Wednesday, 16 November 2016

जागतिक मधुमेह सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


उस्मानाबाद,दि.16:- मधुमेह या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजाराची भयानकता समाजात अधिक दृढ होत आहे. अशा परिस्थितीत जागतिक मधुमेह सप्ताह दि. 14 ते  20 नोव्हेंबर 2016 या कालावधीत राबविला जात असून त्यानिमित्ताने आरोग्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जीवनशैली बदलू या,  मधुमेहास रोखु या असा संदेश दिला आहे .
मधुमेहग्रस्तांनी मद्यपान, धुम्रपान, कोणत्याही  स्वरुपातील तंबाखुजन्य पदार्थ सेवन करु नयेत, हलका व्यायाम  करावा आदी बाबतीत खबरदारी  घ्यावी. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत दिनांक 14 नोव्हेंबर 2016 रोजी जागतिक मधुमेह दिन  व  सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. एकनाथ माले यांच्या हास्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते .
 या उद्घाटनप्रसंगी  निवासी  वैद्यकीय अधिकारी  डॉ. सोपाल आनंद, मनोविकार  तज्ञ  डॉ. महेश  कानडे, डॉ. देशपांडे तसेच सर्व जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जागतिक मधुमेह सप्ताहानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, यामध्ये प्रामुख्याने मधुमेहाकरिता  प्रतिबंधात्मक  तपासणी, आरोग्य शिबिरे,महाविद्यालयांमध्ये निरोगी आरोग्याकरीता  उपयोगी  जीवनशैली  या विषयांवरील व्याख्याने, रुग्णालय व परिसर तंबाखू, गुटखामुक्त करण्याकरीता जीवनशैली या विषयावरील व्याख्यान, विशेष सर्वेक्षण मोहीम आणि  या सप्ताहाच्या  कालावधीमध्ये  मधुमेह  तपासणीकरीता जिल्हा रुग्णालय येथे रुम नं. 7  मध्ये विशेष तपासणी  कक्ष इत्यादी कार्यक्रमांचे  आयोजन केले आहे.
जिल्हयातील जास्तीत नागरीकांनी या शिबिरामध्ये सामिल होऊन, जागरुक नागरिक या नात्याने प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीकडे पाऊल टाकावे. तसेच 30 वर्षांवरील सर्व व्यक्तींनी व गरोदर मातांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व  जिल्हा रुग्णालय येथे जावून मधुमेह व उच्च रक्तदाबाबत मोफत तपासणी करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले यांनी केले आहे.