Saturday, 29 July 2017

जिल्हयातील 1 लाख 35 हजार 627 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योनजेंतर्गत भरला हप्ता


उस्मानाबाद.दि.29:- पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत दि. 28 जुलै 2017 अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे 1 लाख 25 हजार 621 शेतकऱ्यांनी, जिल्हयातील कॉमन सर्व्हिस सेंटरवर 9 हजार 966 शेतकऱ्यांनी असे एकूण 1 लाख 35 हजार 627 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा हप्ता भरला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी दिली आहे. 

            पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 साठी पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2017 असून ऑनलाईन पध्दतीने पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे त्यामुळे अंतिम मुदतीच्या वेळी ऑनलाईन पीक विमा हप्ता भरण्यासाठी गर्दी टाळण्याकरीता आत्ता पासूनच शेतकऱ्यांनी बँकेमध्ये व कॉमन सर्व्हिस सेंटरवर पीक विमा हप्ता भरावा व नैसर्गीक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून पीक संरक्षित करावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी केले आहे. 

पीक विम्यासाठी जिल्हयातील सर्व बँका रविवारी सुरु राहणार


 उस्मानाबाद, दि.29:- राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 मध्ये सहभागी होण्याकरीता 31 जुलै 2017 पर्यंत मुदत आहे. अंतीम दिनांकास शेतकऱ्यांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जिल्हयातील निम शहरी व ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका व सहकारी बँका रविवार दि. 30 जुलै 2017 रोजी सुरु राहणार आहेत.

            तसेच ज्या बँकांना सोमवारी साप्ताहिक सुट्टी असेल त्या बँकादेखील सोमवार दि. 31 जुलै 2017 रोजी सुरु ठेवण्यात येणार आहेत असे मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळविले आहे.   

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


 उस्मानाबाद, दि.29:- खुल्‍या प्रवर्गातील किंवा ज्या प्रवर्गासाठी  महाराष्ट्र  शासनाचे  महामंडळ अस्तित्वात नाही अशा  प्रवर्गातील  आर्थिक  मागास असलेल्या  लाभार्थ्यांसाठी  महाराष्ट्र  शासनाने  आण्णासाहेब पाटील  आर्थिक  मागास विकास महामंडळ  स्थापन  केलेले आहे. या महामंडळामार्फत  बीजभांडवल  कर्जयोजना  राबविली  जाते . या योजनेंतर्गत  अर्जदारास 5 लाखाच्या प्रकल्प  मर्यादा  असलेल्या  व्यवसायाकरिता  कर्ज  उपलब्ध  करुन देण्यात येते. यामध्ये  बँकेचा  सहभाग  60 टक्के असून उमेदवाराचा सहभाग 5  टक्के  व 35 टक्के  रक्कम  महामंडळाकडून बीजभांडवल कर्ज म्हणून देण्यात येते. सदर 35 टक्के  रक्कमेवर वार्षिक 4 टक्के  दराने व्याज आकारण्यात  येते. कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षांचा आहे. ही योजना  अधिक तत्पर  पारदर्शकपणे  व  महामंडळाची  बीज भांडवल  योजनेची माहिती सहज उपलब्ध होण्याकरिता महामंडळातर्फे www.mahaswayamrojgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचीही निर्मिती  करण्यात आली आहे. 
       इच्छुक  उमेदवार  ऑनलाईन  अर्ज सादर  करु शकतात तसेच या संकेतस्थळावर उमेदवारास  पात्रतेनुसार  सुयोग्य  स्वयंरोजगार  योजनेचा  शोध घेणे, उमेदवारांनी  स्वयंरोजगार कर्ज अर्ज  ऑनलाईन पध्दतीने भरणे,  कर्ज योजनेसाठी  आवश्यक  पात्रता, अटी व शर्ती , कर्ज  मंजूर  होण्यापूर्वी  तसेच  कर्ज मंजूर  झाल्यानंतर  सादर  करावयाची कागदपत्रे  इत्यादी  माहिती  उपलब्ध आहे.ऑनलाईन  सादर केलेल्या  अर्जाची  सद्य:स्थिती तपासणे, कर्जफेडीची सद्य:स्थिती पाहाणे, कर्ज फेडीच्या  हप्त्याची  परिगणना  करणे. उस्मानाबाद जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास बेरोजगार उमेदवार व त्यांच्या पालकांनी या वेबपोर्टलवरील सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन  सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्र , उस्मानाबाद यांनी  केले असून संपर्कासाठी कार्यालयाचा  दूरध्वनी क्र. 02472-222236 असा आहे.

Friday, 28 July 2017

तुळजापूर मंदिरातील सर्व लिलाव ऑनलाईन होणार



        महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील सर्व लिलाव यापुढे ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत. यानिमित्ताने तुळजापूर मंदिर संस्थानातील सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र, उस्मानाबाद (एन.आय.सी.) यांच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे शुक्रवारी प्रशिक्षण देण्यात आले.
            राज्यातील सर्व संसाधनाच्या लिलावामध्ये पारदर्शकता, सुटसुटितपणा आणून व निकोप स्पर्धेला वाव देऊन शासकीय महसूलात वाढ व जास्तीत-जास्त भौगोलिक क्षेत्रातील व्यापाऱ्यांपर्यत पोहोंचण्याच्या दृष्टीने 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त राखीव किंमतीच्या लिलावासाठी ई-लिलाव प्रणालीचा वापर 1 जानेवारी 2015 पासून करणे राज्य शासनाच्या वतीने बंधनकारक करण्यात आले आहे.
            त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचे आदेशानुसार तुळजाभवानी मंदिरातील सर्व लिलाव प्रक्रियेतील कारभारामध्ये पारदर्शकता यावी, गैरकारभाराला आळा घालता यावा त्याचसोबत लिलाव प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे याकरीता 28 जुलै 2017 रोजी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र, उस्मानाबाद (एन.आय.सी.) चे श्री. कोंडेकर व श्री. रुकमे यांनी मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ऑनलाईन लिलाव पध्दतीची सविस्तर माहिती देऊन ऑनलाईन लिलावाबाबतचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमातील दुसऱ्या टप्प्यात लिलाव धारक यांना देखील राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र, उस्मानाबाद (एन.आय.सी.) यांच्या वतीने ऑनलाईन लिलाव पध्दतीची माहिती व सांगण्यात आली. सर्व सहभागी लिलाव धारकांनी हा उपक्रम उत्कृष्ठ असल्याचे सांगीतले.  
            यावेळी तुळजापूर तहसीलदार श्री. झांपले, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी व लिलाव धारक यांची उपस्थिती होती. 

मुरघास युनिट योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


उस्मानाबाद.दि.28 :- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत बहुवर्षीय वैरण पिकाची लागवड व उत्पादन करुन  मुरघास तयार करणे या योजनेचा लाभ जिल्हयातील ईच्छूक लाभार्थींनी अर्जाच्या स्वरुपातील प्रस्ताव संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे दि. 31 जुलै  ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंतच्या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,उस्मानाबाद यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत जिल्हयासाठी 5 मे.टन क्षमतेच्या 11 मुरघास युनिटचे आणि 10 मे.टन क्षमतेच्या 10 मुरघास युनिटचे उदिष्ट देण्यात आले आहे.अर्जाचा नमुना आणि प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे अटी व शर्ती याबाबतचा तपशील व या योजनेसाठी जिल्हयातील निवडलेल्या 494 गावांची यादी  लाभार्थीशी  संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार)  पंचायत समिती यांच्याकडे  उपलब्ध आहे.  तरी ईच्छूकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे  आवाहन, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त  उस्मानाबाद यांनी केले

आहे.

शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यासदौऱ्यासाठी दि.31 ऑगस्ट 2017 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत


उस्मानाबाद.दि.28:- शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय न राहता उत्पादीत होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नविन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल,विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यत त्यांच्या गरजेनुरुप योग्य वेळी पोहचविणे निकडीचे आहे.यासाठी शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे सन 2017-18 मध्ये कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील जे शेतकरी अभ्यासदौऱ्यासाठी इच्छिूक आहेत त्यांनी दि.31 ऑगस्ट 2017 पर्यंत संबधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, श्री.शिरिष जमदाडे यांनी केले आहे.
                विविध देशांनी विकसित केलेले शेतिविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शेतकरी , शास्त्रज्ञ यांच्याशी चर्चा व क्षेत्रीय भेट इ.द्वारे शेतकऱ्याचे ज्ञान व क्षमता उंचावण्याकरीता वय वर्ष 25 ते 60 वर्ष असलेल्या शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे सन 2017-18 मध्ये कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहेत.
            उस्मानाबाद जिल्हयातील जे शेतकरी अभ्यासदौऱ्यासाठी इच्छिूक आहेत त्यांनी दि. 31 ऑगस्ट 2017 पर्यंत संबधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत. सदर प्रस्तावासोबत शेतकऱ्याचा अर्ज, चालू वर्षाचा 7/12 व 8 अ, जन्मतारखेचा पुरावा, शिक्षण प्रमाणपत्राची झेरॉक्स,  शेतकरी कुटुंबाची शिधापत्रीका झेरॉक्स, वैध पारपत्राच्या सर्व पानाची   झेरॉक्स, स्वत:शेतकरी असल्याचे शेतकऱ्याचे स्वसांक्षाकित प्रमाणपत्र, शासकिय / निमशासकिय नोकरीत नसल्याचे  व डॉक्टर, वकील, सी.ए, अभियंता, कंत्राटदार इ.व्यवसायीक नसल्याचे शेतकऱ्याचे स्वसांक्षाकित प्रमाणपत्र,पुर्वी शासकिय अर्थसहाय्याने विदेश दौरा केला नसल्याचे प्रमाणपत्र, शारीरीक स्वास्थ्य योग्य असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, प्रपत्र-1 व 2 शेतकऱ्यांच्या फोटोसहीत व इतर कागदपत्रे संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 31 ऑगस्ट 2017 पर्यंत सादर करावेत.

