Saturday, 12 August 2023
13,14 व 15 ऑगस्ट रोजी "हर घर तिरंगा" अभियान उत्स्फूर्तपणे राबवावा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे नागरिकांना आवाहन
13,14 व 15 ऑगस्ट रोजी "हर घर तिरंगा" अभियान उत्स्फूर्तपणे राबवावा
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे नागरिकांना आवाहन
उस्मानाबाद,दिनांक,12 (जि मा का):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वानिमित्त व भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने 'हर घर तिरंगा' हे अभियान उस्मानाबाद जिल्हयात दि. 13 ऑगस्ट 2023, दि. 14 ऑगस्ट, 2023 आणि दि. 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे राबवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 13,14 आणि 15 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत आपल्या घरावर राष्ट्रध्वज यथोचित सन्मानाने फडकाविण्यात यावा. राष्ट्रध्वज सन्मानाने फडकाविताना राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन राष्ट्रध्वजास सलामी देण्यात यावी. तसेच राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
उपरोक्तप्रमाणे 'हर घर तिरंगा' हे अभियान प्रत्येक शासकीय कार्यालयात अनिवार्यपणे राबविण्यात यावे. याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय आणि निमशासकीय संस्था, खाजगी संस्था, महामंडळे, शासकीय व खाजगी इस्पितळे, सार्वजनिक आस्थापना तसेच खाजगी आस्थापनांची कार्यालये, कारखाने व दुकाने इत्यादी ठिकाणी 'हर घर तिरंगा' हे अभियान उत्स्फूर्तपणे राबवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
Thursday, 10 August 2023
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत 112 जिल्हयापैकी विविध योजना व उपक्रम राबविण्यात उस्मानाबाद जिल्हा 10 वा
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत 112 जिल्हयापैकी
विविध योजना व उपक्रम राबविण्यात उस्मानाबाद जिल्हा 10 वा
उस्मानाबाद,दि.10(जिमाका):- आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत नीति आयोगाने देशातील 22 राज्यातून एकूण 112 जिल्ह्यांची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड केली आहे. त्या 112 जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड करण्यात आली. जिल्हा निर्देशांक मध्ये वाढ व्हावी याकरिता सर्व प्रयत्न केले जात असल्यामुळे आज आपला जिल्हा देशात 10 वा आलेला आहे. ही बाब नक्कीच जिल्हा प्रशासनासाठी अभिनंदनीय बाब आहे. उस्मानाबाद जिल्हा कायम प्रगतशील राहावा यासाठी विविध प्रयत्न केले जातीलच आणि यापुढे आपली कामगिरी अजून जास्त उंचावण्यासाठी कायम कटिबद्ध राहतील असे जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे म्हणाले.
आकांक्षित जिल्हा कार्यक्रम सन 2018-19 पासून राबविण्यात येत असून चार वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. सदरील योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या सहा क्षेत्रातील 49 निर्देशांकांमध्ये वृद्धी होणेकरिता उस्मानाबाद जिल्ह्यात विविध योजना, कार्यक्रम,नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम अंतर्गत निश्चित केलेले क्षेत्र: आरोग्य व पोषण (Health & Nutrition), शिक्षण (Education), कृषि व जलस्त्रोत (Agriculture and Water Resources), आर्थिक समावेशन (Financial Inclusion), कौशल्य विकास (Skill Development), मुलभूत सुविधा (Basic Infrastructure) नीती आयोगाच्या डॅशबोर्डवर दर महिना मासिक प्रगती अहवाल भरला जातो व केंद्राकडून दर महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. त्यानुषंगाने सध्या जून महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली असून उस्मानाबाद जिल्ह्याची क्षेत्रनिहाय प्रगती दर्शविणारा तक्ता खालीलप्रमाणे आहे. एकूण जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद जिल्ह्याचा कृषि व जलस्त्रोत क्षेत्रात 3 नंबर, व तसेच शिक्षण क्षेत्रात 8 नंबर आणि आरोग्य व पोषण क्षेत्रात 19 नंबर रँक वर आहे. आपल्या जिल्ह्याचा प्रगती होण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन यंत्रणाकडून वारंवार मेहनत केली जाते. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचेकडून सदरील क्षेत्रात प्रगती व्हावी याकरिता नेहमी क्षेत्रनिहाय आढावा बैठक घेऊन संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा कायम सूचना देऊन मार्गदर्शन केले जाते.
****
Tuesday, 8 August 2023
पाचपिंपळा येथे पंचक्रोशीतील नागरिकांचा आरोग्य सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणार --पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
पाचपिंपळा येथे पंचक्रोशीतील नागरिकांचा
आरोग्य सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणार
--पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
उस्मानाबाद,दि.08(जिमाका):- पाचपिंपळा येथे पंचक्रोशीतील नागरीकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्या पाहिजे.यासाठी तसा प्रस्ताव आरोग्य विभागाने सादर करावा.या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाचपिंपळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात येईल.असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केले.
आज 8 ऑगस्ट रोजी परंडा तालुक्यातील पाचपिंपळा येथे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते विविध कामांचे भूमीपूजन करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.जिल्हा परिषदेचे माझी सभापती धनंजय सावंत,माझी सभापती दत्ता साळुंके, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजंल शिंदे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास, सरपंच वंदना चौधरी, माऊली गोडसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.डॉ. सावंत म्हणाले, गावाच्या विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे.गावात सुरू असलेली कामे ही गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांनी सुरु असलेल्या कामांना वेळोवेळी भेट देऊन पाहणी करावी.झालेली कामे टिकुन राहतील यासाठी प्रयत्न करावा. पाचपिंपळा येथे लवकरात लवकर शेतकरी व पशु पालकांसाठी पशु वैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात येईल.असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते जल जीवन मिशन अंतर्गत 69 लक्ष रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे,जन सुविधा योजनेतंर्गत गावातील सिमेंट रस्त्यासाठी 20 लक्ष रूपये,25/15 या लेखाशिषातून गावातील सिमेंट रस्त्याच्या 10 लक्ष रुपयांच्या कामाचे तसेच अन्य विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले.
****
पालकमंत्री प्रा डॉ. सावंत यांच्या हस्ते कंडारी येथील 10 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन
वृत्त क्रमांक-494 दि.08 ऑगस्ट 2023
पालकमंत्री प्रा डॉ. सावंत यांच्या हस्ते कंडारी येथील
10 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन
उस्मानाबाद,दि.08(जिमाका):- पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते आज 8 ऑगस्ट रोजी परंडा तालुक्यातील कंडारी येथे 10 कोटी 38 लक्ष 50 हजार रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनंजय सावंत, दत्ताअण्णा साळुंखे, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे, उपविभागीय अधिकारी वैशाली शिंदे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.डी.कुलकर्णी, समुदाय आरोग्य अधिकारी रूपाली शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले,नागरिकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.
पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी 9 कोटी 43 लक्ष रुपयांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे, जन सुविधा योजनेअंतर्गत गावातील सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी 10 लक्ष रुपयांच्या निधी, 50 लक्ष रुपयांपेक्षा जास्त निधीतून उभारण्यात येणाऱ्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्र इमारतीचे व गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्यांच्या कामाचे तसेच जन सुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या आरओ प्लांटच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी कंडारी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
Subscribe to:
Posts (Atom)









