Friday, 20 February 2026
शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीराचे यशस्वी आयोजन करा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीराचे यशस्वी आयोजन करा
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
धाराशिव दि.२० फेब्रुवारी (जिमाका ) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात प्रत्येक विभागाने आपल्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणारे बॅनर्स,फ्लेक्स,पॅम्प्लेट्स आदींसह स्वतंत्र स्टॉल उभारावेत,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी श्री.पुजार यांनी दिले.
विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गावपातळीवरील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी १ मार्च रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या अनुषंगाने पूर्वनियोजन बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली.बैठकीस जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडिअम येथे विधी सेवा प्राधिकरणाकडून स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून कार्यक्रमाच्या प्रभावी समन्वयासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे,असेही जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी स्पष्ट केले.याशिवाय रक्तदान शिबीर व कर्करोग तपासणीसाठी मोबाईल मेडिकल व्हॅनची व्यवस्था,दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वितरण,कृषी विभागामार्फत विविध अवजारांचे वाटप,समाज कल्याण विभागातील लाभार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विविध विभागांच्या ऑनलाईन योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कडवकर यांनी उपस्थित विभाग प्रमुखांना शिबीराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.या बैठकीस उपविभागीय अधिकारी, कळंब; उपविभागीय अधिकारी, भूम; उपविभागीय अधिकारी,उमरगा;तहसिलदार, उमरगा;प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग,सोलापूर;तसेच गटविकास अधिकारी, लोहारा आदी अधिकारी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.
0000000
बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन
बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन
धाराशिव दि.२० फेब्रुवारी (जिमाका) मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेची भक्कम पायाभरणी केली.या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी वैज्ञानिक ज्ञानासोबतच विविध सामाजिक विषयांवर प्रकाश टाकत समाजप्रबोधनाचे कार्य केले.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस वरिष्ठ लिपिक नंदू पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी वरिष्ठ लिपिक श्रीमती.आशा बंडगर,कनिष्ठ लिपिक चित्रा घोडके,वाहनचालक मोहन कोळी तसेच दप्तरी अनिल वाघमारे उपस्थित होते.
*****
Thursday, 19 February 2026
‘माय भारत (मेरा युवा भारत)’ मेगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; शिवजयंतीनिमित्त ३ हजारांचा सहभाग
‘माय भारत (मेरा युवा भारत)’ मेगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; शिवजयंतीनिमित्त ३ हजारांचा सहभाग
धाराशिव,दि.१९ फेब्रुवारी (जिमाका) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्य, कर्तृत्व व राष्ट्राभिमान जागविणाऱ्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘My Bharat (Mera Yuva Bharat)’ मेगा पदयात्रेचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज करण्यात आले.या कार्यक्रमाचा शुभारंभ येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडिअम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.त्यानंतर जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी मेगा पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेची सुरुवात केली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,तहसिलदार मृणाल जाधव,प्रकाश व्हटकर,मुख्याधिकारी निता अंधारे,विविध विभागांचे अधिकारी -कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
या मेगा पदयात्रेमध्ये श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,आर्य चाणक्य प्रशाला, तेरणा पब्लिक स्कूल तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी,शिक्षक, पदाधिकारी आणि राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंसह जवळपास ३ हजार जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.युवक-युवतींच्या सहभागामुळे शिवजयंतीचा उत्साह द्विगुणित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
ही मेगा पदयात्रा सकाळी ८:३० वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथून प्रारंभ झाली.महात्मा ज्योतिबा फुले चौक,सुनील प्लाझा मार्गे नगरपरिषद रोड,जिल्हा परिषद,शासकीय विश्रामगृह, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून कोहिनूर हॉटेलसमोर,जुने दूरदर्शन केंद्र,समतानगर,श्री चित्रमंदिर गोरें कॉम्प्लेक्स,महात्मा ज्योतिबा फुले चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पदयात्रेचा समारोप झाला.
समारोपावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच शिवश्री श्रीकांत गवळी आणि वसुंधरा गुरव या चिमुरड्यांच्या दमदार भाषणांनी उपस्थितांना प्रेरित केले आणि कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण समारोप करण्यात आला.
