Saturday, 31 December 2016

पोलीस वर्धापण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


उस्मानाबाद,दि.31:- महाराष्ट्र  पोलीस दलाच्या वर्धापण दिनानिमित्त दि. 2 ते 5 जानेवारी 2017 या दरम्यान जिल्हा पोलीस दलामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त दि.2 जानेवारी 2017 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचे बॅनर व पत्रके प्रसिध्द करणे, पोलीस मुख्यालय व जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यात महिला सुरक्षा संदर्भात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे रॅलीचे आयोजन व पथनाटय, रॅली नंतर महिला स्व:रक्षणाविषयी  प्रात्यक्षिकाचे आयोजन व महिला सुरक्षेबाबतचे चर्चासत्र, दि.3 जानेवारी  2017 रोजी  जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याने शालेय विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यास भेट आयोजीत करणे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे व त्यांना पोलीस विभागातर्फे वापरण्यात येणाऱ्या हत्याराविषयी माहिती देणे व चर्चासत्र, निबंध, चित्रकला स्पर्धा आयोजित करणे, तर पोलीस अधिक्षक कार्यालयात जनतेला सुरक्षा विषयक निरनिराळी माहिती देण्याकरीता सार्वजनिक ठिकाणी, चौरस्ता येथे पोलीस  बॅन्डचे संचलन करणे, दि.4 जानेवारी 2017 रोजी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याने शाळा, महाविद्यालय येथे संबंधित पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन सामाजिक सुरक्षा, वाहतूक सुरक्षा, वाहतूकीचे नियम व सुरक्षित वाहतूक याविषयी माहिती देणे, पोलीस मुख्यालयात कायदेशिररित्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या किंमती मुद्देमाल नियमानुसार फिर्यादीस परत करण्याची विशेष मोहीम राबविणे, दि.5 जानेवारी 2017 रोजी पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांच्या भेटीचे आयोजन व शस्त्रप्रदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन पोलीस वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले असल्याचे पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख यांनी कळविले आहे.
                                              *****


प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2016 साठी पिक विम्याची हप्ता भरण्याची अंतिम मुदत जाहीर


          उस्मानाबाद,दि.31:- प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2016-17 साठी पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2016 ही होती. तथापि केंद्र शासनाने पिक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदत वाढवून ती दि. 10 जानेवारी 2017 अशी केलेली आहे. पिक विमा योजना ही कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. पिक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि. 10 जानेवारी  2017 करण्यात आली आहे.
            पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिरीष जमदाडे यांनी केले आहे.
          रब्बी हंगाम 2016-17 करीता खाली दर्शविल्याप्रमाणे उंबरठा उत्पादनाच्या पातळीपर्यंत प्रति हेक्टरी दिलेल्या विमा संरक्षित रकमेवर दिलेल्या पिक विमा दराप्रमाणे विमा हप्ता भरावयाचा आहे, त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे:-
गहू (बागायत) विमा संरक्षित रक्कम 33 हजार 300 रुपये, विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रु.495/-(शेतकरी हिस्सा)., गहू (जिरायत) विमा संरक्षित रक्कम 30 हजार रुपये विमा हप्ता दर 0. 66 टक्के,  विमा हप्ता रक्कम रु.198/-(शेतकरी हिस्सा) , ज्वारी (बागायत) विमा संरक्षित रक्कम 26 हजार रुपये, विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रु.390/- (शेतकरी हिस्सा) , ज्वारी (जिरायत) विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रु.360/-(शेतकरी हिस्सा) , हरभरा विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रु.360/- (शेतकरी हिस्सा) ,  करडई, विमा संरक्षित रक्कम 22 हजार रुपये, विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रु.330/-(शेतकरी हिस्सा) , सूर्यफूल विमा संरक्षित रक्कम 22 हजार रुपये, विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रु.330/-(शेतकरी हिस्सा) ,रब्बी कांदा   विमा संरक्षित रक्कम 3 हजार 600, विमा हप्ता दर 5.0 टक्के, विमा हप्ता रक्कम 3 हजार रुपये(शेतकरी हिस्सा)  , उन्हाळी भुईमूग  विमा संरक्षित रक्कम 60 हजार रुपये,  विमा हप्ता दर 1.50 टक्के, विमा हप्ता रक्कम रु.540/-(शेतकरी हिस्सा)   राहील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिरीष जमदाडे यांनी कळविले आहे .
****



