आयुष प्रसाद … नुकतेच परिविक्षाधीन जिल्हाधिकारी
म्हणून उस्मानाबाद जिल्हयात रूजू झालेले एक उमदे अधिकारी. विविध बैठका,
कार्यक्रम,उपक्रम या निमित्ताने आमची बऱ्यापैकी ओळख झाली.उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ.
प्रशांत नारनवरे यांनी या जिल्हयात दुष्काळी परिस्थिती असतानाही जलयुक्त शिवार,
कृषी क्रांती, समूहगट शेती ,शेतकरी कंपन्या या अत्यंत लोकोपयोगी संकल्पना
कल्पकतेने राबवून यशस्वी करून दाखविल्या.त्याच धर्तीवर आयुष प्रसाद यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या
उत्साही सकारात्मक मार्गदर्शनाखाली एक नवी संकल्पना राबविण्याचे मिशन हाती घेतले.
मग काय झाली सुरूवात….. दि.3
सप्टेंबर 2016 रोजी बरोबर पुढील एका महिन्याचे ध्येय समोर ठेवून “मिशन हागणदारीमुक्त गाव” ला सुरूवात झली. त्यासंदर्भातील
पहिली बैठक पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.पहिल्या टप्प्यात
उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला व खामसावाडी आणि तुळजापूर तालुक्यातील कुंभारी ,शिराढोण
या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. बैठक सुरू झाली ….सुरूवातीला जिल्हा परिषदेतील स्वच्छ
भारत मिशनचे संवाद सल्लागार श्री.हनुमंत गादगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची ओळख
गावकऱ्यांना करून दिली, त्यानंतर आयुष प्रसाद यांनी गावकऱ्यांशी जमेल तसा थोडासा
हिंदीत, थोडासा मराठीत संवाद साधायला सुरूवात केली.गाव हागणदारीमुक्त म्हणजे काय, नेमके
काय करायला हवे,आपली सर्वांचीच म्हणजेच प्रत्येक गावकऱ्यांची,त्याचबरोबर गावाबाहेरील
लोकांचीही हे मिशन यशस्वी करण्यासाठी काय आणि कशी जबाबदारी आहे, हे त्यांनी
सविस्तर समजावून सांगितले. जिथे त्यांचा हिंदीतील संवाद उपस्थित ग्रामस्थांना
समजायला अवघड जात होता तिथे मी स्वत: गावकऱ्यांशी माझ्या शैलीत संवाद साधत होतो,
गावकऱ्यांना प्रोत्साहीत करीत होतो. आमच्याबरोबर यावेळी गटविकास अधिकारी आर.सी.
चकोर, क्षमता बांधणी सल्लागार श्रीमती शोभा टेकाळे,जिल्हा व्यवस्थापन उपजीविकाचे
शंकर पवार हेही उपस्थित होते.
आयुष प्रसाद यांनी
गावकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, सामुहिक गटशेती ही संकल्पना आपल्या
जिल्हयात अत्यंत यशस्वी ठरली असून आता त्याच धर्तीवर आपण हागणदारीमुक्त गाव ही
मोहिमही यशस्वी करून दाखविणार आहोत.त्यासाठी सर्वप्रथम गावकऱ्यांचे गट बनविले
जातील,या गटात सुशिक्षित बेरोजगार,गवंडी,बिगारी, प्लंबर, सेल्समन आणि एक महिला
प्रतिनिधी यांचा समावेश असेल.या गटाची जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशनच्या
कार्यालयात नोंदणी होईल, त्यांना नोंदणी क्रमांक व नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल, तदनंतर या
गटाने गटाच्या नावाने बँकेत खाते उघडावयाचे आहे.पुढे गावात सर्वेक्षण करून कोणत्या
कुटुंबाकडे शौचालय नाही याची माहिती संकलित करावयाची आहे, त्यानंतर शौचालय बांधून
देण्याच्या कामात ज्या बांधकाम व्यावसायिकांना स्वारस्य असेल अशा सर्वांची गटाने
बैठक घ्यावयाची आहे.या बैठकीत कामाचे स्वरूप,कालावधी, दर आदी बाबींची सर्वांनुमते
निश्चिती करण्यात येईल,मग निश्चित झालेले दर, शौचलयाचे नमुने घेवून गटातील सेल्समन
ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबाची भेट घेवून कामाची निश्चिती करेल,
निश्चिती झाली की, ग्रामसेवकामार्फत बँकेकडे कर्ज मागणीची व मंजुरीची प्रक्रिया
पूर्ण केली जाईल, बँकेकडून 60 टक्के रक्कम गटाच्या खात्यावर जमा झाल्यानंतर गट
बांधकाम साहित्य पुरवठादाराकडून बांधकाम साहित्य खरेदी करेल,एक काम सुरू झाले
की,शौचालय नसलेल्या दुसऱ्या कुटुंबाकडून निश्चिती घ्यावयाची, तोपर्यंत पहिले काम
समाधानकारक पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक आणि लाभार्थी यांच्याकडून घ्यावयाचे,ते
प्रमाणपत्र बँकेत जमा करून उर्वरित 40 टक्के रक्कम गटाच्या खात्यावर जमा करावयाची,
असे सांगून श्री. प्रसाद यांनी अशा प्रकारे 20 सप्टेंबर पर्यंत गटनिर्मिती, 30
सप्टेंबर पर्यत गट नोंदणी व इतर तयारी आणि शेवटी 2 ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष शौचालय
बांधणीला सुरूवात करू या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
हे
समजावून सांगितल्यानंतर ग्रामस्थांच्या शंकाचे समाधान करण्यात आले,त्यांच्या अडचणी
समजून घेतल्या.पुन्हा एकदा ग्रामस्थांकडून हे मिशन कसे राबवायचे,काय काय करायचे
याची उजळणी करून घेतली. एक विलक्षण आत्मविश्वास सर्वांमध्ये दिसून येत होता.
जमाना बदल रहा है,They really
want to develope, एकीचे बळ मिळते फळ या सर्व गोष्टी लोकांना पटत आहेत आणि आजची बैठक
व या बैठकीतील ग्रामस्थांचा उत्साही प्रतिसाद ही त्याचीच प्रचिती आणून देणारा होता.
उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार, कृषी क्रांती, समूहगट शेती ,शेतकरी
कंपन्या या माध्यमातून जिल्हयाची दुष्काळग्रस्त जिल्हा ही ओळख पुसण्याचा यशस्वी
प्रयत्न केला आहेच,ऐन दुष्काळातही या संकल्पनांमुळे शेतकऱ्याला मानसिक,आर्थिक बळ
मिळाल्याचे विविध उदाहरणांमधून सिध्द झाले आहे.
आता
संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करून समृध्द सामाजिक,निरोगी जिल्हा म्हणून ओळख मिळविण्यासाठी
उस्मानाबादकर जनता आणि जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. तेव्हा चला आपणही
प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उस्मानाबादकरांना त्यांच्या या संकल्पपूर्तीसाठी शुभेच्छा
देवू या ! All the best to Osmanabad ……!
(मनोज शिवाजी सानप)
जिल्हा माहिती अधिकारी,
उस्मानाबाद
