Saturday, 31 January 2026
*लेक वाचवा : लिंगगुणोत्तर समतोलासाठी कायदा,समाज आणि आपण*
*विशेष लेख*
*लेक वाचवा : लिंगगुणोत्तर समतोलासाठी कायदा,समाज आणि आपण*
धाराशिव जिल्हा हा “बेटी बचाओ–बेटी पढाओ” या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असून, निती आयोगाच्या आकांक्षित (Aspirational) जिल्हा उपक्रमांतर्गत विशेष लक्ष दिला जाणारा जिल्हा आहे.निती आयोगाच्या महत्त्वाच्या निर्देशांकांपैकी लिंगगुणोत्तर हा एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक निर्देशांक आहे.मात्र गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण सातत्याने घटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.ही बाब अत्यंत चिंताजनक असून, भविष्यात असेच लिंगगुणोत्तर घटत राहिल्यास समाजात मुला-मुलींमध्ये गंभीर असमतोल निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जिल्ह्यात लिंगगुणोत्तर समतोल राखणे हे अत्यावश्यक बनले आहे.गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र – (गर्भलिंग निवड प्रतिबंध) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र –( गर्भलिंग निवड प्रतिबंध) कायदा अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.लिंगगुणोत्तर वाढविणे तसेच गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्र चालक,गर्भपात केंद्र चालक,खाजगी व शासकीय स्त्रीरोगतज्ज्ञ,IMA, FOGSI,NIMA तसेच सर्व शासकीय व खाजगी डॉक्टर यांच्यासाठी कार्यशाळा व बैठका वेळोवेळी आयोजित करण्यात येत आहेत.
तालुकास्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर अंगणवाडी सेविका, एएनएम व आशा कार्यकर्ती यांच्या संयुक्त बैठका घेण्यात येत आहेत. गावनिहाय लिंगगुणोत्तराची माहिती संकलित केली जात असून जिल्ह्यातील प्रत्येक सोनोग्राफी व एमटीपी केंद्रांची त्रैमासिक तपासणी केली जाते.आवश्यकतेनुसार क्रॉस इन्स्पेक्शन करण्यात येते तसेच गुप्त पद्धतीने बनावट रुग्ण पाठवून गर्भलिंग निदान होत आहे का, याचीही काटेकोर तपासणी केली जाते.
*आपण आपल्या कार्यक्षेत्रात काय करू शकतो :*
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र – गर्भलिंग निवड प्रतिबंध) कायदा या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक सोनोग्राफी केंद्र कायद्यातील नियम व तरतुदी पाळत आहे की नाही,यावर देखरेख ठेवण्यासाठी समुचित अधिकारी व सल्लागार समित्या कार्यरत आहेत.या यंत्रणांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
समाजात मुलींची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी विविध सभांमधून प्रबोधन करता येईल.या समस्येच्या मुळाशी असलेल्या पुरुषप्रधान मानसिकता,पैशाच्या हव्यासातून होणारे गैरप्रकार यावर स्पष्टपणे चर्चा करणे गरजेचे आहे. प्रभाग व गाव पातळीवर लिंगनिहाय जन्मनोंदणीची पडताळणी करून उपलब्ध माहिती सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करता येईल.
प्रसारमाध्यमांचा सहभाग घेऊन जनजागृती अधिक प्रभावीपणे करता येईल.गावातील महिला मंडळे, युवक मंडळे यांचा सहभाग घेऊन “मुलगाच हवा” ही मानसिकता बदलण्यासाठी विशेष प्रयत्न करता येतील.गर्भलिंग निवडीशी संबंधित सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर, रेडिओलॉजिस्ट,दवाखाने किंवा प्रयोगशाळांबाबत माहिती मिळाल्यास पुराव्यांसह समुचित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे.
कायदा पुरेसा नाही,मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
मुलींना जन्मालाच न घालण्याची मानसिकता समाजात खोलवर रुजलेली आहे.केवळ कायदा करून ही समस्या संपणार नाही.कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसोबतच स्त्रीविरोधी पुरुषप्रधान मानसिकता बदलणे,तसेच मुलींमध्ये निर्णयक्षमता,आत्मविश्वास आणि स्वावलंबन विकसित करणे आवश्यक आहे.मुलींचे शिक्षण, क्षमता विकास आणि संधींची उपलब्धता यावर आपला निधी व वेळ सकारात्मकरीत्या वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
*गर्भलिंग निदानाचे गंभीर सामाजिक परिणाम :*
गर्भलिंग निदानामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत असून समाजाचा नैतिक पाया ढासळत आहे.देशातील काही भागांत गेल्या १०-१५ वर्षांत मुलींचा जन्मच झालेला नाही,अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. मुलींचा व्यापार,लैंगिक शोषण वाढत आहे.काही ठिकाणी मुलींना जनावरांसारखे विकत घेतले जाते. स्त्रियांवरील अत्याचार, हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे. बहुपतीत्वाच्या प्रथा लादल्या जात आहेत.गुजरात,राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत लग्नासाठी मुली न मिळाल्याने इतर राज्यांतून फसवणूक करून मुली आणल्या जात आहेत.
*का नकोशा वाटतात मुली :*
मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी परक्याचे धन ही मानसिकता आजही समाजात आहे.हुंडा पद्धतीचा भस्मासूर,मुलींवर केलेल्या खर्चाचा “परतावा नाही” असा गैरसमज,रुढी-परंपरा आणि पुरुषप्रधान संस्कृती या सर्व कारणांमुळे मुलींकडे दुर्लक्ष होते.
*सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा गैरवापर :*
गर्भातील बाळाचे लिंग जाणून घेऊन मुलगी असल्यास गर्भपात करणे म्हणजे गर्भलिंग निवड.अल्ट्रासाउंड सोनोग्राफीचा या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला.१९९१ ते २०११ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार देशातील स्त्री-पुरुष प्रमाण झपाट्याने घटले आहे.
*गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान तंत्र कायदा काय सांगतो :*
सन १९९४ साली देशभर लागू झालेल्या या कायद्यानुसार गर्भधारणेपूर्वी किंवा नंतर गर्भलिंग निवड व त्याची जाहिरात करण्यास बंदी आहे.कायद्याचा भंग करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे.पहिल्या गुन्ह्यासाठी संबंधित डॉक्टरला ३ वर्षांपर्यंत कैद,१० हजार रुपये दंड व मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी निलंबन.
पुनरावृत्ती झाल्यास ५ वर्षांपर्यंत कैद,५० हजार रुपये दंड व कायमस्वरूपी नोंदणी रद्द.गर्भलिंग निवडीसाठी दबाव आणणाऱ्या व्यक्तीस ३ वर्षांपर्यंत कैद व ५० हजार रुपये दंड या कायद्याखाली गर्भवती महिला निर्दोष मानली जाते
*तक्रार कुठे करावी*
राज्य सरकारने नियुक्त केलेल्या जिल्हा किंवा तालुका स्तरावरील समुचित प्राधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते.यासाठी www.amchimulgimaha.in ही सार्वजनिक आरोग्य विभागाची वेबसाईट उपलब्ध असून,येथे नाव न सांगता तक्रार करता येते.तसेच टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४४७५/ १०४ वरही संपर्क साधता येतो.
‘बेटी बचाओ–बेटी पढाओ’ अंतर्गत गावपातळीवरील उपक्रम,व्हिलेज हेल्थ प्लॅनमध्ये हा विषय समाविष्ट करून ‘आकडे बोलतात’ फलक, बालिका जन्मोत्सव,युवासंसद, गरोदर मातांसाठी शपथ कार्यक्रम, नवविवाहित दांपत्यांची शपथ,लेक लाडकी अभियान,महिला ग्रामसभा, जनजागृती फेऱ्या,एक मुलगी-एक झाड उपक्रम राबवता येतो.यामुळे समाजात स्त्री-पुरुष समतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचतो.
मुली आणि स्त्रियांना सन्मानाने जगता यावे,यासाठी सामाजिक परिवर्तन घडवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.गर्भलिंग निदानासारख्या अमानवी प्रथांना आळा घालण्यासाठी कायदा, प्रशासन आणि सजग नागरिक यांचा एकत्रित प्रयत्नच यशस्वी ठरू शकतो.लेक वाचली तरच समाज वाचेल, ही जाणीव प्रत्येकाच्या मनात रुजणे गरजेचे आहे.
*संकलन*
*जिल्हा माहिती कार्यालय*
*धाराशिव*
Wednesday, 28 January 2026
ाज्याचे 'खंबीर नेतृत्व', मराठवाड्याचा 'आधारवड' कोसळला!
राज्याचे 'खंबीर नेतृत्व', मराठवाड्याचा 'आधारवड' कोसळला!
प्रशासनावरील ज्यांची ‘वचक’, कामाचा ‘उरक’ पाहून अधिकारीही थक्क व्हायचे, असे संपूर्ण राज्याचे खंबीर नेतृत्व आज हरपले. अजित (दादा) पवार केवळ एका जिल्ह्याचे मर्यादित नेतृत्व नव्हते, तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून राज्याचा गाडा समर्थपणे हाकत. ते राज्याचे नेते होतेच, पण त्याही पलीकडे जाऊन मराठवाडा विभागावर त्यांचा विशेष लोभ होता. दादा मूळचे पश्चिम महाराष्ट्राचे, पण धाराशिव त्यांचे सासर. त्यामुळे मराठवाड्याचे 'जावई' म्हणून त्यांचा या भागावर जीव होताच, पण बीड जिल्ह्याचे 'पालकमंत्री' म्हणून त्यांनी जिल्ह्याला पितृवत प्रेम दिले.
तखत श्री हजूर अबचलनगर साहिब जी गुरुद्वारातील ती 'अखेरची' भेट
अवघ्या दोन दिवसांपूर्वी, २५ जानेवारीला दादा मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर, नांदेडच्या पवित्र भूमीत होते. नांदेड येथील 'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब' गुरुद्वारात ते नतमस्तक झाले. सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पवित्र गुरुद्वारात अत्यंत भक्तीभावाने दर्शन घेतले. 'कडा प्रसाद' ग्रहण केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. दर्शन झाल्यानंतर ते गुरुद्वारा परिसरात थांबले. 'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब'जीं चे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊन, बाहेर येईपर्यंत दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाट पाहत होते. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर सर्व मंत्री महोदय यांनी पवित्र गुरुद्वारातून एकत्रितपणे ऐतिहासिक 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शताब्दी समागम कार्यक्रमासाठी मोदी मैदानाकडे प्रस्थान केले. राज्याचे नेतृत्व म्हणून ज्येष्ठता आणि पदाचा मान राखण्याची त्यांची ही कृती सर्वांनाच भावली. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी सन्मान केला.
पालकमंत्र्यांचा 'धडाका' आणि 'विश्वविक्रम'
एकीकडे नांदेडमध्ये ते अध्यात्मात रमले होते, तर दुसरीकडे बीडमध्ये त्यांनी विकासाचा विक्रम रचला होता. १ जानेवारी २०२६ ला वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बीडमध्ये एकाच वेळी १३६३ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून प्रशासनालाही अवाक केले होते.
केवळ इमारती नाहीत, तर निसर्गाशी नाते जोडत त्यांच्याच उपस्थितीत बीडमध्ये एकाच दिवशी ३० लाखांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. याची नोंद 'वर्ल्ड रेकॉर्ड' (India Book of Records) मध्ये झाली. तरुणांवर त्यांचे विशेष प्रेम होते, म्हणूनच खेळाडूंसाठी क्रीडा विभागाचा २५ कोटींचा निधी मंजूर करून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'टर्फ ग्राउंड' बीडकरांना दिले.
सहकार आणि अर्थाची जोड
प्रशासकीय शिस्तीचे भोक्ते असलेल्या दादांनी बीडमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विभागाच्या भव्य 'सहकार संकुला'चे भूमिपूजन केले. सर्व सहकारी कार्यालये एकाच छताखाली असावीत, हा त्यांचा आग्रह होता. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री या नात्याने त्यांनी बीडच्या विकासाला कधीच निधी कमी पडू दिला नाही. १७ सप्टेंबर २०२५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अहिल्यानगर-बीड’ रेल्वेचे उद्घाटन झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २ हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणि ऐनवेळी दिलेले १५० कोटी रुपये, ही अर्थमंत्री म्हणून दादांनीच मंजूर केले होते.
हृदयाची काळजी घेणारे 'दादा'
बीड जिल्हा रुग्णालयात 'कार्डियाक कॅथलॅब' देऊन त्यांनी गोरगरिबांच्या हृदयाची सोय केली. दुर्दैवाने, बीडकरांच्या हृदयाची काळजी घेणाऱ्या पालकमंत्र्यांचे हृदय मात्र आज थांबले.
एकीकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे सुकाणू समर्थपणे सांभाळणारे 'वित्त व नियोजन मंत्री' आणि दुसरीकडे बीडच्या प्रत्येक प्रश्नावर बारकाईने लक्ष घालणारे 'पालकमंत्री'... अशी दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे पेलली. धाराशिवचे जावई आणि बीडचे पालक असलेल्या या विकासपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली!
- डॉ. श्याम टरके
सहायक संचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय, लातूर.
Tuesday, 27 January 2026
१५० दिवसांचा कार्यक्षम प्रशासनाचा आदर्श ; जिल्हा राज्यात तृतीय जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाचे राज्यभर कौतुक
१५० दिवसांचा कार्यक्षम प्रशासनाचा आदर्श ; जिल्हा राज्यात तृतीय
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाचे राज्यभर कौतुक
धाराशिव दि.२७ जानेवारी (जिमाका) राज्य शासनाने प्रशासनात अधिक पारदर्शकता, गतिमानता निर्माण व्हावी तसेच नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शासकीय उपक्रम व सुविधांचा थेट लाभ जनतेपर्यंत पोहोचावा,या उद्देशाने १५० दिवसांचा विशेष कृती कार्यक्रम राबविला.या कार्यक्रमांतर्गत सर्व उपक्रम प्रभावीपणे व गुणवत्तापूर्ण रीतीने अंमलात आणण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या कुशल नेतृत्व व दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली १५० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार धाराशिव जिल्ह्यात प्रशासन अधिक सक्षम,तंत्रज्ञानस्नेही व नागरिककेंद्रित करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित करण्यात आल्या.यामध्ये डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड प्रणाली,तुळजाई चॅटबॉट, कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर प्रणाली तसेच जीवनरेखा प्रणाली या महत्त्वाच्या डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे.
डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड प्रणालीद्वारे जिल्ह्यातील विविध विभागांच्या शासकीय योजनांचा एकत्रित आढावा घेणे सुलभ झाले आहे.या प्रणालीमुळे योजनांची उद्दिष्टपूर्ती, प्रगतीवर सतत लक्ष ठेवणे व वेळेत पाठपुरावा करणे अधिक कार्यक्षम पद्धतीने शक्य झाले असून प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेला गती मिळाली आहे.
तुळजाई चॅटबॉट - ही प्रणाली नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे.या माध्यमातून पुरवठा विभाग, संजय गांधी योजना, नैसर्गिक आपत्ती,आपले सरकार सेवा केंद्रावरील सेवा याबाबतची माहिती काही क्षणांत उपलब्ध होते.जिल्हा संकेतस्थळाशी संलग्न असलेल्या या प्रणालीवरून नागरिक घरबसल्या आवश्यक कागदपत्रांची माहिती, योजना पात्रता तसेच शंकांचे तात्काळ निरसन करू शकतात. मोबाईल,लॅपटॉप किंवा संगणकावर सहज वापरता येणाऱ्या या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचून प्रशासन अधिक गतिमान झाले आहे.
कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर प्रणाली ही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे.शासन निर्णय,कायदे, परिपत्रके यांची एकत्रित व अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणाऱ्या या प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ,अचूक व जलद झाले आहे.जीवनरेखा प्रणाली ही शेत रस्त्यांशी संबंधित एक महत्त्वाची डिजिटल व्यवस्था असून, जिल्ह्यातील सर्व गट नंबर व सर्वे नंबरनिहाय शेत रस्त्यांची नोंद या प्रणालीत करण्यात आली आहे. त्यामुळे शेत रस्त्यांबाबतच्या तक्रारी, नागरिकांचे प्रश्न,तसेच रस्ता उपलब्धतेसाठीचे अर्ज यांचे प्रभावी निराकरण शक्य झाले असून ग्रामीण भागातील विकासाला मोठी चालना मिळत आहे.
यासोबतच ई-ऑफिस प्रणालीचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे पेपरलेस कार्यालय ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असून, शासकीय कामकाजाचा निपटारा जलद व पारदर्शक पद्धतीने होत आहे.या सर्व उपक्रमांचा थेट लाभ जिल्ह्यातील नागरिकांना मिळत असून,सेवा वितरण अधिक सुलभ, जलद व विश्वासार्ह झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल राज्यभरातून कौतुक होत असून पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांचा सत्कार करून जिल्हा प्रशासनाच्या कार्याचे विशेष कौतुक केले.भविष्यात धाराशिव जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी श्री.विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री.शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री. प्रविण धरमकर,उपजिल्हाधिकारी (मध्यम प्रकल्प क्र. २) श्री.संतोष राऊत,उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती अरुणा गायकवाड, उपजिल्हाधिकारी (मांजरा प्रकल्प) श्री.श्रीकांत पाटील,सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूम श्री.रेवैयाह डोंगरे (भा.प्र.से.), उपविभागीय अधिकारी धाराशिव श्री.ओंकार देशमुख, उमरगा श्री.दत्तू शेवाळे,कळंब श्री. गणेश शिंदे,सर्व तालुका तहसीलदार, महसूल तहसीलदार श्री.प्रकाश व्हटकर,सर्व नायब तहसीलदार, जिल्हा सूचना व विज्ञान केंद्र अधिकारी श्री.अंकीत सिंग,सीएम फेलो श्री.मनोज नाईकवाडी, श्री.रणधिरसिंह भोसले,जीआयओ श्री.विश्वजीत साखरे,जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक श्री.तानाजी हंगरगेकर, सीनियर नेटवर्क इंजिनियर श्री.बंडू गाडे,श्री.अमोल कांबळे तसेच जिल्ह्यातील सर्व सहायक महसूल अधिकारी,महसूल सहायक,मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी ते महसूल सेवक यांनी या यशासाठी सांघिक प्रयत्न केले.
या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार यांनी विशेष कौतुक केले.तसेच प्रशासनात Artificial Intelligence (AI) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आल्याचे नमूद करून नागरिकांनी या सर्व डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले. १५० दिवसांचा हा उपक्रम धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरत असून,भविष्यात जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
*******
Monday, 26 January 2026
७७ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ३ हजार विद्यार्थ्यांची देशभक्ती गीतांवर सामूहिक कवायत
७७ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
३ हजार विद्यार्थ्यांची देशभक्ती गीतांवर सामूहिक कवायत
धाराशिव दि.२६ जानेवारी (जिमाका) देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करत पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.ते पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन असंख्य वीरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला.अपार यातना सहन करत त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली.या सर्व थोर स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान भारताच्या स्वातंत्र्य व प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.
आज पोलीस कवायत मैदान क्र.२ येथे ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थिताना संबोधित करताना श्री.सरनाईक बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक श्री. बुबासाहेब जाधव,भास्करराव नायगावकर,नामदेव माने,श्रीपती जावळे,बाबुराव तवले,शेषराव बनसोडे,कलावती उंबरे, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भारतीय राज्यघटना ही देशाला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी असून २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारलेली ही राज्यघटना कोट्यवधी नागरिकांच्या स्वप्नांचे व आत्मसन्मानाचे प्रतिबिंब आहे,असे सांगून पालकमंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,या राज्यघटनेमुळे भारत सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगात ओळखला जात असून स्वातंत्र्य, समता,बंधुभाव व सामाजिक न्याय या मूल्यांवर देशाची उभारणी झाली आहे.जात,धर्म,लिंग वा भाषा यांचा भेद न करता प्रत्येक नागरिकाला सन्मानाने व सुरक्षिततेने जगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,राज्य सरकार मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक विकास, सामाजिक न्याय व सुशासन या त्रिसूत्रीवर कार्यरत असून राज्य प्रगतीपथावर आहे.आजच्या प्रजासत्ताक दिनी प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्यांचे पालन करण्याची,राष्ट्रीय एकात्मता जपण्याची व आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्याची शपथ घ्यावी. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, पर्यावरण संवर्धन,सामाजिक सलोखा व राष्ट्रप्रेम हीच उज्ज्वल भविष्यासाठी खरी ताकद असून जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचारी व सजग नागरिकांचे त्यांनी अभिनंदन केले.
प्रारंभी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी राष्ट्रध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली.यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी परेडचे निरीक्षण केले.पोलीस परेडचे संचलन भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती. मेघना आर्यन यांनी केले.परेडमध्ये पोलीस पुरुष- महिला,गृह रक्षक दल,एनसीसी, पोलीस बँड पथक, तुळजापूर सैनिक स्कूलचे विविध शाळांचे एनसीसी पथक तसेच स्काऊट गाईडचे पथक सहभागी झाले होते.यावेळी पोलिसांचे वज्र,शीघ्र कृती दल,श्वान कॅप्टन, बेवारस वस्तूपासून सावधान,दंगल नियंत्रण पथक,आपत्ती व्यवस्थापन दलाचा चित्ररथ,वन विभाग,कृषी विभाग,१०८ रुग्णवाहिका, अग्निशमन दल चित्ररथाच्या माध्यमातून सहभागी होते.
शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन शहरातील विविध शाळांच्या ३००० विद्यार्थ्यांनी देशभक्तीवरील गीतांवर सामूहिक कवायत सादर केली.तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम कवायत सादर केली.
यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.बालविवाह न करण्याची प्रतिज्ञा आणि कॉपीमुक्त जिल्ह्याची उपस्थितांना शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,संतोष राऊत,प्रवीण धरमकर,स्वाती शेंडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुंभार,जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त लेखा अधिकारी सचिन इगे,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.मोरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी,नागरिक,पत्रकार बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन हनुमंत पडवळ यांनी केले.
******
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनाचा सन्मानपूर्ण सोहळा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनाचा सन्मानपूर्ण सोहळा
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते ध्वजारोहण
धाराशिव दि.२६ जानेवारी (जिमाका) भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपस्थितांना शपथ देण्यात आली.या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक श्री.बुबासाहेब जाधव,भास्करराव नायगावकर, नामदेव माने,श्रीपती जावळे, बाबुराव तवले,शेषराव बनसोडे व कलावती उंबरे यांची व त्यांचे नातेवाईक प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी सर्वश्री शिरीष यादव,संतोष राऊत,उमेश पाटील, स्वाती शेंडे,प्रवीण धरमकर व अरुणा गायकवाड,श्रीमती.पुजार,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, तहसीलदार मृणाल जाधव,प्रकाश व्हटकर,नायब तहसीलदार संतोष पाटील,सचिन पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
Sunday, 25 January 2026
हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
* नांदेड येथे 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती
* श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न
* श्री गुरु नानक देवजी यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे नऊ समाज प्रथमच लाखोंच्या संख्येने एकत्र
नांदेड दि.२५ (जिमाका) 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते.त्यांचे बलिदान आपल्याला सत्य, धर्म आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची प्रेरणा देते.त्यामुळेच त्यांचे विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित 'हिंद दी चादर' श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण,राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे,नवी दिल्लीचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा मंत्री सरदार मनजिंदर सिंघ सिरसा,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,खासदार डॉ.अजित गोपछडे,खासदार डॉ. भागवत कराड,आमदार प्रताप पाटील चिखलीकर,आमदार बालाजी कल्याणकर,आमदार श्रीजया चव्हाण,आमदार जितेंद्र अंतापूरकर, आमदार रवींद्र चव्हाण,राज्य अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी,विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार,गुरूव्दारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतबीर सिंघ,शहीदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की,गुरू तेग बहादुर साहिब जी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते,तर या देशाची संस्कृती, सभ्यता, विचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते.त्यांचा पराक्रम, वीरता,शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने समाज नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत एकत्र आला आहे.गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशात धर्म, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची नवी चेतना निर्माण झाली.त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा, यासाठी शहीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून प्रत्येक गावात,वाड्या-वस्त्यांवर जावून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शीख गुरूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
श्री गुरु नानक देवजींना मानणारा, त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारा सर्व समाज एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. देशाच्या विपरीत परिस्थितीत श्री गुरु नानक देवजींनी एकत्र बांधणारा, भेदाभेद नष्ट करणारा महान विचार दिला आहे. त्या विचारांनी संपूर्ण देशात विविध समाजांना जोडण्याचे काम केले. हा विचार घेवून सर्व समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे.संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील महान संत होते. त्यांची समाधी पंजाबमधील घुमान येथे आहे.संत नामदेवांनी मांडलेले विचार,त्यांचे अभंग आणि पंक्ती यांना श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान मिळाले आहे. त्यांचे विचार गुरुबाणीचा अविभाज्य भाग बनले आहेत.यामुळे महाराष्ट्रातील वारकरी परंपरा आणि शीख समाज यांच्यातील अनोखे,अतूट नाते अधिक दृढ झाले आहे. श्री गुरु गोविंद सिंघ महाराजांच्या दीर्घकाळ वास्तव्याने नांदेडची भूमी पावन झाली आहे.या भूमीने सामाजिक सलोखा अधिक मजबूत करण्याचे काम केले असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवी सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी होते.जुलमी शासकांच्या दमनकारी धोरणांविरुद्ध विचार स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले गुरु तेग बहादुर जी यांचे बलिदान हे अभूतपूर्व ऐतिहासिक उदाहरण असून,त्यांच्या निर्भय आचरणातून धार्मिक व नैतिक दृढतेचा आदर्श मिळतो,असे त्यांनी सांगितले.
धर्मतत्त्वज्ञान जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गुरु तेग बहादुर साहिब जी यांनी देशभर प्रवास करून आध्यात्मिक,सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी रचनात्मक कार्य केले.अंधश्रद्धा व अपप्रथांविरुद्ध त्यांनी प्रबोधन केले, तसेच विहिरी खोदणे, धर्मशाळा उभारणे, दानधर्म व प्राणीसेवा यांसारखी सार्वजनिक कल्याणाची कामे केली,असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी आपल्या भाषणाला मराठी भाषेत सुरुवात करत महाराष्ट्रात पुन्हा येऊन आनंद झाल्याचे सांगितले.श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानाच्या स्मरणासाठी होणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरेल,असे ते म्हणाले.गुरू तेग बहादूर जी यांच्या जीवनाचा आदर्श घेत युवकांनी देशाला नव्या उंचीवर घेवून जाण्याचा, तसेच देशाला अखंडीत ठेवण्याचा संकल्प करावा,असे आवाहन त्यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज,संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासातून सामर्थ्यासोबत सद्भाव जपण्याचा संदेश महाराष्ट्राने दिला आहे,असा उल्लेखही श्री. कल्याण यांनी केला.
दिल्लीचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा मंत्री सरदार मजिंदर सिंघ सिरसा म्हणाले, या समागम कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले, याचा आनंद आहे. अतिशय भव्य कार्यक्रमाचे आयोजन राज्य शासन व नऊ समाजाच्या सहभागातून केले आहे.श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात आणला.नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत होत असलेल्या या समागम कार्यक्रमानिमित्त श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानत हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या मातीतील विविध समाजाला एकत्र आणणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले.
संत ज्ञानी हरनाम सिंघ म्हणाले,संत नामदेव यांनी पंजाब आणि महाराष्ट्राला जोडण्याचे काम केले,त्यानंतर श्री गुरु गोविंद सिंघ यांनी महाराष्ट्रात येवून दोन्ही राज्यातील समाजाला जोडण्याचे काम केले. देशावर जेव्हा संकट आले,तेव्हा महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांनी शौर्य दाखविले.ज्या धार्मिक सभ्यतांसाठी श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांनी बलिदान दिले, त्या धार्मिक सभ्यता जपण्याचा,त्यांना आपल्या जीवनाचा हिस्सा बनविण्यासाठी संकल्प युवा वर्गाने करावा,असे आवाहन त्यांनी केले.शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. तसेच शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
श्री गुरु नानक देवजी यांच्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या नऊ समाजांना पहिल्यांदाच एकत्र आणून आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजाला जोडणारा आहे.नऊ समाज श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्याशी जोडले गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात तीन ठिकाणी होणाऱ्या शहीदी समागम कार्यक्रमांच्या निमित्ताने हे समाज पुन्हा एकत्र येत आहेत.शीख समाजाचा इतिहास शाळांमध्ये शिकवला जात आहे,ही अतिशय आनंददायी बाब असल्याचे गुरूव्दारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतबीर सिंघ यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गुरू ग्रंथ साहिब जी यांचे दर्शन घेतले. तसेच यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते पंच प्यारे यांचा सन्मान करण्यात आला.त्यानंतर बाबा कुलवंत सिंघ,बाबा हरनाम सिंघ,बाबा बलविंदर सिंघ यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
प्रास्ताविक अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरदराव ढोले यांनी केले. शहीदी समागम कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी आभार मानले.
०००००००००००००
तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
नांदेड, दिनांक 24 (जिमाका) : तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज दर्शन घेतले.
त्यांच्यासह आंध्रप्रदेश उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य चरणदीप सिंघ आदींनीही दर्शन घेतले.
गुरुद्वारा बोर्डाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेतले दर्शन
तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेतले दर्शन
नांदेड, दिनांक 24 (जिमाका) : तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दर्शन घेतले. त्यांच्यासह आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे यांनीही दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वारा बोर्डतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे "हिंद दी चादर " शहीदी समागम कार्यक्रमासाठी नांदेड येथे आगमन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे "हिंद दी चादर " शहीदी समागम कार्यक्रमासाठी नांदेड येथे आगमन
नांदेड,दि.२५ (जिमाका) “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबई येथून विमानाने नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले.मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे आगमन होताच विमानतळ परिसरात त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन प्रसंगी पालकमंत्री श्री.अतुल सावे,खासदार अशोक चव्हाण,खासदार डॉ.भागवत कराड,खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार तुषार राठोड,राजेश पवार, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पर्यावरण मंत्री श्रीमती. पंकजा मुंडे व आमदार रवींद्र चव्हाण यांचेही नांदेड येथे आगमन झाले.त्यानंतर मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस हे विमानतळावरून गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्तच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.
****
पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे घेतले दर्शन
पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे घेतले दर्शन
नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.
यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, राज्य समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)

































