उस्मानाबाद, दि.29:- खुल्या प्रवर्गातील किंवा
ज्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाचे
महामंडळ अस्तित्वात नाही अशा
प्रवर्गातील आर्थिक मागास असलेल्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र
शासनाने आण्णासाहेब पाटील आर्थिक
मागास विकास महामंडळ स्थापन केलेले आहे. या महामंडळामार्फत बीजभांडवल
कर्जयोजना राबविली जाते . या योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखाच्या प्रकल्प मर्यादा
असलेल्या व्यवसायाकरिता कर्ज
उपलब्ध करुन देण्यात येते.
यामध्ये बँकेचा सहभाग
60 टक्के असून उमेदवाराचा सहभाग 5
टक्के व 35 टक्के रक्कम
महामंडळाकडून बीजभांडवल कर्ज म्हणून देण्यात येते. सदर 35 टक्के रक्कमेवर वार्षिक 4 टक्के दराने व्याज आकारण्यात येते. कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षांचा
आहे. ही योजना अधिक तत्पर पारदर्शकपणे
व महामंडळाची बीज भांडवल
योजनेची माहिती सहज उपलब्ध होण्याकरिता महामंडळातर्फे www.mahaswayamrojgar.maharashtra.gov.in
या संकेतस्थळाचीही निर्मिती करण्यात आली
आहे.
इच्छुक उमेदवार ऑनलाईन
अर्ज सादर करु शकतात तसेच या संकेतस्थळावर
उमेदवारास पात्रतेनुसार सुयोग्य
स्वयंरोजगार योजनेचा शोध घेणे, उमेदवारांनी स्वयंरोजगार कर्ज अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे, कर्ज योजनेसाठी आवश्यक
पात्रता, अटी व शर्ती , कर्ज
मंजूर होण्यापूर्वी तसेच
कर्ज मंजूर झाल्यानंतर सादर
करावयाची कागदपत्रे इत्यादी माहिती
उपलब्ध आहे.ऑनलाईन सादर
केलेल्या अर्जाची सद्य:स्थिती तपासणे, कर्जफेडीची सद्य:स्थिती
पाहाणे, कर्ज फेडीच्या हप्त्याची परिगणना
करणे. उस्मानाबाद जिल्ह्यातील
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास बेरोजगार उमेदवार व त्यांच्या पालकांनी
या वेबपोर्टलवरील सेवांचा लाभ घ्यावा,
असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र , उस्मानाबाद यांनी केले असून
संपर्कासाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र.
02472-222236 असा आहे.