Friday, 27 February 2026

*क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा* टीबी फोरम आणि टीबी कॉमोरबिडिटी समितीची बैठक

*क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा* टीबी फोरम आणि टीबी कॉमोरबिडिटी समितीची बैठक धाराशिव दि.२७ फेब्रुवारी (जिमाका) क्षयरोग दूर करण्यासाठी जास्तीत जास्त संशयित लोकांची तपासणी करणे व निदान झालेल्या क्षयरुग्णांना तात्काळ औषधोपचाराखाली आणणे हा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.त्यानुसार आरोग्य विभागाने संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित औषधोपचाराखाली आणावे तसेच मृत्यू झालेल्या क्षयरुग्णांचे डेथ ऑडिट करावे,अशा सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच आयोजित टीबी डेथ Surveillance आणि Response समिती,टीबी फोरम तसेच टीबी कॉमोरबिडिटी समितीच्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.मिटकरी,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.फुलारी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की,टी.बी.मुक्त भारत अभियानांतर्गत सर्व Key Population ची एक्स-रे तपासणी करावी व क्षयरुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचाराखाली आणून पूर्णपणे बरे करावे.सन २०२६ साठी जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची पडताळणी करण्यात आली असून त्यापैकी ४३२ ग्रामपंचायती टीबी मुक्त ग्रामपंचायत प्रमाणपत्रासाठी पात्र ठरल्या आहेत.हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे. पुढील महिन्यात २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना ‘फूड बास्केट’ वाटप करावयाचे असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यासाठी ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे. 000000

पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर ६ मार्च रोजी पंचायत समिती सभापती - उपसभापती पदाची निवडणूक

पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर ६ मार्च रोजी पंचायत समिती सभापती - उपसभापती पदाची निवडणूक धाराशिव दि.२७ फेब्रुवारी (जिमाका) जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक संबंधित पंचायत समिती सभागृहात दिनांक ६ मार्च रोजी दुपारी ०२.०० वाजता होणार आहे. पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील – दिनांक ६ मार्च रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारणे; दुपारी २.०० वाजता सभेस सुरुवात करणे. सभा खालीलप्रमाणे पार पडणार आहे.दुपारी २.०० ते २.१५ वाजेपर्यंत प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी; दुपारी २.१५ वाजता वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची नावे वाचून दाखवणे; दुपारी २.१५ ते २.३० वाजता उमेदवारी परत घेणे; दुपारी २.३५ वाजता उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करणे; दुपारी २.४० वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वाचून दाखवणे; तसेच दुपारी २.४० ते कामकाज संपेपर्यंत आवश्यक असल्यास प्रथम पंचायत समिती सभापती पदासाठी व नंतर उपसभापती पदासाठी मतदान घेऊन निवडणुकीचा निकाल जाहीर करणे इत्यादी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यानुसार प्रथम पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात येणार असून,त्यानंतर लगेच त्याच पद्धतीचा अवलंब करून पंचायत समिती उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. 0000000

१३ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक

१३ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक धाराशिव दि.२७ फेब्रुवारी (जिमाका) जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 मार्च रोजी दुपारी २ वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. – दिनांक १३ मार्च रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्विकारणे, दुपारी २ वाजता सभेस सुरुवात करणे,ही सभा खालीलप्रमाणे पार पडेल, दुपारी २ ते २.१५ वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्राप्त नामनिर्देशन पत्राची तपासणी,नामनिर्देशन पत्राची छाननी, दुपारी २.१५ वाजता वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवाराची नावे वाचून दाखवणे,दुपारी २.१५ ते २.३० वाजता उमेदवारी परत घेणे,दुपारी २.३५ वाजता उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवाराची नावे वाचून दाखवणे, दुपारी २.४० वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची नावे वाचून दाखवणे,दुपारी २.४० ते कामकाज संपेपर्यंत आवश्यक असल्यास मतदान प्रथम अध्यक्ष पदासाठी व नंतर उपाध्यक्ष पदासाठी होणार आहे.त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल यानुसार प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे.त्यानंतर लगेच त्याच पध्दतीचा अवलंब करुन जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे. 0000000

१ मार्च रोजी भव्य विधी सेवा शिबिर व शासकीय योजनांचा लेडीज क्लब येथे महामेळावा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा विधी सेवा प्राधिकरणचे आवाहन

१ मार्च रोजी भव्य विधी सेवा शिबिर व शासकीय योजनांचा लेडीज क्लब येथे महामेळावा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा विधी सेवा प्राधिकरणचे आवाहन धाराशिव दि.२७ फेब्रुवारी (जिमाका) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव व जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ मार्च २०२६ रोजी लेडीज क्लब,धाराशिव येथे सकाळी १० वाजता भव्य विधी सेवा शिबिर व विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. न्यायमूर्ती श्री.शैलेश ब्रम्हे,उच्च न्यायालय मुंबई,खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती धाराशिव यांच्या हस्ते,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती. अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व पोलीस अधीक्षक श्रीमती.रितू खोखर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महामेळावा होणार आहे. विविध स्टॉल्सच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती वंचित, दुर्बल व गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे व त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.मेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद अंतर्गत विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय,पशुसंवर्धन कार्यालय, आरोग्य विभाग,शिक्षण विभाग, कृषी विभाग,समाजकल्याण विभाग,महिला व बालविकास विभाग,मत्स्यव्यवसाय विभाग, आदिवासी विकास विभाग,प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) तसेच इतर संबंधित विभागांमार्फत विविध योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.या महामेळाव्यात विविध कायदेविषयक अधिकार व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वितरणही करण्यात येणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती.अभिश्री देव व सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू व्यक्तींनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा तसेच मोफत विधीसेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे. *****

कुसुमाग्रज तसेच इतर मराठी साहित्यिकांच्या साहित्याचे विशेष ग्रंथ प्रदर्शन भरवून “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

कुसुमाग्रज तसेच इतर मराठी साहित्यिकांच्या साहित्याचे विशेष ग्रंथ प्रदर्शन भरवून “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा धाराशिव दि.२७ फेब्रुवारी (जिमाका) मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून आज उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग,जिल्हा परिषद व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व दीपप्रज्वलन करून विविध विषयांवरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य समाधान शिकेतोड यांच्या “मुलांना वाचतं लिहितं करताना” आणि कवयित्री भाग्यश्री देवकते यांच्या “शब्दप्रभा” या कविता संग्रहाचे प्रकाशन तसेच ज्ञानकिरण सामाजिक संस्थेच्या विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच परिसंवादाचेही आयोजन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र खंदारे,सुप्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र अत्रे,युवराज नळे,जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य समाधान शिकेतोड,कवयित्री सुनिता गुंजाळ, भाग्यश्री देवकते,जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे,पत्रकार अनिल आगलावे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी श्री.कडवकर यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन व्यवहारात मराठीतच संवाद साधण्याचे आवाहन केले.मराठीतील मान्यवर लेखक व कवी यांचे स्मरण ठेवून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबतच अवांतर वाचनाची सवय जोपासावी,असे प्रतिपादन त्यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कुसुमाग्रज तसेच इतर मराठी साहित्यिकांच्या साहित्याचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी भाषा समिती सदस्य भैरवनाथ कानडे यांनी केले,तर महसूल सहायक कल्पना काशिद यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी,शालेय विद्यार्थी,स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ००००००

Thursday, 26 February 2026

बनावट परिवहन वेबसाइट्स व खोट्या e-चलन लिंकपासून सावध रहा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

बनावट परिवहन वेबसाइट्स व खोट्या e-चलन लिंकपासून सावध रहा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन धाराशिव दि.२६ फेब्रुवारी (जिमाका) परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की,अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स,वाहन नोंदणी, ई-चलन आदी सेवांशी संबंधित बनावट वेबसाइट्स,फसवे मोबाईल अॅप्स (APK) तसेच मोबाइल SMS/WhatsApp द्वारे पाठविण्यात येणाऱ्या खोट्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे.या प्रकारांमुळे वाहन चालक व मालकांची आर्थिक फसवणूक,वैयक्तिक माहितीची चोरी तसेच ओळख गैरवापराच्या घटना वाढत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व वाहन चालक/मालकांनी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत संकेतस्थळे पुढीलप्रमाणे आहेत : १) वाहन नोंदणी सेवा (VAHAN) – https://vahan.parivahan.gov.in २) ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) – https://sarathi.parivahan.gov.in ३) परिवहन सेवा – https://www.parivahan.gov.in ४) ई-चलन पोर्टल – https://echallan.parivahan.gov.in वरील सर्व अधिकृत संकेतस्थळे “.gov.in” या डोमेनने समाप्त होतात. “.com”, “online”, “site”, “in” अशा डोमेनवरील कोणतीही संशयास्पद वेबसाइट नागरिकांनी उघडू नये,असे स्पष्ट करण्यात आले आहे. फसवणूक करणाऱ्यांकडून पाठविले जाणारे संदेश प्रामुख्याने खालीलप्रमाणे असतात : – आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड न भरल्यास कारवाई होईल, अशी धमकी देत अनधिकृत लिंक पाठविणे. – “DL (वाहन चालविण्याचा परवाना) सस्पेंड होणार आहे. त्वरित तपासणी करा.”अशा प्रकारचे संदेश पाठविणे. परिवहन विभाग किंवा RTO कार्यालयाकडून नागरिकांच्या मोबाईलवर कधीही WhatsApp किंवा इतर मोबाईल अॅपद्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही,याची विशेष नोंद घ्यावी,असेही विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan_Pay.apk” अशा अनधिकृत APK अॅप्स किंवा लिंक डाउनलोड करू नयेत.अशा अॅप्सच्या माध्यमातून OTP, बँकिंग माहिती तसेच मोबाईलमधील इतर संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास नागरिकांनी तात्काळ पुढील ठिकाणी तक्रार नोंदवावी : – नॅशनल सायबर क्राईम पोर्टल – https://www.cybercrime.gov.in – सायबर फसवणूक हेल्पलाइन – १९३० ही आहे.सर्व वाहन चालक,मालक तसेच नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहून योग्य ती दक्षता घ्यावी. अधिकृत माहितीसाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा वाहतूक विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे. ******************

Wednesday, 25 February 2026

कळंब येथे २७ फेब्रुवारी रोजी आरटीओचे वाढीव शिबीर

कळंब येथे २७ फेब्रुवारी रोजी आरटीओचे वाढीव शिबीर धाराशिव दि.२५ फेब्रुवारी (जिमाका) नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी दरमहा तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिवमार्फत करण्यात येत असते.फेब्रुवारी-२०२६ या महिन्यात कळंब येथे होणारे वाढीव शिबीर कार्यालय दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजित ठिकाणी कळंब येथे होणार असून, संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी व शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे. ******

Tuesday, 24 February 2026

धाराशिवमध्ये १ मार्च रोजी भव्य विधी सेवा शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

धाराशिवमध्ये १ मार्च रोजी भव्य विधी सेवा शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन धाराशिव दि.२४ फेब्रुवारी (जिमाका) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव,जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव व जिल्हा परिषद, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ मार्च २०२६ रोजी श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल,धाराशिव येथे भव्य विधी सेवा शिबिर व विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.न्यायमूर्ती श्री.शैलेश ब्रम्हे,उच्च न्यायालय मुंबई,खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती धाराशिव यांच्या हस्ते, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती.अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व पोलीस अधीक्षक श्रीमती.रितू खोखर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महामेळावा होणार आहे. विविध स्टॉल्सच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती वंचित,दुर्बल व गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे व त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. मेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद अंतर्गत विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय,पशुसंवर्धन कार्यालय,आरोग्य विभाग,शिक्षण विभाग,कृषी विभाग, समाजकल्याण विभाग,महिला व बालविकास विभाग,मत्स्यव्यवसाय विभाग,आदिवासी विकास विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) तसेच इतर संबंधित विभागांमार्फत विविध योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.या महामेळाव्यात विविध कायदेविषयक अधिकार व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून,पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वितरणही करण्यात येणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती अभिश्री देव व सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू व्यक्तींनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा तसेच मोफत विधीसेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे. ******

मातृभाषेचा गौरव : २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रम

मातृभाषेचा गौरव : २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रम धाराशिव दि.२४ फेब्रुवारी (जिमाका) ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या २७ फेब्रुवारी या जयंतीदिनानिमित्त “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून,मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.त्यांच्या कार्याचा सन्मान आणि स्मरण म्हणून त्यांचा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्याचे मुख्य धोरण मराठी भाषा विभागाने निश्चित केले आहे. या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना “घेवू या एकच वसा, मराठीला बनवू या ज्ञानभाषा” अशी असून,विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरव करण्यात येणार आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जिल्ह्यातील मराठी भाषा साहित्यिकांच्या सहभागातून ‘मातृभाषेचे व्यक्तीगत व समाजजीवनातील स्थान’ या विषयावर मराठी भाषा साहित्य परिसंवाद व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे. *****

Monday, 23 February 2026

जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त बालविवाहविरोधी जनजागृती ; विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन

जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त बालविवाहविरोधी जनजागृती ; विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन धाराशिव दि.२४ फेब्रुवारी (जिमाका) जागतिक सामाजिक न्याय दिन (२० फेब्रुवारी) निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव आणि श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाहमुक्त भारत आपला संकल्प अभियान व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले.हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा न्या.भाग्यश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह म्हणजे काय याची सविस्तर माहिती दिली.आपल्या गावात,शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये बालविवाह होत असल्यास तो त्वरित रोखावा,असे आवाहन त्यांनी केले. बालविवाहाबाबत माहिती देण्यासाठी १०९८ या मोफत मदत क्रमांकावर संपर्क साधावा किंवा पोलिसांना कळवावे,असेही त्यांनी सांगितले. बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी समाजातील प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.एखाद्या मुलीला किंवा मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवणे,अयोग्य हातवारे करणे यांसारखी कृत्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजना व ‘नालसा-मुलांसाठी बालस्नेही कायदेविषयक सेवा योजना, २०२४’ याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे,उपप्राचार्य संतोष घासे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम,ॲड. विश्वजीत शिंदे (पॅनल विधिज्ञ) व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक एस.सी.पाटील यांनी केले,तर कार्यक्रमाच्या फलप्राप्तीचे महत्त्व अधोरेखित करत आभार प्रदर्शन के.पी.पाटील यांनी मानले. कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते. ******

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू : १० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू : १० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन धाराशिव दि.२४ फेब्रुवारी (जिमाका) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी स्वयंअर्थसहाय्यित व विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या प्रवेशासाठी १७ फेब्रुवारी २०२६ ते १० मार्च २०२६ या कालावधीत https://student.maharashtra.gov.in/adm_portal� या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. पालकांनी केवळ एकच ऑनलाईन अर्ज भरावा.अर्ज भरताना शाळेपासून घरापर्यंतचे अंतर गुगल मॅपद्वारे अचूक नोंदवावे.निवासाचा पत्ता,जन्मदिनांक, जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,फोटो आयडी,दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी माहिती अचूक व खरी भरावी.चुकीची माहिती भरल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.तसेच प्रवेशासाठी विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी. वंचित गटात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,वि.जा.(अ),भटक्या जमाती (ब),भटक्या जमाती (क),भटक्या जमाती (ड),इतर मागासवर्ग (OBC),विशेष मागास प्रवर्ग (SBC),दिव्यांग,अनाथ तसेच एच.आय.व्ही.बाधित/प्रभावित बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. मागासवर्गीय बालकांसाठी वडील किंवा बालकाचा जातीचा दाखला तहसिलदार किंवा उपजिल्हाधिकारी यांचा असावा. परराज्यातील जातीचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही.दुर्बल गटामध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ किंवा २०२४-२५ मधील वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असलेला तहसिलदाराचा उत्पन्न दाखला आवश्यक आहे.पगारदार पालकांसाठी कंपनी किंवा मालकाचा पगाराचा दाखलाही ग्राह्य धरला जाईल. निवासी पुराव्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील स्वतःच्या मालकीच्या निवासाबाबत रेशन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स,बीएसएनएल टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक/घरपट्टी,मतदान ओळखपत्र,पासपोर्ट किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल.स्वतःचे घर नसल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाचा फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वी किमान ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार आवश्यक आहे.भाडेकरारातील पत्त्यावर वास्तव नसल्यास पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका/अंगणवाडी/बालवाडीचा दाखला तसेच पालकांचे स्वयंनिवेदन ग्राह्य धरले जाईल. दिव्यांग बालकांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे किमान ४० टक्के दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे.अनाथ बालकांसाठी बालसुधारगृहाची कागदपत्रे आवश्यक राहतील.घटस्फोटीत महिलांसाठी न्यायालयीन निर्णय किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणाचा पुरावा तसेच बालकांच्या आईचे संबंधित अभिलेख आवश्यक आहेत.विधवा महिलांसाठी पतीचा मृत्यू दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.एकल पालक (सिंगल पॅरेंट) पर्याय निवडल्यास संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीची आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरली जातील. आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.आई किंवा वडिलांचे आधारकार्ड (अनाथ बालकांच्या बाबतीत सांभाळ करणाऱ्या पालकांचे आधारकार्ड) बालकाचे जन्म प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा.भाडे तत्त्वावर राहणाऱ्यांसाठी नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत. सामाजिक वंचित घटकांसाठी जातीचा दाखला व अपंगत्व प्रमाणपत्र (परराज्यातील दाखले ग्राह्य नाहीत). आर्थिक दुर्बल गटासाठी २०२३-२४ किंवा २०२४-२५ मधील १ लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला.पालकांना ऑनलाईन प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झाल्यानंतर अलॉटमेंट लेटर स्वतःच्या लॉगिनवरून डाउनलोड करून गटशिक्षण कार्यालयाच्या पडताळणी समितीकडे अर्ज व कागदपत्रांसह सादर करावे. पात्र ठरल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा.पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करावे.अधिक माहितीसाठी किंवा अडचणींसाठी गटशिक्षण कार्यालय किंवा शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) रवींद्र खंदारे यांनी केले आहे. ******

