Friday, 9 February 2018

राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन संपन्न




उस्मानाबाद,दि.10:-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणनवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांच्या निर्देशानूसार दिनांक 10 फेब्रुवारी 2018 रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10.30 वाजता जेष्ठ नागरिक आनंदराव साहेबराव राजेनिंबाळकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने लोकअदालतीचे उद्घाटन झाले.  
यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. डी.एन. आरगडे, जिल्हा न्यायाधिश 1 एस.ए.ए.आर औटी, जिल्हा न्यायाधिश 2 पी.जे. पाटील, जिल्हा न्यायाधिश 3 आर.एन. रोकड, तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर.जे. राय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री एस.बी. देसाई, अपर जिल्हाधिकारी पराग सोमन, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. रमेश भोसले यांच्यासह न्यायाधीश, जिल्हयातील विधीज्ञ, पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.

आयकर कपात व आयकर विवरणपत्र दाखल कसे करावे कार्यशाळा संपन्न




उस्मानाबाद, दि.07 :-   इन्कम टॅक्स हा शासनाचाअत्यंत मोठा उत्पन्नाचा स्त्रोत आहे त्यामुळे इन्कम टॅक्स न भरणे, इन्कम टॅक्स भरणे आणि तो शासनाला न जमा करणे, इन्कम टॅक्स भरणे, शासनाला जमा करणे परंतु त्याचे तिमाही विवरणपत्र दाखल न करणे यापैकी कुठेही चुक झाली तर दंड, व्याज, याशिवाय गुन्हा दाखल होऊन शिक्षा देखील होऊ शकते अशी माहिती आयकर, लातूर विभागाचे अति. आयुक्त श्री. संदिपकुमार साळुंके यांनी दिली.
आयकर विभाग, औरंगाबाद व कर सल्लागार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  आयकर कपात व आयकर विवरणपत्र दाखल करणे या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. 
            यावेळी लातूर विभाग वार्ड 4 चे आयकर अधिकारी श्री. आर.एस. वाघमारे, नांदेड विभागाचे यु.एल. जोशी, उस्मानाबाद विभागाचे जी.एस. मैत्री, लातूर विभाग वार्ड 3 चे डी.एम. रंगदळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
            कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयकर, लातूर विभागाचे अति. आयुक्त श्री. संदिपकुमार साळुंके यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
श्री. साळुंके पुढे म्हणाले की, आपण शासकीय अधिकारी, कर्मचारी देशाच्या उभारणीला सहकार्य करत असतो, म्हणून इन्कम टॅक्स भरणे, इन्कम टॅक्स भरणे आणि तो शासनाला जमा करणे, इन्कम टॅक्स भरणे, शासनाला जमा करणे आणि त्याचे तिमाही विवरणपत्र दाखल न करणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाला शासन चालविण्यासाठी सतत पैश्याची आवश्यकता असते, म्हणून शासन जिथे उत्पन्न निर्माण होतं त्या उत्पन्नावरच इन्कमटॅक्स आकारते, त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नित्यनियमाने आयकर भरणे आवश्यकच आहे.  
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. रविंद्र कदम, सूत्रसंचालन अमोल आण्णाप्पा लोहार, आभार दिपक भातभागे यांनी मानले. 
            या कार्यक्रमास जिल्हयातील शासकीय विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. 

गर्भलिंगनिदान चाचणी करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास 1 लाखाचे बक्षीस



उस्मानाबाद, दि.09 :-   उस्मानाबाद जिल्हयामध्ये गर्भलिंगनिदान चाचणी होत असल्याची माहिती देणाऱ्यास 1 लाखाचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा पीसीपीएनडीटी कलम 17 अन्वये जिल्हा सल्लागार समिती, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबादच्या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे केली.
            यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ. वाघचौरे,  बालरोगतज्ञ डॉ. दिग्गज दापके, क्ष किरण तज्ञ डॉ. संजय बीरादार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, लोकप्रतिष्ठाण सामाजिक संस्था प्रतिनिधी डॉ. स्मिता शहापूरकर, श्री. कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळचे प्रतिनिधी डॉ. रमेश दापके यांची प्रमुख उपस्थिती होती.
            उमरगा, वाशी, परंडा, भूम व कळंब या सिमेलगतच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये विशेष लक्ष देवून 1000 मुलांच्या मागील मुलींच्या संख्येत वाढ होणे गरजेचे असल्याने जिल्हा प्रशासनातील प्रत्येकाने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या तुळजापूर ग्रामीण, सास्तूर ग्रामीण, उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय, उस्मानाबाद येथे शासकीय सोनोग्राफी सेंटर सुरु असून लवकरच उमरगा उपजिल्हा रुग्णालयात सुरु होणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांनी दिली. तसेच जिल्हयात कोठेही गर्भलिंगनिदान चाचणी होत असल्याची माहिती www.amchimulgi.gov.in  या संकेतस्थळावर किंवा 18002334475 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी असे आवाहनही केले. 

Monday, 5 February 2018

राज्यमंत्री अर्जुन खोतकर उस्मानाबादचे नूतन पालकमंत्री



उस्मानाबाद, दि.05 :-   उस्मानाबाद जिल्हयाचे नूतन पालकमंत्री म्हणून वस्तोद्योग, दुग्धविकास व पशुसवंर्धन राज्यमंत्री श्री. अर्जुन खोतकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

            परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या जागी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे नूतन पालकमंत्री असणार आहेत. अर्जुन खोतकर हे जालना येथून आमदार आहेत. 

जिल्हा वार्षिक योजना 18-19 अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयासाठी 113 कोटी 13 लक्ष रुपयांची अतिरिक्त मागणी सादर





उस्मानाबाद, दि.05 :-   वित्त व नियोजन मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना बैठकीमध्ये सन 2018-19 करिता उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 148 कोटी 13 लाख रुपयांची मागणी प्रस्तावित करण्यात आली असून 113 कोटी 13 लाख रुपयाची अतिरिक्त मागणी सादर करण्यात आली.
याप्रसंगी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्हयाचे सहपालकमंत्री महादेव जानकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी  राधाकृष्ण गमे यांनी सांगितले की, जिल्हा वार्षिक योजना 2018-19 अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 148 कोटी 13 लक्ष रुपये नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र विविध यंत्रणांकडून 336 कोटी 94 लक्ष मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजना 2018-19 अंतर्गत 113 कोटी 13 लक्ष रुपयाची अतिरिक्त मागणी सादर करण्यात येत आहे. अतिरिक्त मागणीपैकी नीती आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी रु. 76.97 कोटी आणि इतर नियमित योजनांसाठी 36.16 कोटी इतक्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. 
 ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील कृषि व संलग्न सेवा (गाभा क्षेत्र), ग्रामविकास, सामाजिक व सामूहिक सेवा, लघुपाटबंधारे, ऊर्जा, उद्योग, सार्वजनिक बांधकाम (रस्ते), सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवा, नाविन्यपूर्ण योजना, टंचाई, अतिवृष्टी, गारपीट, पूरपरिस्थिती, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यासारख्या योजनांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. तसेच जिल्ह्यासाठीचे मदत व पूनर्वसन विभागाचे 16 कोटी रुपये अद्याप प्राप्त झाले नसून हा निधी तात्काळ मिळावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.  
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ई-लर्निंग करण्यासाठी अधिकचा निधी देण्याबरोबरच जिल्हयाच्या विकास कामांसाठी निधी देण्याची आग्रही मागणी केली. तसेच बळीराजा चेतना अभियानाचा उर्वरित निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणीही  त्यांनी यावेळी केली.
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 5 कोटी निधी मिळावा, खवा उद्योग पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यासाठीही निधी मिळावा, दलित समाजाच्या विकास योजनांसाठी अधिक निधी मिळावा आणि वाशी, लोहारा फायर ब्रिगेड अतिरिक्त निधीची मागणी त्यांनी यावेळी केली.    
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वित्त व नियोजन मंत्री श्री. मुनगंटीवार यांना उस्मानाबाद जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असून जिल्ह्याचे अर्थकारण शेती केंद्रित आहे. परंतु अनियमित व अपुरे पर्जन्यमान, पावसातील खंड, अवकाळी पाऊस,अतिवृष्टी, गारपीट यासारख्या एक ना अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे येथील शेतकरी कायमच अडचणीत येत आहे. पाण्याची शाश्वत उपलब्धता नसल्यामुळे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न फारच कमी आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या उस्मानाबाद जिल्ह्यातच झाल्या आहेत, हे दुर्दैवी वास्तव आहे. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक केवळ ०.६४९ आहे, जो की राज्यातील सर्वात कमी निर्देशांक असणाऱ्या जिल्ह्यात पाचवा असून नीती आयोगाच्या निवडलेल्या देशातील ११५ जिल्ह्यामध्ये देखील उस्मानाबादचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची सर्वंकष आर्थिक, भौगोलिक, नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेवून येणारा अर्थसंकल्प मांडत असतांना वरील बाबींचा गांभीर्याने विचार करून जिल्ह्याला सढळ हाताने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
  वित्त व नियोजन मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास कामे राबवत असताना पाणी, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांबरोबरच रोजगार निर्मितीवर भर देण्यात यावा.  नीती आयोगाच्या 115 मागास जिल्हयांच्या यादीत उस्मानाबाद जिल्हयाचेही नाव आहे, जिल्हयात मोठया प्रमाणावर विकास कामे हाती घेऊन त्यासाठी निधी उपलब्ध करुन देणार आणि उस्मानाबाद जिल्हा मॉडेल जिल्हा करण्याचे यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवाहन केले. अतिरिक्त मागणीबाबत सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

Sunday, 4 February 2018

पारंपारिक न्यायालयापेक्षा वेगळे न्यायालय असल्याने पक्षकारांना वेगळया पध्दतीने न्याय मिळवून देणे गरजेचे - पालक न्यायमूर्ती व्ही.के. जाधव

उस्मानाबाद, दि.04 :-   मानसिक स्वास्थ गमावून बसलेल्या जोडप्यांना खूप वेगळया पध्दतीने हाताळून नेमका मार्ग शोधणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती तथा उस्मानाबादचे पालक न्यायमूर्ती श्री. व्ही. के. जाधव यांनी व्यक्त केले.
येथील कौटुंबिक न्यायालयाच्‍या  उद्घाटन  समारंभात ते बोलत होते. पालक न्यायमुर्ती कौटुंबिक न्यायालय, महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद विभागाच्या श्रीमती  विभा कंकणवाडी व उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती तथा उस्मानाबादचे पालक न्यायमूर्ती श्री. व्ही. के. जाधव यांच्या हस्‍ते येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन झाले.   
यावेळी उस्मानाबादचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर देशमुख, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए.पी. कानडे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड निलेश डी. बारखडे, जिल्‍हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.   



श्री. जाधव पुढे म्हणाले की, 13 वे कौटुंबिक न्‍यायालयाचे रितसर उद्घाटन उस्मानाबाद येथे झाले आहे. या न्‍यायालयात येणाऱ्या व्‍यक्‍ती  निराश, कौटुंबिक कलहामुळे जीवनावरील विश्‍वास उडालेल्‍या असतात. येथील वातावरणामुळे त्‍यांना संवादासाठी वेळ मिळेल आणि घटस्‍फोटासाठी आलेल्‍या व्‍यक्ती परत आनंदात एकत्र जातील, अशा रितीने कामकाज करुन जास्तीत-जास्त प्रमाणात कुटुंब जोडण्यासाठी या न्यायालयाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
समाजातील एकत्र कुटुंब पध्‍दतीचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल चिंता व्‍यक्‍त करत, पूर्वी एकत्र कुटुंब पध्‍दती होती, घरांतील ज्‍येष्‍ठ सदस्‍यांच्‍या मध्‍यस्‍थीमुळे पती-पत्‍नीतील वाद संपुष्‍टात यायचे. बदलत्‍या  जीवनशैलीमुळे कौटुंबिक वादाचे प्रमाण वाढत आहेत. जीवनात सुबत्‍ता असलेल्‍या व्‍यक्‍ती कौटुंबिक कलहामुळे त्रस्‍त असल्‍याची उदाहरणे देऊन कौटुंबिक न्‍यायालयांमध्‍ये येणाऱ्या व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आनंद, आशा निर्माण करण्‍याची मोठी जबाबदारी या क्षेत्रात काम करणाऱ्यांवर असल्‍याचे प्रतिपादन पालक न्यायमुर्ती कौटुंबिक न्यायालय, महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद विभागाच्या श्रीमती  विभा कंकणवाडी  यांनी यावेळी केले.
कौटुंबिक न्‍यायालयाच्‍या स्‍थापनेचा उद्देश सांगून विभक्‍त झालेले आणि घटस्‍फोटासाठी वेगवेगळ्या मार्गांनी या न्‍यायालयात आलेली जोडपी एकत्रित समाधानकारकपणे आपल्‍या मुलांचा हात हातात घेऊन येथून बाहेर जातील, असा विश्वास देत येथील कौटुंबिक न्यायालयाचे कार्यक्षेत्र शहर मर्यादित असून त्याचे कार्यक्षेत्र तालुका मर्यादित करण्यात यावे अशी मागणी यावेळी विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड निलेश बारखडे यांनी प्रास्ताविकात केली.  
शेवटी, कौटुंबिक न्यायालयात न्यायालयीन कक्षाची रचना विशिष्ट पध्दतीने करण्यात आली असून पक्षकारांसाठी बसण्यासाठी स्वतंत्र प्रतिक्षालय, सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचे सांगून उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए.पी. कानडे यांनी केले.  
यावेळी उस्मानाबाद जिल्हयातील विधीज्ञ, पत्रकार मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.