Friday, 21 August 2026

पीयुसी साठी सुधारीत दरवाढ

पीयुसी साठी सुधारीत दरवाढ धाराशिव,दि.२१ ऑगस्ट (जिमाका ) महाराष्ट्र शासनाच्यादिनांक 17 जुलै 2026 रोजीच्या पत्रानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाच्यानिर्देशानुसार राज्यतील मोटार वाहनांच्या वायुप्रदुषण नियंत्रण तपासणी प्रमाणपत्राच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली. दुचाकी वाहनांसाठी नवीन सुधारीत दर 60 रुपये, पेट्रोलवरील तीनचाकी वाहनांसाठी 120 रुपये, पेट्रोल, सीएनजी, एलपीजी वर चालणारी वाहने यासाठी 150 रुपये,डिझेलवर चालणारी वाहने यासाठी 180 रुपये पीयुसी साठी असे नवीन सुधारीत दर असून या दरवाढीची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशीक परिवहन अधीकारी यांनी केले आहे. 000000

महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्याची संधी

महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्याची संधी धाराशिव,दि.२१ ऑगस्ट (जिमाका ) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत प्रकल्प गावांमध्ये 'गावस्तरावरील कृषी अवजारे बँक' स्थापन करण्यासाठी नोंदणीकृत महिला शेतकरी गटांना यंत्रसामग्री खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'एक गाव, एक कृषी अवजारे बँक' या संकल्पनेनुसार तालुकानिहाय लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. प्रकल्प गावातील एमएसआरएलएम (उमेद) व माविम पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघ या घटकासाठी पात्र आहेत. एका गावातून एकापेक्षा अधिक गटांचे अर्ज प्राप्त झाल्यास निवड प्रक्रिया ऑनलाइन लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. यापूर्वी ऑनलाइन लॉटरीद्वारे 03 महिला गटांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित पात्र गावस्तरीय कृषी अवजारे बँक घटकासाठी एफपीओ-डीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज दि.३१ ऑगस्टपर्यंत करता येणार आहेत. प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण केलेल्या प्रकल्प किमतीच्या ६० टक्के अनुदान देय राहणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला शेतकरी केवळ शेतीपुरत्या मर्यादित राहता शेतीपूरक व्यवसाय, यंत्रसामग्री व्यवस्थापन व सेवा क्षेत्रातही पुढे याव्यात, हा उद्देश आहे. कृषी अवजारे बँके मुळे महिला गटांना उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होण्यासोबतच गावातील शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रसामग्री वेळेवर भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत लहान किंवा मोठा ट्रॅक्टर तसेच किमान तीन कृषी अवजारे घेता येईल, योजनेची अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी श्रीराम हेलाले, (मो नं.8275179717) प्रकल्प विशेषज्ञ कृषि व्यवसाय,धाराशिव यांना संपर्क साधावा . या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिला बचत गटांनी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) विष्णु मिसाळ यांनी केले आहे. 00000

‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा संदेश

‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा संदेश पाणी व माती संवर्धनासाठी धाराशिवकरांची एकजूट ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग धाराशिव,दि.२१ ऑगस्ट (जिमाका) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात आला.पाणी आणि माती संवर्धनाची चळवळ केवळ सरकारी उपक्रम न राहता ती जनमानसाची चळवळ व्हावी, या उद्देशाने धाराशिव येथे ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले.सकाळच्या प्रसन्न वातावरणात नागरिक, विद्यार्थी,अधिकारी- कर्मचारी, खेळाडू तसेच विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने जलसंधारणाच्या संदेशाला लोकसहभागाची जोड मिळाली. धाराशिव येथे आज शुक्रवार,२१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता तुळजाभवानी स्टेडियम येथून वॉकॅथॉनला उत्साहात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे,जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचे सुहास चव्हाण, जलसंधारण विभागाच्या उपविभागीय अभियंता सायली जाधव,हर्षदा पाटील,जीवन काकडे,शाखा अभियंता ज्योती जाधव,कांचन मलजे आणि बलराम पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सहभागी नागरिकांना मृदा व जलसंधारणाची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकॅथॉनला सुरुवात करण्यात आली. श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमपासून सुरू झालेली वॉकॅथॉन छत्रपती शिवाजी महाराज चौक,सेंट्रल बिल्डिंग,रामनगर, आनंदनगर,समतानगर मार्गे पुन्हा श्री तुळजाभवानी स्टेडियम येथे पोहोचली. या मार्गावर जलसंधारण,पाणी बचत आणि माती संवर्धनाचा संदेश देत सहभागी नागरिकांनी उत्साहाने वॉकॅथॉन पूर्ण केली.नागरिकांसह शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थी,विविध शासकीय विभागांचे अधिकारी- कर्मचारी, संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले की,पाण्याचे संवर्धन,भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘पाणी अडवा,पाणी जिरवा’ हा मूलमंत्र आहे.या माध्यमातून जलसंधारणाची कामे लोकसहभागातून व्यापक स्वरूपात राबविणे आवश्यक आहे.पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे तसेच जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केल्याने भूजलपातळी वाढण्यास आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास मदत होते.पाण्याचा वापर प्रत्येकाने गरजेनुसार आणि काटकसरीने करणे ही काळाची गरज आहे.२६ जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या पाणी संवर्धनाच्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी केले. प्रास्ताविकात जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी जलसंधारण अभियानांतर्गत विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.ग्रामीण भागात जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करणे,लोकसहभाग वाढविणे आणि पाण्याची बचत करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार’ या उपक्रमामुळे दीर्घकालीन फायदे झाल्याचेही श्री.महामुनी यांनी सांगितले. प्रथम दहा सहभागींचा गौरव ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधील प्रथम दहा सहभागी विजेत्यांना रोख बक्षीस,प्रमाणपत्र,पदक आणि सन्मानचिन्ह देऊन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.शौर्य उमेद पायल,श्रुती पाटील, रणवीर खंडाळकर,प्रगती वाघमारे, क्रांती घावटे,सुजाता लोखंडे,सानिया फुलारी, अनुजा मस्के,हनुमंत माने आणि राकेश जानराव यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले,तर आभार वैशाली महामुनी यांनी मानले. पाणी आणि मातीचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,हा संदेश या वॉकॅथॉनच्या माध्यमातून धाराशिवकरांनी प्रत्यक्ष सहभागातून अधोरेखित केला. *******

Thursday, 20 August 2026

संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती धाराशिव दि.२१ ऑगस्ट (जिमाका) संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष १०९८च्या वतीने जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच बालहक्क,बालविवाह प्रतिबंध आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ याबाबत माहिती देण्यात आली. प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली १ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा उपक्रम घेण्यात आला. धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंबळी, सरस्वती माध्यमिक विद्यालय बेंबळी,प्रभाकर बोंदर विद्यालय बेंबळी,जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कसबे तडवळा,सनराईस इंग्लिश स्कूल येडशी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येडशी,जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा येडशी,तसेच नगर परिषद शाळा क्रमांक २३ धाराशिव,मराठी कन्या शाळा धाराशिव आणि पद्मसिंह पाटील विद्यामंदिर धाराशिव येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. उपक्रमादरम्यान बालकांचे हक्क, त्यांच्या समस्या आणि त्यांच्यासमोर निर्माण होणाऱ्या विविध अडचणी याबाबत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.‘बेटी बचाव,बेटी पढाव’ तसेच बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.संकटात सापडलेल्या किंवा कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असलेल्या बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ उपलब्ध असल्याचे सांगून,गरज भासल्यास या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. बालकांसाठी शासनाच्या विविध योजनांचीही यावेळी माहिती देण्यात आली.चाईल्ड हेल्पलाईन कक्षाच्या समुपदेशक वंदना कांबळे,सुपरवायझर अमर भोसले व पल्लवी पाटील तसेच केस वर्कर अभयसिंह काळे यांनी विद्यार्थ्यांना चाईल्ड हेल्पलाईन कक्ष १०९८च्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. बालकांनी भीती न बाळगता आपल्या समस्या मांडाव्यात,त्यांचे हक्क आणि सुरक्षिततेबाबत जागरूक राहावे,असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमांना संबंधित शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बालकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ मदत उपलब्ध करून देणे नव्हे,तर त्यांना योग्य वेळी बोलते करणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हा या जनजागृती उपक्रमाचा संदेश ठरला. ******

धाराशिव येथे २५ ऑगस्टला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

धाराशिव येथे २५ ऑगस्टला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद धाराशिव दि.२१ ऑगस्ट (जिमाका) जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६चे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सह आयुक्त (उद्योग),छत्रपती संभाजीनगर विभाग,स्वप्नील राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रायगड उत्सव हॉल,डी-मार्टसमोर, धाराशिव येथे होणार आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे,तसेच जिल्ह्याला विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाला चालना देणे,हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्रांबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.त्याचबरोबर गुंतवणुकीच्या संधी,क्षमता असलेल्या इतर क्षेत्रांतील गुंतवणूक व व्यवसायाच्या संधी याबाबत चर्चा होणार आहे. सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम तसेच उद्योजकांचे अनुभव कथन यांचाही परिषदेत समावेश करण्यात आला आहे. या परिषदेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,मैत्री कक्ष,उद्योग आयुक्तालय, मुंबई,जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया,उद्योजक संघटना,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,मिटकॉन, कौशल्य विकास व रोजगार विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण कार्यालय,धाराशिव आदी कार्यालयातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.हे अधिकारी परिषदेस उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यात नव्याने स्थापित होणाऱ्या उद्योग घटकांसोबत या परिषदेत सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या या परिषदेस मोठ्या संख्येने उद्योजकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन सहायक आयुक्त (उद्योग व सेवा),जिल्हा उद्योग केंद्र, धाराशिव यांनी केले आहे. *******

ईद-ए-मिलादनिमित्त २६ ऑगस्टला जिल्ह्यात मद्यविक्री बंद

ईद-ए-मिलादनिमित्त २६ ऑगस्टला जिल्ह्यात मद्यविक्री बंद धाराशिव दि.२१ ऑगस्ट (जिमाका) जिल्ह्यात दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी ईद-ए-मिलाद (मोहंम्मद पैगंबर जयंती) -२०२६ उत्सव/सण साजरा होणार आहे. हा उत्सव शांततेत पार पडावा तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी, यासाठी त्या दिवशी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम १४२ (१) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हा आदेश जारी करण्यात आला आहे.त्यानुसार दि.२६ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. ईद-ए-मिलाद (मोहंम्मद पैगंबर जयंती) -२०२६ उत्सव/सण शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान,या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा,१९४९ व त्याअंतर्गत असलेल्या नियमांतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.तसेच संबंधित अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल,याची संबंधितांनी नोंद घ्यावी,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. *******

दुष्काळी धाराशिवच्या जलसंधारणाला जलयुक्त शिवार २.०’चा आधार ६,६९२ कामे पूर्ण ; ३,९१६.८० स.घ.मी.अतिरिक्त पाणीसाठा, ९३८.९० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

दुष्काळी धाराशिवच्या जलसंधारणाला जलयुक्त शिवार २.०’चा आधार ६,६९२ कामे पूर्ण ; ३,९१६.८० स.घ.मी.अतिरिक्त पाणीसाठा, ९३८.९० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ धाराशिव,दि.२० ऑगस्ट (जिमाका) दुष्काळ,कमी पर्जन्यमान आणि पावसाच्या लहरीपणामुळे पाण्याचे आव्हान कायम असलेल्या धाराशिव जिल्ह्यात जलसंधारणाची कामे म्हणजे केवळ मातीचे बांध,नाले आणि चर नव्हेच तर शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी साठवून ठेवलेली पाण्याची आशा आहे.पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून तो शेतीसाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी उपयोगात आणण्याच्या या प्रयत्नांना ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’मुळे अधिक व्यापक दिशा मिळाली आहे.येत्या २१ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या जलसंधारण दिनाच्या निमित्ताने धाराशिवमध्ये या अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांकडे पाहिले,तर दुष्काळी भूमीत पाणी अडविण्याची आणि जमिनीत मुरविण्याची एक मोठी लोकचळवळ आकार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत जिल्ह्यात एकूण १६३ गावांची निवड करण्यात आली आहे.या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद विभाग,वन विभाग,वरिष्ठ भूवैज्ञानिक,जिल्हा भूजल आणि सर्वेक्षण विकास यंत्रणा आणि मृद व जलसंधारण विभाग कार्यरत आहेत.विविध विभागांच्या समन्वयातून जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात आली असून,गावागावांत स्थानिक परिस्थितीचा विचार करून पाणी अडविणे,ते जमिनीत मुरविणे आणि उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी अधिकाधिक उपयोग करण्यावर भर देण्यात आला आहे. ६ हजार ९१९ कामांचा आराखडा : ६ हजार ६९२ कामे पूर्ण जिल्ह्यात विशेष निधी अंतर्गत १ हजार ३७४,तर अभिसरण अंतर्गत ५ अंतर्गत ५४५,अशी एकूण ६ हजार ९१९ कामे मंजूर करण्यात आली आहेत.या कामांसाठी ७६ कोटी १४ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.आज अखेर ६ हजार ६९२ कामे पूर्ण झाली आहेत. ही आकडेवारी केवळ कागदावरील कामांची संख्या नाही.प्रत्येक पूर्ण झालेले काम म्हणजे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडविण्याची एक संधी,जमिनीला ओलावा देणारा एक प्रयत्न आणि शेतकऱ्याच्या पिकाला आधार देणारा एक हात आहे. ३ हजार ९१६.८० स.घ.मी. अतिरिक्त पाणीसाठा जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत पूर्ण झालेल्या विविध जलसंधारणाच्या कामांमुळे जिल्ह्यात सुमारे ३ हजार ९१६.८० स.घ.मी.अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे.त्याचबरोबर ९३८.९० हेक्टर क्षेत्रवर सिंचन होत आहे.दुष्काळी परिस्थितीचा सातत्याने सामना करणाऱ्या धाराशिवसारख्या जिल्ह्यासाठी ही बाब विशेष महत्त्वाची आहे.पावसाळ्यात काही तासांत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते.हेच पाणी जर गावाच्या शिवारात अडवून ठेवले,जमिनीत मुरवले आणि त्याचा साठा निर्माण केला,तर त्याचा परिणाम केवळ पावसाळ्यापुरता मर्यादित राहत नाही.जमिनीतील ओलावा टिकतो,विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीला आधार मिळतो,सिंचनाची क्षमता वाढते आणि पिकांना पाण्याची उपलब्धता सुधारते.त्यामुळे जलसंधारणाची प्रत्येक रचना ही भविष्यातील पाण्याची शाश्वती निर्माण करणारी गुंतवणूक ठरते. शिवारात विविध जलसंधारण रचना ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत विभागांकडून सिमेंट नाला बांधणे, कंपार्टमेंट बंडिंग,सलग समतल चर (CCT),खोल सलग समतल चर (Deep CCT),गेटेड बंधारे,गॅबियन बंधारे,रिचार्ज शाफ्ट आणि नाला खोलीकरण अशा विविध प्रकारची कामे करण्यात येत आहेत. या कामांचा उद्देश केवळ पाणी साठविणे एवढाच नाही.पावसाचे पाणी शक्य तितके शिवारात अडवून ते जमिनीत मुरवणे, मातीची धूप रोखणे,भूजल पुनर्भरण वाढविणे आणि शेतीला उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढविणे,हा या कामांचा व्यापक उद्देश आहे. भूजल पातळी वाढली तर शेतीला आधार जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे.पावसाची अनिश्चितता ही शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या आहे.अशा परिस्थितीत पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याला विशेष महत्त्व प्राप्त होते.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून होणाऱ्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पुनर्भरणाला चालना मिळत आहे.भूजल पातळी वाढली,तर विहिरींमध्ये अधिक काळ पाणी टिकण्यास मदत होते.सिंचनासाठी उपलब्धता वाढते.खरीपाबरोबरच रब्बी हंगामातील शेतीची शक्यता वाढते.पिकांना महत्त्वाच्या टप्प्यावर पाणी मिळाल्याने उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते.परिणामी शेतकऱ्याच्या उत्पन्नाला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही त्याचा सकारात्मक हातभार लागतो. ‘पाणी अडवा,पाणी जिरवा’पासून शाश्वत जलसुरक्षेपर्यंत जलसंधारण ही केवळ एका विभागाची जबाबदारी नाही.पाणी हा शेती,गाव आणि ग्रामीण जीवनाचा आधार आहे.त्याच्या संवर्धनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आणि स्थानिक सहभाग आवश्यक आहे. ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’मध्ये कृषी विभाग,जिल्हा परिषद विभाग,वन विभाग,जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा तसेच मृद व जलसंधारण विभाग एकत्रितपणे काम करत आहेत.या समन्वयामुळे जलसंधारणाच्या कामांना व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात एकूण विशेष निधी व अभिसरणअंतर्गत ६ हजार ९१९ एकूण मंजूर कामांपैकी ६हजार ६९२ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामधून निर्माण झालेला ३ हजार ९१६.८० स.घ.मी.अतिरिक्त पाणीसाठा आणि ९३८.९० हेक्टर सिंचनाचा लाभ हे या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करतात. मात्र,यापलीकडे या अभियानाचे खरे यश गावातील विहिरींमध्ये टिकणाऱ्या पाण्यात,शेतात उभ्या राहणाऱ्या पिकात आणि पावसाकडे आशेने पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. दुष्काळी भूमीत पाण्याची आशा धाराशिवची ओळख दुष्काळी जिल्हा म्हणून झाली असली,तरी जलसंधारणाच्या माध्यमातून या परिस्थितीत बदल घडविण्याची क्षमता जिल्ह्यात आहे.पाऊस कमी असला तरी उपलब्ध पावसाचा प्रत्येक थेंब जपणे,तो शिवारात अडवणे आणि जमिनीत मुरवणे,हा त्यासाठीचा व्यवहार्य मार्ग आहे.आज जलसंधारणाच्या कामांकडे केवळ विकासकाम म्हणून न पाहता शेतीच्या भवितव्याशी आणि ग्रामीण जीवनाच्या सुरक्षिततेशी जोडलेले अभियान म्हणून पाहण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० त्याच दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. जलसंधारण दिनाच्या निमित्ताने संदेश एकच—पाऊस किती पडतो यापेक्षा पडलेला पाऊस किती अडवतो आणि किती जमिनीत मुरवतो,हे महत्त्वाचे. दुष्काळी धाराशिवच्या शिवारात जलसंधारणाच्या कामातून निर्माण होणारा प्रत्येक थेंब भविष्यातील शेतीची, पिण्याच्या पाण्याची आणि ग्रामीण समृद्धीची आशा घेऊन येत आहे.जलयुक्त शिवार अभियान २.० च्या माध्यमातून हीच आशा आता अधिक बळकट होत आहे. ******

मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करून कर्जमुक्तीचा लाभ देण्याबाबत

मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करून कर्जमुक्तीचा लाभ देण्याबाबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ; बँकांना मानक कार्यप्रणाली (SOP) नुसार कार्यवाही करण्याचे आवाहन धाराशिव,दि.२० ऑगस्ट (जिमाका) राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ सुरू केली आहे.या योजनेची अंमलबजावणी सुरू असून सध्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.महा-आयटीने प्रसिद्ध केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील काही शेतकरी मयत असल्याने त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकत नाही. अशा शेतकऱ्यांची कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभासाठी पात्र असली,तरी शासन निर्णयानुसार आधार प्रमाणीकरणाशिवाय या कर्जखात्यांना लाभ देता येत नाही. त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर वारसांची नोंद करून सुधारित माहिती योजना पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या मयत शेतकऱ्यांची माहिती काढून त्यांच्या वारसांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याबाबत महा-आयटीमार्फत मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात आली आहे.बँकांनी वारसांची नोंद करावी. बँकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्जखात्यांमधील संबंधित कर्जदार शेतकरी आधार प्रमाणीकरणापूर्वी मयत झाल्याची माहिती वारसाकडून प्राप्त झाल्यानंतर, बँकेच्या प्रचलित धोरणाप्रमाणे मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वारसांची नोंद करून घ्यावी.बँकेने कर्जखात्यावर मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद केल्यानंतर योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘Upload Deceased Accounts’ या सुविधेमार्फत वारसांची माहिती अपलोड करावी. बँकेने मयत शेतकऱ्यांच्या वारसांचे हिस्से (Share) कर्जखात्यामध्ये नमूद करावेत.तसेच मयत शेतकऱ्यांऐवजी वारस खातेदारांची वैयक्तिक माहिती नमुना तक्त्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अपलोड करावी.यामध्ये St. No, BR-ID, Heir No., Legal Heir Name, Legal Aadhar No.,Date of Birth, Gender, Mobile Number, AgriStack Registry,CIF, Saving Account Number, PACS ID,PACS Membership Number, Loan Account Number, Percentage of Share in Loan या माहितीचा समावेश राहील. एकाच फाईलमध्ये माहिती अपलोड करावी महा-आयटीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर ‘Upload Deceased Accounts’ या सुविधेमधून माहिती अपलोड करताना केवळ मयत शेतकऱ्यांशी संबंधित पूर्वीचा BR-ID आणि पूर्वीचा कर्ज खाते क्रमांक यासह कर्जखात्याची माहिती एकाच फाईलमध्ये अपलोड करावी. ही माहिती अपलोड करण्यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत संबंधित शासकीय लेखापरीक्षकामार्फत कर्जखात्याची तपासणी करण्यात यावी. पात्र कर्जखात्यांची यादी नव्याने प्रसिद्ध होणार बँकांमार्फत अपलोड करण्यात आलेल्या कर्जखात्यांच्या माहितीचे महा-आयटीमार्फत योजना निकषानुसार संस्करण करण्यात येईल.या संस्करणानुसार लाभासाठी पात्र असलेल्या कर्जखात्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह नव्याने आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेच्या निकषानुसार प्रत्येक वारसाने आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहील.तसेच आधार प्रमाणीकरणापूर्वी अथवा प्रमाणीकरणावेळी ॲग्रीस्टॅक नोंदणी / Farmer ID असणे आवश्यक राहील. मयत कर्जखात्यास एकापेक्षा अधिक वारस असल्यास, योजनेच्या निकषानुसार कर्ज रकमेमधील वारसांच्या हिश्श्याच्या प्रमाणात कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात वर्ग केली जाईल. वारस अपात्र असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मयत कर्जदारांच्या वारसांची नोंद करण्यासाठी तात्काळ संबंधित बँकेशी संपर्क साधून बँकेकडे त्यांच्या वारसांची नोंद करून घ्यावी आणि कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ००००००

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनांसाठी विशेष शिबिर विविध शासकीय योजनांची माहिती; आरोग्य, रोजगार, उद्योजकता व कायदेविषयक मार्गदर्शन

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनांसाठी विशेष शिबिर विविध शासकीय योजनांची माहिती; आरोग्य, रोजगार, उद्योजकता व कायदेविषयक मार्गदर्शन धाराशिव,दि.२० ऑगस्ट (जिमाका) तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनेंतर्गत तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन,जनजागृती मोहीम, जाणीव-जागृती कार्यशाळा, प्रचार-प्रसिद्धी,स्वयंरोजगार मेळावे,उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम,आरोग्य शिबिरे तसेच तृतीयपंथीय व्यक्तींसाठी कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरू करणे आणि तृतीयपंथीयांच्या अनुषंगाने आवश्यक बाबी राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, धाराशिव आणि राजाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय भवन सभागृह,धाराशिव येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास रवि सानप,पोलीस उपअधीक्षक श्री.गुरव,जिल्हा कौशल्य विभाग,नाशिक विभागातील अशासकीय सदस्य तृतीयपंथी व्यक्ती श्रीमती शेख, श्रीमती पानसे,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी सनम लामकने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी तृतीयपंथीयांना सौजन्याने वागणूक देणे,त्यांच्याबद्दल चांगली भावना निर्माण करणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच शिष्यवृत्तीच्या योजना,व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. श्री.गुरव यांनी कौशल्य विकास विभागामार्फत तृतीयपंथीयांना आर.सी.टी.च्या माध्यमातून प्रशिक्षण,रोजगाराच्या संधी तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेबाबत मार्गदर्शन केले.उमेदचे श्री.भांगे यांनी बचत गट निर्माण करून आर्थिक परिस्थिती मजबूत कशी करता येईल,याबाबत माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांनी विविध रोजगाराशी संबंधित योजनांबाबत मार्गदर्शन केले.तसेच नाशिक विभागातील अशासकीय सदस्य तृतीयपंथी व्यक्ती यांनी तृतीयपंथीयांच्या विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. वैशाली आवाड,शहर अभियान व्यवस्थापक,नगर परिषद, धाराशिव यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान तहसील कार्यालय,कौशल्य विकास विभाग,पोलीस विभाग,पोस्ट विभाग तसेच जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा रुग्णालय यांच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी आरोग्य शिबिर,रेशन कार्ड,आधार कार्ड,बँक खाते,उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम,कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन तसेच रेशन कार्ड आदी आवश्यक बाबींची कार्यवाही करण्यात आली. ००००००

ॲट्रॉसिटी प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे निर्देश

ॲट्रॉसिटी प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे निर्देश धाराशिव,दि.२० ऑगस्ट (जिमाका) अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करावा. पीडितांना वेळेत न्याय मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तपासात गती आणून आवश्यक कार्यवाही तत्परतेने करावी,अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले तसेच समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जुलै २०२६ अखेर घेण्यात आलेल्या मागील बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली.त्यानंतर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जुलै २०२६ अखेर सन २०२५-२६ मध्ये घडलेल्या गुन्ह्यांपैकी दोषारोपपत्र व इतर कागदपत्रे अप्राप्त असल्यामुळे अर्थसहाय्यासाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेण्यात आली.तसेच पोलीस स्तरावर निकाली काढलेल्या गुन्ह्यांचा,मा.न्यायालयात सद्यःस्थितीत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा,अत्याचारपीडितांना मंजूर केलेले अर्थसहाय्य मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रकरणांचा तसेच खून प्रकरणांतील वारसांना नोकरी देण्याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी घेतला. २० ऑगस्टअखेर ९ प्रकरणांमध्ये दोषारोप अहवाल दाखल झाले असून,२२ प्रकरणे तपासावर प्रलंबित आहेत.त्यापैकी पाच प्रकरणे ६० दिवसांपेक्षा अधिक कालावधीची असून,१७ प्रकरणे ६० दिवसांच्या आतील असल्याची माहिती जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्य सचिव श्री . कवले यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी संबंधित विभागांनी प्रकरणांच्या तपासात गती आणावी,प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करावा आणि अत्याचारपीडितांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तत्परतेने करावी,असे निर्देश दिले. ******

माती-पाणी संवर्धनासाठी ‘रील्स’ स्पर्धा ; तुळजाभवानी स्टेडियमवर ‘वॉक फॉर वॉटर’

माती-पाणी संवर्धनासाठी ‘रील्स’ स्पर्धा ; तुळजाभवानी स्टेडियमवर ‘वॉक फॉर वॉटर’ धाराशिव दि.२० ऑगस्ट (जिमाका) माती व जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासाठी राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जनमानसात पाणी आणि मातीच्या संवर्धनाची चळवळ उभी करण्यासाठी राज्यव्यापी ‘महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वयोगटासाठी ‘रील्स’ स्पर्धा माती व जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी १५ ते ३० वयोगटातील युवकांसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही राज्यव्यापी स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी ३० ते ६० सेकंदांची माहितीपूर्ण रील तयार करून #SaveSoilSaveWater या हॅशटॅगसह सोशल मीडियावर अपलोड करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. रीलसाठी माती संवर्धन, पाणी बचत, मृद्संधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण,पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना तसेच आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य या विषयांवर रील्स तयार करता येणार आहेत. रील्समध्ये #savesoilsavewater, #savewatersavesoil, #mahawalkathon, #walkforwater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रील्स प्रचारासाठी मुख्य संदेश “एक Reel... मातीसाठी !, एक Reel... पाण्यासाठी!, एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी !” तुळजाभवानी स्टेडियमवर ‘वॉक फॉर वॉटर’ जलसंधारणाचे दूरदृष्टीचे विचार मांडणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे.धाराशिव येथे शुक्रवार,२१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता तुळजाभवानी स्टेडियम येथून वॉकॅथॉनला सुरुवात होणार आहे. ‘पाण्यासाठी पाऊल’ (Walk for Water) या संकल्पनेवर आधारित या मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “आपण सर्वांनी या वॉकॅथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे ,ही विनंती ! चला,जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र पाऊल टाकूया !” असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी केले आहे. वॉकॅथॉनसाठी नोंदणी करण्याकरिता दिलेला QR Code स्कॅन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. असा असेल वॉकॅथॉनचा मार्ग तुळजाभवानी स्टेडियम > नगरपरिषद > सेंट्रल बिल्डिंग चौक > संभाजीनगर कमान > रामनगर > आनंदनगर > समता कॉलनी > महात्मा फुले चौक > तुळजाभवानी स्टेडियम या मार्गावरून वॉकॅथॉन काढण्यात येणार आहे. माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे. *******

Tuesday, 18 August 2026

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण धाराशिव दि.१८ ऑगस्ट (जिमाका) भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त धाराशिव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात १५ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती.ज्योती पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्यदिनाला अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले.ध्वजारोहण कार्यक्रमाला विभागीय वन अधिकारी जे.एम.येडलावर, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे,सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी विश्वास करे,तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांचे कार्यालय प्रमुख,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत देशाच्या प्रगतीसाठी व कर्तव्यपूर्तीसाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आले. *******

Monday, 17 August 2026

सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे वाटप

सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे वाटप धाराशिव दि.१७ ऑगस्ट (जिमाका) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध व्हावे,त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी तसेच मजुरीवरील अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा,या उद्देशाने राज्य शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन २००४-०५ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना ४ एकर कोरडवाहू (जिरायती) अथवा २ एकर ओलीताखालील (बागायती) जमीन शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली जाते. या योजनेअंतर्गत कळंब तालुक्यातील चोराखळी येथील गट क्रमांक ५३९ मधील जिरायती क्षेत्र ५.३८ हेक्टर (१३ एकर १८ आर) जमीन समाज कल्याण विभागाने खरेदी केली असून ती तीन लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. यामध्ये चोराखळी (ता. कळंब) येथील खुणे ज्योती संतोष (विधवा) यांना गट क्रमांक ५३९ मधील १ हेक्टर ७१ आर जिरायती जमीन वाटप करण्यात येणार आहे.तसेच वंजारे रमाबाई राजकुमार (विधवा) यांनाही याच गटातील १ हेक्टर ७१ आर क्षेत्र देण्यात येणार आहे.याशिवाय खंडागळे विलास अच्युत व लक्ष्मी विलास खंडागळे,रा.चोराखळी, ता.कळंब,जि.धाराशिव यांना १ हेक्टर ८० आर जिरायती जमीन वाटप करण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे भूमिहीन कुटुंबांना शेतीच्या माध्यमातून स्वावलंबनाची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक व सामाजिक सबळीकरणाला चालना मिळणार आहे. *******

नशा मुक्त भारत अभियान’च्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त १८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय प्रतिज्ञा कार्यक्रम

नशा मुक्त भारत अभियान’च्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त १८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय प्रतिज्ञा कार्यक्रम धाराशिव दि.१७ ऑगस्ट (जिमाका) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय,नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार ‘नशा मुक्त भारत अभियान’च्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार,दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी “National Pledge Against Drug Abuse” (आमलीपदार्थांच्या गैरवापराविरुद्ध राष्ट्रीय प्रतिज्ञा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व शासकीय कार्यालयांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यासोबतच महिला बचत गट,तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित,विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा व महाविद्यालयांमध्येही दि.१८ ऑगस्ट २०२६ रोजी व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने “National Pledge Against Drug Abuse” (अमलीपदार्थांच्या गैरवापराविरुद्ध राष्ट्रीय प्रतिज्ञा) घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून व्यसनमुक्त भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे,राष्ट्रीय प्रतिज्ञा डाउनलोड करण्यासाठी https://nashamukt.dosje.gov.in/activities या लिंकचा वापर करावा,असेही आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले यांनी केले आहे. ******

जलसंधारण : दुष्काळी धाराशिवच्या विकासाची जीवनरेखा

जलसंधारण : दुष्काळी धाराशिवच्या विकासाची जीवनरेखा २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाच्या इतिहासात सुधाकरराव नाईक यांचे योगदान विशेष महत्त्वाचे मानले जाते.राज्यात पाणी अडवा,पाणी जिरवा या संकल्पनेला व्यापक स्वरूप देत त्यांनी जलसंधारणाच्या लोकचळवळीची पायाभरणी केली.ग्रामीण भागातील जलटंचाई दूर करण्यासाठी आणि शेतीला शाश्वत आधार देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही मार्गदर्शक ठरतात.महाराष्ट्राच्या अनेक भागांप्रमाणेच धाराशिव जिल्ह्यालाही कमी व अनियमित पर्जन्यमानाचा सामना करावा लागतो. जिल्ह्याच्या भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीमुळे येथे पाण्याचे नियोजन हा केवळ विकासाचा विषय नसून अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे जलसंधारणाचे महत्त्व या जिल्ह्यासाठी अधिक अधोरेखित होते. धाराशिव जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.त्यातही हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप अधिक अनिश्चित झाले आहे.काही दिवसांत अतिवृष्टी तर उर्वरित काळात दीर्घ खंड अशी परिस्थिती निर्माण होत आहे.परिणामी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहून जाते आणि भूजल पुनर्भरणाची संधी कमी होते.याचा परिणाम विहिरी, बोअरवेल,तलाव आणि जलाशयांतील पाणीसाठ्यावर दिसून येतो. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर आधारित आहे.सोयाबीन, तूर,हरभरा,ऊस ज्वारी यांसारख्या पिकांवर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.मात्र शेतीचे यश पावसावर अवलंबून असल्याने प्रत्येक दुष्काळी वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान निर्माण करते.अशा परिस्थितीत जलसंधारण ही शेतीला स्थैर्य देणारी सर्वात प्रभावी उपाययोजना ठरते.शेततळे,बंधारे,गाळ काढणे, नाला खोलीकरण,मृद व जलसंधारणाची कामे आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यामुळे जमिनीत पाणी मुरते,भूजलपातळी वाढते आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्यात वाढ होते. जलसंधारणाचा लाभ केवळ शेतीपुरता मर्यादित राहत नाही.पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढते,पशुधनासाठी पाणी उपलब्ध होते,ग्रामीण भागातील स्थलांतर कमी होते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते.जलसंपन्न गावांमध्ये सामाजिक व आर्थिक विकासाचा वेग अधिक असल्याचे अनेक उदाहरणांमधून दिसून आले आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,कृषी विभाग आणि जलसंधारण विभागाच्या विविध उपक्रमांमुळे अनेक गावांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत.तथापि,वाढती लोकसंख्या, बदलते हवामान आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता ही चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज आहे. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही.प्रत्येक नागरिकाचा त्यात सहभाग आवश्यक आहे.घरगुती पातळीवर पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन, विहिरी व तलाव स्वच्छ ठेवणे, वृक्षारोपण आणि जलस्रोतांचे संरक्षण यांसारख्या कृतींमधून नागरिक मोठे योगदान देऊ शकतात.गावपातळीवर लोकसहभागातून उभारलेली जलसंधारणाची कामे अधिक प्रभावी आणि दीर्घकालीन ठरतात,हा अनुभव राज्यातील अनेक यशस्वी गावांनी दिला आहे. आज जलसंधारणाचा विचार केवळ पाणी साठवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही.तो पर्यावरण संवर्धन,कृषी विकास, ग्रामीण समृद्धी आणि भविष्यातील जलसुरक्षा यांच्याशी थेट जोडलेला आहे.त्यामुळे सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जलसंधारण दिनाचे महत्त्व केवळ स्मरणापुरते नसून कृतीची प्रेरणा देणारे आहे. दुष्काळी परिस्थितीशी सातत्याने सामना करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यासाठी जलसंधारण ही विकासाची जीवनरेखा आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जिरविणे आणि जपून वापरणे ही काळाची गरज आहे.शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाली तरच जलसमृद्ध धाराशिवचे स्वप्न साकार होईल.जलसंधारणाची संस्कृती रुजविणे हीच सुधाकरराव नाईक यांना खरी आदरांजली ठरेल. संकलन जिल्हा माहिती कार्यालय धाराशिव

Sunday, 16 August 2026

दुष्काळी धाराशिवने रुजवली हरित आशा ; १२ तासांत १० लाख ७ हजार ९७५ रोपांची लागवड

दुष्काळी धाराशिवने रुजवली हरित आशा ; १२ तासांत १० लाख ७ हजार ९७५ रोपांची लागवड ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; कमी वनक्षेत्र असलेल्या जिल्ह्यात जैवविविधतेच्या संवर्धनाला नवी दिशा धाराशिव,दि.१६ ऑगस्ट (जिमाका) पावसाचे कमी प्रमाण, दुष्काळाची सातत्याने झळ आणि एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत अत्यल्प वनक्षेत्र अशी पर्यावरणीय आव्हाने असलेल्या धाराशिव जिल्ह्याने शुक्रवारी हिरवाईच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले. जिल्ह्यातील आठ ठिकाणी एकाच वेळी १२ तासांत १० लाख ७ हजार ९७५ रोपांची लागवड करून ‘हरित धाराशिव २.०’अंतर्गत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाला लोकसहभागाची भक्कम साथ मिळाल्याने हा उपक्रम केवळ विक्रम न राहता दुष्काळी भूमीवर हिरवाई, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाची नवी आशा रुजविणारी लोकचळवळ ठरला. दुष्काळी जिल्ह्याची हिरवाईकडे वाटचाल धाराशिवची ओळख प्रामुख्याने दुष्काळी जिल्हा म्हणून आहे.कमी पर्जन्यमानामुळे शेती,पाणी आणि पर्यावरणासमोरील आव्हाने कायम आहेत.त्यातच जिल्ह्यातील वनक्षेत्र अत्यल्प असल्याने हरित आच्छादन वाढविणे ही काळाची गरज आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी सुरू झालेल्या ‘हरित धाराशिव’ अभियानाला यंदा ‘हरित धाराशिव २.०’च्या माध्यमातून अधिक व्यापक रूप देण्यात आले.मागील वर्षाच्या अनुभवातून निर्माण झालेला लोकविश्वास,प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन आणि विविध विभागांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाचा विक्रम साकारला. मागील वर्षी १९ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली होती.लावलेल्या रोपांपैकी सुमारे १३ लाख रोपे जिवंत असल्याने यंदाच्या मोहिमेला संवर्धनाचा अनुभव आणि विश्वासाची भक्कम पार्श्वभूमी मिळाली.त्यामुळे यंदा केवळ लागवडीच्या संख्येवर भर न देता रोपांची नोंद,पडताळणी,स्थानिक प्रजातींची निवड आणि पुढील संगोपन यांनाही प्राधान्य देण्यात आले. आठ ठिकाणी एकाच वेळी हिरवाईचा उत्सव ‘हरित धाराशिव २.०’अंतर्गत जिल्ह्यातील आठ ठिकाणी एकूण ३३.७ हेक्टर क्षेत्रावर १० लाख ७ हजार ९७५ रोपांची लागवड करण्यात आली.सामाजिक वनीकरण विभागाच्या चार ठिकाणी १४.५ हेक्टर क्षेत्रावर चार लाख ३५ हजार,वन विभागाच्या तीन ठिकाणी १४.२ हेक्टर क्षेत्रावर चार लाख २६ हजार,तर वन्यजीव विभागाच्या येडशी अभयारण्यातील एका ठिकाणी एक लाख ५० हजार रोपांची लागवड करण्यात आली. या आठही ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक,महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक,अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था,स्वयंसेवक आणि नागरिकांनी सहभाग घेतला.वन विभाग,सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग,स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध यंत्रणांनी समन्वयाने काम केले.आठ ठिकाणी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपजिल्हाधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. प्रत्येक रोपाचा डिजिटल आणि प्रत्यक्ष ठसा गिनीज विक्रमासाठी लागवडीची नोंद पारदर्शक आणि पडताळणीय राहावी,यासाठी प्रत्येक रोपाला स्वतंत्र QR कोड देण्यात आला. मोबाईल स्कॅनरच्या माध्यमातून रोपाची नोंद करण्यात आली. एकच रोप एकदाच मोजले जाईल, याची दक्षता घेण्यात आली. त्यासोबतच रोपांचे लॉगबुक, सहभागी स्वयंसेवकांचे बुक,दर तासाच्या वृक्षलागवडीची नोंद, ठिकाणनिहाय नोंदी,छायाचित्रे, व्हिडिओ रेकॉर्डिंग,ड्रोन शूटिंग आणि स्थिर कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण करण्यात आले. १२ तासांच्या या मोहिमेत वेळ मोजणारे घड्याळ किंवा टायमर थांबविण्यात आला नाही.प्रत्येक तासाची कामगिरी लॉगबुकमध्ये नोंदविण्यात आली. स्वतंत्र वनस्पतिशास्त्रज्ञ आणि त्रयस्थ साक्षीदारांच्या उपस्थितीत नोंदींची पडताळणी करण्यात आली.जास्तीत जास्त चार तासांच्या पाळ्यांमध्ये दोन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि दोन त्रयस्थ साक्षीदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रक्रियेची पाहणी केली.अंतिम टप्प्यातील साक्षीदारांनी पूर्वीच्या नोंदींचे पुनरावलोकन करून अंतिम संख्या निश्चित केली.आठही लागवड स्थळांची पडताळणी सनदी लेखापाल गोपाल लढ्ढा यांच्या सनदी लेखा फर्मकडून करण्यात आली.विविध पुरावे, लॉगबुक,रोपांचे लॉगशीट, छायाचित्रे,व्हिडिओ आणि इतर दस्तऐवज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ यांना सादर करण्यात आले.या संपूर्ण प्रक्रियेसाठी त्रयस्थ संस्थांचे साक्षीदार वनस्पतिशास्त्रज्ञ आणि स्वतंत्र निरीक्षक कार्यरत होते. स्थानिक प्रजातींमुळे जैवविविधतेला आधार वृक्षलागवड केवळ विक्रमापुरती मर्यादित न राहता भविष्यातील जैवविविधतेला आधार देणारी ठरावी,यासाठी स्थानिक प्रजातींना प्राधान्य देण्यात आले.घनवन पद्धतीनुसार कॅनोपी,मोठे वृक्ष, उपवृक्ष आणि झुडूप अशा विविध स्तरांतील प्रजातींची निवड करण्यात आली.वड,उंबर,जांभूळ, कदंब,चिंच,पिंपळ,आवळा,हिरडा, बेहडा,कडुनिंब,मोह,बकुळ, पळस,बहावा,करंज,शमी,बोर आणि बाभूळ यांसह तुळस, कोरफड,चाफा,मोगरा आणि प्राजक्त यांसारख्या स्थानिक व उपयुक्त प्रजातींचा समावेश करण्यात आला.स्थानिक प्रजातींच्या या मिश्र लागवडीमुळे भविष्यात पक्ष्यांना अधिवास, मातीला आधार,सावली,भूजल पुनर्भरणास मदत आणि स्थानिक जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे १४ ऑगस्ट रोजी केलेली वृक्ष लागवड ही केवळ संख्येची नोंद नसून,भविष्यातील पर्यावरणीय समतोलासाठी केलेली गुंतवणूक ठरणार आहे. तीन महिन्यांपासून सूक्ष्म नियोजन या विक्रमासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तीन महिन्यांपासून सूक्ष्म नियोजन केले होते.जिल्हाधिकारी श्री.पुजार यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर यांनी लागवडीसाठी अत्यंत काळजीपूर्वक सूक्ष्म नियोजनातून काम केले.वन, सामाजिक वनीकरण व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले.४० हून अधिक रोपवाटिकांमधून रोपांची निर्मिती करण्यात आली.२४ वनस्पतिशास्त्रज्ञ,स्वतंत्र निरीक्षक आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दुष्काळी परिस्थिती आणि कमी पर्जन्यमान लक्षात घेऊन घनवनासाठी मियावाकी पद्धतीचा वापर करण्यात आला.जिल्हा प्रशासनासोबत विविध सेवाभावी संस्था,विद्यार्थी,शिक्षक, महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक,स्वयंसेवक,नागरिक आणि विविध कंपन्यांनी या उपक्रमासाठी उत्स्फूर्त सहकार्य केले. विक्रमापेक्षा मोठे आव्हान आता झाडे जगविण्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली नोंद धाराशिवसाठी अभिमानाची बाब असली,तरी या विक्रमाची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे.आज लावलेले प्रत्येक रोप जिवंत ठेवणे,त्याला आवश्यक पाणी देणे,संरक्षण करणे आणि त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर करणे ही पुढील जबाबदारी आहे. विक्रमाचा आकडा एका दिवसाचा असतो; मात्र झाडाची सावली, प्राणवायू आणि पर्यावरणीय लाभ अनेक पिढ्यांपर्यंत टिकतात. त्यामुळे वृक्षलागवड ही एका दिवसाची मोहीम न राहता दीर्घकालीन संवर्धनाची लोकचळवळ करण्याचे आव्हान आता जिल्ह्यासमोर आहे.दुष्काळी धाराशिवच्या भूमीवर आज लाखो रोपांच्या रूपाने हिरव्या भविष्याची बीजे रुजली आहेत.प्रशासनाचे नियोजन,विविध यंत्रणांचा समन्वय आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ‘हरित धाराशिव २.०’ने जिल्ह्याला पर्यावरण संवर्धनाची नवी ओळख दिली आहे.आजचा विक्रम कागदावर नोंदला गेला; मात्र उद्या ही लाखो रोपे मोठी होऊन सावली,प्राणवायू आणि जैवविविधतेचा आधार बनली,तरच या हरित पर्वाचे खरे सार्थक होईल. १४ ऑगस्ट रोजी धाराशिवने विक्रम केला; आता या लाखो रोपांनी जिल्ह्याचे पर्यावरणीय भवितव्य बदलावे,हीच या हरित पर्वाची खरी अपेक्षा. ******

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन मुंबई दि.१५ ऑगस्ट : शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे असून मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमाची थीम सेव सॉईल,सेव वॉटर,सीक्यूर टूमारो ( Save Soil, Save Water, Secure Tomorrow) अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा,जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान "जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. तर २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी हे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सर्व मंत्री,सर्व राज्यमंत्री, राज्यसभा/ लोकसभा/ विधानपरिषद/ विधानसभा सदस्य, सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष,सर्व महापौर / उपमहापौर,सर्व नगराध्यक्ष/उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हापरिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्य, सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी,सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठीत व्यक्ती / डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू,जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी,एनसीसी,एनएसएस, माय भारत,नेहरु युवा केंद्र,भारत स्काऊट्स अँड गाईड्स,रेड क्रॉस, होमगार्ड,स्वयंसेवी संस्था,रोटरी क्लब सदस्य,लायन्स क्लब सदस्य,रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य,उद्योग व व्यापारी संघटना,सीएसआर भागीदार कंपन्या,विविध क्रीडा संघटना,गुड मॉर्निंग ग्रुप्स,विविध व्यायाम शाळा,स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे. महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.२१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे.तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात,असे आवाहन करण्यात आले आहे. 0000

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत : युवकांनी सहभाग घ्यावा

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत : युवकांनी सहभाग घ्यावा मुंबई दि.१५ ऑगस्ट (जिमाका) १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धेचे ‘आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इनस्टाग्राम (Instagram) च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या रील स्पर्धेत राज्यातील युवक - युवतींनी उत्सफूर्त सहभागी घ्यावा,असे आवाहन करण्यात येतआहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे.या निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर,जलसंधारणाची शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. रील स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. व्हिडीओ/ रिलच्या सुरुवातीला व्हिडीओ / रिलचा उद्देश,स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद सहभागी स्पर्धकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धाकांने Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी.स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील.यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे. रिल्स बनवण्यासाठी विषय माती संवर्धन,पाणी बचत, मृदसंधारण,जलसंधारण,मातीची धूप रोखणे,पावसाच्या पाण्याचे संकलन,शेततळे,बंधारे,पाणलोट क्षेत्र विकास,वृक्षारोपण,पर्यावरण संरक्षण,गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे,पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती,माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना,आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य असे रील्स बनवण्यासाठी विषय देण्यात आले आहेत. रील्सकरीता गुणांकन पद्धती पुढीलप्रमाणे असणार आहे.विषय व संदेश - ३० गुण,कल्पकता -२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश - २० गुण,सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता - १५ गुण, Instagram Engagement - १० गुण असे एकूण - १०० गुण असणार आहेत. केवळ Likes किंवा Followers वर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल. विजेत्यांना बक्षीस राज्यासाठी एकच अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरण्यात येणार असून,प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रिल्स आणि राज्यभरातून १० हजार रिल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.रिल स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार ₹२५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार ₹१५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार ₹१० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे.पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष “युवा मृद-जलदूत” म्हणून गौरविण्यात येणार आहे "एक Reel... मातीसाठी !, एक Reel... पाण्यासाठी !, एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी !" हा रिल्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे. 0000

विकसित भारतासाठी विकसित धाराशिव’चा संकल्प ; शेतकरी,महिला,युवक आणि उद्योग विकासाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक

विकसित भारतासाठी विकसित धाराशिव’चा संकल्प ; शेतकरी,महिला,युवक आणि उद्योग विकासाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा धाराशिव,दि.१५ ऑगस्ट (जिमाका) धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू आहे.शेतकऱ्याच्या हातात पैसा आला, शेती सक्षम झाली तर गावाची आणि जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत होते.शेतकरी,महिला,युवक,उद्योग,शिक्षण,आरोग्य आणि पर्यावरण या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास साधत ‘विकसित भारतासाठी विकसित धाराशिव’ घडविण्याचा संकल्प करूया,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री श्री.सरनाईक बोलत होते.यावेळी स्वातंत्र्यसैनिक बलभीम पाटील,बुबासाहेब जाधव,दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी कलावती उंबरे,केसरबाई टापरे,जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,पोलिस अधीक्षक रितू खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की,‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६’च्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७० हजार ते १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना सुमारे १ हजार ४०० कोटी रुपयांपर्यंतचा लाभ अपेक्षित आहे.आतापर्यंत १२ हजार २९४ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर १०५ कोटी ८६ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.आधुनिक तंत्रज्ञान, AI आधारित सोयाबीन प्रकल्प, IIT बॉम्बेच्या सहकार्याने कृषी तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देऊन शेतीला आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.असे ते म्हणाले. ‘हरित धाराशिव’ अभियानातून गतवर्षी १९ जुलै रोजी एकाच दिवशी १५ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,त्यापैकी ८५ टक्क्यांहून अधिक रोपे जगविण्यात आली आहेत.यंदा १४ ऑगस्ट रोजी आठ ठिकाणी ३३.७ हेक्टर क्षेत्रावर १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन आणि नागरिकांचे अभिनंदन केले.‘गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार’ आणि नाला खोलीकरणाच्या माध्यमातून ३०२ प्रकल्पांतून १७०.३८ लाख घनमीटर गाळ काढून शेतांमध्ये टाकण्यात आला असून,त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि भूजलसाठा वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मितीवरही शासनाचा भर असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. श्री.सरनाईक पुढे म्हणाले की‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत जिल्ह्यातील ४ लाख ७ हजार ४६ पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळत आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून सुमारे १५ हजार स्वयं- सहाय्यता गटांद्वारे १ लाख ३६ हजारांहून अधिक कुटुंबांचे संघटन झाले आहे. तुळजापूर येथे २० कोटी रुपयांच्या निधीतून ‘उमेद मॉल’ उभारण्यात येत आहे.जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ५६ उद्योगसमूहांसोबत सामंजस्य करार झाले असून, १ हजार ११८ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून दोन हजारांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत.ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे आकाश देण्यासाठी ‘गावातील शाळा ते NASA’ हा उपक्रम राबविण्यात येत असून,जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २० विद्यार्थ्यांना NASA भेटीची संधी मिळणार आहे.‘हर घर जल’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार ४८० घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा झाला असून,२९७ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित झाली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया सुविधांमुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तुळजाभवानी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता मिळाली असून,जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी ४९४ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर असल्याचेही त्यांनी नमूद केले.‘आपला जीव धाराशिव–व्हिजन २०३०’ आणि ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ यांच्या माध्यमातून शासन,प्रशासन,लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून धाराशिवला विकासाचे नवे मॉडेल बनविण्याचा संकल्प करूया,असे आवाहन पालकमंत्री सरनाईक यांनी केले. शेतकरी सक्षम,महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी,युवकांच्या हाताला रोजगार,उद्योगांना चालना आणि प्रत्येक नागरिकाला दर्जेदार शिक्षण,आरोग्य व मूलभूत सुविधा मिळणे हेच विकसित धाराशिवचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ध्वजारोहणाच्या प्रारंभी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत झाले.त्यानंतर राज्यगीत झाले. पालकमंत्री सरनाईक यांच्यासह मान्यवरांनी स्मृतिस्तंभास अभिवादन केले.यावेळी उपस्थितांना जलसंधारण दिन आणि व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच लाभार्थ्यांना योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी,विविध क्षेत्रांतील मान्यवर,विविध पक्षांचे पदाधिकारी,नागरिक,पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हनुमंत पडवळ यांनी मानले. **

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ पालकमंत्री प्रताप सरनाईक

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ पालकमंत्री प्रताप सरनाईक ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद धाराशिव,दि.१५ ऑगस्ट (जिमाका) ‘हरित धाराशिव अभियान २.०’च्या माध्यमातून १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षारोपण करून धाराशिवने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदविला आहे.मात्र,हा विक्रम केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता लावलेली प्रत्येक रोपे जगविण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.‘आपण विक्रम तर केलाच; पण त्यापेक्षा मोठा विक्रम ही झाडे जगविण्याचा करूया,’ असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. धाराशिवजवळील शिंगोली येथे वन विभागाच्या जागेसह जिल्ह्यातील आठ ठिकाणी १४ ऑगस्ट रोजी ‘हरित धाराशिव २.०’अंतर्गत १० लाख ९ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.यानिमित्त शिंगोली येथील वन विभागाच्या परिसरात आज आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री सरनाईक बोलत होते.जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषा गायकवाड,विशेष अतिथी सिनेअभिनेते तथा देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे, जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर, लेखक व साहित्यिक अरविंद जगताप आणि शिंगोलीच्या सरपंच योगिता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘एक पेड माँ के नाम’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशातून प्रेरणा घेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळ देत धाराशिव जिल्ह्याने पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी केली आहे.हरित धाराशिव अभियान १.०’अंतर्गत १९ जुलै २०२५ रोजी एकाच दिवशी १७ लाख १ हजार ८१५ वृक्षांचे रोपण करून जागतिक विक्रमाची नोंद करण्यात आली.या अभियानातील ८६.९७ टक्के रोपे जिवंत राहिली, ही धाराशिवकरांच्या सामूहिक प्रयत्नांची खरी पावती असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. ‘हरित धाराशिव अभियान २.०’अंतर्गत १२ तासांत १० लाख ११ हजार स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यात आली.जिल्ह्यातील आठ ठिकाणी ८३.२६ एकर क्षेत्रावर मियावाकी पद्धतीने घनवन विकसित केले जात आहे.प्रत्येक रोपाला स्वतंत्र QR कोड देऊन त्याची डिजिटल नोंद करण्यात आली आहे.तसेच छायाचित्रण, व्हिडिओ रेकॉर्डिंग,ड्रोन शूटिंग आणि हस्तलिखित लॉगबुकच्या माध्यमातून लागवडीची अचूक नोंद ठेवण्यात आली.हा विक्रम प्रशासनाचा नसून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा आहे. वृक्षलागवड हा जीवनाचा संकल्प बनवून लावलेली सर्व झाडे जगविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी,असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील ३०० कोटी वृक्षलागवडीत धाराशिव जिल्हा महत्त्वाचा वाटा उचलत आहे. जिल्ह्याला केवळ विक्रमाच्या नकाशावर नव्हे,तर हिरवाईच्या नकाशावर घेऊन जायचे आहे. भविष्यात लावलेली सर्व झाडे जगली पाहिजेत,यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.सर्वसामान्य नागरिकांना वृक्षलागवड व संवर्धनाबाबत जाणीव करून त्यांना प्रोत्साहित करावे. देवराईच्या माध्यमातून जिल्ह्यात वनराई वाढविण्यात येणार असून, त्यासाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या (CSR) निधीतून मदत उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील म्हणाल्या,प्रत्येक गावात व्यक्तीच्या नावासह वृक्षलागवड करण्यात येणार आहे.पुढील तीन वर्षांत जिल्ह्यात १३ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांसाठी पालकमंत्र्यांनी सहकार्य करावे,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, वृक्षारोपणाचे महत्त्व केवळ झाड लावण्यात नसून ते जगविण्यात आहे.झाडांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असून, कमी झाडे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये धाराशिवचा समावेश होतो.त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीची गरज आहे. धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून वडगाव (सिद्धेश्वर) येथे १० हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे.वृक्षलागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे. फटाके आणि डॉल्बीमुळे होणारे प्रदूषण कमी करून वृक्षलागवडीकडे वळले पाहिजे. एका पिढीसाठी नव्हे,तर अनेक पिढ्यांसाठी वृक्षलागवड महत्त्वाचे काम आहे,असे त्यांनी सांगितले. अभिनेते तथा देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे म्हणाले,युवा वर्गाने पर्यावरणाबाबत जागरूक असले पाहिजे.‘वृक्ष प्रसाद योजना’ सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात श्रद्धेने रोपे लावली जातील.देवराई तयार करण्याची संधी मिळाल्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम करता येईल.जगातून जाताना माणूस काहीही सोबत घेऊन जात नाही; मात्र अन्न आणि श्वास झाडांपासूनच मिळतो.त्यामुळे प्रत्येक माणसाने आपल्या वयाएवढी झाडे लावली पाहिजेत. २०१३ पर्यंत आपल्याकडे देशी वृक्षलागवडीकडे पुरेसे लक्ष नव्हते. धाराशिवमध्ये सुरू असलेले वृक्षलागवडीचे काम कौतुकास्पद असून,देशी झाडे भक्तांच्या हस्ते लावली जावीत,असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले,१९ जुलै २०२५ रोजी जिल्ह्यात १५ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. पुढील २० वर्षांत राज्यात ३०० कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.यात धाराशिवचा सिंहाचा वाटा असावा,या संकल्पनेतून मागील वर्षापासून ही मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी ४० हून अधिक रोपवाटिकांतून रोपे तयार करण्यात आली.१२ तासांत १० लाख वृक्षांची लागवड करण्याची मोहीम जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून यशस्वी झाली. धाराशिव हा दुष्काळी जिल्हा असून पर्जन्यमान कमी आहे. त्यामुळे मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करण्यात आली. प्रशासनासोबतच विविध सेवाभावी संस्था,विद्यार्थी,नागरिक आणि स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. विविध कंपन्यांनीही यासाठी मदत केली.१० लाख वृक्षलागवडीच्या मोहिमेसाठी २४ वनस्पतिशास्त्रज्ञ,स्वतंत्र निरीक्षक आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मागील वर्षी लावलेल्या १५ लाख झाडांपैकी १३ लाख झाडे जिवंत आहेत.जिल्ह्यात केवळ ०.१ टक्के वनक्षेत्र असून ते वाढविणे गरजेचे आहे.यासाठी जिल्ह्यात देवराई प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यामुळे वनाखालील क्षेत्र वाढण्यास मदत होईल,असे पुजार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘हरित धाराशिव २.०’साठी सहकार्य करणारे प्लॅनेटरा टीमचे श्री.चोले व त्यांचे सहकारी, सेरेंटिकाचे सुरजीत नारायण, प्रायमुव्हचे सिद्धार्थ विश्वकर्मा,स्टेट बँक ऑफ इंडियाचे पृथ्वीराज पाटील,जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे बसवराज दालगळे,टोरेंट ग्रीन एनर्जीचे विजय दलहाडे आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे मिथिलेश पांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ‘हरित धाराशिव २.०’अंतर्गत १२ तासांत १० लाख वृक्षलागवड पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी पालकमंत्री सरनाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी यांनी केले,तर उपस्थितांचे आभार विभागीय वन अधिकारी येडलावर यांनी मानले.कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पालकमंत्री सरनाईक तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ******

उंच भगवा केवळ ध्वज नव्हे; स्वाभिमान आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक पालकमंत्री प्रताप सरनाईक

उंच भगवा केवळ ध्वज नव्हे; स्वाभिमान आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक पालकमंत्री प्रताप सरनाईक ४५ मीटर उंच स्वराज्य ध्वजचे उद्घाटन धाराशिव दि.१५ ऑगस्ट (जिमाका) छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेला ४५ मीटर उंच भगवा ध्वज हा केवळ ध्वज नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला, स्वाभिमानाला आणि स्वराज्याच्या विचारांना नमन करणारे ऐतिहासिक प्रतीक आहे.या भगव्याकडे पाहताना प्रत्येक तरुणाने ‘महाराजांनी आपल्या काळात स्वराज्यासाठी काय केले आणि आपण आपल्या काळात समाजासाठी काय करणार हा प्रश्न स्वतःला विचारावा.इतिहासातून प्रेरणा घेऊन आधुनिक,सक्षम आणि विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करूया,असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. आज १५ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या ४५ मीटर उंच भगवा ध्वजाचे उद्घाटन पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी केले.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती. अर्चना पाटील,खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीमती.उषा गायकवाड,नगराध्यक्ष नेहा काकडे व उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, सुरज साळुंके,नगर पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे वर्णन करताना त्यांनी हा दिवस धाराशिवच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा अभिमानाचा दिवस असल्याचे सांगितले.आकाशाला गवसणी घालणारा हा भगवा पराक्रम, त्याग,धर्म-संस्कृतीच्या रक्षणाची भावना आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,बलाढ्य सत्तांविरुद्धचा संघर्ष या प्रत्येक प्रसंगातून महाराजांनी बुद्धिमत्ता,धैर्य आणि दूरदृष्टीचा आदर्श निर्माण केला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वाभिमान सोडू नये,हा संदेश देत राहील,असे सरनाईक म्हणाले. महाराजांनी केवळ युद्ध जिंकले नाही,तर माणसांची मने जिंकली असे सांगून श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,शेतकरी हा स्वराज्याचा कणा,प्रजेचे कल्याण हे राजाचे कर्तव्य,स्त्रियांचा सन्मान हा राजधर्म आणि प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी असले पाहिजे,ही मूल्यव्यवस्था त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून रुजविली.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे राजे नसून सुशासन,नेतृत्व,सामाजिक न्याय आणि राष्ट्रभक्तीचे आदर्श आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. आजच्या काळातील ‘स्वराज्य’ म्हणजे सुशासन,पारदर्शक प्रशासन,सुरक्षित समाज,सक्षम युवक,समृद्ध शेतकरी,सन्मानाने जगणारा नागरिक आणि विकासाच्या संधी प्रत्येकापर्यंत पोहोचणे होय असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,आपल्या मुलांच्या हातात तलवार नव्हे,तर ज्ञान,कौशल्य आणि तंत्रज्ञानाची ताकद देण्याची गरज आहे. तरुणांच्या मनात द्वेष नव्हे,तर स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती निर्माण केली पाहिजे.छत्रपतींनी समुद्राला सीमा न मानता संधी बनवली; त्याच दूरदृष्टीने आजच्या पिढीने विज्ञान,तंत्रज्ञान,शिक्षण,उद्योग आणि संशोधनाच्या क्षेत्रात नवी क्षितिजे गाठावीत,असे आवाहन त्यांनी केले. हा भगवा ध्वज केवळ चौकाची ओळख ठरू नये,तर प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वराज्याची भावना आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा जागविणारा ठरावा असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की, ‘धाराशिवचा विकास करू, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपू, तरुणांना संधी देऊ,शेतकऱ्याला बळ देऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत महाराष्ट्राला देशातील सर्वांत प्रगत व सक्षम राज्य बनवू,’असा संकल्प या भगव्याखाली करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. श्रीमती पाटील म्हणाल्या की,हा स्वाभिमानाचा ध्वज आहे.शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला.ज्याप्रमाणे धाराशिव येथे हा ध्वज उभा आहे तसाच ध्वज तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ देखील उभारण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी पालकमंत्र्यांकडून व्यक्त केली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाने आत्मसात केले तर या भुतलावर त्यांच्या विचाराचे राज्य येईल.या स्वराज ध्वजाची प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी.शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा ध्वज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष श्रीमती.नेहा काकडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव धाराशिव दि.१५ ऑगस्ट (जिमाका) आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी,लाभार्थी आणि व्यक्तींचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज, महिला सक्षमीकरण,सामाजिक न्याय, शेतकरी कर्जमाफी तसेच पोलिस दलातील प्रदीर्घ व निष्कलंक सेवेसाठी हा सन्मान देण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ अंतर्गत राज्यस्तरावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यात आले.एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील मूल्यांकनात ९०० पैकी ५०८.७२ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल डॉ. सतीश हरिदास यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) जिल्हा कार्यालय,धाराशिवला महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २०२५-२६ या वर्षाचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.या कामगिरीबद्दल जिल्हा कार्यालयाचा सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाज कल्याण कार्यालयामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत कळंब तालुक्यातील चोराखळी येथील ज्योती संतोष खुणे, रमाबाई राजकुमार वंजारे आणि विलास अच्युत खंडागळे यांना जमीन वाटपाचे आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्रांचे वितरणही पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.मुकुंद लोमटे,अमोल जाधव आणि ओंकार पवार यांना या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पोलिस दलातील प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेसाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.२५ वर्षांपेक्षा अधिक काळ अखंडित व निष्कलंक सेवा बजावल्याबद्दल पोलिस उपनिरीक्षक तानाजी महादेव माळी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच १५ वर्षांपेक्षा अधिक सेवा बजावल्याबद्दल पोलिस निरीक्षक विनोद इज्जतवार,पोलिस हवालदार स्वप्नील ढोणे,प्रदीप वाघमारे आणि दीपक लाव्हरे पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा गौरव हा त्यांच्या कार्याला मिळालेली दाद असून,इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती.अर्चना पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची उपस्थिती होती. ******

तुळजापूरच्या सुरक्षिततेला सीसीटीव्हीचे कवच; भाविकांचा विश्वास अधिक दृढ होणार पालकमंत्री प्रताप सरनाईक

तुळजापूरच्या सुरक्षिततेला सीसीटीव्हीचे कवच; भाविकांचा विश्वास अधिक दृढ होणार पालकमंत्री प्रताप सरनाईक तुळजापूर येथे सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे लोकार्पण धाराशिव,दि.१४ ऑगस्ट (जिमाका)आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूरमध्ये येतात.या भाविकांची तसेच नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असून,‘सुरक्षित तुळजापूर ही केवळ शासनाची जबाबदारी नसून सर्वांची सामूहिक बांधिलकी आहे. तुळजापूरच्या सुरक्षिततेला सीसीटीव्हीचे कवच मिळाले असून त्यामुळे भाविकांचा विश्वास अधिक दृढ होणार आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. तुळजापूर शहर सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी पोलिस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती.अर्चना पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री.सरनाईक म्हणाले की,धाराशिव जिल्ह्याच्या सन २०२४-२५च्या वार्षिक नियोजनातून सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.तुळजापूर शहरातील ६२ महत्त्वाच्या ठिकाणी २३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून,नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ३० ठिकाणी स्पीकर आणि धोकादायक अथवा महत्त्वाच्या परिस्थितीची सूचना देण्यासाठी १५ ठिकाणी अलार्म सिस्टिम उभारण्यात आली आहे.गुन्हा घडल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यापेक्षा गुन्हा घडूच नये,यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणा मजबूत करणे महत्त्वाचे आहे. सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांचा तपास,वाहतूक नियंत्रण तसेच संशयास्पद हालचालींवर तातडीने लक्ष ठेवणे शक्य होणार असून,महिला व मुलींच्या सुरक्षिततेलाही त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तुळजापूरला दररोज २५ ते ३० हजार,तर सुट्टीच्या दिवशी सुमारे ४० हजार भाविक भेट देतात असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,नवरात्र महोत्सवात ही संख्या लाखोंच्या घरात जाते.त्यामुळे शहराच्या विकासासोबतच सुरक्षिततेच्या पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे.आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक सुरक्षितपणे तुळजापूरमध्ये यावा,शांततेत दर्शन घ्यावे आणि सुरक्षितपणे आपल्या घरी परत जावा,ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,असे पालकमंत्र्यांनी नमूद केले.या प्रकल्पामुळे तुळजापूर अधिक सुरक्षित,शिस्तबद्ध आणि आधुनिक शहर म्हणून विकसित होण्यास मदत होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. श्रीमती.पाटील म्हणाल्या की,तुळजापुरला आलो की आपण आता सुरक्षित आहोत, ही भावना येथे आज लावलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पामुळे सिद्ध होईल. शहराच्या विकासासाठी आपले सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.शहराला या सीसीटीव्हि प्रकल्पामुळे सुरक्षितता येण्यास मदत झाली आहे.त्यामुळे गुन्हेगारीला व अनुचित प्रकाराला आळा घालण्यास मदत होणार असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,आज एका उत्कृष्ट प्रकल्पाचे लोकार्पण झाले आहे.आधुनिक प्रणालीत जिल्हा आघाडीवर आहे.जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा तत्पर आहे. सीसीटीव्ही तंत्रज्ञान अत्याधुनिक किती वापरले आहे.नवरात्रीच्या काळात ४० लाखांपेक्षा जास्त भाविक तुळजापूर येथे येतात.त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि कोणताही अनुचित प्रकार येथे घडवू नये यासाठी हा प्रकल्प शहरासाठी गेम चेंजर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून माहिती देताना पोलीस अधीक्षक श्रीमती.खोकर म्हणाल्या की,पोलिसांची सुरक्षा सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका आहे.बदलत्या काळानुसार गुन्हेगारी बदलत आहे.नवीन प्रकारचे गुन्हे घडत आहे.कोणताही गुन्हा घडतो तेव्हा सीसीटीव्ही फुटेज आहे का हे देखील विचारले जाते.त्यामुळे येथे सीसीटीव्ही फुटेज बसविण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला.जागतिक दर्जाचे हे श्रद्धास्थान आहे.भाविक व नागरिकांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.शहरात येणारी व जाणारी वाहने या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये निदर्शनास येणार आहे.त्यामुळे आता गुन्हे शोधण्यास मदत होणार आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सूचना पण देता येणार आहे.आधुनिक पद्धतीची सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आली आहे.धाराशिव पोलीस सुरक्षेसाठी तत्पर असल्याचे त्या म्हणाल्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ (सर्वसाधारण) अंतर्गत तुळजापूर शहर सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाच्या कोनशीलेचे तसेच सीसीटीव्ही कक्षाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.तर उपस्थितांचे त्यांच्या आभार अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी मानले. *******"*

धार्मिक,ऐतिहासिक वारशाचे जतन करून पिंपळा खुर्दच्या विकासाला गती देणार पालकमंत्री प्रताप सरनाईक

धार्मिक,ऐतिहासिक वारशाचे जतन करून पिंपळा खुर्दच्या विकासाला गती देणार पालकमंत्री प्रताप सरनाईक पिंपळा (खुर्द) येथील शंभू महादेव देवस्थानच्या नंदी आणि दीपस्तंभचे भूमिपजन धाराशिव दि.१४ ऑगस्ट ( जिमाका ) धाराशिव जिल्ह्याच्या विकासासोबतच जिल्ह्याच्या ऐतिहासिक,धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.पिंपळा खुर्द येथील श्री शंभू महादेव मंदिराला भविष्यात अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात,भाविकांची गैरसोय होऊ नये आणि या देवस्थानाची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी,यासाठी आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आज १४ ऑगस्ट रोजी तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्दपिंपळा (खुर्द) ता.तुळजापूर येथील शंभू महादेव देवस्थान पिंपळा खुर्द येथील देवस्थानच्या नंदी आणि दीपस्तंभचे भूमिपजन श्री. सरनाईक यांच्या हस्ते झाले.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती.अर्चना पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,सुमारे २ हजार वर्षांची ऐतिहासिक व आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या श्री शंभू महादेव मंदिराला हेमाडपंथी स्थापत्यकलेचा वारसा लाभला आहे.या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून आतापर्यंत सुमारे ५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मंदिराचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.स्वयंभू व जागृत शिवलिंगाच्या दर्शनासाठी धाराशिवसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक येतात. महाशिवरात्र,कावड मिरवणूक, छबिना,शिवकथा,भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताह,दिंडी सोहळे,महाप्रसाद तसेच दररोज हरिपाठ-भजन अशा विविध धार्मिक उपक्रमांमुळे हे मंदिर भक्ती,अध्यात्म आणि सामाजिक एकात्मतेचे केंद्र बनले आहे.असे त्यांनी सांगितले. श्री.सरनाईक पुढे म्हणाले की, मंदिर परिसरात उभारल्या जाणाऱ्या दीपस्तंभामुळे केवळ मंदिर परिसर उजळणार नाही,तर आपल्या श्रद्धेचा प्रकाश पुढील अनेक पिढ्यांपर्यंत घेऊन जाईल.या मंदिराचा परिसर शोभनीय करू तसेच बारजचा पुनरुत्थान करण्यात येईल.असे सांगितले. यावेळी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी मंदिराच्या विकासासाठी ११ लाख रुपये वैयक्तिक देणगीची घोषणा केली. श्रीमती.पाटील म्हणाल्या की, पालकमंत्री यांच्या माध्यमातून या गावाच्या विकासाला मदत होईल. ३० लाख रुपये मंदिर विकासासाठी जिल्हा परिषदेच्या तीर्थक्षेत्र विकासनिधीतून देण्यात येईल.येथील मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.साडेपाच कोटी रुपये लोकवर्गणीतून ग्रामस्थानी देवस्थान विकासासाठी दिले आहे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंदिराचे बांधकाम करणारे शिवाजीराव गुटे आणि जयकुमार देवस्थान बांधणारे यांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाला पिंपळा(खुर्द) चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालकमंत्री यांचे आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले. *****