Sunday, 26 April 2026
टीबी मुक्त भारत अभियानाला गती ; १०० दिवसीय मोहिमेत तपासणी शिबिरांसह क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप
टीबी मुक्त भारत अभियानाला गती ; १०० दिवसीय मोहिमेत तपासणी शिबिरांसह क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप
धाराशिव दि.२६ एप्रिल (जिमाका) टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापकस्तरावर जनजागृती, तपासणी आणि उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जोखीमग्रस्त गावांमधील १४ वर्षांवरील सर्व नागरिकांची एक्स-रे तपासणी करण्यात येत असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावागावांत विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
२४ मार्च २०२६ पासून आयुष्मान आरोग्य मंदिर येथे सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत ३६ तपासणी कॅम्प यशस्वीरित्या पार पडले आहेत.या शिबिरांमध्ये एकूण ३ हजार ९१७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून संभाव्य क्षयरुग्णांचे लवकर निदान करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
आरोग्य विभागामार्फत गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,आपल्या गावात टीबी तपासणी कॅम्प आयोजित झाल्यास प्रत्येकाने एक्स-रे तपासणी करून घ्यावी,जेणेकरून क्षयरोगाचे वेळेत निदान होऊन उपचार सुरू करता येतील.या अभियानांतर्गत निदान झालेल्या क्षयरुग्णांना पोषणमूल्ययुक्त आहार उपलब्ध व्हावा यासाठी फूड बास्केट / पोषण आहार किटचे वितरण करण्यात येत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी निक्षय मित्र म्हणून पुढाकार घेत ३० क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले आहे. क्षयरुग्णांच्या आरोग्य पुनर्वसनासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनीही निक्षय मित्र बनून पोषण आहार किट वाटपासाठी पुढे यावे,असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
टीबी मुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी प्रशासन, आरोग्य विभाग आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न अधिक प्रभावी ठरत असून या उपक्रमामुळे क्षयरुग्णांना उपचारासोबतच पोषणाचा आधारही मिळत आहे.
*****