Friday, 12 June 2026
मोहरम,नीट परीक्षा व आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २६ जूनपर्यंत जमावबंदी-शस्त्रबंदी
मोहरम,नीट परीक्षा व आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २६ जूनपर्यंत जमावबंदी-शस्त्रबंदी
धाराशिव, दि.१२ जून (जिमाका) मोहरम सण,विविध स्पर्धा परीक्षा, जिल्ह्यातील आंदोलनात्मक घडामोडी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात १३ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी जारी केला आहे.
पोलीस अधीक्षक,धाराशिव यांनी सादर केलेल्या अहवालानुसार १७ जून ते २६ जून दरम्यान मोहरम सण साजरा होणार असून या काळात सवारी, पंजे,डोले आणि ताबूत स्थापना तसेच मिरवणुका व रॅलींचे आयोजन केले जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
याशिवाय १४ जून रोजी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ तर २१ जून रोजी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) २०२६ आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हाभरातील विद्यार्थी या परीक्षांसाठी उपस्थित राहणार असून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
दरम्यान,जिल्ह्यात विविध समाजांकडून महापुरुषांचे आणि महामानवांचे अनधिकृत पुतळे उभारण्याच्या घटनांमुळे काही ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. पुतळ्यांच्या जागा,चौक आणि स्थानांबाबत दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाविरोधातही नाराजी व्यक्त होत आहे.त्यामुळे मोर्चे, रास्तारोको,बंद आणि आंदोलन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तसेच शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून धरणे,मोर्चे, उपोषण,बंद,निदर्शने,तालाठोको आणि रास्तारोको यांसारखे आंदोलनात्मक कार्यक्रम अचानक आयोजित होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून १३ जून २०२६ रोजी पहाटे १२.०१ वाजल्यापासून ते २६ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
या कालावधीत शस्त्रे,तलवारी, बंदुका,सोटे,काठ्या,लाठ्या, स्फोटके,दाहक पदार्थ,दगड किंवा इतर घातक साहित्य जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच प्रक्षोभक भाषणे, विडंबनात्मक कृती,आक्षेपार्ह घोषणा,संविधानविरोधी किंवा सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कृती,प्रक्षोभक गाणी,वाद्य वाजविणे आणि असभ्य वर्तन करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव परवानगीशिवाय एकत्र येऊ शकणार नाही.कोणताही मोर्चा,मिरवणूक किंवा सभा घेण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची पूर्वलिखित परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
मात्र अंत्ययात्रा,धार्मिक विधी,विवाह समारंभ,सामाजिक सण,शासकीय कार्यक्रम,शासकीय कर्मचारी तसेच सिनेमागृहे आणि रंगमंच यांसारख्या सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी ११ जून २०२६ रोजी स्वाक्षरी व शिक्क्यानिशी हा आदेश जारी केला असून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
******
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या उद्देशाने १४ जून रोजी ऑनलाइन योग सत्र ; जिल्ह्यातील नागरिकांना सहभागाचे आवाहन
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या उद्देशाने १४ जून रोजी ऑनलाइन योग सत्र ; जिल्ह्यातील नागरिकांना सहभागाचे आवाहन
धाराशिव,दि.१२ जून (जिमाका) आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त आयुष मंत्रालय,भारत सरकार यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून,योगाचा प्रसार, जनजागृती आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने १४ जून २०२६ रोजी ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.हे योग सत्र सकाळी ६.१५ ते ७.१५ या कालावधीत होणार असून,या उपक्रमाद्वारे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
आयुष मंत्रालय,भारत सरकार आणि हॅबिल्ड हेल्थटेक प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.या योग सत्राचे प्रक्षेपण आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्युब प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००-३१५-७००८ वर मिस्ड कॉल देऊन पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित सहभागींना सत्राची लिंक तसेच आवश्यक सूचना संदेशाद्वारे पाठविण्यात येणार आहेत.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार प्रत्येक सहभागीने स्वतःच्या स्वतंत्र डिजिटल उपकरणावरून (मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब) सत्रात लॉग-इन करणे आवश्यक राहील.नोंदणीकृत प्रत्येक उपकरणाची स्वतंत्र सहभाग नोंद ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक,विद्यार्थी,खेळाडू तसेच शाळा,महाविद्यालये आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांमधील अधिकारी-कर्मचारी यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
****
जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान संपन्न
जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान संपन्न
धाराशिव,दि.१२ जून (जिमाका) दिनांक १० जून रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय धाराशिव व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था,छत्रपती संभाजीनगर,यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्यचिकित्सक धाराशिव डॉ.धनंजय चाकुरकर,निवासी वैद्यकीय बाह्य संपर्क अधिकारी धाराशिव डॉ.शिवाजी फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आला.या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडळकर यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वाक्षरी अभियानमध्ये सहभाग नोंदविला.
