उस्मानाबाद,दि.27:- जिल्हा
एड्स प्रतिबंधात्मक नियंत्रण समिती यांची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत
नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज पार पडली. या
बैठकीस जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण समितीचे सर्व सभासद उपस्थित होते. या बैठकीत
आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मागील तीन महिन्यात झालेल्या
कामाचा आढावा घेतला.
यामध्ये जिल्हाधिकारी डॉ.
प्रशांत नारनवरे यांनी सूचना दिल्या की, एचआयव्ही संसर्गित रुग्णांना सर्व शासकीय
योजनांचा लाभ मिळवून देण्यात यावा. जिल्हयातील एचआयव्ही संसर्गिक रूग्णांची वर्ष, लिंग
यानुसार माहिती तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, जेणेकरून
संबंधिताच्या शैक्षणिक अर्हतेनुसार संबंधितांना शासकीय सेवेत काम करण्याची संधी
देता येईल तसेच जिल्हयातील सर्व स्तरातील महिलांना एनआरएलएम अतंर्गत विविध
योजनांचा लाभ मिळवून देवून सर्व स्तरातील महिलांच्या सक्षमीकरणाकरिता सर्वांनी
प्रयत्न करावेत.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. एकनाथ माले यांनी सांगितले की,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
यांच्यासमवेत त्यांच्याकडील विविध योजनांचा लाभ संबंधिताना मिळवून देण्याकरिता
लवकरात लवकर बैठक घेण्यात येईल तसेच जिल्हाधिकारी यांनी माहिती मागविल्यानुसार ती
तयार करून एचआयव्ही संसर्गित रुग्णांना सर्व शासकीय आरोग्य योजना व इतर शासकीय
योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता सर्वप्रथम प्रयत्न केला जाईल. आढावा सादर करताना
जिल्हा कार्यक्रम अधिकारी गणेश काकडे यांनी सांगितले की, सन 2016-17 या वर्षांत आयसीटीसी
यांचा नियमित निधी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्याकडून
प्राप्त झालेला नाही. सध्या आयसीटीसीचे काम करताना वेगवेवेगळया अडचणी येत आहेत.
यामध्ये मुख्यत: किट्स ठेवण्यासाठीचे रेफ्रीजरेटर सात रूग्णालयात नादुरुस्त आहेत.
याकरिता जिल्हा नियोजन समितीकडून ते मिळविण्याची मागणी बैठकीसमोर मांडण्यात
आली.तसेच आयसीटी, एआरटी केंद्रातील नऊ संगणक नादुरूस्त असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आपल्या केंद्रासाठी कोणत्या योजनेतून
अनुदान देण्यात येईल यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे सांगितले.
या बैठकीमध्ये रूग्ण कल्याण
समिती, 108 महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिसेस,पीसीपीएनडीटी, राजीव गांधी
जीवनदायी आरोग्य योजना यांचा आढावा यावेळी घेण्यात आला.तसेच राष्ट्रीय तंबाखू
नियंत्रण कार्यक्रम संपूर्ण जिल्हयात राबविण्याकरिता डॉ. एकनाथ माले यांनी सर्व विभागप्रमुखांना
आवाहन केले.
