Sunday, 4 September 2016

चला एकजुटीने,समूहाने गाव हागणदारीमुक्त करू या -आयुष प्रसाद


उस्मानाबाद,दि.4:उस्मानाबाद जिल्ह्यात समूह गट शेती ही संकल्पना दुष्काळी परिस्थितीतही यशस्वी ठरली हे सर्वांनीच अनुभवले आहे, याच धर्तीवर आता जिल्हा प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानातही आघाडीवर येण्याचा संकल्प केला आहे, याअनुषंगाने मग चला तर एकजुटीने गाव हागणदारीमुक्त करू या,असे आवाहन परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

या संदर्भात दि.3 सप्टेंबर रोजी काही शेतकरी गट,पंचायत समिती आणि स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी गटविकास अधिकारी आर.सी. चकोर, स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) चे  संवाद सल्लागार हनुमंत गादगे,क्षमता बांधणी सल्लागार श्रीमती शोभा टेकाळे,जिल्हा व्यवस्थापन उपजीविकाचे शंकर पवार हे उपस्थित होते.

सुरूवातीस श्री. आयुष प्रसाद यांनी उपस्थित शेतकरी, महिला यांची ओळख करून घेतली. त्यानंतर आपले गाव, जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी काय करावे लागेल याबाबतचे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, सामुहिक गटशेती ही संकल्पना आपल्या जिल्हयात अत्यंत यशस्वी ठरली असून आता त्याच धर्तीवर आपण हागणदारीमुक्त गाव ही मोहिमही यशस्वी करून दाखविणार आहोत.त्यासाठी सर्वप्रथम गावकऱ्यांचे गट बनविले जातील,या गटात सुशिक्षित बेरोजगार,गवंडी,बिगारी, प्लंबर, सेल्समन आणि एक महिला प्रतिनिधी यांचा समावेश असेल.या गटाची जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशनच्या कार्यालयात नोंदणी होईल, त्यांना नोंदणी क्रमांक व  नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल, तदनंतर या गटाने गटाच्या नावाने बँकेत खाते उघडावयाचे आहे.पुढे गावात सर्वेक्षण करून कोणत्या कुटुंबाकडे शौचालय नाही याची माहिती संकलित करावयाची आहे, त्यानंतर शौचालय बांधून देण्याच्या कामात ज्या बांधकाम व्यावसायिकांना स्वारस्य असेल अशा सर्वांची गटाने बैठक घ्यावयाची आहे.या बैठकीत कामाचे स्वरूप,कालावधी, दर आदी बाबींची सर्वांनुमते निश्चिती करण्यात येईल,मग निश्चित झालेले दर, शौचलयाचे नमुने घेवून गटातील सेल्समन ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबाची भेट घेवून कामाची निश्चिती करेल, निश्चिती झाली की, ग्रामसेवकामार्फत बँकेकडे कर्ज मागणीची व मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, बँकेकडून 60 टक्के रक्कम गटाच्या खात्यावर जमा झाल्यानंतर गट बांधकाम साहित्य पुरवठादाराकडून बांधकाम साहित्य खरेदी करेल,एक काम सुरू झाले की,शौचालय नसलेल्या दुसऱ्या कुटुंबाकडून निश्चिती घ्यावयाची, तोपर्यंत पहिले काम समाधानकारक पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक आणि लाभार्थी यांच्याकडून घ्यावयाचे,ते प्रमाणपत्र बँकेत जमा करून उर्वरित 40 टक्के रक्कम गटाच्या खात्यावर जमा करावयाची, असे सांगून श्री. प्रसाद यांनी अशा प्रकारे 20 सप्टेंबर पर्यंत गटनिर्मिती, 30 सप्टेंबर पर्यत गट नोंदणी व इतर तयारी आणि शेवटी 2 ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष शौचालय बांधणीला सुरूवात करू या, असे आवाहन उपस्थितांना केले.


या बैठकीस उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला, खामसवाडी आणि तुळजापूर तालुक्यातील कुंभारी व शिराढोण या गावांतील शेतकरी गट, ग्रामस्थ तसेच स्वयं शिक्षण प्रयोग या सामाजिक संस्थेचे काका अडसूळ,टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे गोपाळ गोरे आदि उपस्थित होते.