Wednesday, 21 September 2016

रक्तदानाबरोबरच अवयवदान करावे -आयुष प्रसाद


उस्मानाबाद दि. 21:- दानात दान श्रेष्ठ दान …रक्तदान या उक्तीप्रमाणे जिल्हयातील अधिकारी/कर्मचारी,पत्रकार व बंधुभगिनींनी रक्तदानाबरोबरच अवयवदानही करावे, असे आवाहन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अधिकारी, कर्मचारी समिती, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, स्वच्छता व व्यसनमुक्ती जनजागरण उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा नियोजन सभागृहात केले.
या कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका रूपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमकर,जिल्हा कृषी अधीक्षक तथा उस्मानाबाद राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष जमदाडे,उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, महिला संपादिका श्रीमती शीला उंबरे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना आयुष प्रसाद म्हणाले की, पत्रकार बांधवांनी रक्दान, अवयवदान मोहिमेस जास्तीत जास्त प्रसिध्दी देवून जबाबदारीने लोककल्याणकारी बातम्यांना प्राधान्य दयावे. तसेच स्वच्छता अभियानाबाबत ते म्हणाले की, या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, येरमाळा या शाळेच्या चमूसोबत जिल्हयातील रामलिंग देवस्थान परिसरातील स्वच्छतेसाठी जिल्हा माहिती अधिाकरी मनोज शिवाजी सानप यांना सोबत घेवून स्वच्छतेचे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले जाईल. यावेळी श्री. आयुष प्रसाद यांनी स्वत:चा अवयवदानाचा अर्ज भरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले यांच्याकडे  सुपूर्द केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी येरमाळा येथील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत तसेच स्वच्छता विषयावरील लघुनाटय सादर केले. यानंतर जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करून अधिकारी/कर्मचारी तसेच पत्रकार बांधवांनी अशा लोकोपयोगी कार्यक्रमात तसेच शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिताच्या उपक्रमांमध्ये  उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी जिल्हयात विकासाची ज्योत पेटवायची आहे,ज्योत तेवत ठेवायची आहे. स्वच्छतेकडून आरोग्याकडे, आरोग्याकडून समृध्दीकडे वळायचे आहेअसे सांगून यासाठी  सर्वांच्या सहकार्याने उस्मानाबाद जिल्हयाला राज्यात नंबर एक वर आणायचे आहे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांची भाषणे झाली.या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा पत्रकार संघ उस्मानाबादचे अध्यक्ष महेश पोतदार यांनी व इतर अनेक पत्रकार बंधूंनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख  पाहुण्यांचे विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येरमाळाच्या विद्यार्थीनींच्या हस्ते रोपटे देवून सत्कार करण्यात आला.
उद्घाटनाचा कार्यक्रम संपताच प्रशिक्षणार्थी आयुष प्रसाद, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महिला विश्रांती कक्षाचे उद्घाटन केले.
या उपक्रमात जिल्हयातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी एकूण 7 जणांनी रक्तदान केले तर आरोग्य तपासणी शिबिरात एकूण 32 जणांची नोंदणी झाली,एकूण 27 जणांनी नेत्र तपासणी करून घेतली. या उपक्रमाच्या  माध्यमातून एकूण 32 जणांनी अवयवदानाचे अर्ज भरून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नेहरू युवा केंद्राचे समन्वयक विकास कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी जी.टी. गोरे यांनी  केले.

वृत्त क्र.684
शारदीय नवरात्र महोत्सव समिती
पूर्वतयारी बैठक संपन्न
उस्मानाबाद,दि.21:-प्रतिवर्षाप्रमाणे श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूरमार्फत शारदीय नवरात्र महोत्सव समिती पूर्वतयारी आढावा बैठक  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह तुळजापूर  येथे संपन्न होवून  संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
        पूर्वतयारी आढावा बैठकीस तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री.तुळजाभवानी संस्थान विश्वस्त सदस्य तसेच उपविभागीय अभियंता महावितरण अनिल आंकोलीकर, सहायक  आयुक्त अन्न व औषध प्रशासन टी. सी. बोराळकर, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियत्रंक आर.वाय. साळवे, आगार व्यवस्थापक एम.पी. जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी.एस.चाकूरकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.हर्षदीप कांबळे, तुळजापूरचे पोलीस निरिक्षक उपस्थित होते.
        या बैठकीस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, तुळजापूर येथील नवरात्र महोत्सवासाठी रस्त्याची  खड्डे दुरूस्ती ताबडतोब करून विभागावार स्वच्छता निरिक्षक करून कचऱ्याची विल्लेवाट लावावी तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा पाणीपुरवठा यंत्रणेने पाणीपुरवठा नियमितपणे चालू ठेवून पाण पोहीची व्यव्स्था करावी व वाहनतळ पार्कींग व्यवस्थेची जागा निश्चित करावी.
        माल वाहतूकीस शहरातील रस्त्यावर प्रतिबंध करावा, नंबर नसलेल्या वाहनावर लक्ष केंद्रीत करावेत तसेच व्यसन करनाऱ्या व्यक्तींना पायबंध करावे तसेच तंबाखू गुटका विक्री करणाऱ्या व्यक्ती निदर्शनास आल्यास खटले दाखल करावेत अशा स्पष्ट सूचना दिल्या. शौचास कोणासही उघडयावर बसू देवू नये, गरीब व्यवसायिकांना स्वतंत्र जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून दयावी व मंदिर परिसरातील फुटपाथावर विश्रांतीसाठी कोणासही थांबू देवू नये. छबीना मार्गाबाबत सूचना फलकावर नकाशा लावावा व पोलीस विभागाने बंदोबस्त चोख ठेवावा,मंदिर परिसरातील पुजाऱ्यांनी पोषाखामध्येच राहावे,अशा विविध सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी दिल्या.









Tuesday, 20 September 2016

पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजनाच्या निधीचा आढावा व मार्गदर्शक सूचना


उस्मानाबाद दि. 20:-जिल्हा वार्षिक योजना(सर्वसारधाण)सन 2016-17 अंतर्गत रूपये 17492.00 लक्ष, अनु.जाती उपयोजनाकरिता रूपये 6292.00 लक्ष व आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनाकरिता रूपये 215.57 लक्ष अशा एकूण तीनही योजनांकरिता रूपये 23999.57 लक्ष नियतव्यय मंजूर आहे, याचा पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आढावा घेवून सबंधित अधिकाऱ्यांना हा  निधी खर्च विहित मार्गाने लवकरात लवकर खर्च करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस खासदार रविंद्र गायकवाड, आमदार मधुकरराव चव्हाण,आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राहुल मोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड. धिरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरूजी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते तसेच जिल्हा नियोजन समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2016-17 करिता 17492.00 लक्ष नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी नियमित योजनेकरिता रूपये 13268.00 लक्ष व जलयुक्त शिवार अभियानाकरिता रूपये 4224.00 लक्ष नियतव्यय मंजूर आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2015-16 अंतर्गत माहे ऑगस्ट 2016  अखेर रूपये 4164.47 लक्ष निधी वितरीत करण्यात आला असून त्यापैकी माहे ऑगस्ट 2016 आखेर 908.02 लक्ष निधी खर्च झाला आहे. वितरित तरतुदीच्या खर्चाची टक्केवारी 21.80 टक्के आहे.
जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2016-17 करिता 6292.00 लक्ष नियतव्यय मंजूर करण्यात असून माहे ऑगस्ट 2016 अखेर रू.3058.00 लक्ष निधी वितरित करण्यात आला असून त्यापैकी ऑगस्ट  2016 अखेर रूपये.2192.79 लक्ष निधी खर्च झाला आहे.वितरित तरतुदीच्या खर्चाची टक्केवारी 71.69 टक्के इतकी  आहे.  
            जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी क्षेत्राबाहेरील आदीवासीकरिता उपयोजना) सन 2016-17 करिता रूपये 215.57 लक्ष नियतव्यय मंजूर असून माहे ऑगस्ट 2016 अखेर रूपये 162.57 लक्ष निधी वितरित करण्यात आला असून त्यापैकी माहे ऑगस्ट 2016 अखेर रूपये 27.83 लक्ष निधी खर्च झाला आहे. वितरित तरतुदीच्या खर्चाची 17.12 टक्के इतकी आहे.
            बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच खासदार,आमदार यांच्या सूचना अवगत असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निधी खर्चाबाबत स्पष्ट सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत  यांनी जिल्हयातील शेतीविषयक अनुदानाकरिता व प्रलंबित प्रस्तावाबाबत मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन केले जाईल असे घोषित केले तसेच जिल्हयातील 17 टॅंकर्सची गळती असल्याचे आढळून आल्याने त्यांचा मोबदला अदा करण्यात येवू असे आदेश दिले. शिराढोण येथील  ग्रामीण रूग्णालयाच्या मंजूरीबाबत मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले.
            कसबेतडवळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याची जागा स्मारक म्हणून होण्यासाठी व जतन  करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
            जिल्हयातील पीक परिस्थितीची वस्तुनिष्ठ पाहणी करून ताबडतोब पंचनामे करावेत अशा सूचना  देवून अधिकारी वर्गाने शेतीची नजर आणेवारी भौगोलिक,सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा विचार करून सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, असे सांगून डॉ. सावंत पुढे म्हणाले, भूम, परंडा तालुक्यातील पीक नुकसानीचे लागलीच सर्वेक्षण करावे तसेच शेतीसाठी पाणी पुरविण्यासाठी वीजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी एक्सप्रेस फिडर सुरू करावेत यासाठी लागणाऱ्या खर्चास जिल्हा नियोजन समितीत मंजूरी देण्यात येईल.
            या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी शासनाकडे रूपये 200 कोटी अनुदान मागणीचा ठराव,मानव विकास योजनेत उस्मानाबाद जिल्हयाचा  समावेश करून घेण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत नाबार्डकडून उस्मानाबादमधील सिंचन योजनांना अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा  करावा तसेच चारा छावणीचे उर्वरित राहिलेली देयके ताबडतोब अदा करावीत असे आदेशही डॉ.सावंत यांनी दिले. स्त्री रूग्णालयात येत्या पंधरा दिवसात सोनोग्राफी मशिन बसविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे,प्रवीण पवार, जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, अजिंक्य पवार, समाज कल्याण अधिकारी एस.एम. मिनगिरे तसेच जिल्हयातील इतर सर्व विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.         





Sunday, 18 September 2016

जिल्हयाला विकसित जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्याचा संकल्प करूया -पालकमंत्री डॉ.दीपक सावंत










उस्मानाबाद,दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामात  सहभागी झालेले  स्वातंत्र्यसैनिक  आयुष्यभर  क्रियाशील  राहिले  आणि आजही  क्रियाशील आहेत. अशा या महान  स्वातंत्र्यसैनिकांनी समग्र  विकासाचा  जो ध्यास  धरला होता, तो ध्यास पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यासाठी आजच्या या विशेष दिवशी आपण सर्वजण मिळून आपल्या जिल्हयाला विकसित जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्याचा संकल्प करूया असे आवाहन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज जिल्हधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या  वर्धापनादिनाच्या मुख्य  ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी केले.
प्रारंभी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत व अन्य मान्यवरांनी हुतात्मा स्मृतीस्तंभास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण होताच पोलीस दलाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,अधिकारी कर्मचारी, पत्रकार  व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत म्हणाले की,आपल्या जिल्ह्यातील  देवधानोरा,  नंदगाव , चिलवडी  अशा गावांना या संग्रामात फार हालअपेष्टा  सोसाव्या लागल्या. यात चिलवडीचे रामलिंग जाधव, देवधानोऱ्याचे महादेव बोंदर, लक्ष्मण बोंदर, मुरूडचे शिवाजी नाडे, उस्मानाबादचे भास्करराव नायगावकर, जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष नामदेवराव माने तसेच ज्यांनी या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, आपले प्राणार्पण केले अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची  आम्हाला  सदैव जाणीव राहील. अशा सर्व हुताम्यांना मी अभिवादन  करतो. त्या सर्व गावकऱ्यांची आणि  त्यांनी सोसलेल्या  कष्टांची  आपण नेहमीच  कृतज्ञतेने  आठवण ठेवली पाहिजे.
ते पुढे म्हणाले,मागील दोन-तीन दिवसात जिल्हयात झालेल्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये निश्चितच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हयातील शासन यंत्रणेमार्फत विविध विभागांच्या योजना प्राधान्याने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्याबाबतची अंमलबजावणीही जिल्ह्यात धडाडीने सुरु आहे. नुकताच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने विदर्भ मराठवाडयातील दूध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ संचलित मदर डेअरी फ्रुट ॲन्ड व्हेजिटेबल कंपनीशी राज्य शासनाने सामंजस्य करार केला आहे.यात विदर्भ मराठवाडयातील जवळपास दोन हजार गावातील साठ हजार ग्रामीण कुटुंबांना उपजीविकेचे साधन मिळणार आहे.ही मराठवाडयाच्या आणि आपल्या जिल्हयाच्या  विकासाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे असेही ते म्हणाले.
जिल्हयात विविध शासकीय विभागांकडून योजनांचा प्रचार, प्रसार व प्रसिध्दी अशा विविध उपक्रमांचे आयोजन मोठया प्रमाणावर सातत्याने करण्यात येत आहे,याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हा पोलिस दलाने महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देवून निर्भया दिदी आणि निर्भया पथक यासारख्या उपाययोजना राबविल्या आहेत. राज्यात एकाच वेळी एकूण 44 सायबर सेल चे उद्घाटन करून आधुनिक गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने शासनाने एक महत्वाचे पाऊल उचलले असल्याचे सांगून जिल्हयात राबविलेल्या शेततळी,जलयुक्त शिवार,कृषी क्रांती कॉमन फार्मर्स फोरम आदी बाबींचा त्यांनी उल्लेख केला.
यावेळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बळीराजा चेतना अभियानांतर्गत पशुस्वास्थ्य प्रमाणपत्राचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला खासदार रवींद्र गायकवाड,आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील,उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरूजी विविध पदाधिकारी, विविध मान्यवर यांच्यासह परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक,अपर पोलीस अधीक्षक दीपाली घाटगे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. उध्दव घुगे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, अरविंद लाटकर, श्रीरंग तांबे,जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, अजिंक्य पवार, समाज कल्याण अधिकारी एस.एम. मिनगिरे,तहसिलदार सुजित नरहरी आणि जिल्हयातील सर्व विभागांचे अधिकारी- कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हणमंत पडवळ यांनी केले.