****
छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती धाराशिवमध्ये जल्लोषात ; दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पणाने अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती धाराशिवमध्ये जल्लोषात ; दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पणाने अभिवादन
धाराशिव दि.१९ फेब्रुवारी (जिमाका) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व प्रेरणादायी राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज धाराशिव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या हस्ते मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक करण्यात आला.यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी परिसरात जयघोष आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे, तहसिलदार मृणाल जाधव,प्रकाश व्हटकर,विविध विभागांचे अधिकारी -कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण लाभले
******
वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सांगता
वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सांगता
धाराशिव दि.१९ फेब्रुवारी (जिमाका) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.देशभक्ती, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्राभिमानाने ओतप्रोत भरलेल्या या सोहळ्याची सांगता आज ‘वंदे मातरम’ या गीताने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात विजया कडवकर यांनी सादर केलेल्या “इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर ना होना” या भावगीताने झाली.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर उपस्थितांनी एकत्रितपणे “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्र गीत गायले आणि सभागृह देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून गेले.यानंतर विजया कडवकर व वैभवी कडवकर या भगिनींनी जिजाऊ वंदना सादर करून मातृशक्तीचे स्मरण घडविले. प्रसिद्ध शिवशाहीर सुभाष गोरे आणि त्यांच्या संघाकडून “मानाचा मुजरा” हा पोवाडा सादर करण्यात आला. पुढे शिवशाहीर बंडू खराटे व त्यांच्या संघाने “पुत्र जो झाला जिजाऊला, झाला आनंद शिवनेरीला” या पोवाड्याद्वारे शाहीरी जलसा रंगविला.या सादरीकरणातून शिवचरित्रातील पराक्रम,स्वराज्याची संकल्पना आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले.तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, धाराशिवच्या वतीने विशाल शिंगाडे व सहकलाकारांनी विविध लोकगीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे,लोहारा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती. वैशाली खराडे,नगरसेविका कमला लोडगे,तहसिलदार मृणाल जाधव व प्रकाश व्हटकर,विविध विभागांचे अधिकारी - कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.
कडवकर भगिनींनी भरतनाट्यम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तसेच अवघ्या पाच वर्षांच्या शिवश्री श्रीकांत गवळी या चिमुकल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भाषण सादर करून सभागृह भारावून टाकले. “गोधळ मांडला ग माय अग अंबाबाय,गोंधळाला ये” हे बहारदार गीत नृत्यासह सादर करण्यात आले आणि कार्यक्रमाला रंगत आली.उपजिल्हाधिकारी श्रीमती.स्वाती शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.राष्ट्रप्रेम आणि स्वराज्यभावनेचा संदेश देत ‘वंदे मातरम’ या गीताने दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या संपूर्ण सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, आदर्श,स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाचे प्रभावी वर्णन शिवशाहीरांनी पोवाड्यांच्या माध्यमातून उपस्थितांना ऐकविले.अधिकारी -कर्मचारी,नागरिक,मान्यवर तसेच विद्यार्थी व युवक-युवती यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सांस्कृतिक सोहळा अविस्मरणीय ठरला.
*****
Wednesday, 18 February 2026
पोवाड्यांतून शिवचरित्राचा जयघोष ; धाराशिव येथे शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक सोहळा उत्साहात
पोवाड्यांतून शिवचरित्राचा जयघोष ; धाराशिव येथे शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक सोहळा उत्साहात
धाराशिव दि.१८ फेब्रुवारी (जिमाका) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध इतिहास शिवशाहीर बिहारीलाल राजपूत यांच्या दमदार पोवाड्याने झाली.याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्र गीत तसेच जिजाऊ वंदना सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे गायिली.
यानंतर शिवशाहीर राणा जोगदंड व त्यांच्या संघाकडून शाहीरी जलसा कार्यक्रम उत्साहात सादर करण्यात आला.या कार्यक्रमात शिवचरित्रातील पराक्रम,स्वराज्याची प्रेरणा आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.तसेच शुभम खोत व सहकलाकारांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
श्रीपतराव भोसले हायस्कूलचे संगीत शिक्षक महेश पाटील यांनी “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती”, “मल्हार वारी मोतीयांनी द्यावी भरून- नाहीतर देवा जातो मी दुरुन”, “आम्ही अंबेचे गोंधळी”, “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” ही स्फूर्तीदायक गीते सादर करून वातावरण भारावून टाकले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष,जिल्हा विधी प्राधिकरण सचिव न्या.भाग्यश्री पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,उप विभागीय अधिकारी ओंकार देशमुख,नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे,कळंब नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती. सुनंदा कापसे,विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, आदर्श,स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रभावशाली वर्णन शिवशाहीरांनी पोवाड्यांच्या माध्यमातून उपस्थितांना ऐकविले.या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी,नागरिक, मान्यवर तसेच विद्यार्थी व युवक-युवती यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
*****
Tuesday, 17 February 2026
आयुक्त किरण जाधव यांची ‘आपले सरकार’ सेवा केंद्राला भेट; तृतीयपंथीय सक्षमीकरणाचा उपक्रम ठरतोय यशस्वी
आयुक्त किरण जाधव यांची ‘आपले सरकार’ सेवा केंद्राला भेट;
तृतीयपंथीय सक्षमीकरणाचा उपक्रम ठरतोय यशस्वी
धाराशिव,१७ फेब्रुवारी (जिमाका) लोकसेवा हक्क आयोगचे आयुक्त किरण जाधव यांनी आज १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील तसेच उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.त्याअंतर्गत देवांशी प्रकाश काकडे या तृतीयपंथीय व्यक्तीस दि.१ मे २०२५ रोजी ‘आपले सरकार’ सेवा केंद्राचा परवाना देण्यात आला.या माध्यमातून तृतीयपंथीय सक्षमीकरणाचा आदर्श उपक्रम राबविण्यात येत आहे.
