Saturday, 7 February 2026
“हरित मतदान केंद्र” उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि लोकशाहीचा सुंदर संगम
“हरित मतदान केंद्र” उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि लोकशाहीचा सुंदर संगम
धाराशिव दि.७ फेब्रुवारी (जिमाका) आज जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले.यानिमित्ताने नागरिकांमध्ये मतदानाबाबत जाणीव- जागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग व प्रादेशिक वन विभागामार्फत जिल्ह्यात “हरित मतदान केंद्र” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत धाराशिव तालुक्यातील शेकापूर प्राथमिक शाळा आणि तुळजापूर तालुक्यातील हंगरगावडी प्राथमिक शाळा येथे हरित मतदान केंद्रे उभारण्यात आली.या मतदान केंद्रांवर रोपवाटिकेतील स्थानिक प्रजातींच्या रोपांच्या सहाय्याने परिसर हिरवागार करण्यात आला होता.
पर्यावरणपूरक सजावटीमुळे मतदान केंद्राचा संपूर्ण परिसर आकर्षक व नैसर्गिक वातावरणाने नटलेला दिसून आला.मतदारांमध्ये पर्यावरण संवर्धन व मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या केंद्रांवर विविध माहितीपर फ्लेक्स लावण्यात आले होते.या फ्लेक्सच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे महत्त्व,वृक्षतोडीचे दुष्परिणाम तसेच मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.वृक्ष लावा – पर्यावरण वाचवा आणि मतदान करा – लोकशाही बळकट करा असा दुहेरी संदेश या उपक्रमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या हरित मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विशेष सेल्फी पॉइंटची देखील व्यवस्था करण्यात आली होती.नैसर्गिक वातावरणात मतदान करण्याचा अनुभव घेत मतदारांनी उत्साहाने सेल्फी काढले व या अभिनव उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शेकापूर येथील हरित मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत नागरिकांना वृक्षलागवड व संवर्धनासाठी प्रोत्साहित करण्यात आले.एकूणच,हा “हरित मतदान केंद्र” उपक्रम मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरला.पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही कर्तव्य यांचा सुंदर संगम साधण्यात सामाजिक वनीकरण विभाग व वन विभागाला यश आले.
*****
Friday, 6 February 2026
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३ ‘कोरडे दिवस’ ; मतदान व मतमोजणी काळात मद्यविक्री बंद
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३ ‘कोरडे दिवस’ ; मतदान व मतमोजणी काळात मद्यविक्री बंद
धाराशिव दि.६ फेब्रुवारी (जिमाका) राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद धाराशिव तसेच धाराशिव,कळंब,भूम,परांडा,वाशी, तुळजापूर,उमरगा व लोहारा या ८ पंचायत समिती सदस्यांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक प्रक्रिया खुल्या,मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी तसेच सार्वजनिक शांतता व कायदा - सुव्यवस्था अबाधित राहावी,या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकार वापरून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रांमध्ये मद्यविक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
हे आदेश महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, नोंदवहया इत्यादी) नियम १९६९ मधील नियम ९ (अ) मधील २ (क) (२) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम,१९४९ चे कलम १४२ (१) अन्वये देण्यात आले आहेत.
या आदेशानुसार दि.६ फेब्रुवारी २०२६ (मतदानाचा आदला दिवस) रोजी संबंधित निर्वाचन क्षेत्रांमध्ये (संबंधित ठिकाणचे नगरपरिषद,नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्र वगळता) संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे.दि.७ फेब्रुवारी २०२६ (मतदानाचा दिवस) रोजी संबंधित निर्वाचन क्षेत्रांमध्ये (नगरपरिषद, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्र वगळता) संपूर्ण दिवस बंदी राहील,तर दि.९ फेब्रुवारी २०२६ (मतमोजणीचा दिवस) रोजी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात मद्यविक्री संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत देशी व विदेशी मद्याच्या घाऊक व किरकोळ विक्रीच्या तसेच ताडी विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या — नमुना एफएल-१,एफएल-२,एफएल-३, एफएल-४ (क्लब अनुज्ञप्ती),एफएल/बीआर-२,सीएल-२,सीएल-३,सीएल/एफएल,टिओडी-३,टिडी-१ इत्यादी बंद राहणार आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा,१९४९ मधील कलम ५४ व ५६ मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
******
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाचे दरवाजे खुले ; परदेशी उच्च शिक्षणासाठी ४० जणांना शिष्यवृत्ती
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाचे दरवाजे खुले ; परदेशी उच्च शिक्षणासाठी ४० जणांना शिष्यवृत्ती
धाराशिव दि.६ फेब्रुवारी (जिमाका) अनुसूचित जमाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांच्या गुणवत्तेला जागतिक स्तरावर वाव मिळावा,या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत “परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” योजना राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी ४० गुणवंत आदिवासी तरुण-तरुणींना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार असून,इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेंतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.या शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण व परीक्षा शुल्क,निर्वाह भत्ता (निवास व भोजन),शैक्षणिक आकस्मिक व इतर खर्च,विमान प्रवास खर्च,व्हिसा शुल्क तसेच आरोग्य विमा यांचा समावेश आहे. शैक्षणिक आकस्मिक किंवा इतर खर्चासाठी युएसए व इतर देशांसाठी (युके वगळून) दरवर्षी १५०० युएस डॉलर,तर युकेसाठी दरवर्षी ११०० जीबीपी इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असणे तसेच संबंधित विद्यापीठाची क्यूएस वर्ल्ड रँकिंग २०० च्या आत असणे बंधनकारक आहे.विहित निकषानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास उत्पन्न मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत शिथिल करण्यात येईल, तसेच क्यूएस वर्ल्ड रँकिंग मर्यादा २०० पासून पुढे चढत्या क्रमाने ३०० पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या TOEFL,IELTS किंवा तत्सम प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे.
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज http://fs.maharashtra.gov.in� या अधिकृत संकेतस्थळावर भरावा लागणार असून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.निवड समितीमार्फत सर्व निकष पूर्ण करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.योजनेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाकडून करण्यात आले आहे.
योजनेचे पात्रता निकष : विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा ३५ वर्षे,तर पीएचडी अभ्यासक्रमासाठी ४० वर्षे.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत. TOEFL, IELTS किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. दरम्यान,“राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडी,पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.
त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या परदेशातील उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना बळ मिळते.सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षात ४० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड केली जाणार असून,इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करावेत,असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.
******
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून २,४८३ रुग्णांवर मोफत उपचार ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव ठरले अव्वल
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून २,४८३ रुग्णांवर मोफत उपचार ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव ठरले अव्वल
धाराशिव दि.६ फेब्रुवारी (जिमाका) आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव यांनी उल्लेखनीय कामगिरी करत नविन वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांत एकूण २,४८३ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून शासनाकडे तब्बल ३ कोटी ७४ लाख २५ हजार २११ रुपये इतकी विमा रक्कम जमा झाली आहे.
या योजनेतर्गत सन २०२३ मध्ये ८६१ रुग्णांवर,सन २०२४ मध्ये १,०५० रुग्णांवर तर सन २०२५ मध्ये लक्षणीय वाढ होऊन एकूण २,४८३ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.ही आकडेवारी नविन वैद्यकीय महाविद्यालयांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव यांची असून रुग्णालयाच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे द्योतक आहे.
या यशामागे अधिष्ठाता डॉ.शैलेन्द्र चौहान यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ, डॉ.स्मिता गवळी व अधिसेविका यांचे काटेकोर नियोजन, प्रशासन व समन्वय महत्त्वाचा ठरला.अधिष्ठाता यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षात २,४८३ रुग्णांना या योजनेचा मोफत लाभ मिळाला.
मेडिसीन,सर्जरी,बालरोग,अस्थिरोग, स्त्रीरोग,नेत्ररोग,ईएनटी, अॅनस्थेसिया,रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी,बायोकेमिस्ट्री व मायक्रोबायोलॉजी या सर्व विभागांचे या यशात मोलाचे सहकार्य लाभले. तसेच विभाग प्रमुख डॉ. प्रविणकुमार गोवंदे,निवासी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय समन्वयक डॉ. दत्ता चौरे व डॉ.साजीद शेख,डेटा एन्ट्री ऑपरेटर श्री.सत्यजित मुळे, श्री. सदाशिव कांबळे व सारिका शिंगाडे,तसेच आरोग्य मित्र व स्टाफ नर्सेस यांनी सातत्याने मेहनत घेतली. योजनेचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या मार्गदर्शनामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे सामान्य रुग्णांपर्यंत पोहोचली.सध्यस्थितीत रुग्णालयात आधुनिक उपचार यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आली असून प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स,नियमित वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून दररोज रुग्ण तपासणी व उपचार समाधानकारक पद्धतीने सुरू आहेत.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून उपचारांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्येही रुग्णालयाचा उत्स्फूर्त सहभाग असून समाजात आरोग्यविषयक जनजागृतीत रुग्णालयाची महत्त्वाची भूमिका आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातून शस्त्रक्रिया व विविध आजारांवरील उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण येथे दाखल होत आहेत.उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून रुग्णालय व्यवस्थापन रुग्णांना मोफत सेवा देण्यासाठी सतत कार्यरत आहे.शासनाच्या योजनांचा लाभ रुग्णांना सहज मिळावा यासाठी यंत्रणा सदैव सतर्क ठेवून योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जात आहेत.यामुळेच नविन असले तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव हे कार्यक्षमतेत अव्वल ठरले आहे.
******
बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
धाराशिव दि.६ फेब्रुवारी (जिमाका) बौद्धिकदृष्ट्या अक्षम आणि मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद व नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर येथे करण्यात आले.हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा न्यायाधीश श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मानसिक आजार व बौद्धिक अक्षमता असलेल्या व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजना,त्यांचे हक्क व संरक्षण याबाबत सखोल मार्गदर्शन केले. दिव्यांग व्यक्तींनी कायदेशीर सल्ला व मार्गदर्शनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मोफत टोल फ्री क्रमांक १५१००,तसेच बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक विकलांग व्यक्तींसाठी मदत क्रमांक १४४४६ याबाबत उपस्थितांमध्ये जागृती करण्यात आली. तसेच बालकांसाठीच्या मदत वाणी (हेल्पलाईन) १०९८ विषयी माहिती देऊन दिव्यांग बालकांच्या प्रलंबित प्रश्नांची माहिती जाणून घेऊन ते प्रश्न संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती त्यांनी केली.
या कार्यक्रमास अखिल भारतीय अपंग कल्याणकारी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव,नागनाथ निवासी मतिमंद विद्यालयाचे सचिव राजेंद्र जाधव, मुख्याध्यापिका जयश्री कदम, नवनाथ निवासी विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग जाधव,उपमुख्य न्यायरक्षक अभय पाथ्रूडकर,सहाय्यक न्यायरक्षक शुभम गाडे,पॅनल विधिज्ञ विश्वजीत शिंदे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कायद्याची माहिती नसल्यामुळे अनेकजण आपल्या हक्कांपासून वंचित राहतात. त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव उपलब्ध असून मोफत विधिज्ञ व मोफत कायदेविषयक सल्ल्यासाठी नागरिकांनी संपर्क साधावा,असे मार्गदर्शन उपमुख्य न्यायरक्षक ॲड.अभय पाथरूडकर यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या दिव्यांगांसाठीच्या योजना,विविध उपक्रम तसेच बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सहाय्यक न्यायरक्षक ॲड. शुभम गाडे यांनी आपल्या भाषणातून दिली.
अन्न हे शरीराचे पोषण करते आणि शिक्षण हे मनाचे पोषण करते.दोन्ही हक्क एकमेकांना पूरक असून भुकेले मूल शाळेत लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि अशिक्षित व्यक्ती स्वतःसाठी पुरेसे अन्न मिळवू शकत नाही,असे महत्त्वपूर्ण विचार ॲड. विश्वजित शिंदे यांनी आपल्या भाषणात मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक विनोद लांडगे यांनी केले,तर कार्यक्रमाच्या फलप्राप्तीचे महत्त्व सांगून शिक्षक सुधाकर कोळगे यांनी आभार मानले.या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक,विद्यार्थी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
Thursday, 5 February 2026
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रात मोबाईलला बंदी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक
७ फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रात मोबाईलला बंदी
धाराशिव,दि.५ फेब्रुवारी (जिमाका)
राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांनी २९ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.या कार्यक्रमानुसार धाराशिव जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत असलेल्या ८ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका निश्चित वेळापत्रकानुसार होणार आहेत.
जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार,जिल्ह्यातील एकूण १३๐८ मतदान केंद्रांवर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पडावी,यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.
या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेत शिस्त व गोपनीयता राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून,मतदानाच्या दिवशी उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच मतदार यांना मोबाईल (भ्रमणध्वनी) घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.मतदान प्रक्रियेवर कोणताही अनुचित प्रभाव पडू नये तसेच मतदानाची गोपनीयता अबाधित राहावी,या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
तथापि,नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, मतदानासाठी येताना मोबाईल फोन सोबत आणू नयेत.मतदान केंद्रात प्रवेश करताना मोबाईल फोन आढळून आल्यास प्रवेश नाकारला जाईल याची मतदारांनी नोंद घ्यावी.
जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणेमार्फत सर्व मतदारांनी निर्भयपणे,शांततेत व नियमांचे पालन करून मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून,जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानात सहभाग नोंदवावा,असेही प्रशासनाने केले आहे.
*****
मतदानाच्या दिवशी शांतता राखण्यासाठी जिल्ह्यातील १५ आठवडी बाजार बंद
मतदानाच्या दिवशी शांतता राखण्यासाठी जिल्ह्यातील १५ आठवडी बाजार बंद
धाराशिव,दि.५ फेब्रुवारी (जिमाका)जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ अनुषंगाने मतदान प्रक्रिया शांततेत,निर्भय व सुरळीत पार पडावी,या उद्देशाने जिल्ह्यातील ६ तालुक्यातील १५ आठवडी बाजार ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील धाराशिव,तुळजापूर,उमरगा,लोहारा, भूम,परंडा,कळंब व वाशी या पंचायत समित्यांमध्ये मतदान होणार आहे.
मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या आदेशानुसार धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ.), जागजी,बामणी; तुळजापूर तालुक्यातील निलेगाव,जळकोट,आरळी (बुद्रुक); उमरगा तालुक्यातील तुरोरी,समुद्राळ, केसर जवळगा;भूम तालुक्यातील ईट; कळंब तालुक्यातील मंगरुळ,नायगाव, पिंपळगाव (कोठावळा); तसेच वाशी तालुक्यातील तेरखेडा व बावी या १५ गावांतील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी भरविण्यात येणार नाहीत.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
****
ओबीसी,विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी : वसतिगृह व विविध योजनांचे प्रवेश अर्ज सुरू
ओबीसी,विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी : वसतिगृह व विविध योजनांचे प्रवेश अर्ज सुरू
धाराशिव,दि.५ फेब्रुवारी (जिमाका) इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत प्रवेश अर्ज सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आले आहेत.
बी.ए.,बी.कॉम.,बी.एस्सी.तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सन २०२५-२०२६ साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे.प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी दि.६ ते १५ फेब्रुवारी २०२६ असा असून,अर्ज छाननीचा कालावधी दि.१६ ते १८ फेब्रुवारी २०२६ राहील. पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करून २० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.वरीलप्रमाणे जिल्ह्यात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून १०० विद्यार्थी क्षमतेचे मुला व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृह,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.
ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org� या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वरील वेळापत्रकानुसार अर्ज करावेत,असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव यांनी केले आहे.
******
Wednesday, 4 February 2026
आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी बनावट नियुक्ती आदेशांचा पर्दाफाश आरोग्य विभागाचे उमेदवारांना सतर्कतेचे आवाहन
आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी बनावट नियुक्ती आदेशांचा पर्दाफाश
आरोग्य विभागाचे उमेदवारांना सतर्कतेचे आवाहन
धाराशिव,दि.४ फेब्रुवारी (जिमाका) : आरोग्य सेवक (पुरुष) या पदासाठी बनावट नियुक्ती आदेश देऊन फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून,यासंदर्भात एका वृत्तपत्रात दिनांक ०४.०२.२०२६ रोजी बातमी प्रसिद्ध झाली आहे.या प्रकरणात अज्ञात व्यक्तीने आरोग्य विभागाच्या खोट्या लेटरपॅडचा वापर करून,संगणकाच्या सहाय्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या खोट्या व बनावट सह्या एडिट केल्या आहेत.तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या स्वाक्षरीचे असल्याचे भासवून जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे रिक्त पदावर रुपये २९,२०० ते ९२,३०० या वेतनश्रेणीत नियुक्ती आदेश दिल्याचे दिसून आले आहे. या बनावट आदेशांबाबत प्रसारमाध्यमांत वृत्त प्रसारित झाले आहे.
