Saturday, 4 February 2017

आज होणार "न्याय सेवा सदन" चे उदघाटन


उस्मानाबाद,दि.4:- येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या "न्याय सेवा सदन" या नवीन इमारतीचे उदघाटन रविवार दि. 5 फेब्रुवारी 2017 रोजी  सकाळी 9-30 वाजता  उच्च्‍ न्यायालय, मुंबई  खंडपीठ  औरंगाबाद  तथा  पालक न्यायमूर्ती  श्री. व्ही. के. जाधव यांच्या हस्ते  आणि  प्रमुख  जिल्हा  व   न्यायाधीश श्री. आर. आर. देशमुख  यांच्या  अध्यक्षतेखाली  संपन्न  होणार आहे.

          तरी या उद्वघाटन समारंभाच्या कार्यक्रमास नागरिकांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) प्र.सदस्य सचिव  जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण  श्री. एस. आर.पडवळ  आणि  जिल्हा  विधीज्ञ  मंडळाचे  अध्यक्ष  श्री. ए. व्ही. खोत  यांनी  केले आहे. 

लोहारा येथे "आचार संहिता कक्षाची" स्थापना

                                       
उस्मानाबाद,दि.4:- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 चा कार्यक्रम चालू असून आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी  लोहारा येथे आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

                  आचारसंहिताबाबत कोणाच्या तक्रारी असतील तर  आचारसंहिता पथक प्रमुख श्रीमती क्रांती बोराटे यांच्याशी मोबाईल नं. 9657007946 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017, निवडणूक निर्णय अधिकारी, तालुका लोहारा श्री. कैलास वाबळे यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2016 प्रवेशिका पाठविण्यासाठी 9 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ


उस्मानाबाद, दि.4:- राज्य  शासनाच्या माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रवेशिका पाठविण्यासाठी 9 फेब्रुवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2016 ते 31डिसेंबर, 2016 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक,मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने  dgipr.maharashtra.gov.in  किंवा  www.maharashtra.gov.in  तसेच  www.mahanews.gov.in  या संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत.  
राज्यस्तरीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे  बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी),मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू), यशवंतराव चव्हाण पुरस्कार - शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे  अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद विभाग) (लातूरसह), आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग), नानासाहेब परूळेकर पुरस्कार (पुणे विभाग), शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग), ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग), ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) तर दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) (51 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Wednesday, 1 February 2017

मतदाना दिवशी विशेष नैमित्तीक रजा

शिक्षक मतदारसंघ निवडणूक -2017


     उस्मानाबाद,दि.1:-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक -2017 साठी दिनांक 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहेत.  शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दिवशी संबंधित मतदारसंघातील मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी दिले असल्याचे, उप जिल्हा निवडणूक  अधिकारी , उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कॅप्टन विलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली हॉलीबॉल टीमने प्रथम क्रमांक पटकाविला


     उस्मानाबाद,दि.1:- संचालनालय, लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी जि. अहमदनगर येथे दि.28 व 29 जानेवारी 2017 रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2017 यामध्ये औरंगाबाद विभागाने येथील जिल्हा कोषागार कार्यालयातील लेखापाल कॅप्टन विलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
        औरंगाबाद विभागातून प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांचे मोठे योगदान होते. या हॉलीबॉल संघामध्ये कॅप्टन विलास जाधव, सचिन कोळगे, ए.बी. घायाळ(बीड), श्री. कोळसे (औरंगाबाद), ए.टी. बिराजदार (लातूर), श्री.देशमाने व चिते (परभणी) यांचा समावेश होता.
      उस्मानाबाद येथील जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर कोषागार अधिकारी अप्पा पवार यांच्या अथक सांघिक परिश्रमाने हा प्रथम क्रमांक औरंगाबाद विभागाने पटकवला आहे. या स्पर्धेत जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार कॅप्टन यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटचेही सामने झाले .

          या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. या  विविध स्पर्धांमध्ये श्री. घुटे, के.डी. मगर, एस.आर.ठाकूर, व्ही.पी. पुजारी, अशिष मोरे, निलेश साखरे, सी.व्ही.कांबळे यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला.

शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2017 मद्यविक्रीस बंदी


उस्मानाबाद.दि.1:- निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2017  चा कार्यक्रम घोषित केला आहे. जिल्हयातील  उस्मानाबाद , तेर ढोकी, बेंबळी, पाडोळी, जागजी, केसेगाव तुळजापूर, सावरगाव ,जळकोट, नळदूर्ग , सलगरा, इटकळ, उमरगा, मुरुम, नारंगवाडी, डाळींब, लोहारा, माकणी, जेवळी, ईटकूर, शिराढोण, गोविंदपूर,  भूम,  अम्बी, मानकेश्वर, वालवड, वाशी, तेरखेडा, पारगाव, परंडा,  अनाळा, सोनारी, आसू या गावांमध्ये  दि.3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मतदान शांततेत व सुव्यवस्थित पार पाडणे याकरिता खालील प्रमाणे आदेश देत आहे.
            उपरोक्त गावी/ ठिकाणी मतदान होत असल्याने या गावातील सर्व देशी,विदेशी,किरकोळ विक्री अनुज्ञप्ती ( सीएल-3 ) एफएल /बीआर-2, एफएल-4 अनुज्ञप्ती दि.1 फेब्रुवारी 2017 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपासून ते दि.3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अनुज्ञप्त्या  मद्यविक्रीसाठी बंद ठेवण्यात येतील.
            वरिल प्रमाणे आदेशित करण्यात येत असून या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुध्द मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 54 व 56 अन्वये कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी,असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी कळविले आहे.

Tuesday, 31 January 2017

सन 2017-18 साठी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेसाठी प्रवेश

          
उस्मानाबाद , दि. 31:-  आदिवासी विभाग विभागामार्फत अनुसूचित जमातींच्या  विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली मध्ये नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशाबाबतची योजना  सन 2017-18 या वर्षाकरिता राबविण्यात येत आहे . यासाठी पात्र व इच्छूक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन , प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प , सोलापूर यांनी कळविले आहे .
या योजनेसाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत - विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा,जर विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्यासंबंधिच्या यादीतील अनुक्रमांक नमूद करण्यात यावा, विद्यार्थ्याचे वय 5 वर्ष पूर्ण असावे,विद्यार्थ्याचा जन्म दि.1 जून 2011 ते 1 जून 2012 दरम्यान झालेला असावा, जन्म तारखेसाठी ग्रामसेवक अथवा अंगणवाडीचा दाखला देण्यात यावा, 1 ली मध्ये प्रवेश घेण्यास पात्र विद्यार्थ्यांची जाहीर सूचनेद्वारे माहिती मागवून पालकांनी नजीकच्या प्रत्येक शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकामार्फत विशिष्ट कालावधीत नाव नोंदणी करावी .

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहमतीपत्र व शाळेत प्रवेशासाठी अर्जही द्यावस.तसेच अर्जासोबत दोन पासपोर्ट साईज फोटो,जातीचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पनाचा दाखला इ. अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे . इ.1 ली च्या विद्यार्थ्याची परीक्षा घेतली जाणार नसून शारिरीक पात्रता व मान्यता प्राप्त वयाचा विचार केला जाईल,अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे, आदिवासी जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच अपंग/विधवा/घटस्फोटित /निराधार /परितक्त्या व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करुन त्यांना नामांकित शाळामध्ये प्रवेश दिला जाईल,विद्यार्थ्यांचे पालक शासकीय /निमशासकीय नोकरदार नसावेत व खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रदृ करण्यात येईल,निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही,रुपये 1 लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा व सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र असलेल्या अनुसूचीत जमातीच्या इच्छूक पालकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी दि.1 फेबु्वारी 2017 पासून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.संपर्कासाठी दूरध्वनी क्र.(0217)-2607600 ,मो.नं. 7276202249 क्रमांक असे आहेत.

