Friday, 15 May 2026

जनगणना -२०२७ : घर सूचीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

जनगणना -२०२७ : घर सूचीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन धाराशिव,दि.१५ मे (जिमाका) जनगणना -२०२७ अंतर्गत घर सूचीकरण (House Listing) प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे. जनगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांकडून नागरिकांच्या घर सूचीकरणाची आवश्यक ती नोंद पूर्ण केली जाणार आहे.तसेच काही कारणास्तव नागरिकांना दिनांक १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वतः स्व-गणना (Self Enumeration) करणे शक्य झाले नसल्यास,अशा नागरिकांसाठी दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त प्रगणक घरभेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत. यावेळी नागरिकांनी शासनाने निर्धारित केलेल्या जनगणनेशी संबंधित ३३ प्रश्नांची माहिती प्रगणकांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.या माहितीद्वारे संबंधित नागरिकांची नोंद जनगणनेच्या पोर्टलवर करण्यात येणार आहे. घर सूचीकरण प्रक्रियेत इमारत व घर क्रमांक,घराचे स्थान,कुटुंबातील सदस्यांची संख्या,कुटुंब प्रमुखाचे नाव,लिंग व प्रवर्ग,राहण्याच्या खोल्यांची संख्या,विवाहित जोडप्यांची संख्या,उपलब्ध सुविधा-सुविधा,मालमत्ता,साहित्य आदी विविध बाबींची माहिती विचारली जाणार आहे.या सर्व माहितीच्या आधारे घर सूचीकरणाचे काम डिजिटल स्वरूपात पूर्ण करण्यात येईल.जनगणना -२०२७ संदर्भातील नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय व सुरक्षित ठेवली जाणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जनगणना -२०२७ च्या टप्पा क्रमांक १ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत होणाऱ्या घर सूचीकरण प्रक्रियेसाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक माहिती द्यावी आणि राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. धाराशिव जिल्हा घर सूचीकरणाच्या कामकाजात राज्यात अग्रस्थानी राहावा,यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे. ******

Thursday, 14 May 2026

छत्रपती संभाजी महाराजांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

छत्रपती संभाजी महाराजांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन धाराशिव दि.१४ मे (जिमाका) छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही महाराजांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. ******

आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विभागांनी सज्ज राहावे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मान्सून २०२६ पूर्व तयारी आढावा बैठक

आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विभागांनी सज्ज राहावे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मान्सून २०२६ पूर्व तयारी आढावा बैठक * मान्सूनपूर्व तयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज * विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित * १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित होणार धाराशिव दि.१४ मे (जिमाका) सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सराव आयोजित करावेत.विशेषतः तहसीलदार व नगरपालिकांनी आपल्या कार्यक्षेत्रात आपत्कालीन सराव घेताना संबंधित साहित्याचा प्रत्यक्ष वापर करावा.पाळीव जनावरांचे वेळेवर लसीकरण करण्यात यावे.तसेच गायरान जमिनीवर चारा लागवडीसाठी आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अतिवृष्टीऐवजी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी कोणती पर्यायी पिके घ्यावीत,याचे नियोजन आतापासूनच करावे.आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विभागांनी सज्ज राहावे. असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सून २०२६ पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार बोलत होते.या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी होते. जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,तलावांवर संबंधित विभागाचे नाव,अधिकाऱ्याचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक असलेले फलक लावण्यात यावेत.त्यामुळे संबधित गावातील सरपंच व लोकप्रतिनिधी यांना संबंधित अधिकाऱ्यांशी वेळीच संपर्क साधता येईल.आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच धोक्याची सूचना देणारे बोर्ड उभारावेत.आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या आणि पोहणाऱ्या व्यक्तींची यादी तयार ठेवावी.वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपत्तीच्या काळात दिरंगाई केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होऊ शकणारे वाकलेले पोल, लोंबकळणाऱ्या तारा व धोकादायक वीज यंत्रणेचे सर्वेक्षण करून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत.उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत ठेवावेत.सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित राहून आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन जबाबदारीने काम करावे.तसेच २४ तास आपत्ती निवारण कक्ष सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. कोणत्याही अधिकाऱ्याने पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत पूर,अतिवृष्टी,वादळ, दरडी कोसळणे,गारपीट आदी संभाव्य आपत्तींच्या अनुषंगाने विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १ जून २०२६ पासून जिल्हा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असून, तालुकानिहाय व मंडळनिहाय पावसाची माहिती संकलित केली जाणार आहे.जिल्हा परिषदेला गावांच्या स्थलांतर नियोजनासह तलाव,पूल,रस्ते आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या सूचना यावेळी श्री.पुजार यांनी दिल्या. पोलीस विभागाला बचाव पथके तयार ठेवणे,नदीकाठच्या गावांतील पोहणाऱ्यांची यादी तयार ठेवणे तसेच पूरस्थितीत तातडीने मदत कार्य राबविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.पाटबंधारे विभागाला धरणे व तलावांची नियमित तपासणी,पाणीपातळीवर लक्ष ठेवणे तसेच धरणातून पाणी सोडण्यापूर्वी ४८ तास अगोदर संबंधित ग्रामपंचायत तसेच प्रशासनाला माहिती देण्याचे निर्देश श्री.पुजार यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते,पूल व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ठिकाणांची दुरुस्ती आणि पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.महावितरण विभागाला पावसाळ्यात वीजपुरवठा अखंडित ठेवणे,धोकादायक तारा व पोल दुरुस्त करणे आणि आपत्कालीन ठिकाणी लोडशेडिंग टाळण्याचे निर्देश देण्यात आले.उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करून २४ तास कार्यान्वित ठेवण्यास सांगण्यात आले.तलाठी,ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी आपत्तीची माहिती तात्काळ सादर करावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री.पुजार यांनी स्पष्ट केले. श्रीमती.खोखर यावेळी म्हणाल्या की,प्रत्येकाने आपली जबाबदारी वेळीच पार पाडावी.त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होणार नाही तसेच तणाव निर्माण होणार नाही असे त्या म्हणाल्या. श्री.कडवकर यांनी आरोग्य विभागाला साथीचे रोग टाळण्यासाठी औषधसाठा उपलब्ध ठेवणे,गावांमध्ये आरोग्य सेवा तत्काळ पोहोचविणे तसेच सर्पदंश प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.कृषी विभागाला पिकांच्या नुकसानीचे पंचनामे,रोग प्रतिबंधक उपाययोजना व शेतकरी जनजागृतीची जबाबदारी देण्यात आली आहे.जिल्हा पुरवठा विभागाला अन्नधान्य व केरोसीनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. पशुसंवर्धन विभागाला जनावरांच्या साथीच्या रोगांपासून संरक्षणासाठी लसीकरण आणि औषधसाठा उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले. नगर परिषदांना गटारी,नाले स्वच्छता धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, नदीकाठावरील अतिक्रमण हटविणे तसेच पावसाळ्यापूर्वी शहरांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना यावेळी श्री . कडवकर यांनी दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा,पूर व यात्रांसंदर्भातील एसओपी अद्ययावत करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच १०७७ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित ठेवण्याबाबतही सूचना देण्यात यावेळी देण्यात आल्या.मान्सून काळात सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी दक्ष राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. *******