१० जून रोजी तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे शहर पोलीस स्टेशन परिसरातील, सावरकर चौक,काळा मारुती चौक, अंबाला चौक तसेच बार्शी नाका चौक अशा एकूण १२ ठिकाणी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण (कोटपा) २००३ या कायद्याअंतर्गत दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.यावेळी डॉ.विक्रांत राठौर जिल्हा सल्लागार, डॉ.धुमाळ,दंत शल्यचिकित्सक , अनिल गुंज,प्रतिनिधी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था,प्रदीप तटाळे समुपदेशक,नर्सिंग ऑफिसर श्रीनिवास निर्मळ यांच्या सहाय्याने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा –२००३ (कोटपा) या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली.
अशा प्रकारची मोहीम नियमित संपूर्ण जिल्ह्यात राबवली जाणार आहे - कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यासाठी मनाई आहे,कलम ५ नुसार तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाची जाहीरात करण्यास मनाई आहे,कलम ६ अ नुसार १८ वर्षाखालील मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नये. विक्रेत्याने तसा फलक आपल्या दुकानात लावणे बंधनकारक आहे, कलम ६ ब नुसार शाळा, महाविद्यालय परिसरात १०० यार्डच्या हद्दीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई आहे,कलम ७ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे लेबलवर ८५ टक्के भागात चित्रमय इशारा आणि वैधानिक इशारा छापणे बंधनकारक आहे. खुली चित्रमय इशारा नसलेली सिगारेट विकण्यास मनाई आहे.
000000
रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन
रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन
धाराशिव,दि.१२ जून (जिमाका) देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey-PLFS) 2026 आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises-ASUSE) 2026 राबविण्यात येत आहे.या उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन आज जिल्हाधिकारी यांचे कक्षात करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती.स्वाती शेंडे,जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक सुधाकर जाधव तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000
रोजगार व उद्योग क्षेत्राच्या व्यापक सर्वेक्षणाचा शुभारंभ नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे : जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार
रोजगार व उद्योग क्षेत्राच्या व्यापक सर्वेक्षणाचा शुभारंभ
नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे : जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार
धाराशिव,दि.१२ जून (जिमाका ) देशातील रोजगार,बेरोजगारी तसेच असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey-PLFS) 2026 आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises-ASUSE) 2026 राबविण्यात येत आहे.या महत्त्वपूर्ण सर्वेक्षण उपक्रमाचा शुभारंभ आज १२ जून रोजी शुक्रवारी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आला.
या सर्वेक्षणांच्या माध्यमातून देशातील रोजगार, बेरोजगारी, स्वयंरोजगार,उद्योग-व्यवसाय आणि असंघटित क्षेत्रातील आर्थिक घडामोडींची अचूक माहिती संकलित केली जाणार आहे.केंद्र व राज्य शासनाच्या विविध धोरणांच्या आखणीसाठी तसेच रोजगार निर्मिती व उद्योगविकासाशी संबंधित निर्णय प्रक्रियेसाठी या सर्वेक्षणातील माहिती महत्त्वाची ठरणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सर्वेक्षणासाठी भेट देणाऱ्या अधिकृत कर्मचाऱ्यांना आवश्यक ती माहिती प्रामाणिकपणे व अचूकपणे उपलब्ध करून द्यावी.नागरिकांच्या सहकार्यामुळेच रोजगार व उद्योग क्षेत्राचे वास्तव चित्र समोर येण्यास मदत होणार असून विकासाभिमुख धोरणे अधिक परिणामकारकपणे राबविता येतील.
