उस्मानाबाद, दि.30:-वैद्यकीय शिक्षण विभाग, रोटो साटो
आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती महाराष्ट्र व जिल्हा शासकीय रूग्णालय,
उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रूग्णालय ते तुळजाभवानी स्टेडिअमपर्यंत
अवयवदान महारॅलीचे उत्सफूर्तपणे आयोजन करण्यात आले.
या
अवयवदान महारॅलीस पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले,
निवासी उपजिल्हाधिकारी उध्दव घुगे, उस्मानाबाद नगरपरिषदेचे अध्यक्ष संपतराव डोके
यांनी हिरवा झेंडा दाखवून व हवेत फुगे
सोडून रॅलीला सुरूवात केली .यावेळी डॉ. एच.व्ही. वडगावे, डॉ. धनंजय पाटील, निवासी
वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत सोपल व डॉ. शिवाजी फुलारींसह जिल्हयातील वैद्यकीय
अधिकारी, शाळा महाविद्यालयीन/ विद्यार्थी/ विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
अवयवदान
श्रेष्ठ दान आहे, मरावे परी कीर्तीरूपी उरावे….जगताचे उपकार अवयवदानाने फेडावेत….
चला अवयवदान करूया ….आदी घोषणा देत शहरातून अवयवदान जनजागृती महारॅली काढण्यात
आली. या रॅलीला उस्मानाबाद शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.
एकनाथ माले म्हणाले की, जिवंतपणी अथवा मृत्य झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला
देणे म्हणजे अवयवदान होय. अवयवदान करण्यासाठी जिल्हयातील नागरिकांनी सामाजिक
बांधिलकी जपण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे यावे असे आवाहन केले.
या
अवयवदान महारॅलीस उस्मानाबाद शहरातील नामांकित श्रीपतराव भोसले हायस्कूलसह शहरातील
अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.