Saturday, 18 April 2026
निरोगी मातृत्वाची हमी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा आधार महिलांसाठी मजबूत
निरोगी मातृत्वाची हमी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा आधार महिलांसाठी मजबूत
भारतासारख्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशात मातृ व बाल आरोग्य ही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची बाब आहे. गर्भधारणेपासून ते बाळंतपणापर्यंत अनेक महिलांना कुपोषण,रक्तक्षय, आरोग्य तपासणीचा अभाव आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.या पार्श्वभूमीवर गर्भवती आणि स्तनदा महिलांना पोषण, आरोग्य आणि आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) सुरू केली.ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी नसून मातृत्वाला सन्मान आणि सुरक्षितता देणारी महत्त्वाची पायरी ठरली आहे.
योजनेची गरज आणि पार्श्वभूमी
भारतीय राज्यघटनेतील कलम ४२ नुसार प्रसूतीसंदर्भात महिलांना आवश्यक संरक्षण आणि दिलासा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे.या संकल्पनेतूनच आधी ‘इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना’ काही जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आली होती. त्यानंतर तिचा विस्तार करून संपूर्ण देशभर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यात आली.
योजनेची प्रमुख उद्दिष्टे
या योजनेचा मुख्य भर महिलांच्या आरोग्य आणि पोषणावर आहे.गर्भवती आणि स्तनदा महिलांना सकस आहारासाठी प्रोत्साहन देणे,नियमित आरोग्य तपासणी सुनिश्चित करणे,सुरक्षित आणि संस्थात्मक प्रसूतीला चालना देणे,तसेच माता व अर्भक मृत्यूदर कमी करणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.यासोबतच महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे आणि मातृत्वाला सामाजिक मान्यता देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
पात्रता आणि लाभार्थी
या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यासाठी गर्भवती आणि स्तनदा महिलांना दिला जातो.मात्र,सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आणि पगारी प्रसूती रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ लागू होत नाही.सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांसाठी ही योजना विशेषतः उपयुक्त ठरते.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत एकूण ५,००० रुपयांची आर्थिक मदत तीन टप्प्यांत दिली जाते. गर्भधारणेची नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता १ हजार रुपये,किमान एक आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता २ हजार रुपये आणि बाळाच्या जन्मानंतर त्याची नोंदणी व प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता २ हजार रुपये दिला जातो. याशिवाय ‘जननी सुरक्षा योजना’ अंतर्गत संस्थात्मक प्रसूतीसाठी स्वतंत्र प्रोत्साहन दिले जाते.
अर्ज प्रक्रिया आणि अंमलबजावणी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे.आधार कार्ड,बँक खाते,गर्भधारणा नोंदणी प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे सादर करावी लागतात.ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पीएमएमव्हीवाय-सीएएस प्रणालीद्वारे पार पडते आणि लाभाची रक्कम थेट बँक खात्यात (DBT) जमा केली जाते.महिला व बाल विकास मंत्रालय हे या योजनेचे नोडल विभाग असून अंगणवाडी सेविका,आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य विभाग यांची तळागाळात महत्त्वाची भूमिका असते.जिल्हा आणि राज्यस्तरावर देखरेख यंत्रणा कार्यरत असून पीएफएमएस प्रणालीमुळे व्यवहारात पारदर्शकता राखली जाते.
या योजनेमुळे देशभरातील लाखो महिलांना थेट लाभ मिळाला आहे. संस्थात्मक प्रसूतींचे प्रमाण वाढले असून महिलांच्या पोषणातही सकारात्मक बदल दिसून येत आहे.महिलांमध्ये आरोग्य तपासणी आणि लसीकरणाबाबत जागरूकता वाढली आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे मातृत्वाला कुटुंब आणि समाजात अधिक सन्मानाचे स्थान मिळाले आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही मातृत्वाला सुरक्षित,सन्माननीय आणि सक्षम बनवणारी प्रभावी योजना ठरली आहे.आर्थिक सहाय्याबरोबरच आरोग्य आणि पोषणाचा मजबूत आधार देत ही योजना देशाच्या निरोगी भविष्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.योग्य अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण सुधारणा यांमुळे ही योजना अधिक परिणामकारक ठरत आहे.
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय
धाराशिव
*****
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू
धाराशिव दि.१८ एप्रिल (जिमाका) एप्रिल महिन्यात जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव,स्पर्धा,सभा, बैठका तसेच धरणे- आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली आहे.दि.१२ ते २२ एप्रिल दरम्यान संत गोरोबा काका यात्रा (तेर) तसेच दि.१४ ते ३० एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,दि.१९ एप्रिल रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (पारंपारिक), महात्मा बसवेश्वर जयंती,परशुराम जयंती असे विविध यात्रा व उत्सव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
सध्या जिल्ह्यात हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारणे तसेच बौद्ध समाजाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारण्याच्या कारणावरून दोन्ही समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याशिवाय विविध संघटना व राजकीय पक्षांकडून विविध मागण्यांसाठी शासकीय कार्यालयांसमोर धरणे,मोर्चे, आंदोलन,उपोषण,आत्मदहन,बंद, निदर्शने,तालाठोको व रास्तारोको यांसारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१)(३) अन्वये दि.१६ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ते दि.३० एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
या आदेशानुसार,शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी शस्त्र,काठी,तलवार,बंदूक बाळगण्यास मनाई आहे.तसेच लाठ्या,शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील अशा वस्तू जवळ बाळगणे,क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये,दगड किंवा क्षेपणास्त्रासारखी उपकरणे साठवणे किंवा जवळ ठेवणे यासही मनाई करण्यात आली आहे.
तसेच आवेशपूर्ण भांडणे,अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणे,सभ्यता व नीतिमत्तेला बाधा येईल किंवा अराजक निर्माण होईल अशा प्रकारच्या घोषणा,फलक किंवा चिन्हे वापरण्यास बंदी आहे.व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील अशा उद्देशाने वाद्य वाजवणे किंवा असभ्य वर्तन करणेही निषिद्ध आहे. याशिवाय,पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर एकत्र जमण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मात्र,हा आदेश कामावर असलेल्या पोलीस अधिकारी,शासकीय कर्मचारी,विवाह समारंभ, अंत्ययात्रा,धार्मिक कार्यक्रम,यात्रा तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नसल्याचेही अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी कळविले आहे.
******
मान्सूनपूर्व जलस्रोतांची कामे पूर्ण करा ; हर घर जलचे उद्दिष्ट वेळेत साध्य करा जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार
मान्सूनपूर्व जलस्रोतांची कामे पूर्ण करा ; हर घर जलचे उद्दिष्ट वेळेत साध्य करा
जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार
धाराशिव,दि.१८ एप्रिल (जिमाका) जल जीवन मिशन अंतर्गत सर्व जलतारे,शोषखड्डे व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची कामे मान्सूनपूर्व पूर्ण करून हर घर जल योजनेचे उद्दिष्ट वेळेत साध्य करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत हर घर जल योजना,जल सेवा अभियान आणि जल जीवन योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि.१७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. प्रियंवदा महाडदळकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस.कटकधोंड,कनिष्ठ भूवैज्ञानिक एम.आर.डोंगरे आदी उपस्थित होते.
बैठकीत जल जीवन मिशनअंतर्गत उद्भव विहिरी शेजारी जलतारा अंतर्गत शोषखड्डे करणे,जलताराची कामे २५ एप्रिलपासून सुरू करून मान्सूनपूर्व सर्व जलतारे व शोषखड्डे तांत्रिक बाबींसह पूर्ण करणे, केलेल्या कामांचे जिओ-टॅग फोटो अपलोड करणे,तसेच सर्व जल जीवन मिशन योजनेच्या उद्भवाशेजारी कामे करणे यावर भर देण्यात आला.
तसेच,गावांतर्गत पाण्याची क्षमता जास्त असलेले हातपंप व विंधन विहिरी शेजारी जलतारा अंतर्गत शोषखड्डे करणे,पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभांची स्वच्छता मोहीम राबविणे,जैविक व रासायनिक तपासणी मान्सूनपूर्व करणे,गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करणे आणि रिचार्ज शाफ्ट केलेल्या कामांची स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिल्या.
यावेळी उमरगा,धाराशिव,भूम, तुळजापूर,परंडा,वाशी येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व संबंधित कनिष्ठ अभियंते व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
*****
Friday, 17 April 2026
धाराशिवच्या सर्वांगीण प्रगतीस नवी दिशा शाश्वत विकास ध्येय जिल्हा निर्देशक आराखड्याचे प्रकाशन
धाराशिवच्या सर्वांगीण प्रगतीस नवी दिशा
शाश्वत विकास ध्येय जिल्हा निर्देशक आराखड्याचे प्रकाशन
धाराशिव दि.१७ एप्रिल (जिमाका) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘शाश्वत विकास ध्येय-जिल्हा निर्देशक आराखडा, धाराशिव जिल्हा’ या सन २०२३-२४ व सन २०२४-२५ या दोन पुस्तकांचे प्रकाशन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय,मुंबई यांच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या कार्यक्रमाला अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय,मुंबई येथील अतिरिक्त आयुक्त श्री.भांगे,निवासी उपजिल्हाधिकारी श्री.विद्याचरण कडवकर,जिल्हा नियोजन अधिकारी श्री.पुंडलिक गोडसे,जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्र. उपआयुक्त श्री.सु.न.जाधव तसेच सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी,सोलापूर श्रीकांत कुंटला यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय,धाराशिव येथील कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाश्वत विकासाच्या विविध निर्देशकांवर आधारित तयार करण्यात आलेला हा आराखडा जिल्ह्याच्या नियोजन प्रक्रियेस दिशा देणारा ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
जिल्हा निर्देशक विकास आराखडा हा केवळ आकडेवारीचा संच नसून, जिल्ह्याच्या विकासाचा मार्गदर्शक नकाशा आहे.शिक्षण,आरोग्य,पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन,महिला व बालकल्याण, रोजगार निर्मिती अशा विविध क्षेत्रांतील प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी या आराखड्यात ठोस निर्देशक निश्चित करण्यात आले आहेत.यामुळे विकासाच्या कामांना अधिक पारदर्शकता, परिणामकारकता आणि गती मिळणार आहे.तसेच,या आराखड्याच्या माध्यमातून प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेणे सुलभ होणार असून,उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून जिल्ह्याच्या गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवता येणार आहे.परिणामी,शाश्वत आणि समतोल विकास साध्य करण्यासाठी हा आराखडा मार्गदर्शक ठरेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
*****
अमरजा सराने , चिवरी, ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव #नारीशक्तीवंदन #यशोगाथा
अमरजा सराने , चिवरी, ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव #नारीशक्तीवंदन #यशोगाथा
Thursday, 16 April 2026
अलका गायकवाड, देवळाली, जिल्हा धाराशिव #नारीशक्तीवंदन #यशोगाथा
अलका गायकवाड, देवळाली, जिल्हा धाराशिव #नारीशक्तीवंदन #यशोगाथा
युवा कार्यकर्त्यांसाठी सुवर्णसंधी जिल्हा युवा पुरस्कारासाठी 21 एप्रिल पर्यंत अर्ज मागविले
युवा कार्यकर्त्यांसाठी सुवर्णसंधी
जिल्हा युवा पुरस्कारासाठी 21 एप्रिल पर्यंत अर्ज मागविले
धाराशिव,दि.16 एप्रिल (जिमाका) राष्ट्र व राज्य निर्मितीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून राज्यात मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग व विविध संस्था सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.युवकांमधील सुप्त गुणांना वाव देणे,त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे आणि त्यांचा गौरव करणे आवश्यक आहे.याच पार्श्वभूमीवर राज्याच्या युवा धोरणांतर्गत सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रदान केले जातात.
सन 2025-26 या वर्षासाठी धाराशिव जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे,यासाठी जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांना ‘जिल्हा युवा पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप व्यक्तींसाठी गौरवपत्र,सन्मानचिन्ह व प्रत्येकी 10 हजार रुपये रोख पारितोषिक असे असून संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व 50 हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी युवक,युवती तसेच नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य विचारात घेतले जाणार आहे.यामध्ये राज्याच्या साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन,राष्ट्र उभारणीस सहाय्यभूत ठरणारे उपक्रम,समाजातील दुर्बल घटक,अनुसूचित जाती-जमाती, जनजाती व आदिवासी भागासाठीचे कार्य,शिक्षण,प्रौढ शिक्षण,रोजगार, आरोग्य,पर्यावरण,सांस्कृतिक कला,क्रीडा व मनोरंजन,विज्ञान -तंत्रज्ञान,व्यवसाय,महिला सक्षमीकरण,स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठीचे कार्य आदी क्षेत्रांचा समावेश आहे.तसेच राष्ट्रीय एकात्मता वाढविणारे उपक्रम,नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा,झोपडपट्टी विकास,आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक समस्या सोडविण्यासाठीचे प्रयत्न,साहसी उपक्रम आदी बाबींचाही विचार करण्यात येणार आहे.
अर्जदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन दिनांक 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत मागील तीन वर्षांतील कार्याच्या आधारे करण्यात येईल.
सविस्तर माहिती व अर्जासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव येथे संपर्क साधावा.इच्छुक युवक,युवती व नोंदणीकृत संस्थांनी आपले परिपूर्ण अर्ज दिनांक 21 एप्रिल 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव येथे सादर करावेत,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
*****
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना नवी दृष्टी : १७२ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना नवी दृष्टी : १७२ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे
धाराशिव,दि.१६ एप्रिल (जिमाका) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची सर्वंकष आरोग्य तपासणी करण्यात येत असून,या उपक्रमाअंतर्गत ९ मार्च रोजी धाराशिव जिल्ह्यातील १७२ विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.आरोग्य तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची सखोल तपासणी करण्यात आली.आवश्यकतेनुसार विविध नंबरचे चष्मे विद्यार्थ्यांना देण्यात आले.तसेच गरजू विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी संदर्भ सेवा (Referral Services) उपलब्ध करून देण्यात आली.
ही मोहीम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.एस.चाकुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.एस.फुलारी यांच्या सूचनेनुसार तपासणी पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जात आहे.
राज्यात शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वी ठरत असून कुपोषणाचा प्रश्न कमी करणे आणि बालमृत्यूचे प्रमाण घटविणे हे उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात २० आरोग्य पथकांद्वारे वर्षातून दोन वेळा अंगणवाडीतील व एक वेळा शाळेतील बालकांची नियमित तपासणी केली जाते.
शून्य ते १८ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये ‘४ डी’ म्हणजे जन्मजात व्यंग,पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासातील विलंब आणि विविध आजार यांचे निदान व उपचार केले जातात.तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) अंतर्गत शून्य ते ६ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये जन्मजात आजार, अवयवांच्या उणीवा किंवा विकासातील अडथळे आढळल्यास वेळेत शस्त्रक्रिया व औषधोपचार करून भविष्यातील गंभीर गुंतागुंती टाळण्यास मदत होते.
"अनेक मुलामुलींना झाला लाभ”
हृदयरोग,नेत्ररोग,आकडी व फेफरे यांसारख्या आजारांवर मोठ्या प्रमाणात शिबिरे आयोजित करून निदान व उपचार करण्यात येत आहेत.जिल्ह्यातील अनेक मुलामुलींना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झाला असून अनेकांवर हृदय शस्त्रक्रिया तसेच इतर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
अंगणवाडी तपासणीदरम्यान कुपोषित बालकांचे निदान करून त्यांना पोषण पुनर्वसन केंद्र (NRC), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव येथे संदर्भित करण्यात येते.याठिकाणी उपचारासोबत पालकांना बुडीत मजुरीचा लाभ देखील दिला जातो.
जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.एस. चाकुरकर यांनी केले आहे.
*****
अक्षय तृतीयेवर बालविवाहास ठाम नकार; ‘गुन्हा नोंद करा जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आवाहन
अक्षय तृतीयेवर बालविवाहास ठाम नकार; ‘गुन्हा नोंद करा
जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आवाहन
धाराशिव,दि.१६ एप्रिल (जिमाका) समाजातील बालकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षण,आरोग्य व सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी बालविवाहास आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी नागरिकांना थेट आणि ठाम आवाहन करत,१९ एप्रिल २०२६ रोजीच्या अक्षय तृतीया मुहूर्तावर कोणत्याही ठिकाणी बालविवाह आढळल्यास तात्काळ गुन्हा नोंदवावा,असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ संपूर्ण राज्यात लागू असून त्यासोबत महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंध नियम २०२२ देखील अंमलात आहेत.
केंद्र शासनाच्या ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत बालविवाह रोखण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.या कायद्यानुसार ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे,तर ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका आणि शहरी भागात पर्यवेक्षिका यांची सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या कायद्याअंतर्गत बालविवाह करणे किंवा आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे.
अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त मानला जात असल्यामुळे या दिवशी राज्यात मोठ्या प्रमाणावर सामूहिक तसेच वैयक्तिक विवाह सोहळे आयोजित केले जातात.मात्र,याच दिवशी बालविवाह होण्याची शक्यता जास्त असल्याचे लक्षात घेता,जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दि.१९ एप्रिल रोजी संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी पोलीस विभाग,बाल संरक्षण समिती तसेच इतर यंत्रणांच्या समन्वयाने प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे,व्यापक जनजागृती करणे आणि ‘1098’ चाइल्ड हेल्पलाईन या टोल फ्री क्रमांकाचा प्रचार-प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी, अंगणवाडी सेविका तथा सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी तसेच कोणत्याही सजग नागरिकांनी बालविवाहाची घटना आढळल्यास तात्काळ हस्तक्षेप करून ती थांबवावी आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,धाराशिव यांच्याकडे सादर करावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा टास्क फोर्स (बालविवाह प्रतिबंध) अध्यक्ष कीर्ती किरण पूजार यांनी स्पष्ट केले आहे की,अक्षय तृतीया या मुहूर्तावर बालविवाह झाल्याचे आढळल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 व नियम 2022 अंतर्गत पालक,आचारी,मंडप मालक, पुजारी/काझी,वाजंत्री,हॉल चालक, स्वयंपाकी,उपस्थित नातेवाईक, विवाह आयोजक आणि संबंधित सर्व नागरिकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल. बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चाइल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल,अशी हमी प्रशासनाने दिली आहे.
समाजाच्या भविष्यासाठी प्रत्येक बालकाचे बालपण सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे बालविवाहास ठाम नकार देत,कायद्याच्या अंमलबजावणीत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे भावनिक आणि कडक आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी केले आहे.
00000
आरती ढेकरे, काक्रंबा जिल्हा धाराशिव, #यशोगाथा #नारीशक्तीवंदन
आरती ढेकरे, काक्रंबा जिल्हा धाराशिव, #यशोगाथा #नारीशक्तीवंदन
अनिता नामदेव देवकते, मु पो सौंदना आंबा ता कळंब जिल्हा धाराशिव, #यशोगाथा #नारीशक्तीवंदन
अनिता नामदेव देवकते, मु पो सौंदना आंबा ता कळंब जिल्हा धाराशिव, #यशोगाथा #नारीशक्तीवंदन
वाढत्या तापमानाचा इशारा ; उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य विभागाची सज्जता व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
वाढत्या तापमानाचा इशारा ; उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य विभागाची सज्जता व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
धाराशिव,दि.16 एप्रिल (जिमाका) गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होत असून हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार एप्रिल व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत उष्माघाताच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या.तसेच सर्व आरोग्य संस्थांना नागरिकांना योग्य उपचार उपलब्ध करून देणे आणि उष्माघातासंदर्भात आवश्यक आरोग्य शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभाग,जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील ५ ग्रामीण रुग्णालये,६ उपजिल्हा रुग्णालये, ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २ शहरी आरोग्य केंद्रांमध्ये ‘कोल्ड रूम’ची व्यवस्था करण्यात आली आहे.उष्माघाताच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच उष्माघात प्रतिबंधासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून सर्व आरोग्य संस्थांना प्रसिद्धी साहित्य वितरित करण्यात आले आहे.
उष्माघातापासून बचावासाठी पुढील उपाय अवलंबा :
• हे करा :
पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा,हलक्या वजनाचे व फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा. उन्हात बाहेर पडताना गॉगल,छत्री व पादत्राणांचा वापर करा.डोक्यावर टोपी किंवा हॅटखाली ओलसर कपडा ठेवा.पाळीव प्राण्यांना सावलीत व थंड ठिकाणी ठेवा.घरात ओलसर पडदे,पंखा किंवा कुलरचा वापर करून वातावरण थंड ठेवा.
• हे करू नका :
शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा.कष्टाची कामे उन्हात करू नका.पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुलांना ठेवू नका.गडद रंगाचे व तंग कपडे वापरू नका.उष्णतेच्या काळात स्वयंपाक टाळा व स्वयंपाकघर हवेशीर ठेवा.मद्य, चहा,कॉफी व सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन टाळा.अतिप्रथिनयुक्त व शिळे अन्न खाऊ नका.उष्माघाताची लक्षणे :
उष्माघाताची लक्षणे प्रौढ व लहान मुलांमध्ये वेगवेगळी दिसून येतात.
प्रौढांमध्ये : शरीराचे तापमान १०४ फॅरेनहाइट (४०°C) पर्यंत वाढणे,तीव्र डोकेदुखी,स्नायू आखडणे,मळमळ, उलटीचा भास,अस्वस्थता,चक्कर येणे,हृदयाचे ठोके वाढणे व धडधडणे.
लहान मुलांमध्ये : आहार घेण्यास नकार,सतत चिडचिड,लघवीचे प्रमाण कमी होणे,डोळे शुष्क होणे,तोंड कोरडे पडणे,रक्तस्त्राव होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
शरीराचे तापमान वाढलेले,व्यक्ती बेशुद्ध,गोंधळलेली किंवा अतिप्रमाणात घाम येत असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०८ किंवा १०२ वर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होऊ शकतात.त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियंवदा महाडदळकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले आहे.
00000
“MH25BK” नवीन मालिका सुरु ; आकर्षक वाहन क्रमांकासाठी नागरिकांना सुवर्णसंधी
“MH25BK” नवीन मालिका सुरु ; आकर्षक वाहन क्रमांकासाठी नागरिकांना सुवर्णसंधी
धाराशिव, दि.16 एप्रिल (जिमाका) उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव या कार्यालयात लवकरच परिवहन संवर्गातील वाहनांसाठी MH25BK ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे.वाहनांची नवीन मालिका सुरू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते.त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर ताण पडतो आणि अनेक वेळा नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.हा त्रास कमी करण्यासाठी तसेच नागरिकांना त्यांना हवा असलेला आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक सुलभतेने मिळावा,यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
ज्या वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून घ्यायचे असतील त्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 04.00 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत.अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 (अ) नुसार पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत (उदा. आधार कार्ड,लाईट बिल, टेलिफोन बिल इ.) सादर करणे आवश्यक आहे.तसेच आकर्षक क्रमांकासाठी देय असलेल्या विहित शुल्काचा डी.डी.अर्जासह जमा करणे बंधनकारक आहे.डी.डी.हा केवळ बँकेचा असावा; इतर कोणत्याही नावाचे डी.डी.स्वीकारले जाणार नाहीत.तसेच डी.डी. व्यतिरिक्त बँकेने जारी केलेले बँकर्स चेक स्वीकारले जाणार नाहीत.डीडी किमान एक महिन्याच्या मुदतीचा असावा.
एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डावर लावण्यात येईल.यादीतील अर्जदारांना लिलाव प्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कमेचा डी.डी.सादर करावा लागेल.हा डी.डी.किमान रुपये 300/- पेक्षा कमी नसावा आणि तो केवळ “Deputy Regional Transport Officer, Dharashiv” यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेचा असावा.इतर कोणत्याही नावाचे डी.डी.स्वीकारले जाणार नाहीत.
अर्जदार किंवा त्यांच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांच्या समक्ष सीलबंद लिफाफ्यातील डी.डी.उघडण्यात येतील.ज्या अर्जदाराने सर्वाधिक रकमेचा डी.डी.सादर केला असेल त्यास संबंधित पसंतीचा क्रमांक देण्यात येईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. राखीव क्रमांक घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत संबंधित वाहन नोंदणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.अन्यथा तो क्रमांक आपोआप रद्द होईल आणि भरलेले शुल्क शासन जमा होईल.तसेच भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत किंवा समायोजित केली जाणार नाही.
आकर्षक क्रमांकासाठी अर्जाचा नमुना तसेच प्रतिनिधी येणार असल्यास आवश्यक प्राधिकारपत्राचा नमुना कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.
वेळापत्रक पुढीलप्रमाणे :आकर्षक/पसंती क्रमांकासाठी अर्ज व डी.डी. स्वीकारणे : दि. 17 ते 21 एप्रिल, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजता.
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्जांची यादी प्रसिद्ध करणे : दि. 21 एप्रिल, सायंकाळी 5 वाजता पर्यंत.लिलावासाठी सीलबंद डी.डी. स्वीकारणे व उघडणे : दि. 22 एप्रिल, दुपारी 12 वाजतापर्यंत
नवीन MH25BK मालिकेसाठी इच्छुक नागरिकांनी वेळेत अर्ज करून पसंतीचा क्रमांक मिळवण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
0000000
“सखी वन स्टॉप सेंटर : संकटातील महिलांसाठी सुरक्षित आधारवड”
“सखी वन स्टॉप सेंटर : संकटातील महिलांसाठी सुरक्षित आधारवड”
महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने संरक्षण, न्याय आणि मानसिक आधार मिळावा यासाठी ‘सखी’ वन स्टॉप सेंटर ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे हिंसाचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली सर्व आवश्यक सेवा उपलब्ध होत असून,त्यांच्या आयुष्याला नव्याने उभारी देण्याचे काम हे केंद्र करत आहे. जिल्ह्यात १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल २५८ प्रकरणांची नोंद झाली असून,अनेक महिलांना विविध स्वरूपाची मदत देऊन त्यांना सुरक्षिततेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवण्यात आला आहे.
सन २०१९ पासून धाराशिव शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतीतील रूम क्रमांक ८१ येथे हे केंद्र २४ तास कार्यरत आहे.वय, जात,वर्ग,शैक्षणिक किंवा वैवाहिक स्थितीचा विचार न करता शारीरिक, लैंगिक,भावनिक,मानसिक व आर्थिक अत्याचारांना सामोरे जाणाऱ्या महिलांना येथे आधार दिला जातो.लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार,मानवी तस्करी,ॲसिड हल्ले किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये पीडित महिलांना तातडीने मदत पुरविण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे.
या सेंटरद्वारे महिलांना पोलीस मदत, तात्पुरता निवारा,वैद्यकीय उपचार, कायदेशीर सल्ला आणि समुपदेशन अशा सर्व सेवा मोफत दिल्या जातात.पीडित महिलांना आवश्यकतेनुसार सुमारे १० दिवसांपर्यंत तात्पुरता निवारा देखील दिला जातो.विशेष म्हणजे,या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे महिलांना विविध ठिकाणी धावपळ करण्याची गरज भासत नाही.
गेल्या वर्षभरात प्राप्त झालेल्या २५८ प्रकरणांपैकी २४ महिलांना वैद्यकीय मदत,२८ महिलांना कायदेशीर सहाय्य,१८६ महिलांचे समुपदेशन, ८ महिलांना पोलीस मदत आणि १२ महिलांना तात्पुरता निवारा देण्यात आला आहे.या आकडेवारीतून केंद्राची परिणामकारकता स्पष्टपणे दिसून येते.
महाराष्ट्रभर पसरलेल्या या केंद्रांचे जाळे महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. ‘सखी’ वन स्टॉप सेंटर हे केवळ मदतीचे केंद्र नसून,संकटात सापडलेल्या महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय
धाराशिव
******
“बचतगटांच्या बळावर ग्रामीण महिलांची भरारी ; ‘उमेद’ अभियानातून आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा” * १५,३८० स्वयं सहायता समूहांच्या माध्यमातून सुमारे दीड लाख कुटुंबांचा सहभाग
विशेष वृत्त
“बचतगटांच्या बळावर ग्रामीण महिलांची भरारी ; ‘उमेद’ अभियानातून आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा”
* १५,३८० स्वयं सहायता समूहांच्या माध्यमातून सुमारे दीड लाख कुटुंबांचा सहभाग
* “मिनी सरस” प्रदर्शनात १०० स्टॉल्सद्वारे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ; फूड कोर्टमधून पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव
* ‘उमेद’ अभियानातून सुमारे ९९,२७६ महिला - लखपती दीदी
* महिला केंद्रित टुरिस्ट बस प्रकल्पामुळे पर्यटनास चालना
धाराशिव,दि.१५ एप्रिल (जिमाका) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून,बचतगटांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे.
जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन “मिनी सरस” चे आयोजन लेडीज क्लब मैदान, धाराशिव येथे दिनांक २४ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले होते.या प्रदर्शनात स्वयं सहायता समूहातील महिला भगिनींनी उत्पादित केलेल्या दर्जेदार उत्पादनांची व खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी सुसज्ज अशा १०० स्टॉल्सची उभारणी करण्यात आली होती.प्रदर्शनादरम्यान धाराशिवकरांसाठी वेगळा फूड कोर्ट उभारण्यात आला होता,ज्यामध्ये ग्रामीण बाज असलेल्या रुचकर व चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांनी घेतला.
जिल्ह्यात एकूण १५ हजार ३८० स्वयं सहायता समूहांची स्थापना करण्यात आली असून सुमारे दीड लाख कुटुंबे या अभियानाशी जोडली गेली आहेत.यासोबतच ८०३ ग्रामसंघ,५५ प्रभागसंघ, ५२१ महिला उत्पादक गट आणि महिलांच्या ११ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांमुळे महिलांना केवळ आर्थिक आधारच मिळाला नसून त्यांचा आत्मविश्वासही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे ९९ हजार २७६ महिला “लखपती दीदी” बनल्या आहेत.
बचतगटांमुळे महिलांना नियमित बचत, कर्ज सुविधा,लघुउद्योग उभारणी आणि कौशल्य विकासाच्या संधी मिळाल्याने त्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झाला आहे.पूर्वी घरगुती जबाबदाऱ्यांपुरत्या मर्यादित असलेल्या महिला आता व्यवसाय,विपणन आणि निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत आहेत.
दरम्यान,जिल्हा नियोजन समिती अंतर्गत टुरिस्ट बस प्रकल्प राबविण्यात येत असून यासाठी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीतून दोन १७ सीटर एसी अर्बनिया बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत.हा प्रकल्प जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील पर्यटन विकासाला चालना देणारा ठरणार असून ग्रामीण महिलांसाठी उपजीविकेचे विविध स्रोत उपलब्ध करून देणार आहे.
हा प्रकल्प तुळजापूर केंद्रित असून,येथे येणाऱ्या भाविकांना जिल्ह्यातील इतर पर्यटन व ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळावी यासाठी विशेष टुरिस्ट पॅकेज तयार करण्यात आले आहे. तुळजापूर -नळदुर्ग-अक्कलकोट - पंढरपूर आणि तुळजापूर -तेर -येरमाळा - सरमकुंडी- सोनारी-परंडा असे दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे महिलांद्वारे कार्यान्वित केला जाणार असून “महिला गाईड” चीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निवास,भोजन व दर्शन व्यवस्थेसारख्या सेवा देखील महिला स्वयं सहायता समूहांच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत.
या सर्व उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे.बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी केवळ स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे व समाजाचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणात बचतगटांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
******
Wednesday, 15 April 2026
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा सलग चार वर्षे अव्वल
विशेष वृत्त
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा सलग चार वर्षे अव्वल
* ६२२ महिला उद्योजिकांची ऐतिहासिक भरारी
* रोजगार,स्वावलंबनाची नवी दिशा
* ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळाला नवा वेग
* सलग चार वर्षे १०० टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती
* राज्यासाठी धाराशिव ‘रोल मॉडेल’
धाराशिव दि.१५ एप्रिल (जिमाका) कोणत्याही प्रदेशाचा सर्वांगीण विकास हा केवळ शेतीवर आधारित नसून,त्या भागातील युवक-युवतींना मिळणाऱ्या उद्योग व रोजगार संधींवर अवलंबून असतो.हेच सूत्र अंगीकारत धाराशिव जिल्हा उद्योग केंद्राने ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (CMEGP) प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला नवी गती दिली आहे.या योजनेमुळे केवळ उद्योगनिर्मितीच नव्हे,तर हजारो हातांना रोजगार उपलब्ध होऊन स्वावलंबी समाजनिर्मितीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.परिणामी, धाराशिव जिल्हा आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘रोल मॉडेल’ ठरला आहे.
योजनेचे महत्व : रोजगार निर्मितीचा भक्कम पाया
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून,सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देते.बँकांच्या सहकार्याने राबविण्यात येणारी ही योजना केवळ कर्जपुरती मर्यादित नसून,ती रोजगार निर्मितीची साखळी तयार करते.एक उद्योग उभा राहताच त्यातून अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळतो,ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम बनते.सलग चार वर्षांची विक्रमी कामगिरी करत जिल्ह्याने या योजनेत सलग चार वर्षे १०० टक्क्यांहून अधिक उद्दिष्टपूर्ती करून विक्रम प्रस्थापित केला आहे.
सन २०२२-२३ मध्ये ६०० उद्दिष्टाच्या तुलनेत ६५४ प्रकल्प मंजूर होऊन ६८४.५० लाख अनुदानासह १०९.०० टक्के साध्य झाले.त्यानंतर सन २०२३-२४ मध्ये ८५० उद्दिष्टाच्या तुलनेत ८७४ प्रकल्प मंजूर होऊन १०१६.७० लाख अनुदान वितरित करण्यात आले आणि १०२.८२ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य झाली.सन २०२४-२५ मध्ये ७५३ उद्दिष्टाच्या तुलनेत ८०० प्रकल्प मंजूर होऊन ७४२.०९ लाख अनुदानासह १०६.२४ टक्के प्रगती झाली.चालू सन २०२५-२६ मध्ये ७८० उद्दिष्ट असताना तब्बल १०१५ प्रकल्प मंजूर झाले असून १३०९.१० लाख अनुदान वितरित करून १३०.१३ टक्के विक्रमी उद्दिष्टपूर्ती करण्यात आली आहे.या चार वर्षांत एकूण सुमारे ३७४८ कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान वितरित करून हजारो उद्योजकांना बळ देण्यात आले आहे.
नारीशक्तीचा उद्योजकीय उदय
या यशाचा सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे महिलांचा वाढता सहभाग होय.यंदा मंजूर झालेल्या १०१५ प्रकल्पांपैकी ६२२ प्रकल्प महिला उद्योजिकांचे आहेत.ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी पारंपरिक चौकट मोडून ब्युटी पार्लर,पिठाची गिरणी,मिरची कांडप,खाद्यप्रक्रिया उद्योग अशा विविध क्षेत्रांत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.महिलांच्या या पुढाकारामुळे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन सामाजिक सक्षमीकरणालाही चालना मिळत आहे.
तालुकानिहाय उद्योगांची ओळख
जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आपली स्वतंत्र औद्योगिक ओळख निर्माण करत आहे. भुम,परंडा व वाशी येथे दुग्ध व्यवसाय फोफावत असून खवा व पेढा निर्मितीला राज्यभर मागणी आहे.तुळजापूरमध्ये कृषी आधारित उद्योग वाढत आहेत.उमरगा व लोहारा येथे औद्योगिक वसाहतींमुळे लघुउद्योगांची संख्या मोठी आहे.कळंब तालुका - गारमेंट व डाळ मिल उद्योगात आघाडीवर आहे,तर धाराशिव तालुक्यात इव्हेंट मॅनेजमेंट,हॉटेल व ऑईल प्रोसेसिंग उद्योग वेगाने वाढत आहेत.
तरुणांचा आधुनिक उद्योगांकडे वाढता कल
जिल्ह्यातील तरुण पारंपारिक उद्योगांसोबत आधुनिक व्यवसायांकडेही वळत आहेत. खाद्यपदार्थ (८१),तयार कपडे (५७), हॉटेल (४९),मसाला उद्योग (२९), RO वॉटर प्लांट (११), तसेच सेवा क्षेत्रातील झेरॉक्स व ई-सेवा केंद्र या उद्योगांची संख्या वाढत आहे.शेतीपूरक व्यवसाय म्हणून मळणी व पीक काढणी यंत्रांच्या ४० प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून,ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
जिल्हा उद्योग केंद्राची प्रभावी भूमिका
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकांशी उत्कृष्ट समन्वय साधण्यात आला आहे. बँकांकडे सादर झालेल्या ३२९६ प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्त युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले.हीच या यशामागील मुख्य ताकद ठरली आहे.
प्रमुख उद्योग घटक :
गारमेंट्स – ५७, ब्युटी पार्लर – ५३, शेती औजारे – १८,मिल्क प्रोडक्ट्स – ९, फूड प्रोडक्ट्स – ८१,कुक्कुट पालन – ९,बेकरी – १०,मळणी व पीक काढणी यंत्र – ४०,सलून – ९, फॅब्रिकेशन – १३,पिठाची गिरणी – २५,मिरची कांडप – २७,मसाला उद्योग – २९,हॉटेल – ४९, इव्हेंट मॅनेजमेंट – १४,डाळ मिल – ८, सेंट्रींग – २७,खवा – १५,झेरॉक्स व ई-सेवा – ७,RO ॲक्वा प्लांट – ११. एकूणच,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यात उद्योजकतेची नवी क्रांती घडून आली असून,रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास यांचे प्रभावी मॉडेल म्हणून जिल्ह्याची ओळख अधिक भक्कम झाली आहे.
****
Tuesday, 14 April 2026
समता,न्याय आणि बंधुत्वाचा संदेश देणारी बाबासाहेबांची जयंती धाराशिव येथे अभिवादनासह अन्नदान कार्यक्रम उत्साहात
समता,न्याय आणि बंधुत्वाचा संदेश देणारी बाबासाहेबांची जयंती
धाराशिव येथे अभिवादनासह अन्नदान कार्यक्रम उत्साहात
धाराशिव दि.१४ एप्रिल (जिमाका) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज पुतळ्यास अभिवादन करून अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला.सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानुषंगाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ही केवळ स्मरणदिन नसून सामाजिक समता,न्याय,बंधुत्व आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज या परिवर्तनाचा संदेश देणारा प्रेरणादायी दिवस आहे.त्यांनी दिलेल्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळाले असून त्यांच्या विचारांची आजही समाजाला दिशा देणारी प्रेरणा मिळते.
त्यानुसार आज १४ एप्रिल रोजी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच या ठिकाणी समाज कल्याण कार्यालयाकडून अन्नदान स्वरूपात मसाले भात व जिलबीचे वाटप करण्यात आले.अन्नदान स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर व जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती विश्वास कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या अन्नदान वाटप कार्यक्रमास समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमामुळे समाजात एकोपा,समता आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ होत असून, त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संदेश यामधून देण्यात आला.
*****
सामाजिक समता सप्ताह समारोप उत्साहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,लाभार्थ्यांना योजनांचा लाभ
सामाजिक समता सप्ताह समारोप उत्साहात
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,लाभार्थ्यांना योजनांचा लाभ
धाराशिव दि.१४ एप्रिल (जिमाका) सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी तसेच जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने सामाजिक समता सप्ताहानिमित्त आज १४ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रम”आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार होते.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवदा महाडदळकर,जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोखर व जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती विश्वास कोकणे उपस्थित होते.सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले.
या कार्यक्रमात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ अंतर्गत दाखल प्रकरणातील पीडित वारस रोहन बागुल यास शासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश देण्यात आले.तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत संदीप पाटील यांची सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पदासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून शासनाच्या विविध विभागातील पदांवर निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तेर येथील विद्यार्थिनी अनुश्री मदने हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर भाषण केले.तसेच रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पाण्याचे जार भेटवस्तू म्हणून प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे व्याख्याते प्रा.रवी सुरवसे, छत्रपती शिवाजी कॉलेज,धाराशिव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक व कृषीविषयक विचारांवर मार्गदर्शन केले. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,परदेश शिक्षण योजनाच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.तसेच जात वैधता प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी समाज कल्याण अधिकारी सनम लोमकणे यांनी आभार मानले.सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचा समारोप उत्साहात संपन्न झाला असून या कार्यक्रमास कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
*****
Monday, 13 April 2026
*धाराशिवच्या महिलांची उद्योगक्षेत्रात झेप ; ६२२ उद्योजिकांनी घडविला नवा इतिहास*
*धाराशिवच्या महिलांची उद्योगक्षेत्रात झेप ; ६२२ उद्योजिकांनी घडविला नवा इतिहास*
धाराशिव,दि.१३ एप्रिल (जिमाका) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेतली असून,पारंपारिक चौकटीतून बाहेर पडत त्यांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १०१५ प्रकल्पांपैकी तब्बल ६२२ प्रकल्प महिला उद्योजिकांचे असून, जिल्ह्यात ‘नारीशक्ती’ची प्रभावी ओळख निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून,सुशिक्षित बेरोजगार महिला व युवकांना उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देते.या योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळत असून,त्या केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाहीत,तर कुटुंबाच्या उत्पन्नातही महत्त्वाचा वाटा उचलत आहेत.
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी विविध उद्योगांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.विशेषतः ब्युटी पार्लर,पिठाची गिरणी,मिरची कांडप,खाद्यप्रक्रिया उद्योग,मसाला उद्योग अशा व्यवसायांत महिलांची संख्या लक्षणीय आहे.या उद्योगांमुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होत असून,अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे.
जिल्ह्यातील महिला उद्योजिकांनी विविध क्षेत्रांत आपली छाप पाडली आहे.उपलब्ध आकडेवारीनुसार, ब्युटी पार्लर क्षेत्रात सुमारे ५३ महिला उद्योजिकांनी व्यवसाय सुरू केला आहे.पिठाची गिरणी या उद्योगात सुमारे २५ महिलांनी पुढाकार घेतला असून,मिरची कांडप उद्योगात २७ महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारला आहे.याशिवाय मसाला उद्योगात २९, खाद्यप्रक्रिया (फूड प्रोडक्ट्स) क्षेत्रात ८१,तसेच बेकरी,कुक्कुटपालन, सलून,झेरॉक्स व ई-सेवा केंद्र अशा विविध क्षेत्रांतही महिलांचा लक्षणीय सहभाग आहे.या उद्योगांमुळे महिलांना स्वावलंबनाची संधी मिळत असून,स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे.
महिलांच्या या उद्योजकीय पुढाकारामुळे केवळ त्यांचे वैयक्तिक सक्षमीकरण होत नाही,तर संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे.ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःचे उद्योग उभे करून सामाजिक बंधने मोडीत काढत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे.
जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून बँकांशी समन्वय साधून महिलांना कर्जप्राप्ती सुलभ करण्यात आली आहे.अर्ज प्रक्रिया,मार्गदर्शन आणि पाठपुरावा यामुळे महिलांचा सहभाग सातत्याने वाढत आहे.परिणामी, धाराशिव जिल्हा महिला उद्योजकतेच्या क्षेत्रात राज्यात आदर्श ठरत आहे.एकूणच, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांना उद्योग क्षेत्रात नवे दालन खुले झाले असून,महिला सक्षमीकरणातून विकास या संकल्पनेला प्रत्यक्ष बळ मिळाले आहे.
************
सामाजिक समता सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सामाजिक समता सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव,दि.१३ एप्रिल (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे १५० वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ ८ ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान साजरा करण्यात येत आहे.या सप्ताहानिमित्त जिल्हाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे आणि विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या अनुषंगाने आज,१३ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिरात सहायक आयुक्त समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी,तसेच विविध महामंडळातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.यामध्ये जितेंद्र डोंगरे,राहूल पेंढारकर,विवेक गायकवाड,श्रीकृष्ण मोटे,सिद्धार्थ ओव्हाळ,कृष्णा गायकवाड,संदीप पाटील,अक्षय गंगावणे,लक्ष्मण क्षिरसागर,भगवंत कपाळे,आदटराव लक्ष्मण,रतनराव भोसले आदींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या कार्यक्रमास सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने आदी उपस्थित होते.
सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित अशा उपक्रमांमुळे समाजात सामाजिक ऐक्य,बंधुता आणि मानवतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
*****
जयंती उत्सवात प्लाझ्मा व लेझर लाईटला निर्बंध ; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा निर्णय
जयंती उत्सवात प्लाझ्मा व लेझर लाईटला निर्बंध ; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा निर्णय
धाराशिव,दि.१३ एप्रिल (जिमाका) जिल्ह्यात दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार असून,डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त ३० एप्रिलपर्यंत विविध पक्ष,संघटना व मंडळांकडून मिरवणुका,रॅली व शोभायात्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
या मिरवणुका व रॅलीदरम्यान आयोजकांकडून प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मात्र या प्रखर प्रकाशामुळे मिरवणुकीत सहभागी होणारे तसेच ती पाहण्यासाठी उपस्थित असलेले लहान मुले, वयोवृद्ध,ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिक यांच्या डोळ्यांना इजा होऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.याचबरोबर,अशा तीव्र प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असून, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर,दिनांक ३० एप्रिल २०२६ पर्यंत साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवांच्या अनुषंगाने प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर टाळावा,यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात निर्बंध आदेश लागू करण्यात आले आहे.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३(१) नुसार,नागरिकांच्या जीवितास किंवा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तरतूद आहे.
त्या अनुषंगाने जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत पार पडावा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.नागरिकांच्या डोळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मिरवणुका,रॅली व शोभायात्रांमध्ये प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर कटाक्षाने टाळणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
त्यानुसार,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व मिरवणुका,रॅली व शोभायात्रांमध्ये प्लाझ्मा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर करण्यास निर्बंध लागू करण्यात आले असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी यांनी दिली.
*****
Sunday, 12 April 2026
“सशक्त महिला – समृद्ध महाराष्ट्र : संधी,स्वावलंबन आणि समानतेचा नवा प्रवास”
“सशक्त महिला – समृद्ध महाराष्ट्र : संधी,स्वावलंबन आणि समानतेचा नवा प्रवास”
महिला सक्षमीकरण हा केवळ एक विचार किंवा घोषवाक्य नसून,तो समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा मूलमंत्र आहे.बदलत्या काळात स्त्रीची भूमिका केवळ कुटुंबापुरती मर्यादित राहिलेली नाही; ती शिक्षण, उद्योग,प्रशासन,विज्ञान आणि नेतृत्व अशा विविध क्षेत्रांमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे.त्यामुळे महिलांना संधी,सुरक्षा आणि समान हक्क देणे ही केवळ गरज नसून समाजाची जबाबदारी बनली आहे.
आजच्या युगात सक्षमीकरणाचा अर्थ अधिक व्यापक झाला आहे.स्त्रीला स्वतःचे निर्णय घेण्याची मुभा,आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची ताकद,शिक्षणाची समान संधी आणि सुरक्षित वातावरण मिळणे ही त्याची मूलभूत तत्त्वे आहेत.या सर्व घटकांचा समतोल साधल्याशिवाय खरी प्रगती शक्य नाही.
महिलांच्या प्रगतीसाठी शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा पाया मानला जातो.मुलींना शालेय तसेच उच्च शिक्षणाबरोबरच तांत्रिक आणि कौशल्याधारित प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे.डिजिटल युगात संगणक ज्ञान,ऑनलाईन सेवा वापरण्याची क्षमता आणि संवादकौशल्य यामुळे स्त्रिया अधिक सक्षम बनत आहेत.शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो आणि स्त्री स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकते.
आर्थिक स्वावलंबन हा सक्षमीकरणाचा केंद्रबिंदू आहे.महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे.उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान) अंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळत आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि स्टँड-अप इंडिया योजना यांमुळे महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज आणि आर्थिक सहाय्य मिळत आहे.तसेच महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सक्षमीकरणाची मूलभूत अट आहे.सुरक्षित मातृत्व,योग्य पोषण आणि आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,जननी सुरक्षा योजना यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे.यामुळे माता आणि बालकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल होत आहे.
महिलांना सुरक्षित वातावरण देणे तितकेच महत्त्वाचे आहे.घरगुती हिंसा,छेडछाड आणि कार्यस्थळी होणारा भेदभाव यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे आणि यंत्रणा कार्यरत आहेत.निर्भया फंड अंतर्गत विविध सुरक्षा उपाययोजना राबवल्या जात आहेत,तसेच महिला हेल्पलाईनसारख्या सुविधा महिलांना तातडीची मदत पुरवतात.स्त्री निर्भयपणे समाजात वावरू शकेल,असे वातावरण निर्माण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
डिजिटल सक्षमीकरण हा आधुनिक काळातील एक महत्त्वाचा पैलू आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. इंटरनेट,मोबाईल बँकिंग आणि ऑनलाईन सेवा यांचा वापर महिलांना अधिक स्वावलंबी बनवत आहे.
सामाजिक मानसिकतेत बदल घडवणे ही दीर्घकालीन पण अत्यंत गरजेची प्रक्रिया आहे.मुलगा-मुलगी भेदभाव,पारंपरिक बंधने आणि असमान जबाबदाऱ्या या विचारांपासून समाजाला मुक्त करणे आवश्यक आहे.घरगुती निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग आणि पुरुषांचा समान वाटा यामुळे खऱ्या अर्थाने समतोल साधला जाऊ शकतो.
याशिवाय,महिलांचा राजकीय आणि नेतृत्व क्षेत्रातील सहभाग वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना दिलेले आरक्षण हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.यामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते आणि त्यांच्या समस्या थेट धोरणांमध्ये प्रतिबिंबित होतात.
महिला सक्षमीकरण ही केवळ एका घटकाची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची सामूहिक चळवळ आहे.स्त्री सक्षम झाली तर कुटुंब बळकट होते,कुटुंब मजबूत झाले तर समाज प्रगत होतो आणि समाज प्रगत झाला तर राष्ट्र समृद्ध होते. खऱ्या अर्थाने प्रगती तेव्हाच साध्य होईल, जेव्हा प्रत्येक महिला आत्मविश्वासाने निर्भयपणे आणि सन्मानाने आपले जीवन जगू शकेल.त्या दिशेने शासनाच्या योजना आणि समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन यांचा संगमच एक सशक्त आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू शकतो.
संकलन -
जिल्हा माहिती कार्यालय
धाराशिव
पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आणि पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आणि पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
धाराशिव,दि.१२ एप्रिल (जिमाका) महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखला गेला पाहिजे.पत्रकारांचे कार्य अत्यंत आव्हानात्मक असून ते निष्ठेने आणि व्रतस्थ भावनेने पार पाडले जाते.त्यामुळे पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगर परिषद,धाराशिव येथे दैनिक ‘पुण्य नगरी’च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त कूपन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण,‘पुण्य पुरस्कार’ तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक होते.
यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,नगराध्यक्ष नेहा काकडे,पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,सरचिटणीस संतोष जाधव,सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य,कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष श्रीकांत कदम व अब्बास सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेले ५६७ निर्णय हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी होते.‘लाडकी बहीण’ योजनेला सुरुवातीला विरोध झाला,मात्र ही योजना सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेत राज्य सरकारने अतिरिक्त सहा हजार रुपयांची भर घातली असून, एनडीआरएफपेक्षा दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णयही घेतला.आपत्तीग्रस्तांना दिवाळीपूर्वीच ३२ हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून नागरिकांना थेट सेवा देण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
“माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आहे,असे सांगत शिंदे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर करण्याचा संकल्प व्यक्त केला.मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाद्वारे हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी १८६८ कोटी रुपयांच्या आराखड्याची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी देवी तसेच दैनिक ‘पुण्य नगरी’चे संस्थापक संपादक कै.मुरलीधरआप्पा शिंगोटे आणि कै.अनंत भालेराव यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना ‘पुण्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सहकार क्षेत्रातील कार्यासाठी हभप वसंतराव नागदे,उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी ॲड.व्यंकटराव गुंड, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रासाठी डॉ. दिग्गज दापके-देशमुख,महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अर्चना माने,शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी बाळासाहेब जमाले,व्यसनमुक्ती कार्यासाठी डॉ. संदीप तांबारे,शेती व उद्योग क्षेत्रातील प्रगतीसाठी हणमंत गवळी व विठ्ठल चौधरी तसेच आदर्श सरपंच म्हणून अमर सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार विविध गटांतील विजेत्यांना प्रदान करण्यात आले. शोधवार्ता गटात बालाजी वडजे प्रथम,अमोल मुळे द्वितीय,राजहंस कांबळे व रोशन मुल्ला तृतीय तर विशेष वार्ता गटात माधव आटकोटे प्रथम,रमेश कदम द्वितीय,दिपक बारकुल व डॉ.रविंद्र भताने तृतीय ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली.प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भैरवनाथ कानडे यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार बांधवांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
******
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर आगमन व स्वागत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे
विमानतळावर आगमन व स्वागत
धाराशिव दि.१2 एप्रिल (जिमाका) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज धाराशिव विमानतळावर हेलिकॉप्टरने आगमन झाले.आगमन प्रसंगी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उमरगा पंचायत समितीच्या सभापती ॲड.आकांक्षा चौगुले यांनी, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर व पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी तर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सरचिटणीस संतोष जाधव व कोषाध्यक्ष संतोष हंबीरे यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे स्वागत केले. स्वागतानंतर उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी धाराशिव येथे आयोजित दैनिक पुण्यनगरी व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण केले.
******
सामाजिक समता सप्ताहानिमित्त धाराशिवमध्ये स्वच्छता मोहिम ; फकीरा नगर व बौद्ध नगरमध्ये उपक्रम संपन्न
सामाजिक समता सप्ताहानिमित्त धाराशिवमध्ये स्वच्छता मोहिम ; फकीरा नगर व बौद्ध नगरमध्ये उपक्रम संपन्न
धाराशिव,दि.१२ एप्रिल (जिमाका) सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी दि.८ ते १४ एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येतो.
त्यानुसार सामाजिक समता सप्ताहानिमित्त आज १२ एप्रिल रोजी धाराशिव शहरातील फकीरा नगर व बौद्ध नगर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.या स्वच्छता मोहिमेत सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले,समाज कल्याण अधिकारी सचिन लामकाने तसेच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
0000000
वडगाव (गांजा) येथे सामाजिक समता सप्ताह उत्साहात ; ५२ तरुणांचे रक्तदान,९८ जणांची आरोग्य तपासणी
वडगाव (गांजा) येथे सामाजिक समता सप्ताह उत्साहात ; ५२ तरुणांचे रक्तदान,९८ जणांची आरोग्य तपासणी
धाराशिव,दि.१२ एप्रिल (जिमाका)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,धाराशिव यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत दि.११ रोजी वडगाव (ता.धाराशिव) येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर,स्वच्छता अभियान तसेच प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. विशेष म्हणजे ५२ तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, तर ९८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी श्री.सनम लामकने,मुरूम नगरपरिषदेचे नगराधिकारी सचिन भुजबळ,प्रमुख व्याख्याते किरण सगर, बार्टीचे प्रकल्प अधिकारी तुषार कदम, समतादूत नागेश फुलसुंदर,किरण चिंचोले,रमेश नरवडे,गणेश मोटे, गोविंद लोमटे,सुहास वाघमारे, अर्चना रणदिवे यांच्यासह गावातील उपसरपंच बबन फुलसुंदर,शालेय समिती अध्यक्ष सचिन पवार, सदस्य सतीश पाटील,किरण फुलसुंदर, शेटीबा पवार,दिलीप माळी,मदार सय्यद,आदम सय्यद तसेच आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.त्यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना,मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना,स्वाधार योजना, ऍट्रॉसिटी कायदा,बचत गटांना ट्रॅक्टर वाटप,जात पडताळणी आदी योजनांची माहिती दिली.
प्रमुख व्याख्याते किरण सगर यांनी अनिष्ट रूढी-परंपरा व बुवा-बापू यांच्या आहारी न जाता महापुरुषांचे विचार आत्मसात करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला.दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते गावातील नव्याने पोलीस व सैन्यात भरती झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले व सरपंच बबन फुलसुंदर यांच्या वतीने पाण्याचे जार भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश फुलसुंदर यांनी केले,प्रास्ताविक तुषार कदम यांनी केले तर आभार ग्रामसेवक श्री.जी.व्हि.करदोरे यांनी मानले.कार्यक्रमास गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यासागर फुलसुंदर,प्रभाकर साळुंके,विलास फुलसुंदर,डॉ. ज्ञानेश्वर फुलसुंदर,पै.सोमनाथ फुलसुंदर,अमोल साळुंके,महावीर माळी,राजेश फुलसुंदर,पंडित पवार, बबन बेळे,ज्ञानेश्वर भुजबळ, आकाश भुस्कंडे,बापू फुलसुंदर, संजय फुलसुंदर,सोमनाथ साळुंके, ऋषीं बिराजदार,गोविंद लोखंडे, गणेश पाटील,विद्यासागर पाटील, दशरथ माळी,महादेव गायकवाड, विशाल हिरवे यांनी विशेष प्रयत्न केले.
****
Subscribe to:
Posts (Atom)




































