Wednesday, 16 November 2016

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणूका निर्भयपणे व पारदर्शकपणे व्हाव्यात - राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया




          उस्मानाबाद,दि.16:-  कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता  मतदारांना त्यांच्या इच्छेप्रमाणे मतदान करता यावे याची व्यवस्था करुन  निवडणूका निर्भय, मुक्त  व पारदर्शक होण्याकरिता  लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणे  प्रशासनाने  दक्षता घ्यावी , अशा स्पष्ट सूचना  नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या  पूर्वतयारीची विभागीय आढावा बैठकीत राज्याचे राज्‍य निवडणूक आयुक्त श्री. ज.स.सहारिया यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय  इमारत , उस्मानाबाद   येथे दिल्या .
          या निवडणूक पूर्व आढावा बैठकीस राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने,  राज्याचे अपर पोलीस महासंचालक एस.पी. यादव, औरंगाबाद विभागीय आयुक्त   श्री. उमाकांत दांगट, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद तसेच उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे  , परभणीचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल , हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी व बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम  तर उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख  , जालन्याचे पोलीस अधीक्षक  श्रीमती ज्योतीप्रिया सिंग, परभणीच्या पोलीस अधीक्षक  नियती ठक्कर , हिंगोलीचे पोलीस अधीक्षक  अशोक मोराळे, बीडचे पोलीस अधीक्षक  अनिल पारस्कर,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , निवडणूक निर्णय अधिकारी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
           श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चार टप्प्यात या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर, 2016 रोजी मतदान होत आहे. त्यांच्या तयारीसंदर्भात विभागीय पातळीवर आढावा बैठका घेतल्या जात आहेत. यात प्रामुख्याने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीसंदर्भातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कायदा व सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा  या बैठकीत घेण्यात आला.
          मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणावर मतदार जनजागृतीबाबत मोहीम हाती घेण्याचे आदेशही संबंधिताना देण्यात आले आहेत. मतदार जागृती प्रामुख्याने मतदानाचे प्रमाण वाढविण्याबरोबरच वस्तू अथवा पैशाच्या स्वरूपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारू वाटपावर नजर ठेवणे; तसेच बहुसदस्यीय पद्धतीनुसार आवश्यक तेवढी मते देणे याबाबतदेखील मतदार जागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
          सर्व उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासण्याचे अधिकार निवडणूक यंत्रणेला आहेत. उमेदवारांनी आपला खर्च मतमोजणीच्या 30 दिवसानंतर  सादर करावा. तसे न करणाऱ्या उमेदवारांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच  प्रत्येक  पक्षाने सुध्दा  उमेदवारनिहाय खर्च मतमोजणी झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत  सादर करावा, तसे  न करणाऱ्या  पक्षाची  मान्यता  रद्द करण्यात येईल.
          प्रारंभी औरंगाबाद विभागाचे आयुक्त श्री. उमाकांत दांगट यांनी   विभागातील निवडणुकीबाबत प्रास्ताविकात सविस्तरपणे  माहिती विशद  करुन  प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून मनी पॉवर रोखण्यासाठी  प्रत्येक जिल्हयाने पथके नेमून कार्यवाही सुरु केली आहे . उस्मानाबाद जिल्ह्यात  8 कोटींपेक्षा जास्तीची रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी दिली.
          राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक श्री. एस.पी. यादव  यांनी संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांना मार्गदर्शक सूचना करुन  निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी  सतर्क राहावे अशा सूचना दिल्या.
          यावेळी राज्याचे सचिव शेखर चन्ने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की , पोलींग चिठ्ठी वाटपाचे काम लवकरात लवकर करावे, पेड न्यूजबाबत जिल्हास्तरीय समिती गठीत करुन योग्‍य ती कार्यवाही करावी , पोस्टल बॅलेट पेपर सर्वांना मिळावेत तसेच राजकीय पक्षांना  समान तत्वावर प्रचारासाठी  मैदाने उपलब्ध करुन द्यावेत ,
          यावेळी उस्मानाबाद , जालना , परभणी , बीड व हिंगोली  जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी आपआपल्या  जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा यावेळी सादर केला. तसेच पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्थाबाबतची माहिती दिली. या बैठकीस  अप्पर जिल्हाधिकारी श्री.अविनाश पाठक , निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुनिल यादव , उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री. प्रभोदय मुळे , मुख्याधिकारी  श्री. राजीव बुबणे , सर्व नगरपरिषदांचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  यावेळी उपस्थित होते .

या बैठकीचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले .****