Friday, 1 May 2026
जनगणना २०२७ स्वगणनेत धाराशिव जिल्हा राज्यात अग्रेसर ठरावा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे नागरिकांना आवाहन
जनगणना २०२७ स्वगणनेत धाराशिव जिल्हा राज्यात अग्रेसर ठरावा
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे नागरिकांना आवाहन
धाराशिव,दि.१ मे (जिमाका) महाराष्ट्र दिनाच्या ऐतिहासिक पर्वापासून राज्यात जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत असून जिल्ह्यातील नागरिकांनी घरबसल्या डिजिटल स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा गौरवशाली दिवस म्हणून साजऱ्या होणाऱ्या १ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यात जनगणना-२०२७ चा टप्पा क्रमांक १ सुरू होत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार सन २०२६-२७ मधील ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे.याअंतर्गत १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्व-गणना (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या स्वतःची माहिती अचूकपणे नोंदविण्याची संधी मिळणार असून प्रशासनाची कार्यक्षमता आणि पारदर्शकता अधिक वाढणार आहे.डिजिटल प्रणालीमुळे वेळेची बचत होऊन जनगणना प्रक्रिया अधिक वेगवान, सुटसुटीत आणि प्रभावी होणार आहे.जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेत डिजिटल स्वगणना पूर्ण करून राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी तसेच जिल्ह्याला राज्यात अग्रक्रमावर नेण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,असेही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग जिल्ह्याच्या प्रगतीचा नवा आदर्श निर्माण करेल,असा विश्वासही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
******