उपस्थित होते ******

समृद्ध,सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी धाराशिव विकासाच्या नव्या युगात पालकमंत्री प्रताप सरनाईक ६७ वा महाराष्ट्र स्थापना दिवस साजरा

समृद्ध,सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी धाराशिव विकासाच्या नव्या युगात पालकमंत्री प्रताप सरनाईक ६७ वा महाराष्ट्र स्थापना दिवस साजरा धाराशिव दि.१ मे (जिमाका) महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात विकास,डिजिटल परिवर्तन, उद्योगवाढ,आरोग्य सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुलभ,सुरक्षित आणि सन्मानपूर्ण बनत असून ‘समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने धाराशिव जिल्हा वेगाने पुढे जात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. आज १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ६७ व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्ताने मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना श्री. सरनाईक बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर,बुबा साहेब जाधव श्रीमती कलावती उमरे,श्रीमती भागीरथी कुकडे, भागीरथी गुरव,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती.अर्चना पाटील,उपाध्यक्षा श्रीमती.उषा गायकवाड,महिला व बाल कल्याण समिती सभापती पूजा शिंदे,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलिस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की, प्रशासनात डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना अधिक जलद,सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध होत आहेत. ‘डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड’,‘कल्पवृक्ष स्मार्ट जीआर’,‘जीवनरेखा’ आणि ‘तुळजाई चॅटबॉट’ यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जमिनीचे दाखले,विविध प्रमाणपत्रे,तक्रार निवारण आणि शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत अधिक सुलभतेने पोहोचत आहे.परिणामी वेळ,श्रम आणि आर्थिक खर्चात मोठी बचत होत आहे.औद्योगिक क्षेत्रात जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून गुंतवणूक वाढीस लागली असून हजारो रोजगार संधी निर्माण होत आहेत.विविध औद्योगिक क्लस्टर प्रकल्पांमुळे ‘आत्मनिर्भर धाराशिव’ या संकल्पनेला अधिक बळ मिळत असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,वाहतूक क्षेत्रातही राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मोठे बदल घडत आहेत.मागील वर्षभरात धाराशिव विभागात नव्या बसेसची वाढ झाली असून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना अधिक सुरक्षित,विश्वासार्ह आणि सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध झाली आहे. लवकरच ग्रामीण भागात ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू होणार असल्याने ग्रामीण वाहतुकीला नवी दिशा मिळणार आहे.पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे.‘आपली एसटी’ मोबाईल अॅपमुळे प्रवाशांना बसचे वेळापत्रक,मार्ग आणि सेवा माहिती सहज उपलब्ध होत आहे.असे श्री.सरनाईक यावेळी म्हणाले. आरोग्य क्षेत्रात जिल्ह्यात ऐतिहासिक बदल घडत असल्याचे सांगून श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,आधुनिक रुग्णालये, आयसीयू,एमआरआय,डायलिसिससह अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. ग्रामीण भागातही नव्या आरोग्य संस्थांची उभारणी सुरू असून “आरोग्य सेवा आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे.गृह,शेती आणि सामाजिक क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना,शिवभोजन योजना,उज्ज्वला गॅस योजना,मनरेगा आणि जल जीवन मिशनसारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुरक्षित,सन्मानपुर्ण आणि सुलभ बनत आहे.असे त्यांनी सांगितले. शेतकरी बांधवांसाठी कृषी,सिंचन, पीकविमा,तंत्रज्ञानाधारित शेती आणि नैसर्गिक शेती उपक्रमांमुळे शेती अधिक सक्षम होत आहे.असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे कृषी क्षेत्रातही नवे परिवर्तन घडत आहे. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रस्ते,पाणीपुरवठा,पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासकामांना गती मिळाली असून जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे.महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून विकास,सामाजिक न्याय,लोककल्याण आणि आत्मनिर्भरतेच्या सामूहिक निर्धाराचा दिवस असल्याचा संदेश देत नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा.विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि समृद्ध,सक्षम व प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी हातभार लावावा,असे आवाहन पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमस्थळी आगमन होताच प्रारंभी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी राष्ट्रध्वजारोहण केले.पोलिस पथकाने राष्ट्रगान,राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले व राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.पालकमंत्री व मान्यवरांनी शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहिली. पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या हस्ते कळंब तालुक्यातील शिराढोण येथील ग्राम महसूल अधिकारी विनोद चुकेवाड यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत पडवळ यांनी केले. ******

Sunday, 26 April 2026

टीबी मुक्त भारत अभियानाला गती ; १०० दिवसीय मोहिमेत तपासणी शिबिरांसह क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप

टीबी मुक्त भारत अभियानाला गती ; १०० दिवसीय मोहिमेत तपासणी शिबिरांसह क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप धाराशिव दि.२६ एप्रिल (जिमाका) टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापकस्तरावर जनजागृती, तपासणी आणि उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जोखीमग्रस्त गावांमधील १४ वर्षांवरील सर्व नागरिकांची एक्स-रे तपासणी करण्यात येत असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावागावांत विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे. २४ मार्च २०२६ पासून आयुष्मान आरोग्य मंदिर येथे सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत ३६ तपासणी कॅम्प यशस्वीरित्या पार पडले आहेत.या शिबिरांमध्ये एकूण ३ हजार ९१७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून संभाव्य क्षयरुग्णांचे लवकर निदान करण्यावर विशेष भर दिला जात आहे. आरोग्य विभागामार्फत गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,आपल्या गावात टीबी तपासणी कॅम्प आयोजित झाल्यास प्रत्येकाने एक्स-रे तपासणी करून घ्यावी,जेणेकरून क्षयरोगाचे वेळेत निदान होऊन उपचार सुरू करता येतील.या अभियानांतर्गत निदान झालेल्या क्षयरुग्णांना पोषणमूल्ययुक्त आहार उपलब्ध व्हावा यासाठी फूड बास्केट / पोषण आहार किटचे वितरण करण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी निक्षय मित्र म्हणून पुढाकार घेत ३० क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले आहे. क्षयरुग्णांच्या आरोग्य पुनर्वसनासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनीही निक्षय मित्र बनून पोषण आहार किट वाटपासाठी पुढे यावे,असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. टीबी मुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी प्रशासन, आरोग्य विभाग आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न अधिक प्रभावी ठरत असून या उपक्रमामुळे क्षयरुग्णांना उपचारासोबतच पोषणाचा आधारही मिळत आहे. *****

ाजी सैनिक कुटुंबीयांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी ; महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया

माजी सैनिक कुटुंबीयांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी ; महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया धाराशिव दि.२६ एप्रिल (जिमाका) महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को),पुणे यांच्या वतीने माजी सैनिकांच्या पत्नी,विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्यांसाठी महिला सुरक्षा रक्षक पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. धाराशिव येथे कंत्राटी पद्धतीने महिला सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार असून इच्छुक पात्र उमेदवारांना आकर्षक मासिक वेतनासह विविध शासकीय लाभ मिळणार आहेत.या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दर सहा महिन्यांनी वाढीव महागाई भत्ता,कामगार कायद्यानुसार ईपीएफ,ईएसआय,ग्रॅज्युइटी आदी सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत.माजी सैनिक पत्नी,माजी सैनिक विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्यांनी या भरती प्रक्रियेसाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिव येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२२२५५७ किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ७५८८५२७५५४ वर संपर्क साधता येईल.तसेच श्री.गंगाधर गायकवाड यांच्याशी ९४२२३०७५९३ या क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे. माजी सैनिक कुटुंबीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व महिलांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही भरती मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असून पात्र महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे. *****

"शिका व कमवा" उपक्रमांतर्गत धाराशिवमध्ये २९ एप्रिल रोजी रोजगार मेळावा ; युवावर्गासाठी संधी

"शिका व कमवा" उपक्रमांतर्गत धाराशिवमध्ये २९ एप्रिल रोजी रोजगार मेळावा ; युवावर्गासाठी संधी धाराशिव दि.२६ एप्रिल (जिमाका) कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मासिक रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट ड्राइव्ह तथा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बुधवार,२९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिव येथे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि.यांच्या "शिका व कमवा" (Learn & Earn) योजनेअंतर्गत तरुणांसाठी कौशल्य विकासाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग यांच्या सहकार्याने उमेदवारांना जागतिक दर्जाचे निवासी तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ऑटोमोटिव्ह वेल्ड टेक्निशियन,ऑटोमोटिव्ह पेंट टेक्निशियन,ऑटोमोटिव्ह असेंब्ली टेक्निशियन आणि मेकॅट्रॉनिक्स टेक्निशियन यांसारखे विविध तांत्रिक कोर्सेस उपलब्ध आहेत.या प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा असून प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी सुमारे १५ हजार ८१५ रुपये,तर दुसऱ्या वर्षी १७ हजार ६४५ रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना निवासी सुविधा, राहण्याची सोय,संगणक कक्ष,क्रीडा सुविधा आदी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे संबंधित कंपनीमध्ये नियमित नोकरीची संधी देखील मिळणार आहे. या रोजगार मेळाव्यासाठी १८ ते २० वर्षे वयोगटातील १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील. उमेदवारांना मराठी,हिंदी किंवा इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी बुधवार,२९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव येथे प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राइव्हचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव यांनी केले आहे. *****