Friday, 18 November 2016

भूतपूर्व सैनिक अंशदायी स्वास्थ्य योजना पॉलिक्लिनिकमध्ये मेडिकल ऑफिसर पदाकरिता अर्ज करण्याबाबत आवाहन


          उस्मानाबाद, दि.18:- स्टेशन हेडक्वॉर्टर्स, अहमदनगर येथे ई.सी.एच.एस. पॉलीक्लिनिकमध्ये मेडीकल स्पेशालिस्ट ऑफिसर (एक जागा)  व  मेडीकल ऑफिसर  (दोन जागा) ही पदे कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर एक वर्षाकरिता (अधिक कालावधीसाठी नुतनीकरण) भरण्यात येणार आहेत .
             तरी इच्छुकांनी दिनांक 23 नोव्हेंबर 2016 पर्यंत प्रभारी ई.सी.एच.एस, स्टेशन हेडक्वॉर्टर्स, अहमदनगर, जामखेड रोड,पोस्ट कॅम्प,अहमदनगर येथे अर्ज पोहोचतील अशा बेताने  पाठवावेत तसेच अधिक माहितीसाठी (0241- 2321233)  आणि ई- मेल shqahmednagar@echs.gov.in   येथे संपर्क साधावा, असे  आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सु.मो. गोडबोले यांनी केले आहे 

जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे सेवानिवृत्त वेतनधारक,कुटूंब निवृत्तीवेतनधारकांना आवाहन



        उस्मानाबाद,दि.18:-  सेवानिवृत्त वेतनधारक,कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचे हयातनामा बँकेत व संबंधित कोषागार व उपकोषागार कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून बायो मॅट्रीक डिव्हाईसव्दारे नोंदणी करिता दिनांक 15 जानेवारी 2017 पर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती वेतनधारक,कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित बँक तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून दिनांक 15 जानेवारी 2017 पर्यंत हयातनामा सादर करावा, असे कोषागार अधिकारी  विशाल पवार यांनी कळविले आहे. 

वेतनपडताळणी पथकाचा दौरा


उस्मानाबाद, दि.15:- वेतन पडताळणी  पथकाचा  माहे नोव्हेंबर 2016 चा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आयोजित केला आहे-दौऱ्याचे ठिकाण जिल्हा कोषागार कार्यालय, उस्मानाबाद असून कालावधी दिनांक 17 ते 19 नोव्हेंबर 2016 असा आहे. दिनांक 17  नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय,उस्मानाबाद व  18 ते 19 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्हा/तालुका स्तरावरील इतर कार्यालये असा आहे.
पडताळणीसाठी सेवा पुस्तके सादर करण्यापूर्वी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी शासन निर्णय वित्त विभाग  क्र.वेपुर 1399/प्र.क्र.5/99/सेवा-10 दिनांक 20 जानेवारी 2001 च्या सोबत जोडलेले विवरणपत्र संबंधितांच्या सेवापुस्तकात लावून त्याप्रमाणे सेवापुस्तके पडताळणीस सादर करावीत.

 सेवा पुस्तके पडताळणीसाठी सादर  करताना पुढील एक वर्षात सेवानिवृत्त होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन/लोकायुक्तांकडील प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत, सेवा पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करतांना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोषमधील वेतनिका प्रणालित FFO Login करावे. DDO Login करण्यासाठी BDS साठी वापरण्यात येत असलेले Username and password वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहेत त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकून submit करावे, म्हणजे लेखाधिकारी,वेतन पडताळणी पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार होईल. त्या पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी  पथकाकडे सादर करावीत, असे सहसंचालक लेखा व कोषागारे,औरंगाबाद यांनी पत्राव्दारे कळविले आहे.

Wednesday, 16 November 2016

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणूका निर्भयपणे व पारदर्शकपणे व्हाव्यात - राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया




          उस्मानाबाद,दि.16:-  कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता  मतदारांना त्यांच्या इच्छेप्रमाणे मतदान करता यावे याची व्यवस्था करुन  निवडणूका निर्भय, मुक्त  व पारदर्शक होण्याकरिता  लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणे  प्रशासनाने  दक्षता घ्यावी , अशा स्पष्ट सूचना  नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या  पूर्वतयारीची विभागीय आढावा बैठकीत राज्याचे राज्‍य निवडणूक आयुक्त श्री. ज.स.सहारिया यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय  इमारत , उस्मानाबाद   येथे दिल्या .
          या निवडणूक पूर्व आढावा बैठकीस राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने,  राज्याचे अपर पोलीस महासंचालक एस.पी. यादव, औरंगाबाद विभागीय आयुक्त   श्री. उमाकांत दांगट, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद तसेच उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे  , परभणीचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल , हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी व बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम  तर उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख  , जालन्याचे पोलीस अधीक्षक  श्रीमती ज्योतीप्रिया सिंग, परभणीच्या पोलीस अधीक्षक  नियती ठक्कर , हिंगोलीचे पोलीस अधीक्षक  अशोक मोराळे, बीडचे पोलीस अधीक्षक  अनिल पारस्कर,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , निवडणूक निर्णय अधिकारी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
           श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चार टप्प्यात या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर, 2016 रोजी मतदान होत आहे. त्यांच्या तयारीसंदर्भात विभागीय पातळीवर आढावा बैठका घेतल्या जात आहेत. यात प्रामुख्याने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीसंदर्भातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कायदा व सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा  या बैठकीत घेण्यात आला.
          मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणावर मतदार जनजागृतीबाबत मोहीम हाती घेण्याचे आदेशही संबंधिताना देण्यात आले आहेत. मतदार जागृती प्रामुख्याने मतदानाचे प्रमाण वाढविण्याबरोबरच वस्तू अथवा पैशाच्या स्वरूपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारू वाटपावर नजर ठेवणे; तसेच बहुसदस्यीय पद्धतीनुसार आवश्यक तेवढी मते देणे याबाबतदेखील मतदार जागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
          सर्व उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासण्याचे अधिकार निवडणूक यंत्रणेला आहेत. उमेदवारांनी आपला खर्च मतमोजणीच्या 30 दिवसानंतर  सादर करावा. तसे न करणाऱ्या उमेदवारांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच  प्रत्येक  पक्षाने सुध्दा  उमेदवारनिहाय खर्च मतमोजणी झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत  सादर करावा, तसे  न करणाऱ्या  पक्षाची  मान्यता  रद्द करण्यात येईल.
          प्रारंभी औरंगाबाद विभागाचे आयुक्त श्री. उमाकांत दांगट यांनी   विभागातील निवडणुकीबाबत प्रास्ताविकात सविस्तरपणे  माहिती विशद  करुन  प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून मनी पॉवर रोखण्यासाठी  प्रत्येक जिल्हयाने पथके नेमून कार्यवाही सुरु केली आहे . उस्मानाबाद जिल्ह्यात  8 कोटींपेक्षा जास्तीची रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी दिली.
          राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक श्री. एस.पी. यादव  यांनी संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांना मार्गदर्शक सूचना करुन  निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी  सतर्क राहावे अशा सूचना दिल्या.
          यावेळी राज्याचे सचिव शेखर चन्ने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की , पोलींग चिठ्ठी वाटपाचे काम लवकरात लवकर करावे, पेड न्यूजबाबत जिल्हास्तरीय समिती गठीत करुन योग्‍य ती कार्यवाही करावी , पोस्टल बॅलेट पेपर सर्वांना मिळावेत तसेच राजकीय पक्षांना  समान तत्वावर प्रचारासाठी  मैदाने उपलब्ध करुन द्यावेत ,
          यावेळी उस्मानाबाद , जालना , परभणी , बीड व हिंगोली  जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी आपआपल्या  जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा यावेळी सादर केला. तसेच पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्थाबाबतची माहिती दिली. या बैठकीस  अप्पर जिल्हाधिकारी श्री.अविनाश पाठक , निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुनिल यादव , उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री. प्रभोदय मुळे , मुख्याधिकारी  श्री. राजीव बुबणे , सर्व नगरपरिषदांचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  यावेळी उपस्थित होते .

या बैठकीचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले .**** 

प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2016 साठी पिक विम्याची हप्ता भरण्याची अंतिम मुदत जाहीर


     उस्मानाबाद,दि.16:- प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2016 साठी पिक विम्याची हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2016 ही आहे. तर उन्हाळी हंगामातील उन्हाळी भुईमूग या पिकांचा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दिनांक 31 मार्च 2017 ही आहे. पिक विमा योजना ही कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ऐच्छिक आहे. पिक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2016 आहे.
            पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री. शिरीष जमदाडे यांनी केले आहे.
     रब्बी हंगाम 2016 - 17 करीता खाली दर्शविल्याप्रमाणे उंबरठा उत्पादनाच्या पातळीपर्यंत प्रति हेक्टरी दिलेल्या विमा संरक्षित रकमेवर दिलेल्या पिक विमा दराप्रमाणे विमा हप्ता भरावयाचा आहे, त्याचा तपशिल खालीलप्रमाणे:-

गहू (बागायत) विमा संरक्षित रक्कम 3 हजार 300 रुपये, विमा हप्ता दर 1.50 टक्के विमा हप्ता रक्कम रु.(शेतकरी हिस्सा).495/-, गहू (जिरायत) विमा संरक्षित रक्कम 30हजार रुपये विमा हप्ता दर 66 टक्के, विमा हप्ता रक्कम रु.(शेतकरी हिस्सा) 198/-,ज्वारी (बागायत) विमा संरक्षित रक्कम 26हजार , विमा हप्ता दर 1.50 टक्के विमा हप्ता रक्कम रु. (शेतकरी हिस्सा)  390/-,ज्वारी (जिरायत) विमा संरक्षित रक्कम 24 हजार, विमा हप्ता दर 1.50 टक्के विमा हप्ता रक्कम रु.(शेतकरी हिस्सा)  360/-,हरभरा विमा संरक्षित रक्कम 24 हजार,विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रु. (शेतकरी हिस्सा) 330/-, करडई, विमा संरक्षित रक्कम 22 हजार, विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रु.(शेतकरी हिस्सा) 330/-सूर्यफूल विमा संरक्षित रक्कम 22हजार, विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रु.(शेतकरी हिस्सा)  330/-,रब्बी कांदा   विमा संरक्षित रक्कम 3 हजार 600, विमा हप्ता दर 5.0 टक्के, विमा हप्ता रक्कम रुपये(शेतकरी हिस्सा)  3 हजार /-उन्हाळी भुईमूग  विमा संरक्षित रक्कम 60हजार ,  विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रुपये(शेतकरी हिस्सा) 540/-  असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिरीष जमदाडे यांनी कळविले आहे .

उस्मानाबाद जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन


उस्मानाबाद,दि.16 :- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद आयोजित पुणे, बारामती, कोल्हापूर येथील खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक/कंपनी यांच्याकडील 650 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छूक पुरुष व स्त्री उमेदवारांच्या मुलाखती सोमवार, दि.21 नोंव्हेंबर 2016  रोजी  घेऊन निवड करण्यात येणार आहे.
उद्योजक पद, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा पुढील प्रमाणे राहतील- एम.पी.टी. ए. एज्युकेशन लि, एरंडवणे पुणे अंतर्गत वॉल्वो इंडिया लि. लोणी पुणे येथे, जॉब ट्रेनी 100 पुरुष, आय.टी. आय. कोणताही ट्रेड 18 ते 26 वयोमर्यादा राहील, मेनन ॲन्ड मेनन लि. कोल्हापूर येथे जॉब ट्रेनी 100 पुरुष आय.टी.आय. कोणताही ट्रेड 18 ते 26 वयोमर्यादा राहील, यू.एम.डब्लू. डाऊनसिंग लि.तळेगाव जॉब ट्रेनी 15 पुरुष आय.टी.आय. वेल्डर 18 ते 26 वयोमर्यादा राहील, निप्रो प्रा. लि. श्रीवाल येथे जॉब ट्रेनी 100 पुरुष 12वी/ आय.टी.आय. कोणताही  18 ते 26 वयोमर्यादा राहील.निओसम प्रा.लि. सानसवाडी जॉब ट्रेनी  50 पुरुष, 10 वी  व  12 वी किंवा आय. टी. आय.पास, 18 ते 26 वयोमर्यादा, भारत फॉर्ज, मुंडवा रांजणगाव जॉब ट्रेनी 10 पुरुष, आय.टी.आय.-फिटर, टर्नर, इलेक्ट्रीशिअन, 18 ते 26 वयोमर्यादा, जबिल सर्कीट प्रा. लि. रांजणगाव जॉब ट्रेनी 50 महिला, 10 वी पास, 18 ते 26 वयोमर्यादा, पियाजो व्हेईकल्स प्रा. लि. बारामती, पियाजो/व्हेस्पा प्रा.लि., बारामती  जि. पुणे आय. टी. आय. जॉब ट्रेनी 325 पुरुष ,10 वी पास व आय. टी. आय.  फिटर, टर्नर, मशिनिष्ट, शिट मेटल,  मोटर/डिझेल/ट्रॅक्टर  मेकॅनिक ट्रेड पास  व 8 वी व आय. टी. आय.  वेल्डर/पेंटर  पास ,  वयोमर्यादा 18 ते 36 अशा अटी  व वयोमर्यादा असतील.
 वेतन सुरुवातीस किमान  8 हजार  ते  10  हजार रुपये दरमहा , शैक्षणिक  योग्यतेनुसार आणि सुविधा, कॅन्टीन, निवास ट्रान्सपोर्टेशन इत्यादी सुविधांबाबत संबंधित कंपनीच्या नियमानुसार, प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी कंपनीचे अधिकारी सविस्तर माहिती व मार्गदर्शन करतील,तसेच आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक/प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), अनुभव असल्यास प्रमाणपत्र, एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि 2 पासपोर्ट साईझ  फोटो  आदी  सर्व  कागदपत्रांच्या  झेरॉक्स कॉपींसह प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने हजर राहून खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधीचा जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक श्री. रमेश पवार यांनी केले आहे.

संपर्कासाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक  (02472- 222236 ) असा आहे.  या मेळाव्यात सहभाग नोंदविण्याकरिता उमेदवारांना या कार्यालयाकडील जॉब सिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) असणे बंधनकारक आहे.एम्प्लॉयमेंट नोंदणी नसल्यास उमेदवार www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर नवीन नाव नोंदणी करुन तात्काळ प्रमाणपत्र मिळवू शकतात.

जागतिक मधुमेह सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


उस्मानाबाद,दि.16:- मधुमेह या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजाराची भयानकता समाजात अधिक दृढ होत आहे. अशा परिस्थितीत जागतिक मधुमेह सप्ताह दि. 14 ते  20 नोव्हेंबर 2016 या कालावधीत राबविला जात असून त्यानिमित्ताने आरोग्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जीवनशैली बदलू या,  मधुमेहास रोखु या असा संदेश दिला आहे .
मधुमेहग्रस्तांनी मद्यपान, धुम्रपान, कोणत्याही  स्वरुपातील तंबाखुजन्य पदार्थ सेवन करु नयेत, हलका व्यायाम  करावा आदी बाबतीत खबरदारी  घ्यावी. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत दिनांक 14 नोव्हेंबर 2016 रोजी जागतिक मधुमेह दिन  व  सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. एकनाथ माले यांच्या हास्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते .
 या उद्घाटनप्रसंगी  निवासी  वैद्यकीय अधिकारी  डॉ. सोपाल आनंद, मनोविकार  तज्ञ  डॉ. महेश  कानडे, डॉ. देशपांडे तसेच सर्व जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जागतिक मधुमेह सप्ताहानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, यामध्ये प्रामुख्याने मधुमेहाकरिता  प्रतिबंधात्मक  तपासणी, आरोग्य शिबिरे,महाविद्यालयांमध्ये निरोगी आरोग्याकरीता  उपयोगी  जीवनशैली  या विषयांवरील व्याख्याने, रुग्णालय व परिसर तंबाखू, गुटखामुक्त करण्याकरीता जीवनशैली या विषयावरील व्याख्यान, विशेष सर्वेक्षण मोहीम आणि  या सप्ताहाच्या  कालावधीमध्ये  मधुमेह  तपासणीकरीता जिल्हा रुग्णालय येथे रुम नं. 7  मध्ये विशेष तपासणी  कक्ष इत्यादी कार्यक्रमांचे  आयोजन केले आहे.
जिल्हयातील जास्तीत नागरीकांनी या शिबिरामध्ये सामिल होऊन, जागरुक नागरिक या नात्याने प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीकडे पाऊल टाकावे. तसेच 30 वर्षांवरील सर्व व्यक्तींनी व गरोदर मातांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व  जिल्हा रुग्णालय येथे जावून मधुमेह व उच्च रक्तदाबाबत मोफत तपासणी करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले यांनी केले आहे.    

Tuesday, 15 November 2016

नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारी आढाव्याची दि.16 नोव्हेंबर रोजी बैठक


      राज्य निवडणूक आयुक्त घेणार कामकाजाचा आढावा
उस्मानाबाद,दि.15:- नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका 2016-17 अंतर्गत पहिल्या टप्यातील दि.27 नोव्हेंबर 2016 रोजी होणाऱ्या मतदानाच्या  निवडणुकीच्या तयारीची आढावा  बैठक दि.16 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 4:00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह,प्रशासकीय इमारत,उस्मानाबाद येथे राज्य निवडणूक आयुक्त,महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे,असे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी कळविले आहे.
 या  निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीस,उस्मानाबाद,जालना,परभणी,हिंगोली व बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी, पोलीस अ‍धीक्षक मुख्याधिकारी व निवडणूक निर्णयअधिकारी,मुख्याधिकारी व  निवडणूक निरीक्षक,  मुख्यनिवडणूक निरीक्षक उपस्थित राहाणार आहेत. या बैठकीस संबंधित अधिकाऱ्यांनी निवडणूक अनुषंगिक अद्ययावत माहितीसह उपस्थित राहावे,असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी संबंधितांना दिले आहेत.

या बैठकीनंतर  लगेचच  याच  ठिकाणी पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व व दैनिक / साप्ताहिके तसेच वृत्तचित्रवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी,असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.