Thursday, 5 February 2026

मतदानाच्या दिवशी शांतता राखण्यासाठी जिल्ह्यातील १५ आठवडी बाजार बंद

मतदानाच्या दिवशी शांतता राखण्यासाठी जिल्ह्यातील १५ आठवडी बाजार बंद धाराशिव,दि.५ फेब्रुवारी (जिमाका)जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ अनुषंगाने मतदान प्रक्रिया शांततेत,निर्भय व सुरळीत पार पडावी,या उद्देशाने जिल्ह्यातील ६ तालुक्यातील १५ आठवडी बाजार ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील धाराशिव,तुळजापूर,उमरगा,लोहारा, भूम,परंडा,कळंब व वाशी या पंचायत समित्यांमध्ये मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या आदेशानुसार धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ.), जागजी,बामणी; तुळजापूर तालुक्यातील निलेगाव,जळकोट,आरळी (बुद्रुक); उमरगा तालुक्यातील तुरोरी,समुद्राळ, केसर जवळगा;भूम तालुक्यातील ईट; कळंब तालुक्यातील मंगरुळ,नायगाव, पिंपळगाव (कोठावळा); तसेच वाशी तालुक्यातील तेरखेडा व बावी या १५ गावांतील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी भरविण्यात येणार नाहीत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ****