Saturday, 28 March 2026
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद
सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
धाराशिव दि.२८ मार्च (जिमाका ) राज्य शासनाच्या कार्यालयीन मूल्यमापनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष कृती कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित गौरव समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांचा देखील सन्मान करण्यात आला.या वेळी माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार,मुख्य सचिव राजेश अग्रवाल,पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या कुशल नेतृत्व,दूरदृष्टी आणि परिणामकारक नियोजनामुळे धाराशिव जिल्ह्याने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.जिल्हा प्रशासनाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कामकाज अधिक गतिमान,पारदर्शक आणि नागरिकाभिमुख केले असून याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.
१५० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आल्या.यामध्ये डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड,तुळजाई चॅटबॉट, ‘कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर’ प्रणाली तसेच ‘जीवनरेखा’ प्रणाली या महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे.डिस्ट्रिक्ट डॅशबोर्डमुळे विविध शासकीय योजनांचा एकत्रित आढावा घेणे सुलभ झाले असून निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. ‘कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर’ प्रणालीमुळे शासन निर्णय व परिपत्रकांची अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक अचूक आणि जलद झाले आहे.
‘जीवनरेखा’ प्रणालीद्वारे शेत रस्त्यांची नोंद व व्यवस्थापन सुलभ झाले असून ग्रामीण भागातील तक्रारींचे प्रभावी निराकरण होत आहे.तसेच तुळजाई चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांची माहिती घरबसल्या उपलब्ध होत असून सेवा वितरण अधिक सुलभ,जलद आणि विश्वासार्ह झाले आहे.ई-ऑफिस प्रणालीच्या व्यापक वापरामुळे ‘पेपरलेस कार्यालय’ संकल्पना प्रत्यक्षात येत असून प्रशासनाची कार्यक्षमता वाढली आहे.
या यशामागे जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सांघिक प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नमूद केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान,विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) याचा वापर प्रशासनात वाढवून कामकाज अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.नागरिकांनी उपलब्ध डिजिटल सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
******
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
धाराशिव दि.२८ मार्च (जिमाका) प्रियंवदा महाडदळकर यांची धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव यांच्या स्वाक्षरीने २७ मार्च रोजी त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले.भारतीय प्रशासकीय सेवेत २०२२ मध्ये देशात १३ वा आणि महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या श्रीमती.महाडदळकर यांनी मुंबई येथील व्हीजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून,त्यानंतर बेंगळुरू येथील आयआयएममधून फायनान्स विषयात एमबीए पदवी संपादन केली आहे.शैक्षणिकदृष्ट्या भक्कम पायाभूत तयारीनंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.
प्रशासकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी जून २०२३ ते मे २०२४ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातच त्यांनी परिविक्षाधीन काळात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना स्थानिक प्रशासन,ग्रामीण विकास व विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे अर्थ मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणून काम पाहिले.
यानंतर अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी (एसडीओ) म्हणून त्यांनी कार्य करत आदिवासी व दुर्गम भागातील विकासकामांना गती दिली. स्थानिक समस्यांचे निराकरण, शासकीय योजनांचा प्रभावी लाभ आणि प्रशासनातील पारदर्शकता यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
आता धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी श्रीमती. महाडदळकर यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण विकास,पायाभूत सुविधा,शिक्षण,आरोग्य आणि सामाजिक कल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
*****
Friday, 27 March 2026
जिल्ह्यातील एकही कुटुंब महिला बचत गटापासून वंचित राहू नये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन क्वांटिटीपेक्षा क्वालिटीच्या कामावर भर
जिल्ह्यातील एकही कुटुंब महिला बचत गटापासून वंचित राहू नये
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन
क्वांटिटीपेक्षा क्वालिटीच्या कामावर भर
धाराशिव,दि.२७ मार्च (जिमाका) महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासात्मक पालट होत असून,या उपक्रमात केवळ संख्येपेक्षा गुणवत्तापूर्ण कामाला अधिक महत्त्व आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांची संख्या जरी मोठी नसली तरी त्यांनी केलेले काम अत्यंत दर्जेदार आहे.महिला जिद्दीने व्यवसाय करून आर्थिक उलाढाल वाढवत आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महिलांना बचत गटात समाविष्ट करून एकही कुटुंब या चळवळीपासून वंचित राहू नये, असे आवाहन त्यांनी आज २७ मार्च रोजी केले.
धाराशिव शहरातील शहर पोलीस स्टेशनजवळील उस्मानाबाद क्लब मैदानावर महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प’ अंतर्गत २७ ते २९ मार्च दरम्यान आयोजित नवतेजस्विनी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे,जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक साळुंके,प्रभारी महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महादेवी रणदिवे तसेच माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी नमूद केले की,महिला आर्थिक विकास महामंडळाने १९९४ साली स्थापन केलेले बचत गट आजही कार्यक्षमतेने कार्यरत आहेत,हे मोठे यश आहे.बचत गटातील महिला विविध प्रशिक्षण घेतात आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःची प्रगती साधत आहेत. त्यामुळे या बचत गटांमध्ये मोठी क्षमता असून माविमच्या बचत गटातील महिलांनी आपल्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी बाजारपेठेत (मार्केटिंगमध्ये) अधिक सक्रिय सहभाग घ्यावा,असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी फीत कापून उद्घाटन करण्यात आले तसेच माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गांडूळ खत,जीवामृत व दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी प्रत्येकी १४,८०० रुपये प्रमाणे ३५ महिलांना एकूण ५ लक्ष १८ हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.यामध्ये शारदा नेताजी देशमुख,प्रज्ञा संतोष खंडाळकर,महादेवी बालाजी कोराळे व शिल्पा बळीराम लादे यांना प्राथमिक स्वरूपात धनादेश देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर यांनी केले.सूत्रसंचालन सीएमआरसीचे सहव्यवस्थापक किशोर टोम्पे यांनी केले,तर उपस्थितांचे आभार सीएमआरसी व्यवस्थापक महादेव पवार यांनी मानले.या कार्यक्रमास बचत गटातील महिला,अधिकारी,कर्मचारी तसेच सीएमआरसीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Thursday, 26 March 2026
प्रगणक-पर्यवेक्षकांची भूमिका निर्णायक ; जनगणना अचूकतेने पार पाडा निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर
प्रगणक-पर्यवेक्षकांची भूमिका निर्णायक ; जनगणना अचूकतेने पार पाडा
निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर
धाराशिव, दि.२६ मार्च (जिमाका) भारताची जनगणना २०२७ ही डिजिटल पद्धतीने होणारी असून ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे जनगणनेचे काम काळजीपूर्वक करावे,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज (दि.२६) जनगणना संचालनालय, मुंबई आणि जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय जनगणना २०२७ प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जनगणना संचालनालय,मुंबईचे उपसंचालक तथा प्रशिक्षक किरण गुरव,सहनिरीक्षक पवन गोडे,जिल्हा समन्वयक चेतन प्रकाश,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,तहसीलदार (महसूल) प्रकाश व्हटकर तसेच सहाय्यक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अंकित सिंह उपस्थित होते.
