Thursday, 25 June 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात जनजागृतीची व्यापक चळवळ; हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नशामुक्त भारत अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात जनजागृतीची व्यापक चळवळ; हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
धाराशिव,दि.२५ जून (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय,धाराशिव,जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग तसेच यश मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर विविध जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संदेश देणाऱ्या या अभियानात विद्यार्थी,युवक,शिक्षक, अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभियानाला सुरुवात करण्यात आली.
अभियानाचा प्रारंभ जिल्हा परिषद कन्या प्रशाला,धाराशिव येथे आयोजित व्यसनमुक्ती शपथविधी कार्यक्रमाने झाला.या कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांवदा म्हाडदाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,जिल्हा समाजकल्याण अधिकारी सचिन कवले,यश मेडिकल फाउंडेशनचे डॉ. संदीप तांबारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ.संदीप तांबारे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, त्यावरील उपाययोजना आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी आयुष्यभर व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली.
यानंतर समाजात व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी कन्या प्रशाला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत भव्य जनजागृती दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर्स,बॅनर्स आणि जनजागृतीपर फलक घेऊन सहभाग नोंदविला.
"नशामुक्त भारत – सशक्त भारत", "नशामुक्त भारत – विकसित भारत" आणि "नशामुक्त धाराशिव – सशक्त धाराशिव" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे युवकांसाठी व्यसनमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सचिन कवले होते.प्रमुख उपस्थितीमध्ये दिव्यांग कल्याण विभागाचे सचिदानंद बागर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त परमेश्वर खुने,समाजकल्याण निरीक्षक अमोल कातगळे तसेच डॉ.संदीप तांबारे यांचा समावेश होता.
यावेळी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सचिन कवले यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाने व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संकल्प करून धाराशिव जिल्हा नशामुक्त करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यशाळेत डॉ.संदीप तांबारे यांनी व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध उपचारपद्धती,पुनर्वसन प्रक्रिया तसेच युवकांची सामाजिक जबाबदारी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.प्रत्येक युवकाने आपल्या कुटुंबासह संपूर्ण जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.
या सर्व उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक,शिक्षक,विद्यार्थी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
समारोप प्रसंगी सर्व उपस्थितांनी पुन्हा एकदा नशामुक्त भारताची शपथ घेत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा दृढ संकल्प व्यक्त केला.व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने जनजागृतीची व्यापक चळवळ उभी करणारे हे अभियान धाराशिव जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
******
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन उत्साहात ; गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीसह गौरव
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन उत्साहात ; गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीसह गौरव
धाराशिव,दि.२५ जून (जिमाका) सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश देणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने सामाजिक न्याय दिन तसेच आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व तस्करी विरोधी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले होते.
प्रमुख वक्ते म्हणून प्रेरणादायी वक्ते भैरवनाथ कानडे आणि डॉ.संदीप तांबारे यांनी मार्गदर्शन केले.तसेच दिव्यांग कल्याण आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक सचिन बांगर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त काशिनाथ खुणे,विजयकुमार गायकवाड आणि ॲड.बडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविकात अध्यक्ष सचिन कवले यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,सामाजिक न्यायाची संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष शासन व्यवस्थेत रुजविली.शिक्षण,आरक्षण, शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या माध्यमातून वंचित समाजघटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श प्रत्येकाने आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक विचार आणि सामाजिक न्याय’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते भैरवनाथ कानडे यांनी शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे सर्वाधिक प्रभावी साधन असल्याचे सांगितले.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाच्या माध्यमातून समता,स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाची व्यापक चळवळ उभी केली.वसतिगृहे,शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण आणि आरक्षणाच्या धोरणांद्वारे त्यांनी वंचित समाजाला नवी दिशा दिली. आजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत संविधानिक मूल्ये,सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा विचार आत्मसात करून समाजपरिवर्तनाचे वाहक बनावे,असे आवाहन त्यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व तस्करी विरोधी दिनानिमित्त युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देताना डॉ.संदीप तांबारे म्हणाले की,मादक पदार्थांचे व्यसन हे व्यक्ती,कुटुंब आणि समाजासाठी घातक आहे.युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण,आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा.व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी व्यापक जनजागृती आणि सामूहिक सहभागाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले,तर आभार प्रदर्शन युवराज चव्हाण यांनी मानले.
राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर करताना विद्यार्थ्यांचा गौरव आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
******
Sunday, 21 June 2026
उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक प्राधिकारी संस्था निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण
उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक प्राधिकारी संस्था निवडणूक
मतमोजणीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण
धाराशिव,दि.२१ जून (जिमाका) महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद- लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी दि.२२ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.ही मतमोजणी भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),तुळजापूर रोड, धाराशिव येथे होणार असून प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली आहे.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार या मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया १८ जून रोजी शांततेत पार पडली. त्यानंतर आता मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
मतमोजणी केंद्रावर सुरक्षा,प्रवेश नियंत्रण तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.
******
वैद्यकीय प्रवेश परीक्षा शांततेत ; धाराशिव येथे RE-NEET ला ९१.५५ टक्के उपस्थिती २०७२ पैकी १८९७ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा ; १७५ परीक्षार्थी गैरहजर
वैद्यकीय प्रवेश परीक्षा शांततेत ; धाराशिव येथे RE-NEET ला ९१.५५ टक्के उपस्थिती
२०७२ पैकी १८९७ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा ; १७५ परीक्षार्थी गैरहजर
धाराशिव,दि.२१ जून (जिमाका) देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी RE-NEET (UG) २०२६ परीक्षा रविवारी धाराशिव शहरातील पाच केंद्रांवर शांततेत,शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्याचे स्वप्न बाळगलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा निर्णायक असल्याने सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA), नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत घेण्यात आली.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.
जिल्ह्यातील पाच परीक्षा केंद्रांवर एकूण २०७२ परीक्षार्थी नोंदणीकृत होते.त्यापैकी १८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली,तर १७५ परीक्षार्थी गैरहजर राहिल्याची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील उपस्थितीचे प्रमाण सुमारे ९१.५५ टक्के राहिले.
परीक्षा केंद्रनिहाय पाहता,श्रीपतराव भोसले हायस्कूल,तांबरी विभाग येथे ७२० पैकी ६५७ विद्यार्थी उपस्थित होते,तर ६३ गैरहजर राहिले.रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,बार्शी रोड येथे ४८० पैकी ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.शासकीय तंत्रनिकेतन,तुळजापूर रोड येथे ३६० पैकी ३२६,छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,तांबरी विभाग येथे २८८ पैकी २६४,तर जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे २२४ पैकी २०४ विद्यार्थी उपस्थित होते.
परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि गैरप्रकारमुक्त राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले होते.सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख, व्हिडिओग्राफी,बायोमेट्रिक पडताळणी, फ्रिस्किंग व्यवस्था,पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा नोडल अधिकारी विद्याचरण कडवकर तसेच सीआरपीएफचे सहाय्यक कमांडंट सिद्धार्थ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पार पडली.
याशिवाय शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य व NTA नोडल अधिकारी मो.रा.लोखंडे, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके,भरारी पथक प्रमुख आमोद भुजबळ,पोलीस निरीक्षक, महसूल,आरोग्य,परिवहन,वीज वितरण विभाग तसेच नगर परिषद प्रशासनानेही परीक्षा व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.
वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा जिल्ह्यात अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पूर्ण झाल्याने जिल्हा प्रशासनाचे नियोजन आणि विविध यंत्रणांमधील योग्य समन्वय साधून ही परीक्षा घेण्यात आली.