Wednesday, 13 May 2026

दुष्काळाच्या छायेत आशेचा झरा… ‘जलतारा’मुळे धाराशिवमध्ये उगवतेय नवजीवनाची पहाट

दुष्काळाच्या छायेत आशेचा झरा… ‘जलतारा’मुळे धाराशिवमध्ये उगवतेय नवजीवनाची पहाट धाराशिवच्या मातीत दुष्काळ नवा नाही…उन्हाळ्याची चाहूल लागली की गावागावातील विहिरींचा तळ दिसू लागतो, बोअरवेल कोरड्या पडतात,टँकरच्या पाण्यासाठी रांगा लागतात आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटू लागतात.आकाशात ढग दाटले तरी पाऊस हमखास पडेल याची शाश्वती उरलेली नाही.बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि वर्षानुवर्षे घटत चाललेली भूजल पातळी यामुळे धाराशिवसारख्या दुष्काळी जिल्ह्यासमोर जलसंकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. अशा परिस्थितीत “जलतारा अभियान” हे केवळ प्रशासनाचे अभियान न राहता आशेचा नवा किरण ठरत आहे.कारण ही मोहीम फक्त पाणी अडविण्याची नाही,तर भविष्य वाचविण्याची आहे… पुढील पिढ्यांच्या अस्तित्वासाठी उभा राहिलेला सामूहिक संकल्प आहे. पाणी म्हणजे केवळ तहान भागविणारे साधन नाही; ते शेतीचे जीवन,जनावरांचा आधार,ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आणि पर्यावरणाचा श्वास आहे.म्हणूनच आज “पाणी अडवा,पाणी जिरवा” ही संकल्पना घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची वेळ आली आहे. जलतारा अभियानातून धाराशिव जिल्ह्यात हीच जाणीव लोकांच्या मनामनात रुजताना दिसत आहे. गावोगावी तलाव,नाले,ओढे,विहिरी आणि शेततळ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत.गाळ काढणे,नाले खोलीकरण,बंधारे उभारणे,वृक्षारोपण, जलस्रोत स्वच्छता आणि भूजल पुनर्भरण यांसारख्या उपक्रमांमुळे अनेक गावांमध्ये सकारात्मक बदल जाणवू लागले आहेत. ज्या विहिरी काही वर्षांपूर्वी एप्रिलमध्येच कोरड्या पडत होत्या,त्या आता अधिक काळ पाण्याने भरलेल्या राहू लागल्या आहेत.काही भागांत भूजल पातळी वाढल्याचेही चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे या अभियानाने दुष्काळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.पूर्वी पाणीटंचाई आली की फक्त शासनाकडे मदतीची अपेक्षा ठेवली जात होती; मात्र आता गावकरी स्वतः पुढाकार घेत जलसंधारणाच्या कामांत उतरू लागले आहेत.युवकांचे श्रमदान, महिला बचत गटांचा सहभाग, शेतकऱ्यांचे नियोजन आणि सामाजिक संस्थांची साथ यामुळे “जलतारा” आता लोकचळवळ बनू लागले आहे. धाराशिवसारख्या जिल्ह्यासाठी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे ही काळाची सर्वात मोठी गरज आहे.कारण येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा आधार भूजलावरच आहे.पावसाचे पाणी जमिनीत मुरले तरच विहिरी आणि बोअरवेल जिवंत राहू शकतात.त्यामुळे पडणारा प्रत्येक थेंब अडविणे आणि जिरविणे ही आता निवड नसून अपरिहार्यता बनली आहे. या मोहिमेला अधिक बळ मिळत आहे ते प्रशासन,लोकसहभाग आणि सेवाभावी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी “एक लाख जलतारा” तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प जिल्ह्यासमोर ठेवला आहे.प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटाला प्रत्येकी ५०० जलधारा कामांचे उद्दिष्ट देण्यात आले असून,गावागावात व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या अभियानात नाम फाउंडेशनसह विविध सामाजिक संस्था सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत.नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलतारा कामांसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे.त्यामुळे जलसंधारणाच्या कामांना वेग मिळत असून,भविष्यात जिल्ह्यातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. आजही अनेक शेतकरी अपुऱ्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान सहन करत आहेत. जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो.अशा वेळी जलसंधारणाची प्रत्येक कृती उद्याच्या संकटावर मात करण्याची ताकद ठेवते.कारण जिथे पाणी टिकते,तिथे शेती टिकते; शेती टिकली की गावाची अर्थव्यवस्था टिकते आणि गाव टिकले की भविष्य सुरक्षित राहते. “थेंब थेंब जपला तरच उद्याचा झरा वाहील,जलसंवर्धनाच्या वाटेवरूनच समृद्धीचा सूर्य उगवेल…” जलतारा अभियानाची खरी ताकद म्हणजे त्यातून निर्माण होणारी सामाजिक जाणीव.हे अभियान केवळ जलस्रोत दुरुस्त करण्यापुरते मर्यादित नाही,तर पाण्याबाबत जबाबदारीची संस्कृती निर्माण करत आहे.घरगुती वापरापासून शेतीपर्यंत पाण्याचा योग्य वापर,पुनर्वापर आणि बचत याबाबत समाजात जागरूकता निर्माण होत आहे. धाराशिवला दुष्काळमुक्त आणि जलसंपन्न बनवायचे असेल,तर जलतारा ही फक्त मोहीम न राहता लोकांच्या मनातील चळवळ बनली पाहिजे.शासन, प्रशासन,सामाजिक संस्था आणि नागरिक यांनी हातात हात घालून पुढे आले,तर दुष्काळावर मात करणे अशक्य नाही. कारण आज जपलेला प्रत्येक थेंब उद्याच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करणार आहे…आणि कदाचित याच थेंबांतून धाराशिवच्या नव्या समृद्धीची पहाट उगवणार आहे. संकलन जिल्हा माहिती कार्यालय धाराशिव *******

जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात

जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात धाराशिव दि.१३ मे (जिमाका) सद्यस्थितीत भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दि.१२ मार्च २०२६ रोजीच्या आदेशान्वये राज्यासाठी ३७४४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर केले आहे.त्यानुषंगाने राज्य शासनाकडून धाराशिव जिल्ह्यासाठी ८४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ८४ हजार लिटर केरोसिनचे तालुकानिहाय वाटप अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभ योजना शिधापत्रिकाधारकांसाठी सर्वसाधारण प्रमाणात निश्चित करण्यात आले आहे.त्यानुसार धाराशिव तालुक्यास २० हजार लिटर, तुळजापूरला ११ हजार लिटर, लोहारा ७ हजार लिटर, उमरगा १३ हजार लिटर,परंडा ९ हजार लिटर,भूम ८ हजार लिटर, कळंब ११ हजार लिटर आणि वाशी तालुक्यास ५ हजार लिटर केरोसिनचे नियतन देण्यात आले आहे. दरम्यान,मंजूर करण्यात आलेल्या ८४ हजार लिटरपैकी १२ हजार लिटरचा पहिला टँकर आज १३ मे रोजी जिल्ह्यात दाखल झाला असून, धाराशिव तालुक्यापासून केरोसिन पुरवठ्यास सुरुवात करण्यात येणार आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती.स्वाती शेंडे यांनी केरोसिन टँकरला जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिरवा झेंडा दाखवून जिल्ह्यातील केरोसिन वाटपाचा शुभारंभ केला. जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना हे केरोसिन प्रति लिटर ६३ रुपये दराने उपलब्ध होणार असून,प्रति कार्ड ३ लिटरप्रमाणे वितरण करण्यात येणार आहे.हे नियतन प्राधान्याने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना आणि त्यानंतर प्राधान्य कुटुंब लाभ योजना शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. धाराशिव तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांनी आपल्या केरोसिन किंवा रास्तभाव दुकानदारांकडे जाऊन केरोसिन खरेदी करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ******

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे यांसारख्या दिग्गज डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने या प्रवेशिकांचे परिक्षण केले. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली. या समितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकाद्वारे कुंभमेळा आयोजन आणि लोगो स्पर्धेबाबत माहिती दिली. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू, संत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी उपस्थित साधू संतांचे स्वागत केले. नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाविषयी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, 'मायगव्ह' आणि 'असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी डिझाइन स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत मायगव्ह प्लॅटफॉर्मवर पार पडलेल्या या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले, त्याखालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला. 18 ते 24 वयोगटातील तरुणांनी या स्पर्धेत सर्वाधिक सक्रिय सहभाग नोंदवला. ➡️हे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूगोल आणि धार्मिक परंपरांवर आधारित आहे. ➡️भगवान शंकराचे त्रिशूळ: आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक. ➡️त्र्यंबकेश्वर मंदिर: प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी मंदिराची प्रतिकृती. ➡️काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदी: गोदावरी नदीला 'शिवलिंगा'च्या रूपात दर्शविण्यात आले असून, ते कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते. 00000

Tuesday, 12 May 2026

शेतकरी गटांना मोठी संधी ; खरीप पिक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज मागविले

शेतकरी गटांना मोठी संधी ; खरीप पिक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज मागविले धाराशिव दि.१२ मे (जिमाका) राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात खरीप हंगामातील अन्नधान्य पिकांच्या पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकरी गटांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून,कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे संच (मिनीकीट) वितरणासाठीही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज स्वीकारले जात आहेत.जिल्ह्यातील पात्र शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) आणि शेतकरी संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन कृषि विभाग,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पीक प्रात्यक्षिके ही बाब महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येत असून,शेतकरी गटांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणी झालेले शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) आणि शेतकरी संस्था पात्र राहणार आहेत. याचबरोबर कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे संच (मिनीकीट वितरण) या योजनेसाठीही महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.प्राप्त अर्जांमधून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करून त्यांना प्रमाणित बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे. शासनाच्या नियमानुसार अर्जदार तसेच लाभार्थी गटातील सर्व सदस्यांकडे ‘फार्मर आयडी’ असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह फार्मर आयडीची प्रक्रिया पूर्ण करूनच अर्ज सादर करावेत,असेही आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी व अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल या संकेतस्थळाला भेट द्यावी,असे कृषि विभागाने कळविले आहे. ******

१०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप ; पशुपालकांना अर्ज करण्याचे आवाहन

१०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप ; पशुपालकांना अर्ज करण्याचे आवाहन धाराशिव,दि.१२ मे (जिमाका) पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने सन २०२६ - २७ या आर्थिक वर्षात पशुपालकांसाठी विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून,दुभत्या जनावरांना पुरेसे व दर्जेदार खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी “दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम)” अंतर्गत १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून ३१ मे २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा उप आयुक्त,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,धाराशिव यांनी केले आहे. योजनेअंतर्गत दुभत्या जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे,पशुखाद्य विकासाला चालना देणे आणि पशुपालकांचा खर्च कमी करणे हा उद्देश असून, पात्र लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी पशुपालकांनी आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी तसेच पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्जाचा विहित नमुना,मार्गदर्शक सूचना,नियम,अटी तसेच आवश्यक कागदपत्रांची यादी पशुसंवर्धन विभाग,पंचायत समिती कार्यालय, येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जासाठी पुढील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSctKBS3qJ9Gz-IxPrJZGUTWn_EagSCQtKMlywq_h5QygHBDYg/viewform?usp=sharing&ouid=118136150394133561125 या लिंकद्वारे १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे मागणीसाठी अर्ज सादर करता येणार असून,जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे. *****

Monday, 11 May 2026

धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत १८ मे रोजी

धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत १८ मे रोजी धाराशिव दि.१२ मे (जिमाका) धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतीच्या सरंपच पदाचे आरक्षण जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दि. ८ मे २०२६ रोजी दिलेल्या सुचनेनुसार सोडत पध्द्तीने (ड्रॉ लॉटस) टाकुन दि.१८ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, धाराशिवमध्ये निश्चित करण्यात येणार आहे. धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतीमध्ये दि.१० जुलै २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती.सदर सरपंच आरक्षण सोडतीमध्ये अनु.जाती,अनु. जमातीसाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायत सरपंचपदामध्ये कोणतेही बदल न करता केवळ ना.मा.प्रवर्ग,व सर्वसाधारण या प्रवर्गाच्या सरपंच पदाच्या जागा निश्चित करुन त्या-त्या प्रवर्गातील सरपंच पदाचे आरक्षण त्याच दिवशी सोडत पध्द्‌तीने (ड्रॉ लॉटस) टाकुन निश्चित करण्यात येणार आहे. धाराशिव तालुक्यातील सर्व संबंधीतांनी उपरोक्त ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. मृणाल जाधव,तहसिलदार धाराशिव यांनी केले आहे. *****

राष्ट्रीय लोकअदालतीत हजारो प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा ; कोट्यवधी रुपयांची वसुली धनादेश,मोटार अपघात,बँक व पाणीपट्टी प्रकरणांत मोठी वसुली ; नागरिकांना जलद न्यायाचा दिलासा

राष्ट्रीय लोकअदालतीत हजारो प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा ; कोट्यवधी रुपयांची वसुली धनादेश,मोटार अपघात,बँक व पाणीपट्टी प्रकरणांत मोठी वसुली ; नागरिकांना जलद न्यायाचा दिलासा धाराशिव,दि.१२ मे (जिमाका) राष्ट्रीयहोणार विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार ९ मे २०२६ रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.धाराशिव मुख्यालय येथे सकाळी ठिक १०.३० वाजता लोकअदालतीच्या कामकाजास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.यावेळी श्रीमती अभिश्री देव,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,श्री.एस.जी.ठुबे,जिल्हा न्यायाधीश-३,श्री.आर.के. खोमणे,जिल्हा न्यायाधीश-४,श्रीमती.भाग्यश्री पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तसेच इतर न्यायाधीश यांच्या उपस्थितीत लोकअदालतींची सुरुवात झाली.या लोकअदालतीसाठी एकूण ९ पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. ९ मे रोजी झालेल्या जिल्हास्तरीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित एकूण ७,०४५ तर दावापूर्व प्रलंबित ९,३०९ अशी एकूण हजारो प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यासाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित २९१ आणि दावापूर्व २,४२८ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली.y या लोकअदालतीमध्ये विविध प्रकारच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वसुली करण्यात आली.धनादेश प्रकरणांमध्ये फिर्यादी पक्षाला तब्बल रुपये १ कोटी १९ लक्ष ४९ हजार ८४ हजार इतकी रक्कम प्राप्त झाली.प्रलंबित मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणांत रुपये १ कोटी ७४ लक्ष ५ हजार इतकी भरपाई देण्यात आली.तसेच प्रलंबित दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांत १ कोटी ६८ लक्ष ८६ हजार ५२६ रुपये रकमेचा निपटारा करण्यात आला. याशिवाय बँकांच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये रुपये २८ लक्ष ९२ हजार ७६७ रुपये तर बँकांच्या वादपूर्व प्रकरणांमध्ये रुपये ४७ लक्ष २४ हजार ८९ रुपये इतकी वसुली करण्यात आली.नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या पाणीपट्टी व घरपट्टी प्रकरणांमध्ये रुपये ९५ लक्ष २० हजार ७९२ रुपये रकमेची वसुली झाली.विद्युत वितरण प्रकरणांमध्ये रुपये १४ लक्ष ९९ हजार २३५ रुपये तर ग्राहक मंचाच्या प्रकरणांमध्ये रुपये १५ लक्ष रुपये रकमेचा निपटारा करण्यात आला.तसेच गुन्हा कबुलीच्या प्रकरणांमध्ये ८६ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.y राष्ट्रीय लोकअदालतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना जलद,सुलभ आणि कमी खर्चात न्याय मिळण्यास मोठी मदत होत असून,सामोपचाराने वाद मिटविण्याच्या प्रक्रियेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ******