Friday, 27 February 2026

*क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा* टीबी फोरम आणि टीबी कॉमोरबिडिटी समितीची बैठक

*क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा* टीबी फोरम आणि टीबी कॉमोरबिडिटी समितीची बैठक धाराशिव दि.२७ फेब्रुवारी (जिमाका) क्षयरोग दूर करण्यासाठी जास्तीत जास्त संशयित लोकांची तपासणी करणे व निदान झालेल्या क्षयरुग्णांना तात्काळ औषधोपचाराखाली आणणे हा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.त्यानुसार आरोग्य विभागाने संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित औषधोपचाराखाली आणावे तसेच मृत्यू झालेल्या क्षयरुग्णांचे डेथ ऑडिट करावे,अशा सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच आयोजित टीबी डेथ Surveillance आणि Response समिती,टीबी फोरम तसेच टीबी कॉमोरबिडिटी समितीच्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.मिटकरी,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.फुलारी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की,टी.बी.मुक्त भारत अभियानांतर्गत सर्व Key Population ची एक्स-रे तपासणी करावी व क्षयरुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचाराखाली आणून पूर्णपणे बरे करावे.सन २०२६ साठी जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची पडताळणी करण्यात आली असून त्यापैकी ४३२ ग्रामपंचायती टीबी मुक्त ग्रामपंचायत प्रमाणपत्रासाठी पात्र ठरल्या आहेत.हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे. पुढील महिन्यात २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना ‘फूड बास्केट’ वाटप करावयाचे असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यासाठी ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे. 000000