Wednesday, 13 May 2026
दुष्काळाच्या छायेत आशेचा झरा… ‘जलतारा’मुळे धाराशिवमध्ये उगवतेय नवजीवनाची पहाट
दुष्काळाच्या छायेत आशेचा झरा… ‘जलतारा’मुळे धाराशिवमध्ये उगवतेय नवजीवनाची पहाट
धाराशिवच्या मातीत दुष्काळ नवा नाही…उन्हाळ्याची चाहूल लागली की गावागावातील विहिरींचा तळ दिसू लागतो, बोअरवेल कोरड्या पडतात,टँकरच्या पाण्यासाठी रांगा लागतात आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटू लागतात.आकाशात ढग दाटले तरी पाऊस हमखास पडेल याची शाश्वती उरलेली नाही.बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि वर्षानुवर्षे घटत चाललेली भूजल पातळी यामुळे धाराशिवसारख्या दुष्काळी जिल्ह्यासमोर जलसंकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.
अशा परिस्थितीत “जलतारा अभियान” हे केवळ प्रशासनाचे अभियान न राहता आशेचा नवा किरण ठरत आहे.कारण ही मोहीम फक्त पाणी अडविण्याची नाही,तर भविष्य वाचविण्याची आहे… पुढील पिढ्यांच्या अस्तित्वासाठी उभा राहिलेला सामूहिक संकल्प आहे. पाणी म्हणजे केवळ तहान भागविणारे साधन नाही; ते शेतीचे जीवन,जनावरांचा आधार,ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आणि पर्यावरणाचा श्वास आहे.म्हणूनच आज “पाणी अडवा,पाणी जिरवा” ही संकल्पना घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची वेळ आली आहे. जलतारा अभियानातून धाराशिव जिल्ह्यात हीच जाणीव लोकांच्या मनामनात रुजताना दिसत आहे.
गावोगावी तलाव,नाले,ओढे,विहिरी आणि शेततळ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत.गाळ काढणे,नाले खोलीकरण,बंधारे उभारणे,वृक्षारोपण, जलस्रोत स्वच्छता आणि भूजल पुनर्भरण यांसारख्या उपक्रमांमुळे अनेक गावांमध्ये सकारात्मक बदल जाणवू लागले आहेत. ज्या विहिरी काही वर्षांपूर्वी एप्रिलमध्येच कोरड्या पडत होत्या,त्या आता अधिक काळ पाण्याने भरलेल्या राहू लागल्या आहेत.काही भागांत भूजल पातळी वाढल्याचेही चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या अभियानाने दुष्काळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.पूर्वी पाणीटंचाई आली की फक्त शासनाकडे मदतीची अपेक्षा ठेवली जात होती; मात्र आता गावकरी स्वतः पुढाकार घेत जलसंधारणाच्या कामांत उतरू लागले आहेत.युवकांचे श्रमदान, महिला बचत गटांचा सहभाग, शेतकऱ्यांचे नियोजन आणि सामाजिक संस्थांची साथ यामुळे “जलतारा” आता लोकचळवळ बनू लागले आहे.
धाराशिवसारख्या जिल्ह्यासाठी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे ही काळाची सर्वात मोठी गरज आहे.कारण येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा आधार भूजलावरच आहे.पावसाचे पाणी जमिनीत मुरले तरच विहिरी आणि बोअरवेल जिवंत राहू शकतात.त्यामुळे पडणारा प्रत्येक थेंब अडविणे आणि जिरविणे ही आता निवड नसून अपरिहार्यता बनली आहे.
या मोहिमेला अधिक बळ मिळत आहे ते प्रशासन,लोकसहभाग आणि सेवाभावी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी “एक लाख जलतारा” तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प जिल्ह्यासमोर ठेवला आहे.प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटाला प्रत्येकी ५०० जलधारा कामांचे उद्दिष्ट देण्यात आले असून,गावागावात व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या अभियानात नाम फाउंडेशनसह विविध सामाजिक संस्था सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत.नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलतारा कामांसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे.त्यामुळे जलसंधारणाच्या कामांना वेग मिळत असून,भविष्यात जिल्ह्यातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे.
आजही अनेक शेतकरी अपुऱ्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान सहन करत आहेत. जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो.अशा वेळी जलसंधारणाची प्रत्येक कृती उद्याच्या संकटावर मात करण्याची ताकद ठेवते.कारण जिथे पाणी टिकते,तिथे शेती टिकते; शेती टिकली की गावाची अर्थव्यवस्था टिकते आणि गाव टिकले की भविष्य सुरक्षित राहते.
“थेंब थेंब जपला तरच उद्याचा झरा वाहील,जलसंवर्धनाच्या वाटेवरूनच समृद्धीचा सूर्य उगवेल…”
जलतारा अभियानाची खरी ताकद म्हणजे त्यातून निर्माण होणारी सामाजिक जाणीव.हे अभियान केवळ जलस्रोत दुरुस्त करण्यापुरते मर्यादित नाही,तर पाण्याबाबत जबाबदारीची संस्कृती निर्माण करत आहे.घरगुती वापरापासून शेतीपर्यंत पाण्याचा योग्य वापर,पुनर्वापर आणि बचत याबाबत समाजात जागरूकता निर्माण होत आहे.
धाराशिवला दुष्काळमुक्त आणि जलसंपन्न बनवायचे असेल,तर जलतारा ही फक्त मोहीम न राहता लोकांच्या मनातील चळवळ बनली पाहिजे.शासन, प्रशासन,सामाजिक संस्था आणि नागरिक यांनी हातात हात घालून पुढे आले,तर दुष्काळावर मात करणे अशक्य नाही. कारण आज जपलेला प्रत्येक थेंब उद्याच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करणार आहे…आणि कदाचित याच थेंबांतून धाराशिवच्या नव्या समृद्धीची पहाट उगवणार आहे.
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय
धाराशिव
*******