गुरु तेग बहादूर यांच्या शौर्यगाथेचे समूहगानातून अभिवादन ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त कणकवलीत प्रेरणादायी उपक्रम

गुरु तेग बहादूर यांच्या शौर्यगाथेचे समूहगानातून अभिवादन ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त कणकवलीत प्रेरणादायी उपक्रम सिंधुदुर्गनगरी, दि. 23 फेब्रुवारी (जिमाका) :- श्री गुरु तेग बहादूर यांनी तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या या अद्वितीय बलिदानामुळे भारताच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक अस्मितेचे रक्षण झाले. शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा गौरवशाली इतिहास जनतेपर्यंत पोहोचवत आहे. आजच्या समूहगानातून आपण गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करत असून या उपक्रमातून नवप्रेरणा मिळत असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या. ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त हा समूहगान उपक्रम कणकवली येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला येथे घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, धर्मनिरपेक्षता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा निर्माण झाली. या प्रसंगी तहसिलदार दिक्षांत देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, शिक्षणाधिकारी कविता शिंपी, मुख्याधिकारी गौरी पाटील, तसेच मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची माहिती नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचते, असे मत व्यक्त केले. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर हे शीख धर्मातील नववे गुरु होते. त्यांच्या जीवनकार्याने धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि त्याग यांचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले. प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार धर्म आचरण करण्याचा अधिकार आहे, ही त्यांची ठाम भूमिका होती. स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजहित मोठे मानावे. गरजूंना मदत करणे, दु:खींचे दुःख दूर करणे ही खरी ईश्वरभक्ती आहे. जात, पंथ, भाषा या पलीकडे सर्व मानव एकसमान आहेत. परस्परांप्रती आदर, करुणा आणि सहिष्णुता राखणे आवश्यक आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. गुरु तेग बहादूर यांच्या शिकवणीमधून आपल्याला धैर्य, सहिष्णुता आणि मानवतेचा मार्ग मिळतो. त्यांचे जीवन हे धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठीच्या बलिदानाचे तेजस्वी प्रतीक आहे असेही त्या म्हणाल्या. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामूहिकरित्या प्रेरणादायी गीत सादर केले. सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादर केलेले गीत समूहगानातून गायले गेले. या गीताच्या माध्यमातून गुरुंच्या त्याग, शौर्य, धर्मस्वातंत्र्य व मानवतेच्या मूल्यांची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली. ०००००००

Sunday, 22 February 2026

७० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ विशेष मोहीम; १३ मार्चपर्यंत गावनिहाय राबविणार

७० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ विशेष मोहीम; १३ मार्चपर्यंत गावनिहाय राबविणार धाराशिव,दि.२२ फेब्रुवारी (जिमाका) एकत्रित Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana अंतर्गत ७० वर्षे व त्यावरील नागरिकांचे “आयुष्मान वय वंदना कार्ड” निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागात गावनिहाय व शहरी भागात वॉर्डनिहाय विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. सध्या जिल्ह्यात ७० वर्षे व त्यावरील ९७ हजार ७४१ लाभार्थी पात्र असून त्यापैकी १४,८३८ (१५ टक्के) लाभार्थ्यांचे आयुष्मान वय वंदना कार्ड ई-केवायसी पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी आशा कर्मचारी,स्वस्त धान्य दुकान चालक तसेच आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रती यशस्वी ई-केवायसीसाठी २० रुपये व आयुष्मान कार्ड वितरणासाठी १० रुपये असे एकूण ३० रुपये मानधन देण्याबाबत शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत उपचाराचा लाभ मिळतो. तसेच ७० वर्षे व त्यावरील “आयुष्मान वय वंदना कार्ड” धारकांना प्रति लाभार्थी प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत २३९९ आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया व उपचार सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा जिल्ह्यातील २७ खाजगी व १३ शासकीय अशा एकूण ४० रुग्णालयांमध्ये तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ग्रामपंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र,CSC केंद्र,रेशन दुकानदार, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड मोफत काढून देण्यात येणार आहे.७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी “आयुष्मान वय वंदना कार्ड” काढून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे. सदर विशेष मोहीम २० फेब्रुवारी ते १३ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.संबंधित कर्मचारी गाव,वॉर्ड,वाडी,वस्ती, शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन आयुष्मान कार्डचे ई-केवायसी करणार आहेत. लाभार्थ्यांना स्वतःही ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अँड्रॉईड मोबाईलमध्ये आयुष्मान अॅप डाउनलोड करून ‘Beneficiary’ बटनवर क्लिक करून लाभार्थी स्वतःचे ई-केवायसी करू शकतात. तसेच ‘Operator Login’ मधून “For Senior Citizens of the age of Seventy years & Above – CLICK HERE TO ENROLL” या पर्यायाद्वारे “आयुष्मान वय वंदना कार्ड” काढता येणार आहे.अन्यथा ग्रामपंचायत, CSC केंद्र,आशा स्वयंसेविका, रेशन दुकानदार किंवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधूनही ई-केवायसी करून घेता येईल. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली गावनिहाय नियोजन करण्यात आले असून सर्व विभागांच्या समन्वयातून मार्च २०२६ अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७० वर्षे व त्यावरील सर्व लाभार्थ्यांचे १०० टक्के ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी दिली. ******

पीएमएफएमई’मुळे धाराशिवमध्ये ५०४ प्रस्तावांना मंजुरी; २३ फेब्रुवारीला खवा क्लस्टर भूम येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम

पीएमएफएमई’मुळे धाराशिवमध्ये ५०४ प्रस्तावांना मंजुरी; २३ फेब्रुवारीला खवा क्लस्टर भूम येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम धाराशिव,दि.२० फेब्रुवारी (जिमाका) केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रत्येक जिल्ह्यात आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME) ही योजना सन २०२०-२१ पासून राबविण्यात येत आहे.या योजनेमुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक उत्पन्न मिळविण्याचा मार्ग खुला झाला आहे. जिल्ह्यात बेरोजगारी सातत्याने वाढत असताना अनेक सुशिक्षित युवकांना रोजगार मिळण्यात अडचणी येत आहेत.भांडवलाच्या अभावामुळे उद्योग उभारणीस अडथळे निर्माण होतात.या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे. या योजनेत बेरोजगार युवक-युवती, बचत गट,शेतकरी गट,संस्था तसेच अॅग्रो कंपन्यांना अर्ज करता येतो. शासन एकूण कर्ज रकमेवर ३५ टक्के अनुदान (सब्सिडी) देत असल्याने उद्योग उभारणीस मोठी मदत मिळते.असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगांना संघटित व नोंदणीकृत करून तयार उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधता येणार असून शेतकरी,बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही अर्ज करता येतो.विशेष म्हणजे,सात-बारा उतारा नसतानाही या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी शासनाने प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मानधन तत्त्वावर एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.प्रस्ताव सादर करण्यापासून ते मंजुरीपर्यंत मोफत मार्गदर्शन केले जाते.उद्योग मंजूर झाल्यानंतर तो सुरळीतपणे चालविण्यासाठी शासनाकडून ३५ टक्के अनुदान दिले जाते. PMFME योजनेअंतर्गत सन २०२०-२१ पासून चालू आर्थिक वर्षापर्यंत जिल्ह्यात एकूण ५०४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी ४१३ उद्योग सुरू झाले आहेत.यामध्ये १०७ खवा व तूप उद्योगांचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील खवा उत्पादक व व्यापाऱ्यांना निर्यात संधी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी APEDA (कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण), मुंबई,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय,धाराशिव तसेच कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता खवा क्लस्टर,महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्र भूम येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते होणार आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे. *****

१४ मार्च रोजी लिपिक टंकलेखक (गट क) पदभरतीची ऑनलाईन परीक्षा

१४ मार्च रोजी लिपिक टंकलेखक (गट क) पदभरतीची ऑनलाईन परीक्षा धाराशिव,दि.२० फेब्रुवारी (जिमाका) सैनिक कल्याण विभाग तसेच विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) या पदांच्या सरळ सेवेतील भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ७२ पदांसाठी ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा TCS iON यांच्या मार्फत शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत घेण्यात येणार आहे.संबंधित उमेदवारांनी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार तयारी करून ऑनलाईन पद्धतीने परीक्षेला उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, धाराशिव यांनी दिली. ******