महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील सर्व
लिलाव यापुढे ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत. यानिमित्ताने तुळजापूर मंदिर
संस्थानातील सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र, उस्मानाबाद (एन.आय.सी.)
यांच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे शुक्रवारी प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यातील
सर्व संसाधनाच्या लिलावामध्ये पारदर्शकता, सुटसुटितपणा आणून व निकोप स्पर्धेला वाव
देऊन शासकीय महसूलात वाढ व जास्तीत-जास्त भौगोलिक क्षेत्रातील व्यापाऱ्यांपर्यत
पोहोंचण्याच्या दृष्टीने 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त राखीव किंमतीच्या
लिलावासाठी ई-लिलाव प्रणालीचा वापर 1 जानेवारी 2015 पासून करणे राज्य शासनाच्या
वतीने बंधनकारक करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने
मा. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचे आदेशानुसार तुळजाभवानी मंदिरातील सर्व लिलाव
प्रक्रियेतील कारभारामध्ये पारदर्शकता यावी, गैरकारभाराला आळा घालता यावा
त्याचसोबत लिलाव प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे याकरीता 28
जुलै 2017 रोजी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र,
उस्मानाबाद (एन.आय.सी.) चे श्री. कोंडेकर व श्री. रुकमे यांनी मंदिर संस्थानच्या
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ऑनलाईन लिलाव पध्दतीची सविस्तर माहिती देऊन ऑनलाईन
लिलावाबाबतचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमातील दुसऱ्या टप्प्यात लिलाव
धारक यांना देखील राष्ट्रीय सुचना-विज्ञान केंद्र, उस्मानाबाद (एन.आय.सी.) यांच्या
वतीने ऑनलाईन लिलाव पध्दतीची माहिती व सांगण्यात आली. सर्व सहभागी लिलाव धारकांनी
हा उपक्रम उत्कृष्ठ असल्याचे सांगीतले.
यावेळी
तुळजापूर तहसीलदार श्री. झांपले, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी व
लिलाव धारक यांची उपस्थिती होती.