****
निरोगी जीवनाचा मंत्र देणारा योग दिन उत्साहात साजरा ७०० हून अधिक नागरिकांचा सहभाग
निरोगी जीवनाचा मंत्र देणारा
योग दिन उत्साहात साजरा
७०० हून अधिक नागरिकांचा सहभाग
धाराशिव दि.२१ जून (जिमाका) बदलती जीवनशैली,वाढता ताणतणाव आणि विविध आजारांच्या पार्श्वभूमीवर शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.भारतीय संस्कृतीची ही अमूल्य देणगी आज जगभर स्वीकारली जात असून,निरोगी आणि संतुलित जीवनाचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय योग दिन आज २१ जून रोजी रविवारी धाराशिवमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे,विद्यार्थी,खेळाडू,युवक- युवती,नागरिक आणि योग साधक- साधिका अशा विविध स्तरांतील सुमारे ७०० जणांनी एकत्रितपणे योगाभ्यास करत आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प केला.
जिल्हा प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,आयुष विभाग आणि मेरा युवा भारत केंद्र यांच्या विद्यमाने तसेच पतंजली योग समिती,आर्ट ऑफ लिव्हिंग,धाराशिव डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व क्रीडा भारती यांच्या सहकार्याने सकाळी ७ वाजता श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथील स्केटिंग मैदानावर हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी प्रवीण बागल, आंतरराष्ट्रीय खेळाडू गौरी शिंदे,खो-खो वर्ल्ड कप विजेती अश्विनी शिंदे,जिल्हा आयुष अधिकारी प्रिया सोनवणे,शिक्षण विस्तार अधिकारी भारत देवगुडे,क्रीडा भारतीचे प्रवीण गडदे,आर्ट ऑफ लिव्हिंगचे नंदकिशोर तांबडे तसेच डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सहसचिव योगेश थोरबोले यांचे स्वागत करून योग सत्रास प्रारंभ करण्यात आला.
यंदाच्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची (IDY २०२६) "निरोगी वृद्धत्वासाठी योग" (Yoga for Healthy Ageing) ही संकल्पना विशेष ठरली.वाढत्या वयातही शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी योग किती उपयुक्त आहे, याचा संदेश या संकल्पनेतून देण्यात आला.मैदानावर एकाच वेळी विविध वयोगटांतील नागरिकांनी योगाभ्यास करत या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद दिला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी नियमित योगासने करण्याचे आवाहन केले."स्वतःचे आरोग्य डॉक्टरविरहित ठेवण्यासाठी दररोज योगासने करा,नियमित मैदानावर या आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा," असे सांगत त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद करून उपस्थितांकडून ध्यान-धारणा करून घेण्यात आली.
श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, स्केटिंग मैदान येथे पतंजली योग संस्थेचे राम ढेरे यांनी उपस्थितांकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले.विविध योगासने, त्यांचे आरोग्यदायी फायदे आणि दैनंदिन जीवनात योगाचा समावेश कसा करावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.मैदानावर उपस्थित शेकडो नागरिकांनी उत्साहाने त्यांच्या सूचनांचे पालन करत योगाभ्यास केला.
या कार्यक्रमास तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी व अक्षय बिरादार, क्रीडा मार्गदर्शक डिंपल ठाकरे व विश्वास खंदारे,मनपा शिक्षणाधिकारी मल्हारी माने,आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक,मेरा युवा भारत केंद्राचे वैभव लांडगे,पतंजली योग समितीच्या साधनाताई व वैशाली उपासे यांच्यासह सुमारे ७०० योग साधक-साधिका उपस्थित होते.
तसेच शहरातील शासकीय नर्सिंग महाविद्यालय,खोखो खेलो इंडिया सेंटरचे खेळाडू,कर्मवीर बालक मंदिरचे विद्यार्थी, नागरिक,युवक-युवती आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात शेकडो नागरिकांनी एकत्रितपणे केलेला योगाभ्यास,मैदानावर उमटलेली सकारात्मक ऊर्जा आणि निरोगी जीवनाचा घेतलेला संकल्प यामुळे यंदाचा योग दिन विशेष संस्मरणीय ठरला.
राम ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा मार्गदर्शक शुंभागी रोकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
******
Subscribe to:
Posts (Atom)