आयुक्त श्री.जाधव यांनी केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला असता,दि.१ मे २०२५ पासून आतापर्यंत विविध प्रमाणपत्रांचे मोठ्या प्रमाणावर वितरण झाल्याची माहिती देवांशी काकडे यांनी दिली. त्यामध्ये वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे २४९,अप्लभूधारक प्रमाणपत्रे १५,भूमिहीन प्रमाणपत्रे ७,जात प्रमाणपत्रे 102,आर्थिक दृष्ट्या मागास (राज्य) प्रमाणपत्रे ४२ व (केंद्रीय) ३६,सर्वसाधारण प्रतिज्ञापत्रे १२२,उत्पन्न प्रमाणपत्रे १ हजार ४१,श्रावणबाळ योजनेची प्रमाणपत्रे २२,नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे १५२ तसेच केंद्रीय जात प्रमाणपत्रे २४ वितरित करण्यात आल्याची नोंद आहे.
तृतीयपंथीयांना संधी देत प्रशासनाने सामाजिक समावेशकतेचा आदर्श निर्माण केला असून,आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा उपलब्ध होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
******
शिवजयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारीला धाराशिव येथे सांस्कृतिक सोहळा
शिवजयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारीला धाराशिव येथे सांस्कृतिक सोहळा
धाराशिव,दि.१७ फेब्रुवारी (जिमाका) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, आदर्श,स्वराज्य संकल्पना, राष्ट्रनिर्मितीतील योगदान तसेच त्यांच्या जीवनावर आधारित नाट्यरूप सादरीकरणांचा समावेश असलेले विविध कार्यक्रम १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह,नगर परिषद,धाराशिव येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत,तर दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिक,विद्यार्थी,युवक -युवती, महिला तसेच सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींसाठी खुला आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार,त्यांचा पराक्रम आणि प्रेरणादायी जीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
. ००००००००००
घरपोच लोकसेवा हेच ध्येय आयुक्त श्री.किरण जाधव जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक
घरपोच लोकसेवा हेच ध्येय
आयुक्त श्री.किरण जाधव
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक
धाराशिव,दि.१७ फेब्रुवारी (जिमाका) सर्वसामान्य ग्रामस्थांना शासनाच्या सेवा वेळेत व घरपोच पद्धतीने उपलब्ध करून देणे हा लोकसेवा हक्क आयोगाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी केले.
आयुक्त श्री. जाधव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत महसूल शाखेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील,उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत १५० दिवसांच्या कार्यालयीन मूल्यमापनात जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांना राज्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल आयुक्तांनी जिल्हाधिकारी व सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.तसेच नागरिकांना तत्पर सेवा दिल्याबद्दल कळंब व परंडा तहसिल कार्यालय तसेच वाशी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार जाहीर सेवांची पूर्तता विहित कालमर्यादेत करणे संबंधित विभागासाठी बंधनकारक असून, विलंब झाल्यास जबाबदारी निश्चित केली जाईल,असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.सेवा अर्जांची वेळेत नोंद, निर्धारित मुदतीत निकाली काढणे, अपील प्रक्रिया व पारदर्शक माहिती देण्याबाबत काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना श्री.जाधव यांनी दिल्या.
जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या व्हॉट्सॲप चॅटबोट व ‘तुळजाई’ तक्रार नोंदणी ॲपच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्तांनी विशेष कौतुक केले.जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी या डिजिटल उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.या बैठकीला विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*****
Monday, 16 February 2026
'माय भारत’ मेगा पदयात्रेद्वारे शिवजयंतीचा उत्साह ; १९ फेब्रुवारीला धाराशिव येथे आयोजन
'माय भारत’ मेगा पदयात्रेद्वारे शिवजयंतीचा उत्साह ; १९ फेब्रुवारीला धाराशिव येथे आयोजन
धाराशिव, दि. १६ (जिमाका) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्य,कर्तृत्व व राष्ट्रनिर्मितीच्या कार्याचा गौरव करण्यासाठी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘My Bharat (Mera Yuva Bharat)’ मेगा पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त,छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत असून धाराशिव येथेही सकाळी ७.३० वाजता मेगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासन,सर्व शैक्षणिक संस्था,एनएसएस,एनसीसी,‘माय भारत’ तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे.
धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथून सकाळी ७.०० वाजता पदयात्रेला प्रारंभ होणार आहे.महात्मा ज्योतिबा फुले चौक,सुनील प्लाझा मार्गे नगरपरिषद रोड,जिल्हा परिषद,शासकीय विश्रामगृह,पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून डावीकडे वळून कोहिनूर हॉटेलसमोर,जुने दूरदर्शन केंद्र,समता नगर,श्री चित्रमंदिर गोरें कॉम्प्लेक्स,महात्मा ज्योतिबा फुले चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
*****
संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ ‘आकांक्षित जिल्हा’ ही ओळख पुसण्याचा संकल्प करूया -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ
‘आकांक्षित जिल्हा’ ही ओळख पुसण्याचा संकल्प करूया
-जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
धाराशिव दि.१६ फेब्रुवारी (जिमाका) संपूर्णता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा अर्थात संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते साईन बोर्डचे अनावरण व दीपप्रज्वलन करून करण्यात आला.या अभियानाचा कालावधी २८ जानेवारी ते १४ एप्रिल २०२६ असा राहणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) देवदत्त गिरी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार म्हणाले की,संपूर्णता अभियान २.० अंतर्गत सहा निर्देशांक शंभर टक्के संतृप्त करून यावेळी सुवर्ण पदक मिळविण्याचा निर्धार आहे.‘आकांक्षित जिल्हा’ ही धाराशिवची ओळख या अभियानाच्या माध्यमातून पुसून टाकायची असून त्यासाठी वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी ते तळागाळातील घटकांपर्यंत सर्वांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.जिल्ह्यातील ४४० ग्रामपंचायती टी.बी.मुक्त घोषित करण्यात आल्या असून संपूर्ण जिल्हा टी.बी.मुक्त करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
निती आयोगाद्वारे जानेवारी २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेला ‘आकांक्षित जिल्हा कार्यक्रम’ हा देशातील ११२ मागास जिल्ह्यांच्या जलद विकासासाठी राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. महाराष्ट्रातील धाराशिव,नंदूरबार, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे.आरोग्य,शिक्षण, कृषी आणि मूलभूत सुविधा या क्षेत्रांवर विशेष भर देत ४९ प्रमुख कामगिरी निर्देशांकांच्या आधारे जिल्ह्यांची प्रगती मोजली जाते.असे श्री.पुजार यावेळी म्हणाले.
संपूर्णता अभियान १.०हा टप्पा १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला होता. जिल्हास्तरावरील पाच आणि तालुकास्तरावरील सहा मुख्य निर्देशांक शंभर टक्के संतृप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.या अभियानाचा शुभारंभ ४ जुलै २०२५ रोजी परंडा येथे झाला होता. त्या वेळी विविध महिला बचतगट व ‘उमेद’च्या माध्यमातून खाद्यपदार्थ व विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले होते.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास रौप्य पदक तर तालुका कार्यक्रमांतर्गत परंडा तालुक्याला कांस्य पदक मिळाले.या यशात योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व चषक देऊन जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सन्मानित मान्यवरांमध्ये जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विनय कुलकर्णी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) देवदत्त गिरी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी (परंडा) गणेश कुकडे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक श्रीमती वनिता डोंगरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), परंडा तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार,परंडा गट विकास अधिकारी विनोद जाधव तसेच आरोग्य विभागातील डॉ. सुषमा सांजेकर, डॉ.रुपाली शिंदे,आरोग्य सेविका श्रीमती.आशा काळे,उपकेंद्र चिंचपूर बुद्रुक येथील आरोग्य सेवक संभाजी बडे,बिराप्पा कोटागोंडे,आशा गट प्रवर्तक,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी मदतनीस, ग्रामसखी,कृषी सखी,प्रभाग संघ व्यवस्थापक,बँक सखी,आर्थिक साक्षरता सखी,प्रभाग समन्वयक आणि सहायक कृषी अधिकारी यांचा समावेश होता.
कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी,कृषी अधिकारी,आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका,मदतनीस व ग्रामसखी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Posts (Atom)



































