Wednesday, 21 September 2016

रक्तदानाबरोबरच अवयवदान करावे -आयुष प्रसाद


उस्मानाबाद दि. 21:- दानात दान श्रेष्ठ दान …रक्तदान या उक्तीप्रमाणे जिल्हयातील अधिकारी/कर्मचारी,पत्रकार व बंधुभगिनींनी रक्तदानाबरोबरच अवयवदानही करावे, असे आवाहन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अधिकारी, कर्मचारी समिती, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, स्वच्छता व व्यसनमुक्ती जनजागरण उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा नियोजन सभागृहात केले.
या कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका रूपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमकर,जिल्हा कृषी अधीक्षक तथा उस्मानाबाद राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष जमदाडे,उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, महिला संपादिका श्रीमती शीला उंबरे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना आयुष प्रसाद म्हणाले की, पत्रकार बांधवांनी रक्दान, अवयवदान मोहिमेस जास्तीत जास्त प्रसिध्दी देवून जबाबदारीने लोककल्याणकारी बातम्यांना प्राधान्य दयावे. तसेच स्वच्छता अभियानाबाबत ते म्हणाले की, या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, येरमाळा या शाळेच्या चमूसोबत जिल्हयातील रामलिंग देवस्थान परिसरातील स्वच्छतेसाठी जिल्हा माहिती अधिाकरी मनोज शिवाजी सानप यांना सोबत घेवून स्वच्छतेचे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले जाईल. यावेळी श्री. आयुष प्रसाद यांनी स्वत:चा अवयवदानाचा अर्ज भरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले यांच्याकडे  सुपूर्द केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी येरमाळा येथील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत तसेच स्वच्छता विषयावरील लघुनाटय सादर केले. यानंतर जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करून अधिकारी/कर्मचारी तसेच पत्रकार बांधवांनी अशा लोकोपयोगी कार्यक्रमात तसेच शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिताच्या उपक्रमांमध्ये  उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी जिल्हयात विकासाची ज्योत पेटवायची आहे,ज्योत तेवत ठेवायची आहे. स्वच्छतेकडून आरोग्याकडे, आरोग्याकडून समृध्दीकडे वळायचे आहेअसे सांगून यासाठी  सर्वांच्या सहकार्याने उस्मानाबाद जिल्हयाला राज्यात नंबर एक वर आणायचे आहे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांची भाषणे झाली.या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा पत्रकार संघ उस्मानाबादचे अध्यक्ष महेश पोतदार यांनी व इतर अनेक पत्रकार बंधूंनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख  पाहुण्यांचे विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येरमाळाच्या विद्यार्थीनींच्या हस्ते रोपटे देवून सत्कार करण्यात आला.
उद्घाटनाचा कार्यक्रम संपताच प्रशिक्षणार्थी आयुष प्रसाद, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महिला विश्रांती कक्षाचे उद्घाटन केले.
या उपक्रमात जिल्हयातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी एकूण 7 जणांनी रक्तदान केले तर आरोग्य तपासणी शिबिरात एकूण 32 जणांची नोंदणी झाली,एकूण 27 जणांनी नेत्र तपासणी करून घेतली. या उपक्रमाच्या  माध्यमातून एकूण 32 जणांनी अवयवदानाचे अर्ज भरून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नेहरू युवा केंद्राचे समन्वयक विकास कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी जी.टी. गोरे यांनी  केले.

वृत्त क्र.684
शारदीय नवरात्र महोत्सव समिती
पूर्वतयारी बैठक संपन्न
उस्मानाबाद,दि.21:-प्रतिवर्षाप्रमाणे श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूरमार्फत शारदीय नवरात्र महोत्सव समिती पूर्वतयारी आढावा बैठक  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह तुळजापूर  येथे संपन्न होवून  संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
        पूर्वतयारी आढावा बैठकीस तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री.तुळजाभवानी संस्थान विश्वस्त सदस्य तसेच उपविभागीय अभियंता महावितरण अनिल आंकोलीकर, सहायक  आयुक्त अन्न व औषध प्रशासन टी. सी. बोराळकर, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियत्रंक आर.वाय. साळवे, आगार व्यवस्थापक एम.पी. जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी.एस.चाकूरकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.हर्षदीप कांबळे, तुळजापूरचे पोलीस निरिक्षक उपस्थित होते.
        या बैठकीस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, तुळजापूर येथील नवरात्र महोत्सवासाठी रस्त्याची  खड्डे दुरूस्ती ताबडतोब करून विभागावार स्वच्छता निरिक्षक करून कचऱ्याची विल्लेवाट लावावी तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा पाणीपुरवठा यंत्रणेने पाणीपुरवठा नियमितपणे चालू ठेवून पाण पोहीची व्यव्स्था करावी व वाहनतळ पार्कींग व्यवस्थेची जागा निश्चित करावी.
        माल वाहतूकीस शहरातील रस्त्यावर प्रतिबंध करावा, नंबर नसलेल्या वाहनावर लक्ष केंद्रीत करावेत तसेच व्यसन करनाऱ्या व्यक्तींना पायबंध करावे तसेच तंबाखू गुटका विक्री करणाऱ्या व्यक्ती निदर्शनास आल्यास खटले दाखल करावेत अशा स्पष्ट सूचना दिल्या. शौचास कोणासही उघडयावर बसू देवू नये, गरीब व्यवसायिकांना स्वतंत्र जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून दयावी व मंदिर परिसरातील फुटपाथावर विश्रांतीसाठी कोणासही थांबू देवू नये. छबीना मार्गाबाबत सूचना फलकावर नकाशा लावावा व पोलीस विभागाने बंदोबस्त चोख ठेवावा,मंदिर परिसरातील पुजाऱ्यांनी पोषाखामध्येच राहावे,अशा विविध सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी दिल्या.