उस्मानाबाद येथे दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कूटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन



उस्मानाबाद दि.31:-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद आयोजित सुशिक्षीत बेरोजगारांसाठी दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 4 ते 15 फेब्रुवारी 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण दुग्ध व्यवसायाचे महत्व,गायींच्या जाती,चाऱ्याचे नियोजन, लसीकरण, पॅकिंग, दुध विक्री तसेच शेळीपालन, उस्मानाबादी शेळीचे महत्व, करडयांची निगा,शेळीचे लसीकरण,शेळीचे आहार व आजारांविषयी माहिती, अर्ध बंदिस्त व बंदिस्त शेडची माहिती, शेळीच्या वेगवेगळया जातीची माहिती व कुक्कुटपालनामध्ये गावरान व बॉयलर याविषयी सविस्तर माहिती, त्याच्या खाद्याची व शेडची माहिती, विमा, आजाराविषयी माहिती, व उद्योजकीय अभ्यासक्रम या विषयी दररोज तज्ञ डॉ. व्यक्तींचे मार्गदर्शन व यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

            उद्योजकीय माहितीमध्ये संभाषण कौशल्य, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, बँक अधिकाऱ्यांचे मागदर्शन, शासकीय कर्ज प्रस्तावाची सविस्तर माहिती, अहिल्याबाई होळकर महामंडळाची सविस्तर माहिती तसेच नाबार्ड विषयी माहिती दिली जाणार आहे. तरी इच्छूक युवक-युवतींनी अधिक माहिती व अर्जासाठी श्री.प्रकाश पवार, कार्यक्रम समन्वयक, मो.9604143488 यांच्याशी एम.सी.ई.डी., जिल्हा उद्योग केंद्र ,उस्मानाबाद येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एमसीईडी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.

शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी ऑनलाईन भरण्याचे आवाहन


 उस्मानाबाद.दि.31:- सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यार्थ्यांसाठी सी बीएसई / आसीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी ज्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये प्रवेश घेतलेले आहेत त्याच्यांसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती, शिक्षण फी चे अर्ज भरण्यासाठी http://mahaeschol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.
जिल्हयातील सीबीसीएसई / आयसीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी ज्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये प्रवेश घेतलेले आहेत त्यांनी सन 2016-17 साठी ऑनलाईन अर्ज भरुन आपला युझर आयडी व पासवर्ड प्राप्त करुन घेणे व महाविद्यालयाने संबंधित शिष्यवृती, शिक्षण फी व परीक्षा फी साठी पात्र विद्यार्थ्यांच्या जुन्या अर्जांच्या नुतणीकरणाची प्रक्रीया विहित कालावधीत करुन घ्यावी . याकरिता सर्व प्राचार्यांना व विद्यार्थ्यांनी सन 2016-17 या कालावधीचे जिल्हयातील सीबीएएसई / आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता 11 वी व12 वी साठी प्रवेश घेतलेल्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीत आपले ऑनलाईन शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी चे अर्ज विहीत कालावधीत सादर न केल्यास या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती, शिक्षण फी अदा करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी कळविले आहे . 

निवडणुका शांततेत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे -जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे

जि.. ..निवडणूकीच्या कामकाजाचा घेतला आढावा


       
उस्मानाबाद, दि. 31 :- जिल्ह्यातील  जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणूका शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने व सजगपणे काम करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी केले
उस्मानाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 च्या अनुषंगाने  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी उपस्थित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, बँक अधिकारी  तसेच सर्व विभागाचे  विभाग प्रमुख  यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
याबैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तहसिलदार सुजित नरहीरे, जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार  व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते .
 यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका शांततामय वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांत समन्वय गरजेचा आहे. तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीज, अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था चोख असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सर्व मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी करावी व तेथील पोलीस बंदोबस्ताविषयी आराखडा तयार करावा. पोलीस विभागाने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती घ्यावी. मागील काळातील घटनांची माहिती घेऊन अशा केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा. अवैद्य दारू विक्री करणारे यांच्यावर कडक कारवाई करावी.  संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या निवडणूक प्रक्रियेचे गांभीर्य ओळखून त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक असणारे विविध समित्यांचा तसेच स्थिर तपासणी पथके व अचानक तपासणी करणारी पथके, मतदान यंत्र, अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, जनजागृती इत्यादी बाबीविषयी सविस्तर आढावा घेवून योग्य त्या सूचना केल्या. तसेच संपूर्ण निवडणूक यंत्रेणेने अधिक प्रभावीपणे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले

Monday, 30 January 2017

निवडणूक पत्रकाच्या व भित्तीपत्रकाच्या छपाईबाबत निर्बंध


            उस्मानाबाद,दि.30:- भारत निवडणूक आयोगाने  शिक्षक मतदार संघ निवडणूक 2017 हा कार्यक्रम दिनांक 4 जानेवारी रोजी घोषित केलाआहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे  लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127 (अ) अन्वये निवडणूक पत्रकाच्या व भित्तीपत्रकांच्या छपाईबाबत  निर्बंध  घातलेले आहेत.  त्याप्रमाणे हे छपाई कामे  करणारे प्रेसधारकांनी  जिल्हाधिकारी तथा  जिल्हादंडाधिकारी  उस्मानाबाद यांच्याकडे  नमुन्यात  प्रतिज्ञापत्र  त्वरीत सादर  करणे आवश्यक आहे . तरी  सर्व प्रेसधारकांनी  या बाबतीत अधिक माहिती करिता  आणि प्रतिज्ञापत्राकरिता  येथील जिल्हाधिकारी कार्यालय  उपचिटणीस शाखा येथे  संपर्क साधावा .

 कोणीही प्रेसधारक  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  यांच्याकडे प्रतिज्ञापत्र  करुन दिल्याशिवाय  शिक्षक  मतदार संघ निवडणूक 2017 या निवडणूकी संदर्भातील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा  राजकीय पक्ष यांच्याकरिता  छपाई करुन  देतील त्यांच्याविरुध्द वरील अधिनियमातील तरतुदीनुसार  कायदेशिर कारवाई  करण्यात येईल, याबाबतच्या  सविस्तर सूचना कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी  कार्यालय, उपचिटणीस शाखा येथे उपलब्ध आहेत असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कळविले आहे .

कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर मार्फत पाच दिवसीय “ दुग्ध व्यवसाय” प्रशिक्षण कार्यक्रम संपन्ना


उस्मानाबाद, दि. 30:-वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र,तुळजापूर आणि आत्मा,उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवशीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण दि.21 ते 25 जानेवारी 2017 या कालावधीत मौजे करजखेडा ता.जि. उस्मानाबाद येथे यशस्वीरित्या राबविण्यात आले. या प्रशिक्षणाच्या उदघाटन कार्यक्रमास प्रकल्प उपसंचालक(आत्मा) सुभाष चोले, प्रा.वर्षा मरवाळीकर,डॉ.प्रभाकर पडधन व श्री.पवार हे उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये मौजे करजखेडा येथील महात्मा फुले रेशीम उद्योजक समुहातील सदस्यांना दुग्ध व्यवसायाचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये दुधाळ जनावरांची निवड, चारा व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन,मुक्त संचार, गोठा पध्दत, दुध साठवण्याच्या पध्दती व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पनीर,खवा,बासुंदी,लस्सी इत्यादी दुग्धजन्य पदार्थ निर्मीतीचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. शेतक-यांना या व्यवसायासाठी अधिक माहिती मिळावी व व्यवसाय यशस्वीपणे कशा प्रकारे केला पाहिजे याकारिता  प्रशिक्षणार्थ्यांना उस्मानाबाद जिल्हयातील यशस्वी दुग्धपालन व उत्पादक यांच्या प्रक्षेत्रावर भेटी दिल्या.
            या कार्यक्रमाची सांगता दि.25.जानेवारी रोजी वरिष्ठ शास्त्र तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्र प्रा.सचिन सूर्यवंशी,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिरीष जमदाडे, एस.आर. खरात,अरुण गुट्टे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करुन  करण्यात आली.

            या प्रशिक्षणाचे प्रशिक्षण समन्वयक म्हणून शास्त्रज्ञ (पशुविज्ञान)डॉ.ए.एस.जिंतूरकर यांनी काम पाहिले. ***** 

Sunday, 29 January 2017

उस्मानाबादकरांनी ग्रीन आर्मी (हरितसेना)मध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे - राजेश सातेलीकर


उस्मानाबाद दि, 27:- महाराष्ट्र शासनाने येत्‍या तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला असून यासाठी वन विभागामार्फत ग्रीन आर्मी हरितसेना नावाचे एक पोर्टल तयार करण्यात आले असून या पोर्टल मध्ये सर्वांनीच विनाशुल्क रजिस्टेशन करुन घ्यावयाचे आवाहन विभागीय वन अधिकारी राजेश ए. सातेलीकर  यांनी केले आहे.
          या पोर्टलमध्ये सर्वसामान्य नागरिक, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थींनी, आपले कुटुंब तसेच आपला मित्रपरिवार रजिस्ट्रेशन करु शकतो या रजिस्ट्रेशनचे उद्दिष्टय 1 कोटीहून अधिक आहे, तरी सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा.
          कोणतीही व्यक्ती यापोर्टलचे रजिस्टेशन ऑनलाईन करु शकते, रजिस्ट्रेशन करणे आगदी सोपे आहे आपण www.mahaforest.nic वर जावून green army registration click here ला सिलेक्ट करावे किंवा  greenarmy.mahaforest.gov.in वर नोंदणी करु शकता. 
          या हरितसेनेमुळे प्रत्येक नागरिकास वन व वन्यजीवाचे संरक्षण व संवर्धन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हरितसेना महाराष्ट्र मोहिमेमुळे जनतेचा फायदा होणार असून  जे स्वयंसेवक वर्षभर सक्रिय सहभाग नोंदवितील त्यांची शासनामार्फत विशेष दखल घेवून त्यांना प्रमाणपत्र/ पारितोषिके देवून पुरस्कृत केले जाणार आहे. यामुळे यातून मिळणारा अनुभव ते त्यांच्या वैयक्तिक, व्यावसायिक लाभाकरिता वापरु शकतील.
          या ग्रीन आर्मी नोंदणीमुळे सर्वांनी वनक्षेत्र, अभयारण्य,व्याघ्र प्रकल्प येथे प्रवेश शुल्कात सवलत देण्याचे विचाराधीन असल्याचेही विभागीय वन अधिकारी श्री.सातोलीकर यांनी कळविले  आहे.
          ग्रीन आर्मी (हरितसेना) रजिस्टेशन केल्यानंतर सर्वांनाच महाराष्ट्र हरितसेना सदस्त्व  प्रमाणपत्र ऑन लाईन तात्काळ मिळणार आहे.

          या संदर्भातील अधिक माहिती करिता आपण विभागीय वन अधिकारी कार्यालय मध्यवर्ती इमारत प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे 02472-223408 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करु शकता, असे विभागीय वन अधिकारी राजेश ए. सातेलीकर यांनी कळविले  आहे.   

‘मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आगामी काळात अधिक प्रयत्न करु’ -जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे


    उस्मानाबाद.दि.27:-  मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आगामी काळात सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असून हा दर सरासरीपेक्षा अधिक होण्यासाठी गतीने प्रयत्न करण्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केला.
             बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्ल उस्मानाबाद शहरातील आर्य चाणक्य विद्यालयात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले, लोकलेखा समितीच्या अध्यक्षा सौ.सुषमा मिलिंद पाटील, सदस्य डॉ.अभय शहापूरकर, कमलाकर पाटील, शेषाद्री डांगे, जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप, प्राचार्या डॉ. अनार साळुंके, मुख्याध्यापक डॉ.मनीष देशपांडे, मुख्यमंत्री मित्र बालाजी पवार आदींची मान्यवर उपस्थित होते.
           यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे म्हणाले की, बेटी-बचाओ बेटी-पढाओ या अभियानात उस्मानाबाद जिल्हयाला देशपातळीवर प्राप्त झालेला गौरव हा जिल्हावासीयांच्या एकत्रित सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी सर्व घटकांपर्यंत पोहोंचून मुलीच्या जन्माचा दर 804 वरून 920 पर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केले. गर्भलिंग निदान चाचणी कायदयाची जनजागृती केली. तसेच यासंबंधी प्रसंगी गुन्हे दाखल केले. सर्व आरोग्य यंत्रणा, महसूल प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सरपंच आणि लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनी हा विषय जनतेपर्यंत पोहोचवल्यामुळे आपल्या जिल्हयाला हे यश प्राप्त झाले. आगामी काळात मुलींच्या जन्माचा          दर केरळ प्रमाणे सरासरी पेक्षा अधिक वाढवण्यासाठी ही अशाच सामूहिक प्रयत्नांची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.         
 मुलींच्या जन्माचा दर वाढल्यास जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक वाढले आणि विकासाला चालना मिळेल असेही डॉ. नारनवरे यावेळी म्हणाले.
          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसेवा समितीचे सदस्य डॉ. अभय शहापूरकर यांनी केले, त्यात त्यांनी लोकसेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या बेटी-बचाओ बेटी-पढाओ या कार्यक्रमातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. उस्मानाबाद जिल्हयाला देशपातळीवर नेण्यात डॉ.नारनवरे यांचे कार्य सर्वांसमोर यावे या उद्देशाने त्यांच्या सत्काराचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने आर्य चाणक्य विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या महिला     पालकांचा हळदी कुंकू तीळ गुळ वाटप कार्यक्रम आणि बेटी बचाओ- बेटी पढाओ या संकल्पनेतून साकारलेल्या नयनरम्य रांगोळया, जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्यांची वैशिष्टये दाखवणाऱ्या आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे ही डॉ. शहापूरकर यांनी सांगितले.
          या कार्यक्रमात आर्य चाणक्य विद्यालयातील आशिष सुरेश यरकळ इयत्ता 8 वी या विद्यार्थ्यांचा मैसूर, कर्नाटक येथील राष्ट्रीय स्काऊट सहभागाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

          या महिला मेळाव्याच्या आणि सत्कार समारंभाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या उस्मानाबाद जिल्हयाची वैशिष्टये तालुकानिहाय रंगीत वैशिष्टयांनी दर्शविणाऱ्या तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेतून साकारलेल्या रांगोळयांनी उपस्थितांची मने जिंकली. या रांगोळया साकारणाऱ्या सौ. पवार आणि सौ. देशमाने यांचा सत्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार सौ. सुषमा पाटील यांनी मानले. तर सूत्रसंचलन श्री. जगताप सर यांनी केले. कार्यक्रमासाठी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती ॲड.मिलींद पाटील, संस्थाचालक श्री संजय देशमुख, तसेच महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. 

जिल्हास्तर युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


उस्मानाबाद, दि:- 27  क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्या पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद च्या वतीने जिल्हास्तर युवा प्रशिक्षण (निवासी) शिबिराचे आयोजन दिनांक 01 फेबु्रवारी 2017  ते 10 फेबु्रवारी 2017 या कालावधीत श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा स्टेडीयम उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात येत आहे.
          प्रशिक्षणात सहभागी  होणारे युवक हे 15 ते 29 वर्ष‍ या वयोगटातील असतील सदरचे प्रशिक्षण हे अतंरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयात युवकांनी पार पाडलेल्या भुमिका दिलेले योगदान यामुळे युवाचे एक अव्दितीय समुह अशी ओळख समाजात झालेली आहे. युवाना मानव संशोधन विकासाचा मुख्य स्त्रोत म्हणून देखील मान्याता देण्यात आलेले आहे. युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असुन विकास प्रक्रीयतील आवश्यक भाग आहे. समाजातील युवांची संख्या पहाता त्याच्या साठी स्वतंत्र विचार करण्याची आवश्यकता आहे. इच्छुक युगात नवीन आव्हांनाना तोंड देण्यासाठी युवांच्या सक्षमीकरणाची गरज आहे.

          युवा सक्षमीकरण हे घरामधून,शाळा, महावि­दयालयामधून,युवा मंडळाच्या माध्यमातून शासकीय धोरणाच्या माध्यमातून विविध उपक्रमाचे आयोजन करणे शक्य आहे. याचाच भाग म्हणून जिल्हा युवा प्रशिक्षण केंद्र,उस्मानाबाद अंतर्गत जिल्हायातील युवांना आधुनिक तत्रांची ओळख करुन देऊन या स्पर्धच्या युगांत शक्तीशाली स्पर्धक म्हणून पुढे आणण्याच्या उदेशाने दिनांक 01 फेब्रुवारी 2017 ते 10 फेबु्रवारी 2017 या कालावधीत श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा स्टेडीयम उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात येत आहे. जिल्हास्तर युवा प्रशिक्षण (निवासी) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक युवानी दिनांक 30 जानेवारी 2017 पर्यंत आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत नोंद करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.संजय महाडीक यांनी केले आहे.

