Friday, 12 June 2026

१४ जून रोजी १९ परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात निर्बंध ; नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई

१४ जून रोजी १९ परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात निर्बंध ; नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई धाराशिव, दि.१२ जून (जिमाका) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ रविवार, १४ जून रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत धाराशिव शहरातील १९ परीक्षा केंद्रांवर होणार असून,या परीक्षेसाठी एकूण ५ हजार २८० परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत.परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल,रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,छत्रपती शिवाजी हायस्कूल, जिल्हा परिषद कन्या प्रशाला,श्री श्री रविशंकर विद्यामंदिर,विद्यामाता हायस्कूल, तेरणा पब्लिक स्कूल,शासकीय तंत्रनिकेतन,अभिनव इंग्लिश स्कूल, ग्रीनलँड पब्लिक स्कूल,पोदार इंटरनॅशनल स्कूल,टीपीसीटी अभियांत्रिकी महाविद्यालय,भारत विद्यालय, के.टी.पाटील फार्मसी महाविद्यालय, व्ही.जे.शिंदे पॉलिटेक्निक कॉलेज आदी केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षार्थ्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये तसेच बाह्य हस्तक्षेप टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत.या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास, शांततेला बाधा निर्माण करणारी कृत्ये करण्यास तसेच परीक्षा प्रक्रियेत अडथळा आणण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ,कॉम्प्युटर सेंटर,इंटरनेट कॅफे, ध्वनिक्षेपक तसेच तत्सम सुविधा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोबाईल फोन,सेल्युलर फोन,फॅक्स, ई-मेल किंवा इतर प्रसार माध्यमांची साधने घेऊन परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासही बंदी राहणार आहे.परीक्षेशी संबंध नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.केवळ परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी,शासकीय कामावरील अधिकारी- कर्मचारी,संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच प्रवेश असेल.परीक्षार्थ्यांच्या नातेवाईकांनाही केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.परीक्षा केंद्र परिसरात कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे आदेश १४ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. परीक्षा सुरळीत आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी हे निर्बंध घालण्यात आले असून,आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ******