Thursday, 1 September 2016

हे शासन अवैध सावकारी मोडून काढणार - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

    










उस्मानाबाद,दि.1:- या शासन काळात गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, हे शासन अवैध सावकारी मोडून काढणारचं असे मी उस्मानबादमधील जनतेला आश्वासित करतो,असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
          उस्मानाबाद जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्या पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आज पालकमंत्री डॉ. दीपक सावंत आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत, त्यावेळी ते बोलत होते.
          कळंब तालुक्यातील भाट शिरपूरा या गावातील श्रीमती वनमाला गायकवाड या महिलेने तसेच याच तालुक्यातील मोहा गावातील अनिल मुटकुळे या तरूण शेतकऱ्याने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
          या कुटुंबियांच्या सांत्वनभेटीच्या वेळी दोन्ही मंत्रीमहोदयांनी या कुटुंबाला धीर दिला, शासन आपल्या दु:खात आपल्या सोबत असून शासनाकडून आपल्याला शक्य तेवढी मदत केली जाईल तसेच गुन्हेगारांचा लवकर शोध घेतला जाईल आणि त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होईल असे आश्वासन दिले.
          यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे,मुख्य  कार्यकारी अधिकारी आनंद रायते ,जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, विभागीय कृषी अधिकारी श्री. बिराजदार, प्रांताधिकारी सचिन बारावकर, तहसिलदार एस. डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

          या दुष्काळी परिस्थिती पाहणी दौऱ्याच्या दरम्यान मंत्री महोदयांनी शिंगोली, तेरणा, ढोकी येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली व जलपूजन केले तर जहागिरदारवाडी, भडाची वाडी येथील पिकांची पाहणी केली. त्याचप्रमाणे ढोकी येथील पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय येथेही भेट दिली. याच दरम्यान कसबे तडवळे येथील जुन्या पोलीस ठाण्याच्या जागेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, असे निवेदनही कसबे तडवळे ग्रामस्थांकडून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले.