उस्मानाबाद जिल्हा निती आयोगाच्या अभ्यासानुसार
आकांक्षीत जिल्हा म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानुसार या जिल्ह्याच्या
शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, स्वच्छता या क्षेत्रातील काम चांगल्या
पद्धतीने होणे अपेक्षित आहे.म्हणूनच येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच जनतेनेही या
गोष्टीकडे एक संधी म्हणून पाहावे, जेणेकरून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून
जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होऊ शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
यांनी आज येथे केले.
जिल्हा प्रशासन आणि युनिसेफ
यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 व 30 ऑगस्ट या दोन दिवशी "उस्मानाबाद
जीवन रेखा एक मुक्त चर्चा" या कार्यशाळेचे नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी
महाराज नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे ,या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते
बोलत होते. यावेळी माजी जिल्हाधिकारी श्री.नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
संजय कोलते ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी अनुप शेगुलवार, महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, श्री. निपाणीकर,
शिक्षणाधिकारी डॉ.शेख,जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री. कांबळे, उपमुख्य कार्यकारी
अधिकारी अजिंक्य पवार,सहाय्यक नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी,उपशिक्षणाधिकारी रोहिणी
कुंभार उपस्थित होते.
श्री.गमे. यांनी यावेळी उस्मानाबाद जिल्हा नेमका आकांक्षीत जिल्हा म्हणून कसा
निवडला गेला,या जिल्ह्याच्या कोणत्या घटकांवर विशेष काम करणे आवश्यक आहे, या
बाबींवर उत्तम असे सादरीकरण केले.यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याची पाणी टंचाई, जमिनीची
प्रत,भौगोलिक स्थान, पडणारा पाऊस या बाबींचा समावेश होता.
जिल्हाधिकारी श्री गमे यांनी सांगितले की, येथील शेती पावसावरच अवलंबून आहे.
त्यातही पडणाऱ्या पावसाचे बरेचसे पाणी म्हणजे जवळपास 58 टक्के पाणी कृष्णा पात्रात
तर 42 टक्के गोदावरी पात्रात जाऊन मिळते.त्यापैकी इथे जवळपास 16 टक्के पाण्यावरच
शेती होते. त्यातही जास्तीत जास्त पाणी उसाच्या शेतीला वापरले जाते.या जिल्ह्यात
जवळपास 7 लाख 50 हजार हेक्टर शेती क्षेत्र आहे परंतु फक्त चाळीस हजार हेक्टर
क्षेत्राला हे 16 टक्के पाणी वापरायला मिळते. 16 लाख 57 हजार 576 इतकी लोकसंख्या
असलेल्या या जिल्ह्यात 728 गावे तर 621 ग्रामपंचायती आहेत. येथे स्थलांतरणाचेही
प्रमाण जास्त आहे.गेल्या पंधरा वर्षांत सात वेळा दुष्काळ या जिल्ह्याने अनुभवला
आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आयोगाच्या 115 आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीत आपला जिल्हा 51 व्या क्रमांकावर
आहे.एक गोष्ट स्पष्ट आहे की, निती आयोगाने केलेल्या रँकिंगमध्ये सुधारणा करावयाची
असल्यास एकाक्ष होऊन फक्त कामच करावे लागेल,याला दुसरा पर्याय नाही त्यासाठी कामात
सुधारणा करून जिल्ह्याला आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीतून बाहेर
काढण्याचे आवाहन शेवटी जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या
कार्यक्रमाची प्रस्तावना युनिसेफच्या अपर्णा देशपांडे यांनी केली तर सूत्रसंचालन
डॉ. हनुमंत वडगावे यांनी केले.
या दोन दिवसीय कार्यशाळेत युनिसेफच्या
तज्ञ मार्गदर्शकांकडून स्वच्छता, आरोग्य,शिक्षण, महिला व बालकल्याण या विषयांवर
सविस्तर मार्गदर्शन केले जाणार असून तद्नंतर गटागटाने शासकीय
अधिकारी,कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा कार्यकर्त्या
गटचर्चा करणार आहेत. या गटचर्चेतून आपल्या दैनंदिन कामात कशा प्रकारे सुधारणा
घडवून आणता येतील,लोकांचे प्रश्न कसे सोडविता येतील याबाबत विचारमंथन होऊन
प्रत्यक्ष कृती करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
|
या कार्यशाळेस विविध
विभागांचे अधिकारी-कर्मचारी, युनिसेफचे तज्ञ मार्गदर्शक, आशा कार्यकर्त्या,
अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
|