क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


उस्मानाबाद,दि.25:-  क्रीडा व युवक सेवा संचालना‍लय,महाराष्ट्र  राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद मार्फत जिल्हयात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे क्रिडा धोरण 2012 अन्वये खेळातील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणार्थी पध्दती, नवीन खेळ खेळाची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी क्रीडा शिक्षकांना महित व्हावी व त्यांच्या ज्ञानात भर पडावी या उदेदशाने जिल्हास्तर क्रिडा शिक्षकांचे आठ दिवसाचे निवासी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दिनांक 01 ते 10 फेब्रुवारी 2017 या कालावधीत श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रिडा संकुल या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. या शिरामध्ये 19 खेळाचे अदयावत प्रशिक्षण शिबीर दिले जाणार आहे. उदा- फुटबॉल, हॉकी, कुस्ती, खो-खो, एथलेटिक्स, धनुविदया, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, कब्ब्ड्डी व इतर खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
          या शिबीरासाठी एकुण 100 क्रीडा शिक्षकांची निवड केली जाणार असून त्यासाठी पात्रता निकष पुढील प्रमाणे असतील-

जिल्हयातील ज्या शाळाचे अधिक संघ शालेय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होऊन प्राविण्य मिळवत असणा-या शाळांचे शिक्षक, राजय व रार्ष्टीय स्तरावरील खेळाडू असलेले शिक्षक तसेच उच्चतम क्रीडा अर्हता प्राप्त शिक्षक (एन.आय.एस.एम.पी.एड.बि.पी.एड) तरी इच्छुक क्रीडा शिक्षकांनी दिनांक 30 जानेवारी 2017 पर्यंत आपली नावे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक, यांनी कळविले आहे.

विविध खेळांच्या क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


उस्मानाबाद,27 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्र, उस्मानाबाद व्दारे आयोजित फुटबॉल,हॉकी,कुस्ती खेळांच्या क्रीडा प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन दि. 1 ते 10 फेब्रुवारी 2017 या कालावधीत रोज सकाळी, संध्याकाळी विविध वयोगटाती मुले व मुली यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
        या शिबिरात येणा-या विविध शाळेतील खेळाडूंना तांत्रिक व तंत्रशुदध पध्दतीने विविध खेळाचे क्रीडा मार्गदर्शन विविध खेळाचे मार्गदर्शन करणार आहे. प्रत्येक तीन प्रकार च्या खेळात 50 प्रमाणे निवड करण्यात येईल व त्यांना वर्षभर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर्फे विनामूल्य खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी या संधीचा सर्व शाळातील खेळाडूंनी फायदा घ्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.संजय महाडीक यांनी केले आहे.

        ज्या खेळाडूंना सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी दि.29 जानेवारी 2017 पर्यंत शाळेच्या पत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री.तुळजाभवानी क्रीडा स्टेडीयम उस्मानाबाद येथे नोंदणी करावयाची आहे. अधिक महितीसाठी 012472221818 या दूरध्वनी वर संपर्क करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी शाळांची नोंदणी व प्रवेश प्रक्रिया कार्यवाही


उस्मानाबाद,दि.27:- बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणांतर्गत दुर्बल आणि वंचित घटकांना विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान 25 टक्के तरतूद आहे. सर्व पात्र शाळांच्या  मुख्याध्यापकांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहिती फलकावर दर्शनी भागावर लावावी. प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
        दिनांक 16 जानेवारीपासून शाळांची नोंदणी सुरु केलेली आहे. ही नोंदणी 19 दिवस चालेल. शाळांच्या नोंदणीनंतर लगेच पालकांना 5 फेब्रुवारीपासून प्रवेशासाठी अर्ज करावयाचे आहेत. सध्या पाच सोडतीचे वेळापत्रात जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पहिली सोडत 27 फेबुवारीला काढण्यात येणार आहे. प्रत्येक सोडतीनंतर उर्वरित जागा शाळांना दर्शवायच्या आहेत. त्यानुसार नंरतरच्या सोडतीमधील प्रवेश निश्चित होणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया  एप्रिलपर्यंत चालणार आहे.
पालकांनी आपल्या नजिकच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. वंचित (s.c.s.t व विकलांग) दुर्बल घटक (ज्याच्या कुंटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लक्ष पर्यंत आहे असे खुल्या प्रवर्गासह,विमुक्त वभटक्या जाती,इतर मागास विशेष मागास व धार्मिक अल्पसंख्यांक म्हणजेच मुस्लीम,बौध्द,ख्रिश्चन,पारसी,जैन व शीख)यांचेसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. अशा शाळांमधून (जी शाळा आपल्या निवासापासून 1 कि.मी. अंतरावर आहे) आपल्या पाल्याचा प्रवेश नर्सरी (इ.1 ली पुर्वी 3 वर्षे) / इ.1 ली मध्ये घेता येईल त्यासाठी पालकांस rte25admission.Maharashrta.gov.in या संकेतस्थळावर Online Admission portal वर जाऊन New Registriation ला क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर विदयार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, जिल्हा व मोबाईल क्रमांक ही महिती भरावी लागेल. ही महिती भरल्यानंतर Registriation या ठिकाणी क्लिक करावे. पालकांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पालकांना sms व्दारे Application ID व password मिळेल. त्यावरुन पहिल्या वेळी login करताना Application ID हा क्रमांक Application Number या ठिकाणी टाकावा व Password च्या ठिकाणी मोबाईलव्दारे मिळालेला Password टाकावा. त्यावेळी  Password बदलाची सूचना मिळेल Password बदलताना 6 व जास्तीत जास्त 10 अक्षरांचा नवीन Password तयार करावा. (त्यामध्ये किमान एक alphabet, एक –नंबर व एक स्पेशल कॅरेक्टर (उदा. # * @ इत्यादी असावे) बदलेला Password पालकांच्या मोबाईल क्रमांकावर  SMS व्दारे प्राप्त होईल.
Password  गहाळ झाल्यास Application Number टाकून मुलांची जन्मतारीख टाकावी. Password दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पुन्हा प्राप्त होईल
अर्ज भरताना कागदपत्रे Uplod करावयाची गरज नाही. परंतू प्रवेशासाठी आवश्यकता आहे ती खालील प्रमाणे

               वंचित घटकासाठी जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे)  तहसिलदार/उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी, जन्माचा दाखला-ग्रा.प./न.पा./मनपा/रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला/अंगणवाडी,बालवाडी रजिस्टर मधील दाखला अथवा आई/वडीलाचे प्रतिज्ञापत्राव्दारे केलेले स्वनिवेदन, बालकांचे रंगीत छायाचित्र- पासपोर्ट साईज, रहिवासी पुरावा-आधार कार्ड/पासपोर्ट/निवडणूक ओळखपत्र/लाईटबील/टेलीफोन बील/घरपटटी/वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी.दुर्बल घटक रहिवासी पुरावा वरील प्रमाणे उत्पन्न दाखला तहसिलदार/नायब तहसिलदार यांचा आर्थिक यांचा आर्थिक वर्ष 2015-16 जन्माचा दाखला वरील प्रमाणे रंगीत फोटो (बालकांचा), अपंगासाठी (40% पेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र) आदी कागदपत्रे अर्ज भरताना पालकांनी सोबत घेऊन जावीत.यासाठी वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. शाळा नोंदणी दि.23जानेवारी ते 3 फेब्रवारी 2017, ऑनलाईन अर्ज (प्रवेशासाठी) दि.5 ते 21 फेब्रुवारी 2017, पहिली सोडत दि.27व 28 फेब्रूवारी 2017, प्रवेशाला सुरवात दि.1 ते 9मार्च 2017, प्रवेशानंतर रिक्त पदांची जागा दर्शविणे दि.10 व 11 मार्च 2017, दुसरी सोडत दि.14 व 15 मार्च 2017, प्रवेश सुरू दि. 27फेब्रूवारी ते 1 मार्च 2017, रिक्त जागा दर्शविणे दि.22व 23मार्च 2017,तिसरी सोडत दि.24 व 25 मार्च 2017, रिक्त जागा दर्शविणे दि.3 ते 6 एप्रिल 2017,चौथी सोडत दि.7 व 8 एप्रिल 2017, पाचवी सोडत दि.18 ते 20 एप्रिल 2017 रोजील होईल.अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप यांनी केले आहे.