Monday, 16 February 2026

संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ ‘आकांक्षित जिल्हा’ ही ओळख पुसण्याचा संकल्प करूया -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ ‘आकांक्षित जिल्हा’ ही ओळख पुसण्याचा संकल्प करूया -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार धाराशिव दि.१६ फेब्रुवारी (जिमाका) संपूर्णता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा अर्थात संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते साईन बोर्डचे अनावरण व दीपप्रज्वलन करून करण्यात आला.या अभियानाचा कालावधी २८ जानेवारी ते १४ एप्रिल २०२६ असा राहणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) देवदत्त गिरी आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार म्हणाले की,संपूर्णता अभियान २.० अंतर्गत सहा निर्देशांक शंभर टक्के संतृप्त करून यावेळी सुवर्ण पदक मिळविण्याचा निर्धार आहे.‘आकांक्षित जिल्हा’ ही धाराशिवची ओळख या अभियानाच्या माध्यमातून पुसून टाकायची असून त्यासाठी वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी ते तळागाळातील घटकांपर्यंत सर्वांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.जिल्ह्यातील ४४० ग्रामपंचायती टी.बी.मुक्त घोषित करण्यात आल्या असून संपूर्ण जिल्हा टी.बी.मुक्त करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. निती आयोगाद्वारे जानेवारी २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेला ‘आकांक्षित जिल्हा कार्यक्रम’ हा देशातील ११२ मागास जिल्ह्यांच्या जलद विकासासाठी राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. महाराष्ट्रातील धाराशिव,नंदूरबार, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे.आरोग्य,शिक्षण, कृषी आणि मूलभूत सुविधा या क्षेत्रांवर विशेष भर देत ४९ प्रमुख कामगिरी निर्देशांकांच्या आधारे जिल्ह्यांची प्रगती मोजली जाते.असे श्री.पुजार यावेळी म्हणाले. संपूर्णता अभियान १.०हा टप्पा १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला होता. जिल्हास्तरावरील पाच आणि तालुकास्तरावरील सहा मुख्य निर्देशांक शंभर टक्के संतृप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.या अभियानाचा शुभारंभ ४ जुलै २०२५ रोजी परंडा येथे झाला होता. त्या वेळी विविध महिला बचतगट व ‘उमेद’च्या माध्यमातून खाद्यपदार्थ व विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास रौप्य पदक तर तालुका कार्यक्रमांतर्गत परंडा तालुक्याला कांस्य पदक मिळाले.या यशात योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व चषक देऊन जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सन्मानित मान्यवरांमध्ये जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विनय कुलकर्णी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) देवदत्त गिरी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी (परंडा) गणेश कुकडे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक श्रीमती वनिता डोंगरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), परंडा तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार,परंडा गट विकास अधिकारी विनोद जाधव तसेच आरोग्य विभागातील डॉ. सुषमा सांजेकर, डॉ.रुपाली शिंदे,आरोग्य सेविका श्रीमती.आशा काळे,उपकेंद्र चिंचपूर बुद्रुक येथील आरोग्य सेवक संभाजी बडे,बिराप्पा कोटागोंडे,आशा गट प्रवर्तक,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी मदतनीस, ग्रामसखी,कृषी सखी,प्रभाग संघ व्यवस्थापक,बँक सखी,आर्थिक साक्षरता सखी,प्रभाग समन्वयक आणि सहायक कृषी अधिकारी यांचा समावेश होता. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी,कृषी अधिकारी,आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका,मदतनीस व ग्रामसखी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *****