Saturday, 3 December 2016

नोटाविरहित व्यवहारांचा उस्मानाबाद पॅटर्न



उस्मानाबाद,दि.3:- देशात 500 आणि 1000 रुपयांच्या   नोटांचे निश्चलनीकरण केल्यानंतर कॅशलेस अर्थव्यवस्था अंगिकारावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले आहे. पंतप्रधानाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅशलेस अर्थव्यवस्था होण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या एकूण 343 प्राथमिक शाळा व 117 उच्च माध्यमिक शाळेतील 5 ते 12 वी पर्यंतच्या एकूण 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना  ई-लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येक कौशल्य  विकास दिनी ई- बँकींग, मोबाईल बँकींग,  पेटीएम, एटीएम इत्यादींमार्फत कॅशलेस  व्यवहार कसा करायचा याबाबत विविध बँकांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रशिक्षण  दिले जाणार असल्याचे जिल्ह्यातील विविध बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा आग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. निलेश विजयकर , शिक्षणाधिकारी सचिन जगताप उपस्थित होते .

श्री. रायते म्हणाले की, रोखीने होणारे व्यवहाराचे प्रमाण कमी करून व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी आर्थिक व्यवहारात जास्तीत जास्त कॅशलेस पद्धतीचा वापर करावा. जिल्ह्यात ज्या गावांमध्ये बँकेच्या शाखेची सुविधा नाही अशा ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेचे व्यवहार करणे सोपे जावे या दृष्टीकोनातून बँकमित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

सर्वप्रथम सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांच्या बँक खात्यांची माहिती घेतली जाईल ज्या पाल्यांच्या पालकांचे बँकेत खाते नसतील अशांची खाते बँकेत उघडली जातील . प्रत्येक शनिवारी म्हणजेच कौशल्य विकास दिनी बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने शिक्षक ई-लर्निंगच्या माध्यमातून नेटबँकींग, मोबाईल बँकींग यासारख्या डिजिटल पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना सांगतील , ज्यामध्ये नोटांची निर्मिती कशी झाली ,  नोटांचा इतिहास , प्लॅस्टिक मनी ही संकल्पना , एटीएम कार्डबाबत माहिती एटीएम कार्डची  काळजी कशी घ्यायची ,  एटीएम कार्ड वापरण्याची पध्दत, एटीएम कार्डचे फायदे इत्यादींबाबतची माहिती इयत्ता 5 ते 12 वी पर्यंतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना  जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार आहे . यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निश्चलनीकरणाबाबतची भिती निघून जाईल तसेच  कॅशलेस पध्दतीबाबत जनजागृती होईल . याशिवाय  प्रत्येक विद्यार्थी शाळेत दिलेल्या प्रशिक्षणाची माहिती आपल्या पालकांना देतील त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधील ही निश्चलनीकरणाची व कॅशलेस व्यवहारांबाबतची भिती दूर होण्यास मदत होईल असे श्री. रायते पुढे म्हणाले .


या बैठकीस  विविध बँकांचे अधिकारी तसेच  जिल्हा सूचना व विज्ञान  केंद्राचे श्री. रुकमे , शिक्षणाधिकारी (माध्य)ए.एम. उकिरडे आदी उपस्थित होते .****


Friday, 2 December 2016

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2017-18 साठीच्या प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी प्रस्तावांची छाननी



          उस्मानाबाद,दि.2:- जिल्हा वार्षिक योजना  सन 2017-18 चा प्रारुप  आराखडा  तयार करण्यासाठी शासनाकडून  उस्मानाबाद  जिल्ह्याकरिता सर्वसाधारण  योजनांसाठी  एकूण 13,558 लक्ष ची  वित्तीय  मर्यादा  कळविण्यात  आली आहे .  जिल्ह्यासाठीच्या  वार्षिक  योजना वेळापत्रकाप्रमाणे तयार करुन  त्यास  लहान  गटाची  व तद्नंतर  जिल्हा नियोजन  समितीची  मान्यता घेऊन  नियोजन  विभागास  सादर  करण्याच्या शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार  आज दिनांक 2 डिसेंबर 2016 रोजी जिल्हा नियोजन समिती लहान गटाची बैठक संपन्न झाली .
            या बैठकीस  जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ,  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य  तथा आमदार (वि.स.स) श्री. ज्ञानराज चौगुले , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.सुभाष  गुंडा माळी ,  वैधानिक विकास  मंडळाचे सदस्य  श्री. बी.बी.ठोंबरे ,  अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुप शेंगुलवार हे उपस्थित होते .
            या बैठकीमध्ये  प्रत्येक  योजनेवर  सविस्तर चर्चा करण्यात आली   तसेच  प्रारुप आराखड्याची  छाननी लहान गटामार्फत  करण्यात आली तसेच  जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17  मध्ये  योजनानिहाय झालेला खर्च ,  उद्दिष्टे ,साध्य , कामाच्या  याद्या  व सन 2017-18 साठी प्रस्तावित  केलेल्या  कामाच्या याद्या  इत्यादींचा  सविस्तर आढावा घेण्यात आला .
            या बैठकीस  मुख्य लेखा व वित्त अधिकारी  एस.ए.शेटे , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रुपाली सातपुते ,  सहायक आयुक्त समाज कल्याण एस.एस. शेळके ,   जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.के. मिनगिरे उप आयुक्त जिल्हा पशुसंर्धन डॉ. एस.एस. भोसले , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.)  नवले , शिक्षणाधिकारी (माध्य)ए.एम. उकिरडे ,  कार्यकारी अभियंता  दत्तात्रय  देवकर , जिल्हा ग्रंथालय  अधिकारी श्री. प्रशांत पाटील ,   जिल्हा उपनिबंधक  के.बी. वाबळे,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत) अजिंक्य पवार ,  जिल्हा  प्रशासन अधिकारी  राजीव बुबणे,   जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व इतर  विभाग प्रमुख उपस्थित होते .

शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेती करुन स्वत:चा विकास साधावा -जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे



उस्मानाबाद,दि.2:-  उस्मानाबाद हा  जिल्हा अवर्षणग्रस्त  जिल्हा म्हणून  ओळखला जातो, यावर मात करण्यासाठी  येथील  शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीचा  अवलंब करुन स्वत:चा , जिल्ह्याचा  विकास साधावा असे आवाहन  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी आज येथे केले.
शेतीमध्ये  मजुरीवर  होणाऱ्या  खर्चात  बचत  करणे  व  मशागतीची कामे वेळेवर,जलदगतीने करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण  उपअभियान  ही योजना सन 2016-17 मध्ये उस्मानाबाद जिल्हयात राबविण्यात  येत  आहे. त्या अनुषंगाने  आज 2 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, येथे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हास्तरीय कार्यकारी  समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते .
या  बैठकीस जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम जमदाडे, कृषी विकास अधिकारी के.बी खोत, विभागीय  व्यवस्थापक  महाराष्ट्र  राज्य कृषि विकास महामंडळ श्री.एम.के पळसापुरे,  प्रकल्प उपसंचालक (आत्मा) व्ही.एम  हिरेमठ,  प्रकल्प समन्वयक सचिन सूर्यवंशी, कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूरचे डॉ.एम.एस फुलारी,कृषी महाविद्यालय, उस्मानाबाद  व  सर्व  तालुका कृषी  अधिकारी  जिल्हयातील  विविध  तालुक्यातील  शेतकरी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीला  जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी यांनी कृषी यांत्रिकीकरण  योजनेची  पार्श्वभूमी व  योजनेचा  उद्देश  याबाबत  सविस्तर मार्गदर्शन  केले.
या बैठकीमध्ये  जिल्हयातून  ट्रॅक्टर  या  घटकासाठी ज्या  शेतकऱ्यांनी  अर्ज  सादर केले होते. त्यांच्या उपस्थितीत व विविध शेतकऱ्यांच्या  हस्ते लॉटरी  पद्धतीने तालुकानिहाय, प्रवर्गनिहाय  लाभार्थ्यांची  निवड  करण्यात  आली.
सर्वप्रथम  उस्मानाबाद  तालुक्यातील  सर्वसाधारण  प्रवर्गातील  प्राप्त अर्जामधून श्रीमती  जिजाबाई  बापू जाधव रा. चिलवडी व श्री. राजेंद्र  किसनराव  देशमुख  पाटील रा. वरवंटी  यांची  निवड  लॉटरी  पद्धतीने  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या  हस्ते करण्यात आले. जिल्हयात  ट्रॅक्टर  या  बाबीसाठी  सर्वसाधारण  प्रवर्गासाठी  191 अर्ज  प्राप्त   झाले  होते. त्यापैकी  31  लाभार्थ्यांची  लॉटरी पद्धतीने  विविध  तालुक्यातून निवड  करण्यात  आली  व  58 लाभार्थ्यांची  ट्रॅक्टरसाठी  लॉटरी  पद्धतीने  तालुकानिहाय प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी उस्मानाबाद जिल्हयातून  19 अर्ज  प्राप्त  झाले होते.  त्यापैकी 12  लाभार्थ्याची  निवड  लॉटरी पद्धतीने विविध  तालुक्यातून  करण्यात आली व 7  लाभार्थ्यांची लॉटरी  पद्धतीने  तालुकानिहाय प्रतिक्षा यादी  तयार  करण्यात  आली.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व  इतर  औजारांचा लाभ  कृषी विभागाकडून  या  योजनेत मिळणार  आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी ते कोणत्या शेतकरी  गटात  समाविष्ठ  आहेत  व औजार  घेतल्यानंतर कोणकोणत्या  शेतकरी गटातील शेतकऱ्यांना या औजाराचा  लाभ  देणार आहेत याची  माहिती कृषि  विभागास सादर  करण्याच्या  सूचना दिल्या व  कृषी   विभागाने  अशा प्रकारची माहिती संकलित करावी असे सांगितले.
या  बैठकीचे  आभार  प्रदर्शन  कृषी उपसंचालक श्री.डी.  व्ही जाधवर यांनी केले. बैठक यशस्वी होण्यासाठी तंत्र अधिकारी श्री.बी.आर पवार, श्री.पी.एच धाईजे, कृषी सहाय्यक  यू. आर  लोणीकर यांनी परिश्रम घेतले.

आंबा बागायतदार शेतक-यांना आंबा बाग नोंदणीसाठी 31 डिसेंबर 2016 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


उस्मानाबाद दि.2:- उस्मानाबाद जिल्हयातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना युरोपियन देशांना आंबा निर्यात करू इच्छिणाऱ्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी त्यांच्या आंबा  बागाची कृषी विभागाच्या ग्रेपनेट योजनेतंर्गत नोंदनी करून घ्यावी, निर्यातीसाठी आंबा नोंदणी प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे. तसेच नोंदणी प्रमाणपत्र असल्याशिवाय युरोपियन देशांना आंबा निर्यात करता येणार नाहीत ज्यांना आंबा निर्यात करावयाचे नाहीत परंतु आपल्याच देशात चांगल्या  दरात  विकावयाची आहेत. त्यांनी देखील आंबा बाग नोंदणी करण्यास  हरकत नाही. नोंदणीकृत  बागेतील आंबा देशांतर्गत चांगले भाव मिळू शकतात.
            ज्या  शेतकऱ्यांना  आंबा  बागाची  नोंदणी  करावयाची आहे, त्यांनी  संबंधित तालुका कृषी अधिकारी/मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत व अर्जासोबत बागेचा स्थळदर्शक नकाशा सादर करावा.
            उस्मानाबाद  जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी आपल्याकडील  उत्पादीत  आंबा  युरोपियन  देशांना  निर्यात करणे देशांतर्गत चांगल्या दराने विक्री होण्यासाठी  आंबा बागेमधील  किटकनाशके/बुरशीनाशकाचे  उर्वरित अंश तपासणीसाठी आपल्या  बागेची  नोंदणी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे करावी. आंबा बागेची नोंदणी  पूर्ण  झाल्यानंतर  संबंधितांना  त्याबाबतचे  प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. युरोपियन  देशांना  आंबा निर्यात करण्यासाठी हे  प्रमाणपत्र  आवश्यक आहे.

नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज व चलनाचे शिर्ष संबंधित तालुका कृषी अधिकारी/मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध होतील तसेच संबंधित बागेचा 7/12 व स्थळदर्शक  नकाशासहित अर्ज करावेत याची नोंद घ्यावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी कळविले आहे. ***

Thursday, 1 December 2016

मार्च 2017 मध्ये होणाऱ्या 10 वीच्या परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्यास मुतदवाढ


            उस्मानाबाद,दि.1: - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेस नियमित प्रविष्ट होणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी  पुनर्परीक्षार्थी,नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले,पुर्वीचे खाजगी विद्यार्थी,श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट होणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर सादर करण्याच्या सुधारित तारखा खालीलप्रमाणे-
            माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा नियमित शुल्कासह दिनांक 4 नोव्हेंबर  ते 5 डिसेंबर 2016 पर्यंत राहील. तसेच  दिनांक 29 नोव्हेंबर  ते 5 डिसेंबर2016 या कालावधीत शाळांनी परीक्षा शुल्काचे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या एक्सेलशीटमध्ये प्रिंटींग कराव्यात, या परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरण्यासाठी आपल्या शाळेशी संपर्क साधावा. ऑनलाईन आवेदनपत्रे भरताना येणाऱ्या अडचणींबाबत मुख्याध्यापकांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.

शासन निर्णयानुसार ऑनलाईन आवेदनपत्रे भरताना विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाण नमूद करण्याची कार्यवाही  शाळांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करावी. इयत्ता 10 वी आवेदनपत्रे भरताना आधार कार्ड क्रमांक नमूद करण्याबाबत अनिवार्य केलेले असले तरी एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नोंदणी केलेली असेल तर नोंदणी क्रमांक देखील ग्राह्य धरण्यात येईल,नोंदणी केलेली नसेल तर निकालापर्यंत आधार कार्ड काढण्यात येईल असे विद्यार्थ्याने प्राचार्य/मुख्याध्यापकांना लेखी हमीपत्र देणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्ड क्रमांक नाही  म्हणून आवेदनपत्र भरले नाही असे होणार नाही. तसेच माध्यामिक शाळांनी बँकेत चलनाव्दारे शुल्क भरावयाच्या तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील, मार्च  2017 च्या परीक्षेसाठी प्रतीवर्षी मंडळामार्फत प्रिंट करून दिली जाणारी प्रिलिस्ट या वर्षापासून दिली जाणार नाही.सर्व माध्यमिक शाळानी ऑनलाईन प्रिलिस्ट प्रिंट करून   जनरल रजिस्टरप्रमाणे त्याची तपासणी करावी. तसेच त्यामध्ये काही दुरूस्त्या असल्यास ऑनलाईन पध्दतीने एडिट ऑप्शनद्वारे दि.19 डिसेंबर 2016 पर्यंत करण्यात याव्यात.असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.

एड्सग्रस्त रुग्णांसोबत होणारा भेदभाव व कलंक नाहीसा करावा- जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे


जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

उस्मानाबाद , दि. 1:- एड्सग्रस्त रुग्णांसोबत होणारा भेदभाव व कलंक शून्यावर आणावा, यापुढे समाजात एड्सचे नवीन इन्फेक्शन होणार नाही म्हणजेच हे प्रमाण शून्यावर आणावे व एचआयव्हीमुळे होणारे मृत्यूसुध्दा शून्यावर आणावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे आज येथे केले. जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय , आरोग्य विभाग जिल्हा परिषदइंडीयन मेडीकल असोसिएशन , काळजी व आधार केंद्र विहान व प्राईड  इंडीया स्पर्श यांच्या संयुक्त विद्यमाने आज  दिनांक 1 डिसेंबर रोजी भव्य रॅली काढण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. नारनवरे पुढे म्हणाले की,एचआयव्ही संसर्गित व्यक्तीबद्दल समाजामध्ये असणारी कलंक व भेदभावाची भावना शून्यावर आणण्यासाठी अशा व्यक्तींना स्विकारुन त्यांना समानतेची वागणूक देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे.एड्सने होणारे मृत्यू शून्यावर आणण्यासाठी सर्व एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना औषधोपचार उपलब्ध व्हावेत , यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.
जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य होऊ या सारे एकसंघ, करु या एचआयव्हीचा प्रतिबंध या भोवती सन 2016 चे जागतिक एड्स दिनाचे कार्यक्रम केंद्रीत होते. हँड्स  अप फॉर  एचआयव्ही प्रिव्हेंशन   या संकल्पनेवर सर्व स्तरावर एड्सला प्रतिबंध करण्याचे आवाहन करण्यात येत आहे तसेच निरोगी जीवन हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि त्यासाठी उपलब्ध आसणाऱ्या आरोग्य विषयक विशेषतः एचआयव्ही एड्स संबंधित सुविधांचा लाभ घेणे आवश्यक आहे त्यातून   रोगप्रतिबंधक उपचार, हिंसा नाही, शून्य कलंक व भेदभाव, हानी कमी करणे, एचआयव्हीसाठी औषधोपचार  ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी वैयक्तिक, सामाजिक व सरकारी पातळीवर जबाबदारी घेवून व जागरुक राहून सातत्याने नवीन एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठी युवक व तरुणांमध्ये जबाबदार लैंगिक वर्तणूक आणि सुरक्षित लैंगिक संबंधावर अधिकाधिक भर देणे महत्वाचे आहे व त्याचबरोबर वेगवेगळया माध्यमांतून योग्य संदेश जाणीवपूर्वक देणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले यांनी जागतिक एड्स दिनाचे महत्व विशद करताना सांगितले की, जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात रक्त तपासणी होत असून ग्रामीण भागातील लोकांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर एचआयव्ही पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. याबद्दल त्यांनी सर्व आयसीटीसी व जिल्हयातील सर्व रुग्णालयांचे कौतुक केले. गतिमान प्रतिबंधात्मक सेवा राबवून खऱ्या अर्थाने एड्सवर प्रतिबंधात्मक उपाय योजनेबद्दलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश साध्य करण्याचा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाकरीता प्रमुख उद्घाटक जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंद रायते, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी प्राधिकरण श्री.सुनील रा.पडवळ, नगर परिषद नगराध्यक्ष श्री.मकरंदराजे निंबाळकर, इन्स्पेक्टर मोटार व्हेईकल श्री.अभिजीत मांजरे, व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर पांचाळ, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आनंद सोपल, आरकेएस सदस्य श्री.अब्दुल लतीफ, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, संपादिका श्रीमती शिला उंबरे, नोडल ऑफीसर डॉ.सुजितकुमार रणदिवे, डॉ.सचिन देशमुख, श्री.गणेश काकडे,डॉ.निता चौगुले, श्रीमती सरस्वती थोरात, प्राचार्य नर्सिंग केंद्र श्री.कोराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात नर्सिंग स्कूल, आर.पी.ज्युनिअर अॅन्ड सिनिअर कॉलेज,के.टी.पाटील फार्मसी कॉलेज, के.टी.पाटील नर्सिंग कॉलेज, छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज, तेरणा कॉलेज, इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज, डॉ.शिवाजीराव घोगरे नर्सिंग कॉलेज व नवीन आरजीएनएम नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
            या कार्यक्रमामध्ये जिल्हयातील एचआयव्ही संसर्गित  जीवन जगणाऱ्या व्यक्ती, सामाजिक संस्था, विद्यार्थी व प्रवासी बांधव इत्यादींनी सहभाग नोंदविला. तसेच दिवसभर बसस्थानकामध्ये मोफत एचआयव्ही तपासणी व बसमध्ये एचआयव्हीविषयी जनजागृती करण्यात आली. संध्याकाळी 6 वाजता एचआयव्ही मुळे मृत्यु झालेल्या लोकांना श्रध्दांजली अर्पण करुन व जागतिक एड्स दिनाची शपथ घेवून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमानिमित्त चित्रकला ,निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या.या  स्पर्धेतून प्रथम,व्दितीय,तृतीय व उत्तेजणार्थ  आलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच नर्सिंग स्कूल व डॉ.शिवाजीराव घोगरे नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी होऊया सारे एकसंघ, करुया एचआयव्हीचा प्रतिबंध व शून्य गाठायचा आहे यावर विविध अंगानी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले व उपस्थित सर्व मान्यवरांनी पथनाट्याचे कौतुक केले.
सर्व उपस्थित विद्यालय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॉफी,प्रमाणपत्र व सन्मापत्र देवून तसेच इतर स्टेकहोल्डर्संना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच नाभिक मंडळाने एचआयव्ही कॅम्प घेण्याकरीता सहकार्य केले. एकूण 30 नागरिकांनी एचआयव्ही तपासणी करुन घेतली व नाभिक मंडळाचे अध्यक्ष श्री.लक्ष्मण माने व उपाध्यक्ष सचिन चौधरी तालुकाध्यक्ष यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डापकू विभागातील श्री.महादेव शितोळे व सागर शेळके, कार्यक्रम अधिकारी गणेश काकडे ,  पर्यवेक्षक  महादेव  शिनगारे  यांच्यासोबत एआरटी विभाग, आयसीटीसी विभाग, रक्तपेढी विभाग,सुरक्षा क्लिनीक विभाग, काळजी व आधार केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Wednesday, 30 November 2016

उपसंचालक माहिती यशवंत भंडारे यांची जिल्हा माहिती कार्यालयास सदिच्छा भेट


उस्मानाबाद,दि.30:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय  अंतर्गत औरंगाबाद  येथील मराठवाडा  विभागीय माहिती कार्यालयाचे प्र. संचालक तथा  लातूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे यांनी  आज दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्हा माहिती कार्यालयास  सदिच्छा भेट  देवून  अधिकारी /कर्मचारी यांना मार्गदर्शन करुन योग्य त्या सूचना दिल्या .
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप, प्र. माहिती सहायक श्रीमती आशा बंडगर, वरिष्ठ दूरचित्रवाणी यांत्रिक भिमा पडवळ , लिपिक दिलीप वाठोरे , सिनेयंत्रचालक आश्रुबा सोनवणे , वाहनचालक सिध्देश्वर कोंपले, रोनिओ ऑपरेटर अनिल वाघमारे, संदेशवाहक शशिकांत पवार , श्रीमती  चित्रा घोडके , श्रीमती उज्वला पवार व विलास माळी हे उपस्थित होते .
मार्गदर्शन करताना यावेळी यशवंत भंडारे म्हणाले की , माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये कामाचे स्वरुप हे टीमवर्क पध्दतीने करावयाचे आहे . म्हणून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने नवीन तंत्रज्ञान अवगत करुन प्रसिध्दीचे काम करावे ,राज्यातील शासन जनतेसाठी लोकोपयोगी योजना राबवित आहे . त्याची प्रसिध्दी जास्तीत जास्त होईल. यासाठी प्रयत्न करावेत . माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचे महत्व आपल्या जिल्ह्यात प्रसिध्दीच्या माध्यमाने विशद करावे .   
यावेळी  यशवंत भंडारे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे संवाद साधून या कार्यालयाचे कौतुक करुन पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या .

प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांनी  उपसंचालक यशवंत भंडारे यांचे कार्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . 

Tuesday, 29 November 2016

मुरघास युनिट योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


उस्मानाबाद.दि.29 :- राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत मुरघास युनिटची स्थापना करणे या योजनेचा लाभ जिल्हयातील ईच्छूक लाभार्थींनी अर्जाच्या स्वरुपातील प्रस्ताव नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे दि.30 नोव्हेंबर  ते 9 डिसेंबर 2016 पर्यंतच्या कालावधीत सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे अटी व शर्ती याबाबतचा तपशील  लाभार्थीशी  निगडीत असलेल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात व संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार)  पंचायत समिती यांच्याकडे  उपलब्ध आहे.  तरी ईच्छूकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे  आवाहन उपआयुक्त , जिल्हा पशुसंवर्धन यांनी केले आहे

शाळा-महाविद्यालयांनी शैक्षणिक सहलीसाठी राज्य परिवहन बसेसला प्राधान्य द्यावे


उस्मानाबाद,दि.29:- दरवर्षीप्रमाणे  यंदाही राज्य परिवहन  शाळांना  शैक्षणिक  सहलीसाठी  त्यांच्या  मागणीनुसार  राज्य  परिवहन  बस देण्याचे  नियोजन केले असून सुरक्षित व  किफायतशीर  प्रवासाच्या  दृष्टीने  सर्व  शाळा व महाविद्यालयांनी  प्राधान्याने राज्य परिवहन  बसेसचा शालेय  सहलीसाठी  वापर करावा असे, आवाहन परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 250 आगाराच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाळा-महाविद्यालयांनी संबंधित आगाराच्या आगार प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य परिवहनचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय  संचालक   रणजीत  सिंह  देवोल  यांनी  केले  आहे.
दिवाळी  सुट्टी  संपली  की,  शाळेच्या मुलांना  वेध लागतात  ते  शैक्षणिक  सवलतीचे अजंठा-वेरूळ , महाबळेश्वर-पाचगणी, मालवण,  तारकली  यासारख्या  जगप्रसिध्द पर्यटन स्थळांबरोबर मुंबई, पुणे  व  कोल्हापूरसारख्या   ऐतिहासिक  व  सांस्कृतिक  वारसा असलेल्या शहरांना भेट  देण्यासाठी  राज्यातील असंख्य शाळा दिवाळीनंतर शैक्षणिक सहलीचे आयोजन करतात.  शालेय सहलींसाठी राज्य परिवहन  महामंडळामार्फत   50 टक्के सवलतीप्रमाणे  बस  पुरविल्या  जातात.  विशेष  म्हणजे   या प्रासंगिक  कराच्या राज्य परिवहन बसेसला  वगळण्यात   आल्याने  शालेय  विद्यार्थ्यांना  अत्यंत  किफायतशीर   दरात  शालेय सहलीचा  आनंद  घेता  येतो.
खाजगी  बसच्या असुरक्षित वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित प्रवाशांसाठी विद्यार्थ्यांच्या पालकाकडून आग्रह धरला जातो. त्यामुळे वर्षांगणिक राज्य परिवहनच्या   बसची  संख्या  शैक्षणिक  सवलतीसाठी  वाढत असल्याचे  दिसून येते. मागील वर्षी 15 हजार  388  इतक्या  राज्य  परिवहन  बस  शैक्षणिक  सहलीसाठी  करारबध्द  झाल्या होत्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित


            उस्मानाबाद,दि.29:- सन 2017 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात  येणाऱ्या  परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक  आयोगाकडून निश्चित  करण्यात आले असून हे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे .

             तांत्रिक सहायक परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, राज्य सेवा परीक्षा 2017,   पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2017, लिपिक-टंकलेखक परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2017, दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क गट-क परीक्षा 2017, महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2017, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2017, सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017, सहायक कक्ष अधिकारी-विक्रीकर निरीक्षक- पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा 2017, महाराष्ट्र कृषि सेवा परिक्षा 2017 आणि विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 इत्यादी परीक्षा सन 2017 मध्ये आयोगामार्फत घेण्यात येणार आहेत .****       

Monday, 28 November 2016

उस्मानाबाद जिल्हयातील आठ नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार जाहीर

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2016-17

       उस्मानाबाद, दि.28:- जिल्हयातील आठ नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक 2016 चे  अनुषंगाने आज दि. 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून विजयी नगराध्यक्षांची नावे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी  पुढीलप्रमाणे कळविली आहेत--
          उस्मानाबाद नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार श्री. मकरंद शूरसेन राजेनिंबाळकर(शिवसेना), तुळजापूर  नगरपरिषद नगराध्यक्ष  अर्चना विनोद गंगणे (राष्ट्रवादी कॉग्रेस), नळदूर्ग  नगरपरिषद नगराध्यक्ष श्रीमती.रेखाताई जगदाळे(राष्ट्रवादी कॉग्रेस), उमरगा नगरपरिषद नगराध्यक्ष श्रीमती. प्रेमलता टोपगे(काँग्रेस), मुरूम नगरपरिषद  नगराध्यक्ष श्रीमती. अनिता सुधीर अंबर(काँग्रेस), कळंब  नगरपरिषद नगराध्यक्ष श्रीमती.सुवर्णा मुंढे(राष्ट्रवादी कॉग्रेस), भूम  नगरपरिषद नगराध्यक्ष श्रीमती. सुप्रिया वारे (राष्ट्रवादी कॉग्रेस)व परंडा नगरपरिषद नगराध्यक्ष  पदाचे  विजयी  उमेदवार  झाकीर सौदागर (राष्ट्रवादी कॉग्रेस)आहेत.
नगरपरिषदेच्या या निवडणूकीत एकूण 166 उमेदवारांनी आपले नशिब आजमावले. उस्मानाबाद नगरपरिषदेकरिता एकूण 39 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी राष्ट्रवादी कॉग्रेस  पक्षाचे 17, कॉग्रेस पक्षाचे 2, भारतीय जनता पक्षाचे  8, शिवसेनेचे 11 तर अपक्ष 1 उमेदवार विजयी झाले. तुळजापूर नगरपरिषदेकरिता एकूण 20 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी राष्ट्रवादी कॉग्रेस  पक्षाचे 13, कॉग्रेस पक्षाचे 0, भारतीय जनता पक्षाचे  0, शिवसेनेचे 0,अपक्ष 6 तर  शेतकरी कामगार पक्षाचे 1 उमेदवार विजयी झाले. नळदूर्ग नगरपरिषदेकरिता एकूण 17 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी राष्ट्रवादी कॉग्रेस  पक्षाचे 12, कॉग्रेस पक्षाचे 5, भारतीय जनता पक्षाचे  0, शिवसेनेचे 0 तर अपक्ष 0उमेदवार विजयी झाले. उमरगा नगरपरिषदेकरिता एकूण 22 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी राष्ट्रवादी कॉग्रेस  पक्षाचे 3, कॉग्रेस पक्षाचे 8, भारतीय जनता पक्षाचे  7, शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झाले. मुरुम नगरपरिषदेकरिता एकूण 17 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी राष्ट्रवादी कॉग्रेस  पक्षाचे 0, कॉग्रेस पक्षाचे 15, भारतीय जनता पक्षाचे  0, शिवसेनेचे 2तर अपक्ष 0 उमेदवार विजयी झाले. कळंब नगरपरिषदेकरिता एकूण 17 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी राष्ट्रवादी कॉग्रेस  पक्षाचे 11, कॉग्रेस पक्षाचे 6, भारतीय जनता पक्षाचे  0, शिवसेनेचे 0तर अपक्ष 0 उमेदवार विजयी झाले.  भूम नगरपरिषदेकरिता एकूण 17 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी राष्ट्रवादी कॉग्रेस  पक्षाचे 14, कॉग्रेस पक्षाचे 3, भारतीय जनता पक्षाचे  0, शिवसेनेचे 0 तर अपक्ष 0 उमेदवार विजयी झाले.  परंडा नगरपरिषदेकरिता एकूण 17 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी राष्ट्रवादी कॉग्रेस  पक्षाचे 9, कॉग्रेस पक्षाचे 0, भारतीय जनता पक्षाचे  4, शिवसेनेचे 4 तर अपक्ष 0 उमेदवार विजयी झाले.

जिल्हयातील आठही नगरपरिषदेच्या  मतदान मोजणीच्या ठिकाणी कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी जिल्हा  प्रशासनाकडून योग्य तो  बंदोबस्त  ठेवण्यात  आला होता. कोठेही  अनुचित  प्रकार न घडता  मतमोजणी  शांततेत  पार  पडली.  नगरपरिषदेच्या  आठही नगराध्यक्ष  पदाच्या  विजयी  उमेदवाराचे  प्रशासनामार्फत अभिनंदन  करण्यात  आले.

Sunday, 27 November 2016

उस्मानाबाद जिल्हयातील आठ नगरपरिषदांच्या निवडणुकीत सरासरी 68.36 टक्के मतदान





नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2016-17

       उस्मानाबाद, दि.27:- जिल्हयातील आठ नगरपरिषदेत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीचे मतदान आज शांततेत व सुरक्षित पार पडले. जिल्हयातील एकूण आठ नगरपरिषदेच्या  निवडणुकीत दोन लाख अकरा हजार तीनशे दोन  पैकी एक लाख चव्वेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून मतमोजणी सोमवार दि. 28 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10-00 वाजता चालू होणार आहे.
          जिल्हयातील उस्मानाबाद नगरपरिषदेत सरासरी 60.32 टक्के, तुळजापूर 85.57 टक्के, नळदूर्ग 71.49 टक्के, उमरगा 64.51 टक्के, मुरूम 66.98 टक्के, कळंब 72.05 टक्के, भूम 75.16 टक्के  तर  परंडा  नगरपरिषदेत  76.31  टक्के  मतदान  झाले आहे.
          जिल्हयातील आठ  नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज सकाळी 7-30 ते 5-30  या  वेळेत पार  पडली.  त्यासाठी  जिल्हा  प्रशासनाने काटेकोरपणे  नियोजन केले होते. निवडणूक  प्रक्रिया  शांततेत  व  सुव्यवस्थेत  पार  पडली  यासाठी  चोख  पोलीस  बंदोबस्तासह संपूर्ण मतदान  प्रक्रियेवर  कॅमेऱ्यांचीही  नजर  होती, असे जिल्हा निवडणूक  अधिकारी  तथा  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत  नारनवरे  यांनी सांगितले.

मतमोजणीकरिता प्रशासनाचे काटेकोर नियोजन, चोख बंदोबस्त

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2016-17

          उस्मानाबाद नगरपरिषद निवडणूक 2016 ची मतमोजणी सोमवार दि.28 रोजी सकाळी 10-00 वाजल्यापासून सुरू होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने  काटेकोर नियोजन केले असून  चोख बंदोबस्तही  ठेवला आहे.
          उस्मानाबाद नगरपरिषदेची  मतमोजणी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे ,तुळजापूर नगरपरिषदेची  मतमोजणी  श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे,  कळंब नगरपरिषदेची  मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे, भूम नगरपरिषदेची  मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था , परंडा नगरपरिषदेची  मतमोजणी नगरपरिषद कार्यालय (नवी इमारत) येथे, मुरूम नगरपरिषदेची  मतमोजणी मुरूम एन. पी सभागृह येथे, नगरपरिषदेची  मतमोजणी  अंतुबली सभागृह येथे तर नळदूर्ग   नगरपरिषदेची  मतमोजणी  एन. पी सभागृह येथे सकाळी  10-00 वाजल्यापासून सुरू  होईल, त्या  अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी  तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी  मतमोजणीसाठीच्या तयारीबाबत आज विविध  यंत्रणांना काटेकोरपणे  नियोजनाचे निर्देश दिले तसेच  मतमोजणीसाठीच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेवून पोलीस बंदोबस्तही चोख  ठेवण्याबाबत  पोलीस दलाला आवश्यक त्या सूचना  दिल्या.