यावेळी बोलताना कडवकर म्हणाले की, जनगणना २०२७ साठी तालुका पातळीवर प्रगणकांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जनगणनेचे कायदे कडक असून, जाणीवपूर्वक हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्यास संबंधितांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
श्री.खडसे यांनी जनगणनेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की,जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.ग्रामीण व शहरी भागातील विकास,रोजगार आणि सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास यामुळे शक्य होतो.तसेच केंद्र व राज्य शासनाला विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविता येतात.मूलभूत सुविधांचे अचूक नियोजन करता येते आणि लोकसंख्येनुसार निधीचे न्याय्य वाटप शक्य होते.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे ही जबाबदारी आहे.
उपसंचालक किरण गुरव यांनी प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की,हे प्रशिक्षण चार्ज ऑफिसरकरिता असून पुढील दोन महिन्यांत त्यांच्या जबाबदाऱ्यांचे नियोजन केले जाईल.जनगणना दोन टप्प्यात पार पडणार असून प्रगणक प्रत्येक घरात जाऊन मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित करणार आहे.जनगणनेचे तांत्रिक पैलू,पायाभूत सुविधामाहिती संकलनाची प्रक्रिया आणि त्याचा उपयोग याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
पहिल्या टप्प्यात प्रगणक कुटुंबप्रमुखाकडून ३३ प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित करणार असून प्रत्येक कुटुंबाने आपल्या सोयी-सुविधांची माहिती देणे आवश्यक आहे.जनगणनेत निष्काळजीपणा केल्यास संबंधितांवर कारवाईची तरतूद आहे.ही जनगणना पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे.सन १८७२ पासूनची ही सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे.संकलित माहिती न्यायालयीन कामकाजात वापरता येणार नाही,तसेच एका प्रगणकाला काम पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात येणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.
सहनिरीक्षक पवन गोडे यांनी सांगितले की,जनगणना २०२७ चा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान होणार असून या कालावधीत घरयादी व घरगणना केली जाईल.दुसरा टप्पा ९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान पार पडणार आहे.निर्धारित वेळेत अचूक माहिती संकलन करणे अत्यंत महत्त्वाचे असून प्रगणक व पर्यवेक्षकांची कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत.
या प्रशिक्षण शिबिरास चार्ज ऑफिसर म्हणून सर्व तहसीलदार, नगरपालिकांचे सर्व मुख्याधिकारी,नायब तहसीलदार, तांत्रिक अभियंते,जनगणना लिपिक, तांत्रिक सहाय्यक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महा आयटी व जिल्हा सूचना व विज्ञान केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांनी प्रशिक्षकांना प्रश्न विचारून जनगणनेबाबतच्या शंका निरसन करून घेतले.
प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनगणना कक्षाचे सहाय्यक महसूल अधिकारी (जनगणना) दीपक चिंतेवार,विशाल वाघमारे,सुजित टिके,श्रीमती मनीषा वाघमारे,महसूल सहाय्यक गहनीनाथ देवगिरे व संजय पवार यांनी परिश्रम घेतले.
*****
घरगुती गणनेपासून डिजिटल जनगणनेपर्यंत — धाराशिव सज्ज जनगणना-२०२७ साठी
घरगुती गणनेपासून डिजिटल जनगणनेपर्यंत — धाराशिव सज्ज जनगणना-२०२७ साठी
धाराशिव दि.२६ मार्च (जिमाका) आगामी जनगणना-२०२७ संदर्भात राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात जनगणनेच्या पूर्वतयारीस सुरुवात झाली असून जनगणना कामकाजात संयुक्त सचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, मुंबई यांनी जनगणना संदर्भात टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करून दिली आहे.
जनगणना-२०२७ चे संचालन शासन व जनगणना कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या स्तरावरून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी,धाराशिव व जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी,धाराशिव यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्ययंत्रणेच्या स्तरावर जनगणना संबंधी घर यादी व गृहगणना (जनगणना २०२७ चा पहिला टप्पा) ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी चार्ज जनगणना अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून जिल्ह्यातील सर्व तहसीलदार हे चार्ज जनगणना अधिकारी म्हणून जनगणनेचे संपूर्ण कामकाज पार पाडणार आहेत.
जनगणना-२०२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनगणना पूर्वतयारीला गती देण्यात आली असून घर यादी व गृहगणना टप्प्यापासून डिजिटल जनगणनेपर्यंत सर्व प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.त्यासाठी चार्ज जनगणना अधिकारी (तहसीलदार व मुख्याधिकारी) यांच्या कार्यालयाच्या स्तरावर जनगणना कामकाजासाठी आवश्यक ते अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यात घर यादी व गृहगणना ही मोहीम जिल्हास्तरावर व क्षेत्रीय कार्ययंत्रणेच्या स्तरावर प्रभावीपणे राबविण्यात येणार असून त्यासाठी धाराशिव जिल्ह्यात जनगणना - २०२७ चे कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व संरचना निर्माण करण्यात आली आहे.
जनगणना पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्यात एकूण २८५० “इन्शी लिस्टिंग ब्लॉक्स (HLB)” निश्चित करण्यात आले असून २ मास्टर ट्रेनर,५२ फील्ड ट्रेनर,२८५० गणनाकर्मी (Enumerators) आणि ६२ पर्यवेक्षक (Supervisors) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.सर्व संबंधितांना जनगणना-२०२७ चे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात १८ प्रशिक्षण केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी,धाराशिव व जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी,धाराशिव यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर जनगणना कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यामध्ये तहसीलदार-महसूल व तहसीलदार-(निवासी) यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.तसेच कक्षांतर्गत जनगणना कामकाजासाठी आवश्यक ते कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तसेच जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व चार्ज जनगणना अधिकारी (तहसीलदार व मुख्याधिकारी) यांच्या कार्यालयात जनगणना कक्ष स्थापन करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक ते अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जनगणना-२०२७ च्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी चेतन प्रकाश सहायक संचालक,जनगणना संचालनालय,मुंबई यांची धाराशिव जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.त्यांनी दि. २४ व २५ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व चार्ज जनगणना अधिकारी (तहसीलदार व मुख्याधिकारी) यांच्या कार्यालयास भेट देऊन जनगणना-२०२७ च्या पूर्वतयारीचा सखोल आढावा घेतला आहे.
भारत सरकारच्या सहसचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार जनगणना-२०२७ च्या अनुषंगाने उपक्रमांची आखणी करण्यात आली असून जिल्हास्तरावर विविध बैठका घेण्यात येत आहेत.चार्ज जनगणना अधिकारी,नियुक्त नोडल अधिकारी, तहसीलदार,तलाठी,ग्रामसेवक व संबंधित कर्मचारी यांच्या सहभागातून घर यादी व गृहगणना (जनगणना-२०२७ चा पहिला टप्पा) प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
महिला सक्षमीकरणाचा उत्सव : धाराशिव येथे २७ मार्चपासून तीन दिवसीय ‘नवतेजस्विनी महोत्सव’”
महिला सक्षमीकरणाचा उत्सव :
धाराशिव येथे २७ मार्चपासून तीन दिवसीय ‘नवतेजस्विनी महोत्सव’”
धाराशिव दि.२६ मार्च (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ,धाराशिव येथे “नवतेजस्विनी महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन २७ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वयंसहाय्य महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री तसेच महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात जिल्ह्यातील विविध प्रकारचे सुमारे ४० स्टॉल सहभागी होणार असून,गावरान धान्य,कडधान्य,राजमा, तूप,अंडी,वर्मी कंपोस्ट खत,दुग्धजन्य पदार्थ,मसाले,पापड,कुरडई,शेवय्या, मनुके,शोभेच्या वस्तू,मूर्ती,फ्लॉवर पॉट, रेडीमेड कपडे आदी विविध उत्पादनांचा समावेश असणार आहे.या माध्यमातून महिला बचतगटांना आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.तसेच या तीन दिवसांच्या महोत्सवात विविध सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम, महिलांच्या आरोग्य व सकस आहार विषयक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.याशिवाय माविम मित्र व उत्कृष्ट बचतगटांचा सन्मान सोहळाही पार पडणार आहे.
या “नवतेजस्विनी महोत्सव” मध्ये जिल्ह्यातील तसेच शहरातील सर्व नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून महिला सक्षमीकरणासाठी सहकार्य करावे,असे आवाहन श्री.सुखदेव चिंचोलीकर,जिल्हा समन्वय अधिकारी,महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांनी केले आहे.
*****
Wednesday, 25 March 2026
जनगणना-२०२७ पूर्वतयारीला वेग; जिल्ह्यात व्यापक नियोजन आणि प्रशिक्षणास सुरुवात
जनगणना-२०२७ पूर्वतयारीला वेग;
जिल्ह्यात व्यापक नियोजन आणि प्रशिक्षणास सुरुवात
धाराशिव,दि.२५ मार्च (जिमाका) आगामी जनगणना-२०२७ च्या संदर्भात राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात जनगणनेच्या पूर्वतयारीची सुरुवात झाली असून जनगणना कामाबाबत संयुक्त सचिव भारत सरकार व मुख्य प्रधान जनगणना अधिकारी,मुंबई यांनी जनगणना बाबत टप्पेनिहाय कार्यवाही करण्याबाबत कालमर्यादा निश्चित करून दिली आहे.
जनगणना-२०२७ चे सर्वेक्षण शासन व जनगणना कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य,मुंबई यांचे स्तरावर वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांच्या प्रमाणे क्षेत्रीय कार्यक्षेत्रस्तरावर जनगणना संदर्भात घर यादी आणि गृहनिर्माण गणना (जनगणना २०२७ चा पहिला टप्पा) ही संयुक्तपणे राबविण्यात येणार असून यासाठी जिल्हाधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व मुख्याधिकारी हे संबंधित कार्यक्षेत्रात चार्ज जनगणना अधिकारी म्हणून कामकाज करणार आहेत.
जिल्ह्यात एकूण ८ सर्व तहसीलदार व एकूण १० मुख्याधिकारी हे संबंधित कार्यक्षेत्रात चार्ज जनगणना अधिकारी म्हणून कामकाज करणार आहेत.तसेच जिल्ह्यात जनगणनेसाठी Total No Of House listing Block No (HLB)- २८५०,Master Trainers -०२,Field ट्रेनर ५२, Enumerators- २८५०, Supervisors- ६२,Total No Of Training Venues-१८ निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सर्व चार्ज जनगणना अधिकारी यांच्या कार्यालयस्तरावर जनगणना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, धाराशिव व जिल्हा जनगणना अधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या अधिनस्त जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून तहसीलदार व महसूल व तहसीलदार संगायो यांची सहनियंत्रक म्हणून नियुक्ती करून सदर कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या सहसचिव व मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यपद्धतीनुसार जनगणना-२०२७ च्या कामासाठी उपयुक्त भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व चार्ज जनगणना अधिकारी, जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहाय्यक यांना घर यादी आणि गृहनिर्माण गणना (जनगणना २०२७ चा पहिला टप्पा) अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यासाठी जिल्ह्यात जनगणना-२०२७ पहिला टप्पा अंतर्गत, जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली किरण गुरव, सहसंचालक, जनगणना संचालनालय, मुंबई व पवण घाडे, निरीक्षक,जनगणना संचालनालय, मुंबई यांच्या उपस्थितीत सर्व चार्ज जनगणना अधिकारी,जनगणना संबंधित कर्मचारी व तांत्रिक सहाय्यक यांना नियोजन भवन सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,धाराशिव येथे दिनांक २६ मार्च,२७ मार्च व २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
****
Tuesday, 24 March 2026
आर्थिक वर्षअखेरसाठी २८,२९ व ३१ मार्च रोजी कोषागार व बँका उशिरापर्यंत सुरू जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
आर्थिक वर्षअखेरसाठी २८,२९ व ३१ मार्च रोजी कोषागार व बँका उशिरापर्यंत सुरू
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
धाराशिव,दि.२४ मार्च (जिमाका)
वित्तीय वर्ष २०२५-२६ मधील सर्व शासकीय आर्थिक व्यवहार दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आदेश काढला आहे.या आदेशानुसार २८ मार्च,२९ मार्च आणि ३१ मार्च २०२६ रोजी कोषागार कार्यालये व बँकांचे कामकाज उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.
जिल्हा कोषागार अधिकारी, धाराशिव यांच्या दि.१६ मार्च २०२६ च्या पत्रानुसार महाराष्ट्र शासन,वित्त विभागाच्या दि.१३ मार्च २०२६ च्या परिपत्रकान्वये यावर्षी २८ मार्च (शनिवार),२९ मार्च (रविवार) आणि ३१ मार्च (महावीर जयंती) हे दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत.मात्र मार्च अखेरीस कोषागारात मोठ्या प्रमाणावर देयके सादर होण्याची शक्यता लक्षात घेऊन या दिवशीही कोषागारे व बँका कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच ३१ मार्च २०२६ रोजी शासकीय देयके केवळ E-Kuber Payment Mode द्वारेच अदा करण्यात येणार आहेत.त्या दिवशी कोषागारात सादर होणाऱ्या देयकांचे भुगतान रात्री १२ नंतरही धनादेशाद्वारे न करता ई-कुबेर प्रणालीमार्फतच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनास जमा करावयाच्या रकमा शासकीय लेख्यात वेळेत जमा व्हाव्यात यासाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी कोषागार कार्यालयाचे व्यवहार पूर्ण होईपर्यंत आपले कामकाज सुरू ठेवणे आवश्यक असल्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम क्र. ४०९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी शनिवार २८ मार्च,रविवार २९ मार्च आणि मंगळवार ३१ मार्च २०२६ रोजी कोषागार कार्यालयांचे कामकाज पूर्ण होईपर्यंत उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
*****
महाडीबीटीवरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज २८ मार्चपूर्वी निकाली काढा- सहाय्यक आयुक्तांचे महाविद्यालयांना आवाहन
*महाडीबीटीवरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज २८ मार्चपूर्वी निकाली काढा*
सहाय्यक आयुक्तांचे महाविद्यालयांना आवाहन
धाराशिव,दि.२४ (जिमाका) सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी प्रणालीवरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज दिनांक २८ मार्च २०२६ पूर्वी निकाली काढावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,धाराशिव श्री.सचिन कवले यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता अशा विविध योजनांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावरून दिनांक ०१ जुलै २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे.महाडीबीटी प्रणालीवरील डॅशबोर्डच्या पाहणीनुसार सन २०२५-२६ साठी एकूण ७४३२ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले असून त्यापैकी १२५४ अर्ज अद्याप महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.
या संदर्भात महाविद्यालयांना वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या असतानाही संबंधित प्राचार्यांनी अद्याप अर्जांची पडताळणी करून ते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे सादर केलेले नाहीत.
त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईन प्राप्त अर्जांची शासन निर्णयातील निकषांनुसार सखोल छाननी करून पात्र अर्ज दिनांक २८ मार्च २०२६ पूर्वी समाज कल्याण कार्यालयाकडे अग्रेषित करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विहित मुदतीत अर्ज निकाली न काढल्यास अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो.अशा परिस्थितीत त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी यांची राहील,याची गांभीर्याने नोंद घ्यावी,असेही श्री.सचिन कवले यांनी कळविले आहे.
*************
अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू ; उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा
अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू ; उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा
धाराशिव,दि.२४ मार्च (जिमाका)अग्निपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले असून जिल्ह्यातील इच्छुक अविवाहित उमेदवारांनी लवकरात लवकर नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
अग्नीवीर भरतीसाठी दिनांक १ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू असून उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.inया अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करावी.
जिल्ह्यातील पात्र व इच्छुक तरुणांनी ही संधी साधून अग्निपथ योजनेत सहभागी व्हावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान,या भरती प्रक्रियेअंतर्गत संभाव्य परीक्षा जून २०२६ मध्ये होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
******
Monday, 23 March 2026
पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित
पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित
धाराशिव,दि.२४ मार्च (जिमाका)
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques (PCPNDT) Act अंतर्गत जिल्हास्तरावर कार्यरत जिल्हा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून काम करण्यासाठी पात्र व इच्छुक स्वयंसेवी संस्था (NGO) कडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या समितीवर सदस्य म्हणून काम करण्यासाठी अर्ज करणाऱ्या संस्थांनी शासनमान्य नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.तसेच महिला व बालकल्याण,आरोग्य,जनजागृती आदी क्षेत्रात कामाचा अनुभव असणे बंधनकारक असून संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे.
अर्जासोबत संस्था नोंदणी प्रमाणपत्र, मागील कामाचा अहवाल किंवा अनुभव प्रमाणपत्र,संस्थेची सविस्तर माहिती (प्रोफाईल) तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक संस्थांनी आपले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह २८ मार्च २०२६ पर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,धाराशिव येथे सादर करावे. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी संबंधित समितीवर नियुक्ती करण्याचे सर्वस्वी अधिकार धाराशिव येथील (PCPNDT) जिल्हा सल्लागार समितीकडे राहतील.
नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन,भत्ता किंवा पगार देय राहणार नसल्याची नोंद घेणे आवश्यक आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा समुचित प्राधिकारी डॉ. धनजय चाकुरकर यांनी दिली.
*****
पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्ग जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न
पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्ग
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न
धाराशिव,दि.२३ मार्च (जिमाका) : जिल्ह्यात जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून “जिथे पाणी वाढते, तेथे समृद्धी वाढते” याच्या अनुषंगाने व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे. पाण्याचे योग्य नियोजन व लोकसभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
मृदा व जलसंधारण विभाग, धाराशिव व मृदा व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संपूर्णतः अभियान २.० अंतर्गत आयोजित जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून श्री.पुजार बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जल योद्धा हनुमंत केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मदने, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी चंद्रकांत राऊळ, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कटकधोंड, धाराशिव सारथी जिल्हा परिषद शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विकास गोडसे व स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या मार्गदर्शक श्रीमती वैशाली घुगे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार पुढे म्हणाले की, पाण्याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने आपल्या स्तरावर नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. पूर्वी महिलांना डोक्यावर हंडा घेऊन दूरवरून पाणी आणावे लागत होते, मात्र आज ‘हर घर जल’ योजनेमुळे अनेक गावांमध्ये घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. ही सकारात्मक बदलाची दिशा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे श्री.पुजार म्हणाले.
जिल्ह्यात दर तीन वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे धरणे, कालवे, बंधारे यांसारख्या प्रकल्पांबरोबरच स्थानिक स्तरावर पाणी साठवणूक आणि पुनर्भरणावर भर देणे आवश्यक आहे, असे सांगून श्री.पुजार म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या घराजवळ सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी शोषखड्डे तयार केल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. ‘जलयुक्त शिवार’ योजनेसह विविध शासकीय योजनांद्वारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. नीती आयोग व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रिचार्ज शाफ्टसारखी कामे करून पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू असून, यामुळे भविष्यात दुष्काळमुक्ती साध्य होण्यास मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले.
श्री.पुजार पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती असून पाण्याचे योग्य नियोजन केल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. आज जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढून २ लाख १० हजार रुपये झाले आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमाला पाण्याचे योग्य व्यवस्थापन जोडले तर समृद्धीचा मार्ग अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.श्री.घोष म्हणाले की, मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा दुष्काळी स्वरूपाचा असून २०२४ मध्ये अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. अशा परिस्थितीत दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. पाण्याची जबाबदारी केवळ महिलांवर सोपविणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामसभा आणि नागरिकांनी एकत्रितपणे या प्रश्नावर उपाय शोधणे गरजेचे आहे. ग्रामसभेत महिलांनी सक्रिय सहभाग घेतल्यास समस्यांचे प्रभावी निराकरण होऊ शकते. दुष्काळामुळे मुला-मुलींना पाणी आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागते, ज्याचा त्यांच्या आरोग्य व शिक्षणावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जलव्यवस्थापनात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे असे ते म्हणाले.
पाण्याचे संवर्धन करण्यासाठी शोषखड्डे, जलतारा, वृक्षारोपण यांसारख्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे असे सांगून डॉ.श्री.घोष म्हणाले की, प्लास्टिकमुळे पाण्याचा निचरा अडतो, त्यामुळे पर्यावरणपूरक सवयी आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.केंद्रे म्हणाले की, नागदरवाडीसारख्या दुष्काळी गावाला ग्रामस्थांच्या सहभागातून पाणीदार बनविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. पूर्वी पाच किलोमीटर दूरवरून पाणी आणावे लागणाऱ्या गावात आज जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांमुळे परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. ग्रामस्थांनी स्वतःवर काही नियम घालून घेतले आणि पाण्याचा प्रत्येक थेंब गावातच मुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले. महिलांनी या कामात मोठा पुढाकार घेतला असून, त्यांच्या सक्रिय सहभागामुळे गावातील जलसंधारण चळवळ अधिक सक्षम झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
इंडो-जर्मन वॉटरशेड प्रकल्पाच्या माध्यमातून १०१४ हेक्टर क्षेत्रावर विविध कामे करण्यात आली आहेत असे सांगून श्री.केंद्रे म्हणाले की, पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गावाने जलसमृद्धीचा मार्ग स्वीकारला आहे. गावाचा विकास साधायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे.केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी काम करण्याची भावना जोपासल्यासच जलसमृद्ध गावांची निर्मिती शक्य होईल,असे त्यांनी आवाहन केले.
श्री.गोडसे म्हणाले की,गोड पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे.जलसाक्षरता वाढविणे ही काळाची गरज आहे. सूक्ष्म सिंचन पद्धती जसे की ठिबक, तुषार, मिनी स्प्रिंकलर यांचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. शेतीत आच्छादन (मल्चिंग) केल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि उत्पादन वाढीस मदत होते.“शेतातील पाणी शेतात आणि गावातील पाणी गावात” ही संकल्पना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे जलसाठा वाढण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते,असे त्यांनी यावेळी नमूद केले.
श्रीमती घुगे म्हणाल्या की,महिलांचा पाण्याशी दिवसभर संबंध येत असल्यामुळे त्यांनी पाण्याचे नियोजन करण्यामध्ये पुढाकार घेणे आवश्यक आहे. धाराशिव जिल्हा आकांक्षीत व दुष्काळी असल्यामुळे जलव्यवस्थापनावर विशेष भर देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळल्यास उत्पादन खर्च कमी होऊन शेती अधिक समृद्ध होऊ शकते. यासाठी पाण्याचा योग्य वापर आणि संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.
पाणलोट व्यवस्थापन ही काळाची गरज असून प्रत्येक गावात या दृष्टीने काम केले पाहिजे असे सांगून श्रीमती घुगे म्हणाल्या की,जलदूत महिलांच्या माध्यमातून जलसंधारण चळवळ अधिक बळकट होऊ शकते. ग्रामस्थांच्या सहकार्यानेच जिल्हा पाणीसमृद्ध होऊ शकतो. प्रत्येकाने पाण्याचा जपून वापर करून पुढील पिढ्यांसाठी संसाधने सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व जल पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमास जिल्ह्यातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्रीमती सायली जाधव यांनी केले.
*******
क्रीडा-सांस्कृतिक उपक्रमातून संघभावना आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धां
क्रीडा-सांस्कृतिक उपक्रमातून संघभावना आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
जिल्हा महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धां
धाराशिव,दि.२३ मार्च (जिमाका)
क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना,शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो.दैनंदिन कामकाजातील ताणतणावातून मुक्तता मिळून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात २२ व २३ मार्च रोजी जिल्हा महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून,या स्पर्धेचे उद्घाटन रविवार,२२ मार्च रोजी जिल्हाधिकारी पुजार यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक रितु खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की,महसूल विभागाच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांत सहभागी होता येत आहे.त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढून प्रशासन अधिक सक्षम व गतिमान होण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी सर्वश्री.ओंकार देशमुख,रेवैयाह डोंगरे,दत्तू शेवाळे तसेच तहसीलदार मृणाल जाधव,अरविंद बोळगे, गोविंद येरमे,जयवंत पाटील,निलेश काकडे,प्रकाश म्हेत्रे,हेमंत ढोकले आणि रणजितसिंह कोळेकर यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धांमध्ये 100 मीटर व 200 मीटर धावणे,लांब उडी,उंच उडी, थाळी फेक,भाला फेक,गोळा फेक, 3 किमी चालणे यांसारख्या मैदानी स्पर्धांसह क्रिकेट,व्हॉलीबॉल,थ्रो बॉल,बॅडमिंटन,रिंग टेनिस,खो-खो, कबड्डी,बुद्धिबळ, कॅरम व टेबल टेनिस अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला आहे.
******
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर *जिल्ह्यात १८ ते ३१ मार्चपर्यंत* *जमावबंदी व शस्त्रबंदी लागू*
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर
*जिल्ह्यात १८ ते ३१ मार्चपर्यंत*
*जमावबंदी व शस्त्रबंदी लागू*
धाराशिव दि.१८ मार्च (जिमाका) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अंतर्गत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश काढण्यात आले आहे.त्यानुसार १८ मार्च रोजी रात्री १ पासून ते 31 मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार आहेत.जिल्ह्यात १९ मार्च रोजी गुढी पाडवा,२१ मार्च रोजी रमजान ईद, २६ मार्च रोजी रामनवमी,२७ मार्च रोजी तुळजाभवानी चैत्री यात्रा (तुळजापूर) ३० मार्च रोजी येडेश्वरी चैत्री यात्रा (येरमाळा) आणि ३१ मार्च रोजी महावीर जयंती असे विविध धर्मीय सण मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत.
या सण-उत्सवांदरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच सध्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या उभारणीसंदर्भात विविध समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याशिवाय विविध संघटना व राजकीय पक्षांकडून धरणे,मोर्चे,आंदोलन,उपोषण, बंद,रास्तारोको,तालाठोको अशा आंदोलनात्मक कार्यक्रमांची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार,शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींना शस्त्र,काठी, तलवार,बंदूक,लाठ्या किंवा शारीरिक इजा होऊ शकतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच दगड,फेकावयाची साधने किंवा तत्सम वस्तू साठवणे,तयार करणे किंवा बाळगणे यास मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय आवेशपूर्ण भाषणे करणे, प्रक्षोभक घोषणा देणे,असभ्य वर्तन करणे, समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रतिमा, फलक किंवा चिन्हांचा वापर करणे, संविधानविरोधी कृती करणे किंवा सार्वजनिक शांतता भंग करणारी कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. व्यक्ती,मृतदेह किंवा त्यांचे प्रतीकात्मक प्रदर्शन करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना परवानगीशिवाय एकत्र येण्यास,मोर्चा किंवा मिरवणूक काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.कोणतीही सभा, मोर्चा किंवा निवडणूक प्रचार कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान,अंत्ययात्रा,धार्मिक विधी, लग्नसमारंभ,सामाजिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम तसेच सिनेमागृह व रंगमंच यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.तसेच शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी यांनाही या आदेशातून वगळले आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांतता सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
**************
*आवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे; शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासन सज्ज*
*आवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे; शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासन सज्ज*
धाराशिव,दि.१८ मार्च (जिमाका)माहे मार्च,२०२६ मध्ये जिल्ह्यात झालेल्या आवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीपिकांचे तसेच जिवित व वित्तीय नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत मिळण्यासाठी नुकसानाचे अचूक पंचनामे करणे आवश्यक आहे. यासाठी तालुकास्तरीय समितीच्या आदेशानुसार ग्रामस्तरीय समितीमार्फत बाधित क्षेत्रामध्ये तात्काळ पंचनामे करण्यात येत आहेत.संबंधित सर्व यंत्रणांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून विहित नमुन्यात पंचनामे पूर्ण करावेत,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व उपविभागीय कृषी अधिकारी,धाराशिव,सर्व तहसीलदार तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत की, ग्रामस्तरीय समितीमार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यांच्या आधारे विहित नमुन्यातील निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आपल्या क्षेत्रातील पीक नुकसान व फळबाग नुकसानीची माहिती संबंधित ग्रामस्तरीय समिती म्हणजे ग्राम महसूल अधिकारी,कृषी सहाय्यक व ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडे तात्काळ कळवावी, जेणेकरून पंचनामे वेळेत पूर्ण करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करता येईल,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.तसेच ज्यांची ई-पीक पाहणी बाकी आहे,त्यांस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याने सर्व उर्वरित ई-पीक पाहणी सहाय्यकांमार्फत करून घ्यावी,असेही निर्देश देण्यात आले आहेत.
*************
*निपाणी येथे महारेशीम मेळावा* *रेशीम शेतीस नवे मार्गदर्शन*
*निपाणी येथे महारेशीम मेळावा*
*रेशीम शेतीस नवे मार्गदर्शन*
धाराशिव दि.१८ मार्च (जिमाका) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निपाणी येथे आज दि.१८ मार्च रोजी महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्यात रेशीम शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी समजून घेण्यात आल्या तसेच रेशीम विकासाशी संबंधित विविध शासकीय योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.राजकुमार मोरे,कळंब येथील गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,उपविभागीय अधिकारी शिंदे,रेशीम विकास अधिकारी श्रीमती वाकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कळंब तालुक्यातील क्षेत्रसहायक श्री.एस.एच.सुर्यवंशी,श्री.एन.ए.पवार, तांत्रिक सहाय्यक जुनेद उस्मानी तसेच प्रगतिशील रेशीम शेतकरी श्री.बालाजी पवार आणि चॉकीधारक शेतकरी अतुल लुगडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी रेशीम शेतीतील उत्पादनवाढ,रोग व्यवस्थापन, कोषपालन तंत्रज्ञान तसेच शासनाच्या विविध अनुदान व सहाय्य योजनांचा लाभ घेण्याबाबत सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
या मेळाव्यास परिसरातील विविध गावांतील रेशीम शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच निपाणी गावचे तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक, सरपंच,उपसरपंच व इतर मान्यवरही उपस्थित होते.या उपक्रमामुळे रेशीम शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढून उत्पादनवाढीस चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
************
*उद्योगाशिवाय पर्याय नाही : कौशल्य,भांडवल व मार्केटिंगवर भर देऊन उद्योजक व्हा* महाव्यवस्थापक अमोल बडे *उद्योजक मेळावा संपन्न*
*उद्योगाशिवाय पर्याय नाही : कौशल्य,भांडवल व मार्केटिंगवर भर देऊन उद्योजक व्हा*
महाव्यवस्थापक अमोल बडे
*उद्योजक मेळावा संपन्न*
धाराशिव.दि.१८ मार्च (जिमाका)जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव,दे आसरा फाउंडेशन,पुणे तसेच व्यवस्थापन शास्त्र विभाग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज एमआयडीसी येथील विद्यापीठाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्यात नवउद्योजकांनी उद्योग उभारणीसंदर्भातील विविध बाबींची सविस्तर माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांच्या हस्ते झाले.यावेळी एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक डी.व्ही.खाडे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे तसेच दे आसरा फाउंडेशनच्या सायली जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटक म्हणून श्री.बळे म्हणाले की,
वाढत्या लोकसंख्येमुळे नोकरीच्या संधी कमी होत आहेत.त्यामुळे उद्योगाशिवाय पर्याय उरलेला नाही.जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. कौशल्य,आर्थिक पाठबळ,शासकीय मदत आणि प्रभावी मार्केटिंग या चार टप्प्यांवर शासन उद्योजकांना सहाय्य करत आहे. जिल्हा उद्योग केंद्र उद्योग उभारणीसाठी सदैव तयार असून विविध योजनांद्वारे ८०० पेक्षा अधिक उद्योगांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मदत करण्यात आली आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले.
एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री.खाडे म्हणाले की,उद्योजक होण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे.पूर्वी शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणे हा होता,मात्र आता शिक्षणाचा उपयोग उद्योग निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूखंड,पायाभूत सुविधा व प्रशिक्षण उपलब्ध करून उद्योगांना चालना दिली जाते.गुंतवणूक व उद्योग निर्मिती हा विकासाचा मुख्य आधार असल्याचे ते म्हणाले.
श्री.खडसे म्हणाले की,धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असून येथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे.त्यामुळे शेतीपूरक उद्योगांची गरज अधिक आहे.अशा उद्योगांमुळे रोजगारनिर्मिती होऊन जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावू शकते.शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन युवकांनी उद्योगक्षेत्रात पुढे यावे.असे त्यांनी सांगितले.
श्रीमती.सायली जाधव म्हणाल्या की, स्वतःचा उद्योग उभारल्यास केवळ स्वावलंबनच नव्हे तर इतरांनाही रोजगार देता येतो.उद्योग सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे व प्रभावी मार्केटिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.उत्पादन केलेल्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास आवश्यक आहे.असे त्या म्हणाल्या.
या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रुरल एंटरप्राइजेस फायनान्स सपोर्ट कन्सल्टंट श्रीमती.पल्लवी पाटील यांनी भांडवल गुंतवणूक व आर्थिक नियोजन यावर मार्गदर्शन केले.सनदी लेखापाल लक्ष्मण वाकुरे यांनी आयटीआर व जीएसटी रिटर्न भरताना घ्यावयाची काळजी यावर माहिती दिली.संजय देशमाने यांनी उद्योगातील आव्हाने व उपाय मांडले,तर अशोक चव्हाण (मुंबई) यांनी मार्केटिंगचे महत्त्व स्पष्ट केले. याशिवाय उद्योजक व मध उत्पादन तज्ज्ञ तेजस लिमकर यांची मुलाखत घेण्यात आली.
चर्चा सत्रात उपस्थित उद्योजकांनी प्रश्नोत्तरांमध्ये सक्रिय सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संजय गुरव यांनी केले, आभार प्रदर्शन व्यवस्थापन विभाग प्रमुख सुयोग अमृतराव यांनी केले.
*************
ग्रामीण शिक्षणाचा झेंडा उंचावला नवोदय प्रवेशात जिल्हा परिषद शाळांचा दबदबा ८० पैकी ६६ विद्यार्थ्यांची निवड
ग्रामीण शिक्षणाचा झेंडा उंचावला नवोदय प्रवेशात जिल्हा परिषद शाळांचा दबदबा
८० पैकी ६६ विद्यार्थ्यांची निवड
धाराशिव दि.२० मार्च (जिमाका) जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत यंदा जिल्हा परिषद शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.इयत्ता ६ वीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण ८० जागांपैकी तब्बल ६६ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील निवड झालेले आहेत.विशेष म्हणजे, ग्रामीण भागातून ८० पैकी ७७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून,हे ग्रामीण शिक्षणाच्या गुणवत्तेचे द्योतक मानले जात आहे.
तालुकानिहाय एकूण निकाल पुढीलप्रमाणे आहे – धाराशिव (२०), तुळजापूर (१८),कळंब (१३), उमरगा (०७),भूम (०७),लोहारा (०७),वाशी (०४) आणि परंडा (०४) असे एकूण ८० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.यामध्ये जिल्हा परिषद शाळांचा वाटा लक्षणीय असून, तालुकानिहाय जिल्हा परिषद शाळांमधील निवड पुढीलप्रमाणे आहे – धाराशिव तालुका २० पैकी १८,तुळजापूर १८ पैकी १६,कळंब १३ पैकी १२,उमरगा ७ पैकी ४,भूम ७ पैकी ४,लोहारा ७ पैकी ५,वाशी ४ पैकी २ तसेच परंडा ४ पैकी ४ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधून निवड झालेले आहेत.
मागील वर्षी जिल्हा परिषद शाळांमधून ६३ विद्यार्थ्यांची निवड झाली होती,तर यंदा हा आकडा वाढून ६६ वर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या कामगिरीत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी धाराशिव जिल्हा परिषदने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये जिल्हा स्वनियोजित निधीतून OMR शीटचा वापर करून दोन सराव परीक्षांचे आयोजन केले होते. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून,परिणामी जिल्हा परिषद शाळांच्या कामगिरीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपाध्यक्ष उषाताई गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, शिक्षणाधिकारी डॉ.रवींद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी कैलास पिकवणे यांनी विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.
सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण विभागातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे.या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक क्षमता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जाणीव अधोरेखित झाली असून, भविष्यातही अशाच प्रकारे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे.
*****
ऑटोरिक्षा-टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणाला स्थगिती : इरादापत्र देण्याची प्रक्रिया थांबवली
ऑटोरिक्षा-टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणाला स्थगिती : इरादापत्र देण्याची प्रक्रिया थांबवली
धाराशिव दि.२० मार्च (जिमाका) राज्यातील विविध संघटनांकडून ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणाबाबत आक्षेप नोंदवत ते बंद करण्याची मागणी करण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर ९ मार्च २०२६ रोजी परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या बैठकीदरम्यान ऑटोरिक्षा / टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणास स्थगिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरात नवीन परवाने देण्याच्या प्रक्रियेत तात्पुरती अडथळा निर्माण होणार असून, संबंधित विभागांना याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने इरादापत्र देण्याचे कामही तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आले आहे.त्यामुळे नवीन परवाना प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना सध्या प्रतीक्षा करावी लागणार आहे.हा निर्णय प्रशासनिक पातळीवर अमलात आणण्यात येत असून, पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.या संदर्भात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी धाराशिव,श्री.हर्षल डाके यांनी माहिती दिली.
******
आर्थिक वर्षअखेर दस्तनोंदणीसाठी विशेष सुविधा ; सुट्टीच्या दिवशीही निबंधक कार्यालये राहणार सुरू
आर्थिक वर्षअखेर दस्तनोंदणीसाठी विशेष सुविधा ; सुट्टीच्या दिवशीही निबंधक कार्यालये राहणार सुरू
धाराशिव दि.२० मार्च (जिमाका) आर्थिक वर्ष संपत येत असून नूतन वर्षानिमित्त नागरिकांचा मालमत्ता खरेदीकडे वाढता कल लक्षात घेता दस्तनोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर तसेच इष्टांक पूर्तीच्या दृष्टीने प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.दि.२६ मार्च २०२६,दि.२८ मार्च २०२६,दि.२९ मार्च २०२६ व दि.३१ मार्च २०२६ या चार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही दस्तनोंदणीची सुविधा उपलब्ध होणार असून व्यवहारांमध्ये सुलभता येणार आहे.
तसेच या सुट्ट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी आणि अभिनिर्णय व कमी पडलेले मुद्रांक शुल्क इत्यादी कामे विहीत वेळेत पूर्ण करण्यासाठी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयही कार्यरत ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.
या निर्णयामुळे दस्तनोंदणी प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून नागरिकांना वेळेची बचत होणार आहे.
******
ग्रामपंचायत पोटनिवडणुक प्रक्रिया सुरू ; आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती
ग्रामपंचायत पोटनिवडणुक प्रक्रिया सुरू ; आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती
धाराशिव दि.२० मार्च (जिमाका) सचिव,राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी वाचा अन्वये दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा,अनर्हता किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुका पारंपरिक पद्धतीने राबविण्याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.त्यानुसार संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील सदस्य/थेट सरपंच पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून,या निवडणुकीचा कार्यक्रम व संबंधित ग्रामपंचायतींची यादी ई-मेलद्वारे पाठविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक संदर्भातील आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आचारसंहिता प्रमुख म्हणून संबंधित गटविकास अधिकाऱ्यांची पंचायत समिती स्तरावर नियुक्ती करण्यात आली आहे.या अधिकाऱ्यांमार्फत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त राखण्यावर भर दिला जाणार आहे.
तालुकानिहाय नियुक्त गटविकास अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. धाराशिव – गटविकास अधिकारी, पंचायत समिती,धाराशिव; तुळजापूर – गटविकास अधिकारी,पंचायत समिती,तुळजापूर; उमरगा – गटविकास अधिकारी,पंचायत समिती,उमरगा; लोहारा –गटविकास अधिकारी,पंचायत समिती,लोहारा; कळंब – गटविकास अधिकारी, पंचायत समिती,कळंब हे आहेत.
वरीलप्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी.तसेच राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देश व आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करावी,असे निर्देशही देण्यात आले आहेत.
******
मतदार यादी विशेष पुनरिक्षणासाठी जिल्ह्यातील संगणक लॅब अधिग्रहित
मतदार यादी विशेष पुनरिक्षणासाठी
जिल्ह्यातील संगणक लॅब अधिग्रहित
धाराशिव दि.२० मार्च (जिमाका) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लवकरच मतदार यादींचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision) राज्यात सुरू करण्याची घोषणा होणार आहे.त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून मतदार यादींच्या पुनरिक्षण पूर्व उपक्रमाची तयारीबाबत लेखी निर्देश दिलेले आहेत.त्यानुसार मतदार यादीमध्ये असलेल्या मतदारांचे सन २००२ रोजीच्या मतदार यादीतील मतदारांशी मतदार मॅपिंग करणे, अस्पष्ट (Blur Photo) मतदारांचे नवीन रंगीत फोटो गोळा करून अद्यावत करणे,तसेच DSE च्या नोंदीची पडताळणी करून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे इत्यादी कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील २४०-उमरगा,२४१-तुळजापूर, २४२-उस्मानाबाद व २४३-परंडा विधानसभा मतदारसंघातील सर्व BLO व BLO Supervisor यांनी मतदारांचे मॅपिंग करणे,अस्पष्ट असलेले (Blur Photo) फोटो गोळा करून अद्यावत करणे,तसेच DSE च्या नोंदीची पडताळणी करणे या कामकाजासाठी दिनांक २०.०३.२०२६ ते २१.०३.२०२६ या कालावधीत पूर्णवेळ सेवा अधिग्रहित केली असल्याने SIR संदर्भातील संगणकीय कामकाज करण्यासाठी तालुकानिहाय औद्योगिक संस्था / महाविद्यालयाच्या संगणक लॅब इंटरनेट सुविधेसह तसेच संगणक हाताळणारे ५ तांत्रिक कर्मचारी यांची सेवा या आदेशान्वये दिनांक २०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ या कालावधीत करिता खालील प्रमाणे अधिग्रहित करण्यात येत आहेत.
यामध्ये धाराशिव तालुक्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन,धाराशिव; तुळजापूर तालुक्यासाठी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय कंप्युटर लॅब, तुळजापूर; लोहारा तालुक्यासाठी श्री स्वामी रामानंद तीर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,लोहारा; उमरगा तालुक्यासाठी इंदिरा वेदप्रकाश शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,उमरगा; कळंब तालुक्यासाठी संत गोरखाबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कळंब; वाशी तालुक्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वाशी; भूम तालुक्यासाठी आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,भूम; तसेच परंडा तालुक्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,परंडा या संस्थांचा समावेश करण्यात आलेला आहे.
त्यामुळे वरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था / महाविद्यालयाच्या संगणक लॅब,इंटरनेट सुविधेसह दिनांक २०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ या कालावधीत सेवा अधिग्रहित करण्यात येत असून,संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून मतदार यादी विशेष पुनरिक्षणाची प्रक्रिया वेळेत व अचूकरीत्या पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
*****
युवा भारत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
युवा भारत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव,दि.२० मार्च (जिमाका) मेरा युवा भारत कार्यालय व छत्रपती क्रीडा मंडळ,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी आदित्य पाटील (कार्यकारी अधिकारी,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,धाराशिव) होते,तर प्रमुख उपस्थिती म्हणून अक्षय बिराजदार (तालुका क्रीडा अधिकारी) उपस्थित होते. मार्गदर्शन वक्ते म्हणून विश्वास खंदारे (तालुका क्रीडा अधिकारी,धाराशिव) तसेच मेरा युवा भारत कार्यालयाचे वैभव लांडगे,रविकांत सुरवसे,रोहिले गोविंद,ऋतुराज आगळे व छत्रपती क्रीडा मंडळाचे प्रा.प्रवीण बागल, रोहित चव्हाण,सुनील मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदित्य पाटील यांनी युवकांना मोठ्या संख्येने क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करण्याचे व देशाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले. त्यांनी क्रीडा क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन युवकांनी आपले भविष्य घडवावे,असेही सांगितले.
या स्पर्धांमध्ये उमरगा,लोहारा,भूम व परंडा तालुक्यांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.खो-खो, कबड्डी,१०० मीटर धावणे,गोळा फेक,लांब उडी व स्लो सायकलिंग अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे २०० ते २५० खेळाडूंनी आपली उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत कापसे व सिद्धेश्वर मते यांनी केले.हा कार्यक्रम उपसंचालक, मेरा युवा भारत,धाराशिव (महाराष्ट्र-गोवा) राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
*****
Subscribe to:
Posts (Atom)

























