Thursday, 24 August 2017

राज्यस्तर युवा पुरस्कार  सन 2016-17 साठी प्रस्ताव दाखल करावेत
उस्मानाबाद.दि.24:- राज्यात सामजिक क्षेंत्रात कार्य केलेल्या युवक -युवती व संस्थांचा यथोचित गौरव करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत दरवर्षी राज्यस्तर युवा पुरस्कार देण्यात येतो. राज्यातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी   प्रत्येक विभागातून एक युवक, एक युवती, एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतील. या युवक /युवती पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम  पन्नास हजार रुपये, संस्थेसाठी पुरस्काराचे स्वरूप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम  एक लाख  असे असेल.या पुरस्कारासाठी यापुर्वी प्रस्ताव मागविलेले आहेत. परंतू पुरेसे प्रस्ताव प्राप्त न झाल्यामुळे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
या पुरस्कारासाठी युवक/युवतीस अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण  व शहरी  भागात  केलेले सामाजिक कार्य, राज्याचे  साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र  उभारणीच्या विकासाठी सहाय्यभुत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसुचीत जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण सांस्कृतिक कला, क्रीडा मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभुण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वागीण विकासासाठी  केलेले कार्य. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण बाबतचे कार्य असावे.
 पुरस्काराच्या अटी व शर्ती, पात्रता, अर्ज  याबाबत सविस्तर माहिती संचालनालयाच्या संकेतस्थळ www.maharashtra.gov.in यावर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या 201311121122043321 या संकेतांकावर उपलब्ध आसून. याबाबत सविस्तर माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद यांचेशी संपर्क साधावा व  युवक/युवती/संस्था यांनी पुरस्कारासाठीचे परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 28 ऑगस्ट  2017 पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, मुदतीनंतर आलेल्या प्रस्तावांची शिफारस कोणत्याही परिस्थितीत करण्यात येणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा उदघाटन समारंभ संपन्न

                   

उस्मानाबाद,दि. 24:- राष्ट्रीय  अंधत्व  नियंत्रण कार्यक्रम  अंर्तगत दि. 25 ऑगस्ट  ते 08 सप्टेंबर 2017 या  कालावधीत  32 वा  राष्ट्रीय  नेत्रदान पंधरवाडा  साजरा  करण्यात येत असून जिल्हा रुग्णालयात नेत्रदान पंधरवाडा  समारंभाचे उदघाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ.धनंजय पाटील व मोतिबिंदु शस्त्रक्रिया झालेले रुग्ण यांच्या हस्ते दिप प्रज्वलन तसेच डॉ. भालचंद्र व धन्वंतरी  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले.
            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील हे होते.  प्रमुख  पाहुणे  म्हणुन रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री. अब्दुल लतीफ अब्दुल मजीद हे होते. यावेळी  निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.ज्योति कानडे, डॉ. एम.के.पल्ला डॉ.गजानन परळीकर, डॉ.वृंदाराणी वीर, नेत्रचिकित्सा अधिकारी श्री.घाडगे बी. एम. व श्री शेख ए.एल. सहाय्यक अधिसेविका श्रीमती शेख व सर्व नर्सिंग स्टॉफ व रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी रुग्ण व नातेवाईक  यांची विशेष उपस्थिती होती.
 यावेळी बोलताना डॉ.ज्योति कानडे यांनी नेत्रदान म्हणजे काय नेत्रदानाची आवश्यकता, समाजातील अंधत्वाच्या समस्येवर नेत्रदान केल्यावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. तसेच भारतात दरवर्षी लाखोंच्या संख्येत मृत्यू होतात, त्यातुलनेने होणारे मृत्यु पाहता मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याचे सांगुन सर्वांनी सकारात्मक दृष्टीने नेत्रदानाकडे पाहणे आवश्यक आहे, असे सांगितले व कार्यक्रमासाठी जमलेल्या नागरिक तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी या सर्वानी नेत्रदान संमतीपत्रे भरुन देण्याबाबत आवाहान ही त्यांनी यावेळी केले.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी कार्यक्रमासाठी जमलेल्या नागरिकांना व कर्मचाऱ्यांना नेत्रदान व अवयवदान करुन मरणासन्न व्यक्तीच्या आयुष्याला नवीन आकार देऊ शकतो असे सांगून नेत्रदान व अवयवदानाबाबतचे  महत्व समजावून सांगितले.
            यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री अब्दुल लतीफ अब्दुल मजीद यांनी नेत्रदान हे सामाजिक कार्य असून आपल्या नेत्रदानातून इतरांना दृष्टी देण्याच्या कामी सर्वानी स्वतःहुन पुढाकार घेणे आवश्यक आहे.  समाजात असणारे अंधत्वाचे प्रमाण कमी करण्यात सर्वांचा सहभाग हा मोलाचा आहे, त्यामुळे नेत्रदान एक चळवळ म्हणून समाजात रुजली पाहिजे, असे  मत व्यक्त केले.                                    

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्री.शेख ए.एल. यांनी केले व उपस्थित सर्वांचे आभार मानले.

वर्तमान पत्राचे शिर्षक मंजूरीसाठी प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात सादर करावेत



उस्मानाबाद, दि.24:- द प्रेस ॲन्ड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट 1867 मधील अनुच्छेद 4 मधील तरतुदीप्रमाणे घोषणापत्र साक्षांकित करण्याचे अधिकार जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांना आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणापत्रासाठी (Declaration) जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातून मोठयाप्रमाणात अर्ज प्राप्त होतात, जिल्हाधिकारी कार्यालयातील कामाचा व्याप व ग्रामीण भागातील अर्जदारास जिल्हाधिकारी कार्यालयास येणे गैरसोईचे होत असल्याने नागरिकांची कामे वेळेत व सुलभ होण्यासाठी जिल्हयातील उप विभाग (उस्मानाबाद,कळंब,भुम,उमरगा) यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील प्राप्त होणारे वर्तमान पत्राचे शिर्षक मंजूरीसाठी प्रस्ताव Registrar OF New Paper for India New Delhi यांचेकडे पाठविणेसाठी तसेच त्यांचेकडून मंजूरी मिळालेल्या वर्तमानपत्राचे अधिकथन (घोषणापत्र) स्वाक्षरी करणेचे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना असल्याने सदरील विषय जिल्हयातील सर्व संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला असल्याचे, असे जिल्हाधिकारी  यांनी  कळविले आहे.

Wednesday, 23 August 2017

कर्जमाफीचे ऑनलाईल अर्ज 15 सप्टेंबर पर्यंत भरुन योजलेचा लाभ घ्यावा


उस्मानाबाद,दि.23:- शासन निर्णय 28 जून 2017 अन्वये दि. 30 जून 2017 अखेर थकबाकीदार असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 राबविण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. कर्जमाफीचे अर्ज ग्रामपंचायतचे आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई सेवा केंद्र, CSC-SPV केंद्रावर भरण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांनी कर्ज माफीचे अर्ज 15 सप्टेंबर 2017 पर्यंत ऑनलाईन भरुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.  
विहीत नमुन्यातील कर्जमाफीचे अर्ज सर्व सहाय्यक निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सर्व ग्रामपंचायत, सर्व विकास सेवा सहकारी संस्था, सर्व बँका आणि CSC-SPV केंद्रावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात आदी ठिकाणी  उपलब्ध असून ते ऑनलाईन भरण्यासाठी ग्रामपंचायतचे आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई सेवा केंद्र, CSC-SPV केंद्रावर भरण्यात येत आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व त्यांचे कार्यालयातील क्षेत्रिय अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.

उस्मानाबाद  जिल्हयातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज दि. 15 सप्टेंबर 2017 पर्यंत  ऑनलाईन केंद्रावर भरुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.

महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन


उस्मानाबाद.दि.23:- जिल्ह्यातील सर्व केंद्रशासन, राज्यशासन, निमशासकीय कार्यालय, शासकीय अंगीकृत उपक्रम महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, नियोक्ते, उद्योजक,आस्थापना यांच्यासाठी पुर्वीच्या www.maharojgar.gov.in वेबपोर्टलच्या ठिकाणी www.mahaswayam.in हे वेबपोर्टल नव्याने कार्यरत केले आहे.

शासनाने या विभागाकडील एम्पलॉयमेंट, कौशल्य विकास, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, यांचे मिळून  www.mahaswayam.in  हे नवीन वेबपोर्टल कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. यापूर्वीच्या या कार्यालयाकडील नोंदणीकृत आस्थापना आहेत अशा सर्व कार्यालयानी आपले प्रोफाईल अपडेट करुन घ्यावे, यासाठी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मध्यवर्ती प्रशासकीय ईमारत येथील कार्यालयाशी संपर्क साधावा यासाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02472-222236 वर संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक संचालक श्री.बालाजी मरे यांनी केले आहे.

फलोत्पादन यांत्रिकीकरण व कांदाचाळ योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंतच अर्ज सादर करावेत


उस्मानाबाद,दि.23:- कृषी विभागाकडून राष्ट्रीय कृषि विकास  योजना सन 2017-18 योजनेअंतर्गत फलोत्पादन  यांत्रिकीकरण व कांदाचाळ हे घटक राबविण्यात येणार आहेत. योजने अंतर्गत अभियानामध्ये इच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी  संबंधित तालुका कृषि अधिकारी  यांचेशी संपर्क साधुन ऑनलाईन अर्ज 31 ऑगस्ट 2017 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

            हा कार्यक्रम राबविताना मार्गदर्शक सुचनेनुसार महिला 30 टक्के, अनुसुचित जाती 16 टक्के व अनुसूचित जमाती 8 टक्के व अपंग 3 टक्के व उर्वरीत सर्वसाधारण या प्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीनुसार लाभ देण्यात येणार आहे. सन 2017-18 मधील तालुकानिहाय लाभार्थ्यांचे अर्ज www.hortnet.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातील. लाभार्थ्याची सोडत (लकी ड्रॉ) पध्दतीने निवड करण्यात येणार आहे.दि. 31 ऑगस्ट  नंतर ऑनलाईन झालेल्या अर्जाचा सोडत (लकी ड्रॉ)  पध्दतीमध्ये विचार केला जाणार नाही. प्रत्येक घटकासाठी शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.  जुन्या अर्जाचा या प्रक्रियेमध्ये विचार केला जाणार नाही.ऑनलाईन अर्ज शेतकरी स्वत: भरु शकतात तसेच शक्य नसल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्याच्या मदतीने शेतकरी अर्ज करु शकतील परंतु अर्ज ऑनलाईन झाल्याची खात्री  शेतकऱ्यांने स्वत: करावी.असे  प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 कर्जमाफीचे ऑनलाईल अर्ज भरुन योजलेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे

                           
        उस्मानाबाद,दि.22:- शासन निर्णय 28 जून 2017 अन्वये दि. 30 जून 2017 अखेर थकबाकीदार असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 राबविण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. कर्जमाफीचे अर्ज ग्रामपंचायतचे आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई सेवा केंद्र, CSC-SPV केंद्रावर निशुल्क भरण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांनी कर्ज माफीचे अर्ज ऑनलाईन भरुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.   
विहीत नमुन्यातील कर्जमाफीचे अर्ज, सर्व सहाय्यक निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सर्व ग्रामपंचायत, सर्व विकास सेवा सहकारी संस्था, सर्व बँका आणि CSC-SPV केंद्रावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात आदी ठिकाणी  उपलब्ध असून ते ऑनलाईन भरण्यासाठी ग्रामपंचायतचे आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई सेवा केंद्र, CSC-SPV केंद्रावर निशुल्क भरण्यात येत आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व त्यांचे कार्यालयातील क्षेत्रिय अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.
उस्मानाबाद  जिल्हयातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन केंद्रावर भरुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