अधिक माहितीसाठी उस्मानाबाद जिल्हयातील इच्छूक शेतकऱ्यांनी संबधित तालुका कृषि अधिकारी व उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, श्री.शिरिष जमदाडे यांनी केले आहे. 



Thursday, 27 July 2017

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करावी - जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


उस्मानाबाद,दि.27:- सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय कार्यालयात धुम्रपान करण्यास बंदी असल्याचे फलक लावण्यात येऊन सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यावर व शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत धुम्रपान करताना आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज आयोजित बैठकीत दिले.
                          राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मौखिक, डोके,मान व चेहरा कर्करोग प्रतिबंध सप्ताहनिमित्त आढावा बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, अन्न व प्रशासनचे सहाय्यक आयुक्त श्री.टी.एस.बोराळकर, औषध निरिक्षक श्री.एस.एन.गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंजुम शेख, शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
                          यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री.गमे म्हणाले की, तंबाखुच्या व्यसनामुळे कर्करोगासारख्या आजाराचा प्रार्दुभाव होवू शकतो.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या व्यसनापासून दूर करण्याची गरज असून शाळा तसेच महाविद्यालयाच्या परिसराच्या 100 मीटर परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्री तसेच सेवनाला बंदी असल्याचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत, विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्य व तंबाखुमुक्त शाळा याबाबत शिक्षकांनी माहिती दयावी, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात धुम्रपानाचे प्रमाण अधिक असल्याने याबाबत ग्रामीण भागात तंबाखु सेवनामुळे होणारे आजार याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना यावेळी श्री. गमे यांनी  दिल्या.

                          यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 ची सादरीकरणाद्वारे माहिती बैठकीत दिली.

Wednesday, 26 July 2017

उस्मानाबाद येथे कारगिल विजय दिन उत्साहात साजरा




उस्मानाबाद, दि.26 :-  कारगिल (ऑपरेशन विजय) युध्दात मिळालेल्या विजयास आज 26 जुलै 2017 रोजी सतरा वर्षे पूर्ण होत असून कारगिल विजयाचा 18 वा कारगिल विजय दिवस म्हणून उस्मानाबाद येथिल स्मृतीस्तंभास जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन पुष्पांजली वाहण्यात आली.
            या कार्यक्रमास जिल्हयातील प्रतिष्ठित नागरीक, युध्दात शहिद झालेल्या जवानांच्या वीरपत्नी, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थींनी, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
            या कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थींनींनी कारगिल विजयी दिनानिमित्त उस्मानाबाद शहरातून रॅली काढून कारगिल विजयी दिनाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या रॅलीत विद्यार्थ्यांसमवेत विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एम. चव्हाण व सर्व शिक्षकवृंद यांनी सहभाग नोंदविला.
            यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत‍ युध्दात शहीद झालेल्या किंवा शौर्य पदक विजेत्या सैनिकांच्या वीर नारींना राज्य शासनामार्फत राज्य परिवहन बस मध्ये  2500 कि.मी. प्रवास करण्याकरीता 3586 रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते उस्मानाबाद जिल्हयातील एकूण नऊ पैकी प्रातिनिधीक तीन वीर नारींना धनादेश सुपूर्द करण्यात आला. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील खानापूर येथील श्रीमती प्रभावती राजाराम निकम, लोहारा तालुक्यातील नारंगवाडी येथील श्रीमती बेबीताई शहाजी व तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील श्रीमती कांताबाई विश्वनाथ कदम यांचा समावेश आहे. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.