Sunday, 4 September 2016

उस्मानाबादमध्ये वृत्तपत्र छायाचित्रकारांचा अनोखा उपक्रम


उस्मनाबाद,दि.3:- प्रसारमाध्यमातून प्रसिध्द होणाऱ्या राजकीय, सामाजिक, धार्मिक फोटोंचे प्रथमच प्रदर्शन भरल्याने जिल्ह्याला नवी मेजवानी मिळाली आहे. आम्हा राजकीय मंडळींनाही या फोटोतून निखळ आनंद मिळाला, अशी प्रांजळ भावना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.
जागतिक फोटोग्राफरदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील फोटोग्राफर संघटनेच्या वतीने शहरातील लेडीज क्लबजवळच्या पशुसंवर्धन विभागाच्या सभागृहात फोटोप्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे शनिवारी, दि.3 सप्टेंबर 2016 राजी  मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, महेश पोतदार, ज्येष्ठ छायाचित्रकार कालिदास म्हेत्रे,उस्मानाबाद जिल्हा संपादक संघाच्या अध्यक्षा शीला उंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले,उस्मानाबादमधील प्रसारमाध्यमातील फोटोग्राफर्सची उत्तम कलाकृती एकाच दालनामध्ये पहायला मिळाली, ही आनंदाची बाब आहे. आम्हा राजकीय नेत्यांना केवळ वृत्तपत्रातून हे फोटो पहायला मिळत होते. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील काही दुर्मिळ फोटो आणि पेंटिंग्जचे प्रदर्शन सगळ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. उस्मानाबादमधील प्रेस फोटोग्राफर असोसिएशनने अत्यंत कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केला आहे. आगामी काळात मराठवाडास्तरीय विभागीय फोटोंचे प्रदर्शन भरविण्याचा प्रयत्न करावा, आम्ही सर्व राजकीय मंडळी त्यासाठी मदत करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
तत्पूर्वी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप म्हणाले,  महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये मी सेवा बजावली, मात्र, अशाप्रकारे प्रेस फोटोग्राफरचे स्वतंत्र फोटोप्रदर्शन मी कुठेही पाहिले नाही. आपली व्यवसायिक स्पर्धा बाजूला ठेवत प्रसारमाध्यमातील फोटोग्राफर आणि वृत्तवाहिनीच्या कॅमेरामन यांनी एकत्र येऊन घेतलेला हा कार्यक्रम उत्कृष्ठ आणि वाखाणण्याजोगा आहे. प्रसारमाध्यमातील फोटोग्राफर्सनी माहिती व जनसंपर्क संचालनालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी अधिकाधिक फोटो पाठवावेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष आरिफ शेख यांनी केले. ते म्हणाले, अशा प्रकारचे भव्य प्रदर्शन भरविण्यासाठी जिल्ह्यातील फोटोग्राफर्सनी पुढाकार घेतला हे प्रदर्शन दोन दिवस सुरू राहणार आहे.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कालिदास म्हेत्रे, इस्माईल सय्यद, सुखदेव गायके, आरिफ शेख, बाळासाहेब अणदूरकर, सुजित शिंदे, अजिंक्य माने, अक्षय धाकतोडे, राहूल कोरे, भीमराज सरवदे, शंकर भूसे, किशोर माळी, सुहास कांदे, लक्ष्मीकांत बनसोडे, गौरव धावारे, लक्ष्मीकांत घोडके, नितीन गुंडाळे,गणेश तोडकरी,अमित आडे, सिध्दार्थ बनसोडे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दौलत निपाणीकर यांनी केले आभार सुहास कांदे यांनी मानले.