Sunday, 20 August 2017

मिशन 90 दिवस अभियानांतर्गत “हा पोळा…स्वच्छतेचा पोळा” उपक्रम


        उस्मानाबाद,दि.20:- ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत 02 ऑक्टोंबर 2014 पासून केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ची सुरुवात झाली आहे. सोमवार 21 ऑगस्ट 2017 पोळा सणानिमित्त जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा पोळा… स्वच्छतेचा पोळा म्हणून सारजा करण्याचे निर्धारीत करण्यात आले आहे.
            मा. पंतप्रधान महोदयांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) हा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम असून त्यात मा. मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्य 31 मार्च 2018 अखेर हागंदारीमुक्त करण्याचे निर्धारीत केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्यावतीने उस्मानाबाद जिल्हयातील ग्रामीण क्षेत्र हागंदारीमुक्त करण्यासाठी 02 जुलै 2017 पासून जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन 90 दिवस अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यातून 02 ऑक्टोंबर 2017 अखेर उस्मानाबाद जिल्हा हागंदारीमुक्त करण्याचे निर्धारीत केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवार दि. 21 ऑगस्ट 2017 रोजी पोळा सणानिमित्त जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद जिल्हयातील सर्व गावांमध्ये जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग व मिशन 90 दिवसातील जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरील सहभागी सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने पोळा… स्वच्छतेचा पोळा म्हणून सारजा करण्याचे निर्धारीत करण्यात आले आहे. 

            जिल्हाभरात या दिवशी बैलाच्या मिरणुकीप्रसंगी बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकरी आत्महत्या रोखणे व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता, वैयक्तिक शौचालय बांधकाम व वापर याविषयी शेतकरी व ग्रामस्थांमध्ये संवाद साधण्याकरीता उक्त उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमातुन बैल मिरणुक प्रसंगी स्वच्छतेविषयी घोषवाक्य देत ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व कळावे व उघडयावरील हागंदारी प्रथा बंद व्हावी याकरीता शौचालय बांधा खास.. वापर करा चोवीस तास, एकच वादा शौचालय बांधा, हातात मोबाईल, घरात फोन, उघडयावर संडासाला जातय कोण, माइया मालकाने शौचालय बांधलय, तुइया मालकाचे काय, असे संदेश देत ही मिरणूक काढून या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधव व ग्रामस्थ यांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केले आहे. 

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष अद्यावतीकरणास सुरुवात

 उस्मानाबाद.दि.19:- राज्य शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष अद्यावत करण्यात येणार आहे. या माहितीकोषात शासनाच्या नियमित,  नियमित्तेतर,  कार्यव्ययी,  रोजंदारी,  अंशकालीन,  मानसेवी तसेच तदर्थ नेमणूका करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.  दि. 1  जुलै 2017 या संदर्भ दिनांकास अनुसरुन गोळा करण्यात येणार आहे. शासनाच्या नियोजन विभागाने याविषयी दि. 20 जुलै 2017 रोजी शासन परिपत्रक निर्गमित केले आहे.

          राज्यस्तरावर अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई, विभागीय स्तरावर संबंधित अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रादेशिक कार्यालय व जिल्हा स्तरावर संबंधित जिल्हा सांख्यिकी कार्यालय शासकिय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही करणार आहेत. सर्वकष  माहितीकोष  तयार करणेकरीता आवश्यक असणारी ऑनलाईन संगणकीय आज्ञावली महाराष्ट्र शासनाच्या  www.mahasdb.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर EMDb या नावाने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
संकेतस्थळावर माहिती अद्यावत करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी  जिल्हा सांख्यिकी  कार्यालयामधून युजर आयडी आणि पासवर्ड  तात्काळ प्राप्त करुन ऑनलाईन संगणकीय आज्ञावलीमध्ये माहिती नोंदणी दि. 16 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत पूर्ण करावयाची आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, यांचेकडून दिले जाणारे माहिती भरल्याचे प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2017 च्या वेतन देयकासोबत व माहिती बरोबर असल्याचे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी 2018 च्या वेतन देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा सदर वेतन देयके कोषागार कार्यालय/अधिदान व लेखा कार्यालय येथे पारीत केली जाणार नाहीत.
शासन परिपत्रकाच्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी कार्यवाही करुन शासकिय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्यास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री.वा.प्र.जाधव यांनी केले आहे.

कृष्ठरोग शोध मोहिम सर्वेक्षण कालावधीत कुंटुंबातील सर्व सदस्यांनी तपासणी करुन घ्यावी -निवासी उपजिल्हाधिकारी


उस्मानाबाद. दि.19 :- राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात दि.5 ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.या कालावधीत आपल्या घरी  तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करुन कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रत्यक्ष तपासणी करुन घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन  निवासी  उपजिलहाधिकारी  राजेंद्र खंदारे  यांनी  केले. 
राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन कार्यकम हा प्रधानमंत्री ,भारत सरकार यांचे प्रगती योजनेत समाविष्ट करण्यात आलेला आहे. या अंतर्गत कृष्ठरोग शोध मोहिम 2017-18 ( Leprosy Case Detection campaign-LCDC ) उसमानाबादासह महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात दि. 05 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या नियोजन व विविध विभागाच्या समन्वयासाठी तालुका व जिल्हा पातळीवर समन्वय समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे. जिल्हा समन्वय समितीची बैठक  निवासी उप जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र खंदारे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी  राज्यस्तरीय निरीक्षक डॉ. श्रीमती राठोड, डॉ. मिटकरी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांचाळ, जिल्हा क्षयरोग आरोग्य अधिकारी  डॉ. फुलारी,  निवासी वैदयकीय अधिकारी  डॉ. प्रताप शिंदे, वैदयकीय  अधीक्षक  स्त्री  रुग्णालय  डॉ. वाघमारे, जिल्हा हिवताप अधिकारी श्री. बोरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कृष्ठरोग ) डॉ. भागवत खडके यांनी प्रास्ताविक करुन मोहिमेबाबत  सविस्तर  माहिती  दिली. मोहिम कालावधीत  जिल्ह्यातील संपुर्ण ग्रमीण व निवडक शहरी भागातील लोकसंख्याचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षण आशा कार्यकर्ती  व पुरुष कर्मचारी /स्वयंसेवक यांच्या संयुक्त टिमद्वारे घरोघर जाऊन करण्यात येणार आहे. वैदयकीय अधीक्षक, तालूका आरोग्य अधिकारी, वैदयकीय अधिकारी  व आरोग्य  कर्मचारी यांचे प्रत्यक्ष नियंत्रणाखाली त्यांचे कार्यक्षेत्रात मोहिम राबविली जाणार आहे.
मोहिम कालावधीत आपल्या घरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करुन कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रत्यक्ष तपासणी करून घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले. तसेच मोहिम कालावधीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचना निवासी  उपजिल्हाधिकारी श्री.खंदारे  यांनी  दिल्या.

  शिक्षण अधिकारी  प्राथमिक यांचे  प्रतिनिधी  व इतर जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते.

जिल्हा शासकीय रुग्णालयात अवयव दान दिन साजरा


उस्मानाबाद.दि.19:- जिल्हा रुग्णालय,उस्मानाबाद येथे दि.14 ऑगस्ट रोजी अवयव दान दिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले हे होते. प्रमुख उपस्थिती अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के. पाटील, निवासी वैद्यकीस अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अधिसेविका श्रीमती थोरात, सहाय्यक अधिकसेविका श्रीमती शेख तसेच रुग्णांलयाचे नसिंग स्टॉफ व रुग्णालयील कर्मचारी उपस्थित होते. परिचारीका प्रशिक्षणार्थी व रुग्णांलयात तपासणी करिता आलेले रुग्ण व नातेवाईकांची यांची  उपस्थिती होती.
            या कार्यक्रमांची  सुरुवात धन्वंतरी  यांच्या प्रतिमेला  पुष्पहार व दिपप्रज्वलांनीने करण्यात आली. यावेळी  डॉ. डी.के. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थित सर्वांना अवयदान  म्हणजे काय अवयव दान कोणास करता येते, अवयव दानाची गरज काय  मृत्यू नंतर अवयव दान केल्यास ते मरणांच्या दारात उभ्या असणाऱ्या व्यक्तीच्या नवीन आयुष्य देण्यासाठी  संजीवनी  ठरु  शकते. परिसेविका श्रीमती खंदारे यांनी अवयवदान जनजागृतीवर कवितेचे सादरीकरण केले.
            यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी उपस्थित सर्वांना अवयव दानाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे व अवयवदानातून इतर मरणासन्न व्यक्तीला जिवनदान देण्यासाठी उपयोग होऊ शकतो त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने स्वत:चे मरणोत्तर अवयवदानाचे समंतीपत्र भरुन देण्याबाबत आवाहन केले. 

            जिल्हा रुग्णलयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच सर्व नसिंग स्टॉफ  यांनी  या कार्यक्रमासाठी परिश्रम  घेतले. या  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती  हेंडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन निवासी  वैदयकीय अधिकारी  डॉ. प्रताप  शिंदे यांनी व्यक्त केले.