या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे,जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक सुधाकर जाधव तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय आणि जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
******
१५ जून रोजी धाराशिवमध्ये शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा ; टाटा मोटर्समध्ये संधी
१५ जून रोजी धाराशिवमध्ये शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा ; टाटा मोटर्समध्ये संधी
धाराशिव,दि.१२ जून (जिमाका) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), धाराशिव येथे १५ जून २०२६ रोजी “शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यात नामांकित टाटा मोटर्स,पिंपरी (पुणे) कंपनीचे प्रतिनिधी सोमेश्वर सोनवणे उपस्थित राहणार आहेत.
या भरती मेळाव्यात मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, टूल अँड डाय मेकर,वेल्डर, शीट मेटल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आदी ट्रेडमधील प्रशिक्षणार्थींनी बायोडाट्यासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिप कालावधीत प्रतिमाह १९ हजार ८५० रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. याशिवाय महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रतिमाह ३ हजार ५०० रुपये इतकी अतिरिक्त प्रोत्साहनपर रक्कम राज्य शासनाकडून दिली जाणार आहे.
जुलै २०२६ मध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रशिक्षणार्थींनीही या भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी आयटीआय किंवा एमसीव्हीसी उत्तीर्ण झालेल्या आणि अद्याप शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) न मिळालेल्या प्रशिक्षणार्थींनाही ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हा भरती मेळावा १५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव येथे होणार असून इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे व बायोडाटा घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य तसेच सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एम.एस.बिरादार यांनी केले आहे.
टाटा मोटर्ससारख्या अग्रगण्य कंपनीत शिकाऊ उमेदवारीची संधी उपलब्ध होत असल्याने धाराशिवसह परिसरातील आयटीआय व एमसीव्हीसी प्रशिक्षणार्थींसाठी हा भरती मेळावा रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
***
एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण : सूचना व अभिप्राय मागविले
एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण : सूचना व अभिप्राय मागविले
धाराशिव,दि.१२ (जिमाका) राज्यातील विधवा,घटस्फोटित, परित्यक्ता,अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी स्वतंत्र ‘एकल महिला धोरण’ तयार करण्यात येत असून,हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक व्हावे यासाठी राज्यातील एकल महिला,नागरिक,स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते,अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
एकल महिलांच्या समस्या केवळ मांडण्याऐवजी त्या समस्यांवर शासनाने कोणत्या ठोस उपाययोजना कराव्यात,कोणत्या नवीन योजना सुरू कराव्यात, विद्यमान योजनांमध्ये कोणते बदल करावेत तसेच आवश्यक असल्यास कोणत्या कायद्यांमध्ये किंवा नियमांमध्ये सुधारणा कराव्यात, याबाबत सविस्तर सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सूचना पाठविताना केवळ त्रोटक स्वरूपातील मते न पाठविता संबंधित विषयाची पार्श्वभूमी, अपेक्षित उपाययोजना,संभाव्य लाभार्थी आणि अपेक्षित परिणाम यांचा समावेश असलेले सविस्तर प्रस्ताव सादर करावेत,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. समाजातील एकल महिला तसेच सर्व संबंधित घटकांचा सक्रिय सहभाग या धोरण निर्मिती प्रक्रियेत असणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
सूचना व अभिप्राय शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी ८२०८५८९१९५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर अभिप्राय पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा ‘एकल महिला धोरणा’चा मसुदा तयार करताना योग्य तो विचार करण्यात येणार आहे.
दरम्यान,जिल्ह्यातील सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था,महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते,अभ्यासक व विषयतज्ज्ञ यांनी १७ जून २०२६ पर्यंत जिल्हा परिषद सभागृह, धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.
*****
धाराशिवमध्ये रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रम नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन
धाराशिवमध्ये रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रम
नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.१२ जून (जिमाका) देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey-PLFS) 2026 आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises-ASUSE) 2026 राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्रात हे सर्वेक्षण जागतिक बँकेच्या सहकार्याने ‘महास्ट्राईड’ प्रकल्पांतर्गत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली राबविले जाणार असून,क्षेत्रीय कामकाजासाठी IPSOS या बाह्य संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणांतर्गत रोजगार व बेरोजगारीविषयक सर्वेक्षणे यापूर्वी नियमितपणे घेतली जात होती.मात्र बदलत्या आर्थिक परिस्थितीत कामगार बाजारपेठेबाबत अधिक वारंवार आणि अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी,तसेच ग्रामीण व शहरी भागांसाठी रोजगार व बेरोजगारीचे वार्षिक अंदाज तयार करता यावेत, यासाठी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या शिफारशीनुसार सन 2017 पासून PLFS सर्वेक्षण नियमितपणे राबविण्यात येत आहे.
PLFS सर्वेक्षणातून काय मोजले जाणार
या पाहणीचा प्रमुख उद्देश देशातील श्रमबाजाराचे महत्त्वाचे निर्देशांक निश्चित करणे हा आहे.त्यामध्ये श्रमशक्ती सहभाग दर (LFPR), कामगार-लोकसंख्या गुणोत्तर (WPR) आणि बेरोजगारी दर (UR) यांचा समावेश आहे.हे निर्देशांक चालू साप्ताहिक स्थितीच्या (Current Weekly Status-CWS) आधारे तयार केले जातात.ग्रामीण व शहरी भागांसाठी दरमहा तसेच राज्य,केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीयस्तरावर दर तिमाही कालावधीत हे अंदाज प्रसिद्ध करण्यात येतील.याशिवाय बहुतेक जिल्ह्यांसाठी ग्रामीण व शहरी विभागनिहाय वार्षिक जिल्हास्तरीय अंदाजही तयार करण्यात येणार आहेत.या अंदाजांसाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय आणि राज्यस्तरीय नमुने एकत्रित करून विश्लेषण केले जाणार आहे.
PLFS अंतर्गत मासिक व तिमाही बुलेटिनमध्ये श्रमशक्ती सहभाग दर, कामगार-लोकसंख्या गुणोत्तर, बेरोजगारी दर तसेच रोजगाराची स्थिती आणि उद्योगनिहाय वर्गीकरणाची माहिती प्रसिद्ध केली जाईल.वार्षिक अहवालात वयोगट, लिंग,शैक्षणिक स्तर,रोजगाराचे प्रकार,उद्योगनिहाय वितरण, व्यवसाय वर्गीकरण,अनौपचारिक क्षेत्रातील रोजगार,रोजगारातून मिळणारे उत्पन्न आणि कामाच्या तासांबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध होणार आहे.
असंघटित क्षेत्राच्या अर्थकारणाचा वेध घेणार ASUSE
असंघटित क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून रोजगारनिर्मिती आणि सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) त्याचे मोठे योगदान आहे.या क्षेत्राची आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी ASUSE 2026 हे सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे.
उत्पादन,व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रांतील असंघटित,बिगर-कृषी आस्थापनांची माहिती या सर्वेक्षणातून संकलित केली जाणार आहे.
‘आस्थापना’ (Establishment) हे या सर्वेक्षणाचे मूलभूत चौकशी एकक असेल.ASUSE 2026 जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत राबविले जाणार असून उत्पादन,व्यापार आणि व्यापाराव्यतिरिक्त निवडक सेवा क्षेत्रातील सर्व असंघटित बिगर-कृषी आस्थापनांचा त्यात समावेश असेल.
कोणत्या आस्थापनांचा समावेश
कारखाना अधिनियमांतर्गत नोंदणीकृत नसलेली उत्पादन आस्थापने,काही विशिष्ट उत्पादन उद्योग,व्यापार आस्थापने,सेवा क्षेत्रातील आस्थापने,स्वमालकी व भागीदारी संस्था,बचत गट,ट्रस्ट, संघटना,क्लब,सहकारी संस्था आणि ना-नफा तत्त्वावरील संस्था यांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात येणार आहे.
कोणत्या आस्थापना वगळल्या जाणार
कंपनी अधिनियमांतर्गत नोंदणीकृत कंपन्या,वार्षिक उद्योग सर्वेक्षणात (ASI) समाविष्ट उद्योग,केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडे नोंदणीकृत वीज निर्मिती केंद्रे तसेच शासकीय विभाग,शासकीय कंपन्या,शासकीय संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग या सर्वेक्षणाच्या व्याप्तीबाहेर ठेवण्यात आले आहेत.नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणांमधून मिळणारी माहिती रोजगारविषयक धोरणे,विकास आराखडे,आर्थिक नियोजन आणि राष्ट्रीय लेखा प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे निवडलेल्या कुटुंबांनी, नागरिकांनी आणि आस्थापनांनी सर्वेक्षण पथकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे,असे आवाहन
करण्यात आले आहे.
*****
स्वाधार योजनेसाठी शासकीय वसतिगृहास अर्ज करणे अनिवार्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
स्वाधार योजनेसाठी शासकीय वसतिगृहास अर्ज करणे अनिवार्य
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
धाराशिव दि.१२ (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुला- मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येत असून,शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
जिल्ह्यात सध्या एकूण ११ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.सन २०२६ - २७ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.शालेय विभागातील विद्यार्थ्यांनी ३० जून २०२६ पर्यंत, तर इयत्ता ११ वी,१२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी १५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत.
शासकीय वसतिगृहांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जात असल्याने काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकत नाही.अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासनाची ‘स्वाधार’ योजना उपलब्ध आहे.मात्र,स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यामुळे इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी https://hmas.mahati.org या संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा,असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री.सचिन कवले यांनी केले आहे.
******
१४ जून रोजी १९ परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात निर्बंध ; नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई
१४ जून रोजी १९ परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात निर्बंध ; नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई
धाराशिव, दि.१२ जून (जिमाका) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ रविवार, १४ जून रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत धाराशिव शहरातील १९ परीक्षा केंद्रांवर होणार असून,या परीक्षेसाठी एकूण ५ हजार २८० परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत.परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल,रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,छत्रपती शिवाजी हायस्कूल, जिल्हा परिषद कन्या प्रशाला,श्री श्री रविशंकर विद्यामंदिर,विद्यामाता हायस्कूल, तेरणा पब्लिक स्कूल,शासकीय तंत्रनिकेतन,अभिनव इंग्लिश स्कूल, ग्रीनलँड पब्लिक स्कूल,पोदार इंटरनॅशनल स्कूल,टीपीसीटी अभियांत्रिकी महाविद्यालय,भारत विद्यालय, के.टी.पाटील फार्मसी महाविद्यालय, व्ही.जे.शिंदे पॉलिटेक्निक कॉलेज आदी केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
परीक्षार्थ्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये तसेच बाह्य हस्तक्षेप टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत.या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास, शांततेला बाधा निर्माण करणारी कृत्ये करण्यास तसेच परीक्षा प्रक्रियेत अडथळा आणण्यास मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ,कॉम्प्युटर सेंटर,इंटरनेट कॅफे, ध्वनिक्षेपक तसेच तत्सम सुविधा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोबाईल फोन,सेल्युलर फोन,फॅक्स, ई-मेल किंवा इतर प्रसार माध्यमांची साधने घेऊन परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासही बंदी राहणार आहे.परीक्षेशी संबंध नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.केवळ परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी,शासकीय कामावरील अधिकारी- कर्मचारी,संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच प्रवेश असेल.परीक्षार्थ्यांच्या नातेवाईकांनाही केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
तसेच परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.परीक्षा केंद्र परिसरात कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हे आदेश १४ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. परीक्षा सुरळीत आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी हे निर्बंध घालण्यात आले असून,आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
******
Wednesday, 10 June 2026
धाराशिवमध्ये १२ जूनपासून PLFS आणि ASUSE सर्वेक्षणांना प्रारंभ रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या विकासाचा आरसा ठरणार राष्ट्रीय सर्वेक्षण
धाराशिवमध्ये १२ जूनपासून PLFS आणि ASUSE सर्वेक्षणांना प्रारंभ
रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या विकासाचा आरसा ठरणार राष्ट्रीय सर्वेक्षण
धाराशिव,दि.१० जून (जिमाका ) केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) मार्गदर्शनाखाली अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय,महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणारी पीरिऑडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) आणि अॅन्युअल सर्व्हे ऑफ अनइन्कॉर्पोरेटेड सेक्टर एंटरप्रायझेस (ASUSE) ही दोन महत्त्वाची राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणे जिल्ह्यात १२ जून २०२६ पासून सुरू होत असून डिसेंबर २०२६ पर्यंत चालणार आहेत.या सर्वेक्षणांचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते १२ जून रोजी करण्यात येणार आहे.
भारत सरकारतर्फे नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणांद्वारे रोजगार,बेरोजगारी तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्राची अद्ययावत व विश्वासार्ह माहिती संकलित केली जाते.या आकडेवारीच्या आधारे केंद्र व राज्य शासन विविध विकासात्मक योजना, रोजगारविषयक धोरणे आणि आर्थिक नियोजनाची आखणी करत असते.
PLFS (Periodic Labour Force Survey) हे सर्वेक्षण देशातील रोजगार व बेरोजगारीची स्थिती,महिला कामगार सहभागाचे प्रमाण,स्वयंरोजगार,वेतनाधारित रोजगार तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील श्रमबाजाराची परिस्थिती याविषयी अद्ययावत माहिती उपलब्ध करून देते.या सर्वेक्षणातून प्राप्त होणारी माहिती रोजगारनिर्मिती,कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक-आर्थिक धोरणांच्या आखणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
तर ASUSE (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises) हे सर्वेक्षण असंघटित क्षेत्रातील उत्पादन (Manufacturing),व्यापार (Trade) आणि सेवा (Services) क्षेत्रातील उद्योग आस्थापनांची संख्या,त्यामधील रोजगार, उत्पादनक्षमता,स्थूल मूल्यवर्धन (GVA), उत्पन्न आणि इतर आर्थिक निर्देशांकांची माहिती संकलित करते. देशाच्या अर्थव्यवस्थेत असंघटित क्षेत्राचा मोठा वाटा असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी ASUSE सर्वेक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.या माहितीच्या आधारे राज्य व जिल्हास्तरीय उत्पन्नाचे अंदाज तसेच विविध विकास निर्देशांक तयार करण्यास मदत होते.
धाराशिव जिल्ह्यात PLFS सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागातील ४८ आणि शहरी भागातील २४ अशा एकूण ७२ नमुना घटकांची,तर ASUSE सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागातील १२ आणि शहरी भागातील ३२ अशा एकूण ४४ नमुना घटकांची निवड करण्यात आली आहे.निवडलेल्या नमुना घटकांमध्ये प्रशिक्षित प्रगणक व पर्यवेक्षकांमार्फत नमुना पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे.
सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडलेल्या कुटुंबांना तसेच उद्योग आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देऊन मुलाखतींच्या माध्यमातून माहिती गोळा करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि संबंधित आस्थापनांनी अचूक व आवश्यक माहिती देऊन या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमास सहकार्य करावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
देशातील रोजगार,उद्योजकता आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक योगदानाचे वास्तव चित्र समोर आणणारी PLFS आणि ASUSE ही सर्वेक्षणे केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून भविष्यातील विकास धोरणांची दिशा निश्चित करणारी ठरणार आहेत.त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात सुरू होणाऱ्या या सर्वेक्षणांकडे प्रशासन,उद्योग क्षेत्र आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
.******
दृष्टीदानाचा संकल्पच अंधत्व निर्मूलनाचा प्रभावी मार्ग ; दृष्टी दिन सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात
दृष्टीदानाचा संकल्पच अंधत्व निर्मूलनाचा प्रभावी मार्ग ; दृष्टी दिन सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात
धाराशिव,दि.१० (जिमाका) राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्रविभाग,जिल्हा शासकीय रुग्णालय,धाराशिव येथे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० ते १६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या दृष्टी दिन सप्ताहाचे उद्घाटन आज १० जून रोजी बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात झाले.यावेळी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून अंधत्व निर्मूलनासाठी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,नेत्रविभाग प्रमुख डॉ.महेश पाटील, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.ज्योती कानडे,डॉ.मुस्तफा पल्ला,डॉ.सायली कोकाटे,डॉ.पवन महाजन, अधिसेविका सुमित्रा गोरे, नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे,रामराजे बिडवे,श्रीकांत कल्याणी तसेच नेत्रविभागातील सर्व अधिपरिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.महेश पाटील यांनी दृष्टी दिनाचे महत्त्व विषद करताना डॉ. भालचंद्र यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व आधुनिक सुविधा उपलब्ध नसतानाही सामाजिक बांधिलकी जपत अंधत्व निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.हजारो नागरिकांना दृष्टीदान मिळवून देणाऱ्या त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच डोळ्यांचे विविध आजार, त्यांची लक्षणे आणि डोळ्यांची योग्य काळजी घेण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
डॉ.सायली कोकाटे यांनी उपस्थित रुग्ण,त्यांचे नातेवाईक तसेच अधिकारी-कर्मचारी यांना मरणोत्तर नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले. नेत्रदान कोण करू शकते,मृत्यूनंतर किती वेळेत नेत्रदान करता येते तसेच नेत्रदानाबाबत समाजात असलेले विविध गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी सविस्तर माहिती दिली.प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा,असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांनी डॉ.भालचंद्र यांनी नेत्रशस्त्रक्रिया क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. पूर्वीच्या तुलनेत सध्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे उपचार अधिक सुरक्षित व सोयीस्कर झाले असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने नेत्रदानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
दृष्टी दिन सप्ताहाच्या उद्घाटनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात एकूण २० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. महेश पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेत्रविभागातील सर्व अधिकारी,नर्सिंग स्टाफ आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
"नेत्रदान हेच श्रेष्ठ दान" हा संदेश देत दृष्टी दिन सप्ताहाला सुरुवात झाली असून आगामी आठवडाभर विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
*****
Tuesday, 9 June 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ९८८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क * १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजतापर्यंत मतदान
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ९८८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
* १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजतापर्यंत मतदान
* २९ मतदान केंद्रावर होणार मतदान
* ३२ मतदान केंद्राध्यक्ष व १२८ इतर मतदान अधिकारी
धाराशिव दि.९ जून (जिमाका) २६ उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -२०२६ करिता येत्या १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ दुपारी ४ वाजतापर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण ९८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.यामध्ये ४९९ पुरुष आणि ४८९ स्त्री मतदारांचा समावेश आहे.यामध्ये धाराशिव जिल्हा परिषदेचे २७ पुरुष ३६ स्त्री असे एकूण ६३ मतदार, जिल्ह्यातील दोन नगरपंचायत व आठ नगरपालिकांचे १३७ पुरुष आणि ११७ स्त्री असे एकूण २५४ मतदार,लातूर जिल्हा परिषदेचे ३२ पुरुष आणि ३७ स्त्री मतदार असे एकूण ६९ मतदार,पाच नगरपंचायत चार नगरपालिकांचे ११२ पुरुष,१०९ स्त्री,लातूर महानगरपालिकेचे ४१ पुरुष,३६ स्त्री असे ७७ मतदार,बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायत व सहा नगरपालिकांचे १५० पुरुष आणि १५४ स्त्री मतदार असे एकूण ३०४ मतदार यांचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यात ८,लातूर जिल्ह्यात १० आणि बीड जिल्ह्यात ११ अशा एकूण २९ मतदान केंद्रावर मतदार होणार आहे.सर्व २९ मतदान केंद्र हे तहसील कार्यालय येथे असणार आहे.
या निवडणुकीसाठी धाराशिव येथील ९ मतदान केंद्राध्यक्ष व ३६ इतर मतदान अधिकारी,लातूर येथे ११ मतदान केंद्राध्यक्ष व ४४ इतर मतदान अधिकारी आणि बीड येथे १२ मतदान केंद्राध्यक्ष व ४८ इतर मतदान अधिकारी राहतील. यामध्ये राखीव इतर मतदान अधिकारी यांचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यात चार,लातूर जिल्ह्यात पाच आणि बीड जिल्ह्यात पाच एकूण १४ झोनल अधिकारी असतील.संबंधित जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी हेच झोनल अधिकारी म्हणून काम पाहतील.
क्षेत्रीय अधिकारी,मतदान अधिकारी/ कर्मचारी यांना तीन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे.५ जून रोजी धाराशिव जिल्ह्याचे आणि ६ जून रोजी लातूर व बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे.दुसरे प्रशिक्षण १२ जून रोजी धाराशिव येथील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे,१३ जून रोजी लातूर व बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणि तिसरे प्रशिक्षण १७ जून रोजी तीनही जिल्ह्याच्या ठिकाणी हे होणार आहे.
या निवडणुकीच्या मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी बँक अधिकाऱ्यांची सूक्ष्म निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशीवच्या आठ मतदान केंद्रावर ११,लातूरच्या दहा मतदान केंद्रावर १३ आणि बीडच्या अकरा मतदान केंद्रावर १४ सूक्ष्म निवडणूक निरीक्षक असे एकूण २९ मतदान केंद्रावर ३८ सूक्ष्म निरीक्षक असतील.
१८ जून २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीचे मतदान साहित्य वितरण हे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातून १७ जून रोजी, मतदानासाठी दिलेल्या साहित्याची स्वीकृती ही १८ जून रोजी धाराशिव येथील भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक व प्रशिक्षण संस्थेत होईल.मतमोजणी २२ जून रोजी भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिव येथे होणार आहे.
*****
Subscribe to:
Posts (Atom)