जिल्हा परिषद,धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन-२०२३ साठी जाहिरात क्र. १/२०२३ दिनांक ०५.०८.२०२३ च्या अनुषंगाने विविध संवर्गातील एकूण ४५३ पदे सरळसेवा पदभरतीसाठी प्रस्तावित करण्यात आली होती.यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के व आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी IBPS,मुंबई यांच्यामार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीअंती अंतिम निवड यादीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची सर्व माहिती जिल्हा परिषदेच्या व एनआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने उमेदवारांना आवाहन केले आहे की, अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केलेल्या आदेशांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहिती केवळ जिल्हा परिषद व एनआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात आलेली असून,त्याचे आवलोकन करावे.कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये.तसेच अधिक माहितीसाठी आरोग्य विभाग,जिल्हा परिषद,धाराशिव या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.आरोग्य विभाग अशा प्रकारच्या फसवणूक प्रकरणाचे समर्थन करीत नाही.या फसवणुकीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असण्याची दाट शक्यता असून,त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाची नाहक बदनामी झाली आहे.
तरी या प्रकरणाची सविस्तर पोलिस चौकशी करून,उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे खोटे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी,असे निवेदन आरोग्य विभागाकडून पोलीस अधीक्षक,धाराशिव यांना देण्यात आले आहे.
*****
Tuesday, 3 February 2026
पदापेक्षा माणुसकी मोठी असते… जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आदर्श निमित्त होते स्विय सहायकाच्या सेवानिवृतीचे
पदापेक्षा माणुसकी मोठी असते…
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आदर्श
निमित्त होते स्विय सहायकाच्या सेवानिवृतीचे
धाराशिव दि.३ फेब्रुवारी (जिमाका) २ फेब्रुवारी रोजी एक प्रसंग पाहायला व अनुभवायला मिळाला,जो पद,अधिकार आणि प्रशासनाच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचे खरे दर्शन घडवणारा ठरला.जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या संवेदनशील,आपुलकीच्या आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा आली.
सेवेची तब्बल ३५ वर्षे पूर्ण करून जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक श्री.दत्तात्रय कुलकर्णी २ फेब्रुवारी रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. प्रशासनात कार्यरत असताना त्यांनी प्रामाणिकपणे,निष्ठेने व समर्पित भावनेने आपली जबाबदारी पार पाडली.अशा निष्ठावान कर्मचाऱ्याचा सन्मान हा केवळ औपचारिक न राहता,मनापासूनचा असावा,याचे जिवंत उदाहरण २ फेब्रुवारी रोजी पाहायला मिळाले.सेवापूर्ती कार्यक्रमानंतर सायंकाळी ७.३० वाजता जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी एक अत्यंत भावस्पर्शी निर्णय घेतला.स्वतःच्या शासकीय वाहनात,श्री.कुलकर्णी साहेबांना स्वतःच्या जागेवर बसवून,स्वतः मात्र समोर सुरक्षा रक्षकाच्या जागेवर बसून त्यांना घरी सुखरूप पोहोचवले आणि त्यानंतरच आपल्या शासकीय निवासस्थानी परतले.
हा केवळ एक प्रसंग नव्हता,तर
अधिकारी–कर्मचारी नात्यातील जिव्हाळा, प्रामाणिकपणाला मिळालेली माणुसकीची पावती आणि नेतृत्व म्हणजे काय याचा आदर्श ठरलेला क्षण होता.अधिकारी असूनही कर्मचाऱ्यांवर कुटुंबातील सदस्यासारखे प्रेम करणारे,त्यांच्या कार्याचा आदर करणारे आणि माणुसकी जपणारे जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार अनेकांच्या मनात आदराने घर करून गेले.अशा संवेदनशील,माणुसकीने भरलेल्या नेतृत्वाला मनापासून वंदन.
*******
Subscribe to:
Posts (Atom)