Friday, 30 December 2016

“बेसिक फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी प्रशिक्षणातून स्वयंरोजगार”


           उस्मनाबाद,दि.30:- स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील 18 ते 45वयोगटातील पुरुषांसाठी 10 ते 30 डिसेंबर 2016 या 21 दिवसाच्या कालावधीत  बेसिक फोटोग्राफी व्हिडिओग्राफीया प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा निरोप समारंभ दिनांक 30डिसेंबर 2016 रोजी श्री.अमोल देवलसी, ग्रामीण जीवन्नोती अभियान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, छ.शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
याप्रसंगी   नायब तहसिलदार   श्री. रामदासी, श्री. पांडुरंग वारे, प्रशिक्षक श्री. माळाळे , अर्बन बँक मॅनेजर श्री. धनंजय कुलकर्णी, श्री श्रीराम क्षीरसागर तसेच स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे  संचालक श्री. मिलिंद सावंत व कर्मचारी उपस्थितीत होते.
संस्थेचे संचालक श्री. मिलिंद सावंत यांनी संस्था स्थापनेपासूनचा आढावा घेताना आजतागायत 105 प्रशिक्षण कार्यक्रमय यशस्वीपनणे राबविले असून 3 हजार 64 पुरुष व महिला उमेदवारांना  या संस्थेकडून प्रशिक्षण दिलेले आहे. त्याचप्रमाणे १हजार ५७३ प्रशिक्षणार्थ्यांनी स्वयंरोजगार सुरु केलेला आहे. प्रशिक्षण कालावधीत निवास व भोजनाची व्यवस्था संस्थेमार्फत मोफत केलेली असून वितरित केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे स्वयंरोजगार सुरु करू शकतात असे श्री. सावंत यांनी प्रास्ताविकात केले .
तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कमीत कमी 2 वर्षापर्यंत संस्थेतर्फे प्रशिक्षनार्थ्याचा पाठपुरावा केला जातो आणि स्वतच्या पायावर उभे केले जात असल्याचे यांनी  प्रतिपादन केले.         
 “ शोभेच्या वस्तू बनविणे प्रशिक्षण याबाबत पुढील प्रशिक्षण देण्यात येणार असून ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील 18 ते 45 वयोगटातील महिलांसाठी दि.१ जानेवारी ते ३० जानेवारी २०१७. या ३० दिवसाच्या कालावधीसाठी आहे. प्रवेशासाठी 02472 - 222124 किंवा 7875443799 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करून प्रशिक्षणार्थ्याना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
निरोप समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना श्री.अमोल देवलसी, ग्रामीण जीवन्नोती अभियान, उस्मानाबाद यांनी  प्रशिक्षाणार्थ्यांना ग्राहकाची गरज ओळखून  त्याला जे हवे आहे ते देणे आणि आपल्या उद्योगात भर पाडणे याविषयी सांगून त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी पाहिजे, जिद्द-चिकाटी , प्रामाणिकपणे काम, आपले भविष्य आपण घडवू शकतो हे सांगितले व आपला उदयोग सुरु करण्याचे आवाहन केले.त्यासाठी  लागणारे भांडवल पुरवठा बँका करतात असेही  सांगितले. तसेच  रोजगार मेळाव्यामधून आपण नोकरीसाठी  अर्ज  करू  शकता असे  सांगितले  आणि प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशिक्षणार्थी श्री. प्रवीण बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश सूर्यवंशी  यांनी  केले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.                                                                                                                                                         ******                       



तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न


उस्मानाबाद, दि.30 : नेहरु  युवा  केंद्र  उस्मानाबाद  व नेहरु  युवा  मंडळ  बावी  तालुका  वाशी  जि. उस्मानाबाद यांच्या  संयुक्त  विद्यमाने  तालुका स्तरीय  क्रीडा  स्पर्धा  घेण्यात  आल्या.  दिनांक 27 डिसेंबर 2016  रोजी  सकाळी 11.00  वाजता  जनसेवा  विद्यालय  प्रांगण  बावी ता.वाशी   येथे या क्रीडा पार पडल्या.
क्रीडाशिक्षक श्री व्ही.व्ही.शिंदे, श्री डी.एस.शिंदे, श्री पी.डी. शिंदे, श्री जे.आर.जाधव, श्री आर.एच.शिंदे, श्री पी.एस.शेळके, श्री बी.एन जगताप, श्री पांडुरंग निमकर, श्री  विक्रम  शिंदे  या  मान्यवरांच्या  हस्ते  शुभारंभ करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये धावणे, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, रांगोळी अशा विविध क्रीडा  स्पर्धा  घेण्यात  आल्या या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये  तालुक्यातील  विविध  गावांमधून  संघ सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने झिन्नर, गोजवडा, बावी, सोनार वाडी ,वाशी , सरमकुंडी, दसमेगाव येथील विविध खेळांडूनी  उत्सफूर्तपणे  आपला  सहभाग  नोंदविला.
यामध्ये  प्रामुख्याने  विजयी  ठरलेले  संघ व  विजेते पुढील  प्रमाणे आहेत- धावणे-प्रथम संकेत शिंदे (सोनारी), व्दितीय शिवप्रसाद शिंदे(बावी), तृतीय अंगद सरकार सोनारी, रांगोळी स्पर्धा प्रथम रेणूका टेकाळे (वाशी), व्दितीय  सुप्रिया  शिंदे (बावी), तृतीय पूजा शिंदे (बावी) कबड्डी स्पर्धा प्रथम जनसेवा संघ (बावी), जग्गज्योती महात्मा बसवेश्वर संघ (झिन्नर), तृतीय जीवनज्योती संघ(सोनारवाडी), खो-खो प्रथम जनसेवा संघ (बावी), व्दितीय महात्मा  बसवेश्वर संघ (झिन्नर), तृतीय क्रांती संघ (गोजवडा) व्हॉलीबॉल प्रथम जीवनज्योती संघ (सोनारवाडी), व्दितीय भगवान महावीर संघ (सरमकुंडी) तृतीय क्रांती संघ गोजवडा.
विजेत्या संघांना व स्पर्धकाना प्रथम, व्दितीय, तृतीय  बक्षीस  व प्रमाणपत्र मुख्याध्यापक श्री बाबासाहेब शिंदे व श्री मुख्याध्यापक जनसेवा विद्यालय बावी , एस.आर.कावळे महात्मा बसवेश्वर विद्यालय झिन्नर  यांच्या  हस्ते  देण्यात  आले व आधुनिक कृषी क्रांतीचे शिल्पकार-शरद  पवार  या  विषयावरील  निबंध  स्पर्धेत जिल्हयात प्रथम क्रमांक  आलेली यादव रुतुजा बालाजी व  वरील संघांना  बक्षिस वितरण  करण्यात  आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय युवा स्वंयसेवक विरेश गायकवाड, आर.एस. उमरदंड व सामाजिक  कार्यकर्ते  श्री.  विक्रम  शिंदे  त्याचबरोबर  प्रशांत शिंदे  व  जनसेवा  विद्यालय  बावी यांचे  सर्व  शिक्षक  व  कर्मचारी  यांनी  परिश्रम घेतले.
*****


राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे 19 ते 25 जानेवारी 2017 दरम्यान आयोजन


उस्मानाबाद.दि.30:- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दि.19 ते 25 जानेवारी 2017 या कालावधीत राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये दि.19 ते 21 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा, दि.23 ते 25 जानेवारी 2017 या दरम्यान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन यशंवतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, सातारा येथे केले आहे.

             या स्पर्धांसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख वक्तृत्व स्पर्धेसाठी दि. 16 जानेवारी 2017 तर प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी दि 15 जानेवारी 2017 राहील. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (02162-231074) व संस्थेच्या www.rayatshikshan.eduwww.erayat.org या संकेत स्थळावर संपर्क साधावा. असे कार्यकारी संचालक श्री. आर. के. शिंदे यांनी कळविले आहे.

अन्नधान्याचे माहे जानेवारी-2017 साठीचे मासिक नियतन मंजूर


उस्मानाबाद.दि.30:- जिल्ह्यातील माहे जानेवारी 2017 करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी करण्याकरिता योजनानिहाय अन्नधान्याचे मासिक नियतन मंजूर झाले असून या नियतनाची योजनानिहाय लाभार्थी संख्यानिहाय अन्यधान्य परिमाण पुढीलप्रमाणे निर्धारित  करण्यात येत आहे.
 प्राधान्य  कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत गहू 3 कि.ग्रॅ. प्रतिव्यक्ती 2 रु.,तांदूळ 2 कि.ग्रॅ.प्रतिव्यक्ती 3 रु., अंत्योदय  योजनेतील लाभार्थ्यांसाठी गहू 21 कि.ग्रॅ.प्रती कार्ड 2 रु., तांदूळ 14 कि.ग्रॅ.प्रती कार्ड 3 रु., एपीएल (केसरी) शेतकरी लाभार्थ्यांसाठी गहू -3 कि.ग्रॅ . प्रतीव्यक्ती 2 रुपये, तांदूळ- 2 कि.ग्रॅ प्रतिव्‍यकी-3 रु., उर्वरीत ए. पी. एल. साठी अद्याप नियत मंजूर नाही,गहू 10 कि.ग्रॅ. प्रती कार्ड 7.20 रू.,तांदूळ 5 किलो प्रती कार्ड 9.60 रू., साखर - बी. पी. एल. 500 ग्रॅम दरडोई- 13 रुपये 50 पैसे, अंत्योदय  योजनेंतर्गत साखर 500 ग्रॅम दरडोई- 13 रुपये 50 पैसे, अन्नपूर्णा 500 ग्रॅम दरडोई -13 रुपये 50 पैसे याप्रमाणे राहील. 
             केरोसीनचा विक्रीदर दि. 16 नोव्हेंबर 2016 पासून पुढीलप्रमाणे आहे- उस्मानाबाद तालुका  दर 18 रुपये 68 पैसे प्रति लिटर , तुळजापूर 18 रुपये 56 पैसे, उमरगा -18 रुपये 81 पैसे, लोहारा 18 रुपये 71 पैसे , कळंब -18 रुपये 95 पैसे, परंडा- 18 रुपये 90 पैसे, भूम-18 रुपये 92 पैसे व वाशी तालुक्यातील दर 18 रुपये 33  पैसे प्रति लिटर राहतील. 
उस्मानाबाद जिल्हयासाठी माहे जानेवारी 2017 करिता शासनाकडून अन्नधान्याचे नियतन पुढीलप्रमाणे प्राप्त झाले आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी गहू 2 हजार 295 मेट्रीक टन व तांदूळ 1 हजार 997 मे टन,  तसेच अंत्योदय अन्न योजनेसाठी गहू 822 मेट्रीक टन, तांदूळ 548 मेट्रीक टन व शेतकरी लाभार्थी गहू 1 हजार 421 मे.टन व तांदूळ 947 मे.टन एवढे धान्य प्राप्त झाले आहे. या धान्याच्या वाहतुकीबाबतचे आदेश वाहतूक ठेकेदार गोदामनिहाय देण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहेत.

                                  *****

पाटोदा येथे मोफत आरोग्य तपासणी व संवाद मेळावा संपन्न





            उस्मानाबाद,दि.30:- प्राथमिक आरोग्य केंद्र पाटोदा ता. उस्मानाबाद येथे दि 30 डिसेंबर 2016 रोजी  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी कार्यक्रमांतर्गत बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकरी व  त्यांचे पाल्य यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.  प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे,   वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.डी.बिरादार, डॉ. एस.एम. सुतार डॉ. सौ. कदम, श्रीमती संध्या द्वासे , जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बोरकर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पाटोद्याचे कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे  यांनी आरोग्य मेळाव्यासाठी उपस्थित लाभार्थीं, शाळकरी मुले-मुली  यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, चांगले  आरोग्य ठेवण्यासाठी  30 वर्षांपुढील प्रत्येकांनी आजार असेल किंवा नसेल तरीही आरोग्य तपासणी करून घ्यावी. ग्रामीण भागातील जनतेने आरोग्याची काळजी घेताना परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरावे, तंबाखु,गुटखा,मावा असे तंबाखूजन्य पदार्थ  खावू  नयेत. तसेच प्रणायाम, योगा यासारखे व्यायाम करावेत.प्राथमिक आरोग्य स्तरावरील सर्व शासकीय योजना व आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना  म्हणाले की , शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेस समुपदेशन करण्यासाठी आरोग्य गट, शेतकरी मदत गट तयार करण्यात यावेत. या गटांनी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांची माहिती जनतेला देण्यात यावी व शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारू नये. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले.शासना मार्फत  शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी  बळीराजा चेतना अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत शेतकरी व  त्यांचे पाल्य यांची प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर  तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी, संवाद मेळावे आयोजित करून शेतकऱ्यांना मानसिक समुपदेशन करण्यात येते. शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती व नापिकीला कंटाळून आत्महत्या करू नये, परिस्थितीचा धिराने सामना करावा असेही जिल्हाधिकारी डॉ.  प्रशांत नारनवरे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले .
           आरोग्य मेळाव्याच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना,  उपक्रम व आरोग्य विषयक माहितीचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या मेळाव्यास   करजखेडा येथील न्यु कनिष्ठ कला महाविद्यालयाचे प्राचार्य परमेश्वर ढमाले तसेच  विद्यार्थी व विद्यार्थीनी,  जिल्हा परिषद प्रशाला , पाटोदा येथील  शाळेतील मुले, मुली, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील महिला, पुरूष, स्थानिक गावकरी आरोग्य तपासणीसाठी मोठया संख्येने उपस्थित होते.
            यावेळी  नायगांवच्या ग्राम मंडळ या संस्थेकडून लोकजागर  या कार्यक्रमांतर्गत  श्री. चव्हाण यांनी    शेतकऱ्यांनी आत्महत्येपासून परावृत्त व्हावे यासाठी  एक ह्रदयस्पर्शी  एकांकिका सादर केली .  तसेच  बोलक्या  बाहुल्यांच्या कार्यक्रमातूनही जनजागृती करण्यात आली .
            यावेळी कु. ऋतुजा केदारे या विद्यार्थीनीने शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारु नये , शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारल्यास त्यांचे कुटुंब उघड्यावर येते यामुळे दुष्काळाचा व संकटांचा धैर्याने सामना करावा अशा भावनाही  तिने आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.

******

विभागीय महसूल स्पर्धेत उस्मानाबादची नेत्रदीपक कामगिरी


            उस्मानाबाद,दि.30:- नांदेड येथे घेण्यात आलेल्या विभागीय महसूल सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत उस्मानाबाद महसूल विभागाने विविध स्पर्धेत घवघवीत यश संपादन करीत नेत्रदीपक कामगिरी केली.
             नांदेड येथे दि. 22 ते 24 डिसेंबर 2016 दरम्यान घेण्यात आलेल्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत उस्मानाबाद तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार राजेश जाधव  यांच्या संघाने वारु नृत्य  व जाऊ द्यां ना बाळासाहेब या मराठी चिञपटातील समूह नृत्य सादर करून स्पर्धेत यश संपादन केले.  संघामध्ये वाशी तहसिल कार्यालयाच्या तलाठी  सुप्रिया ठाकूर, उस्मानाबाद  तहसिल कार्यालयाचे  निशिकांत भोज, सचिन मोरे, प्रविण शेंदारकर, बालाजी लाकाळ, राजेश भवाळ, सुजित टिके, कळंब तहसिल कार्यालयाचे  राहूल वाघमारे, नितेश काळे, महेश क्षिरसागर यांचा समावेश होता, वारु  या नृत्यास प्रथम पारितोषिक मिळाले.
          परंडा तहसिल कार्यालयाचे शोभा गायकवाड यांनी कॅशलेसअभिनय सादर केला, या अभिनयास प्रथम पारितोषिक मिळाले.
            गोंधळी नृत्य  ,तलाठी मुकुंद शिदे यांनी गायन केले. तहसिलदार अभय मस्के यांनी काव्य वाचन केले,  लावणी  नृत्य सादर केले, लोहारा तहसिल कार्यालयाचे विशाल पवार यांनी  मिमिक्री  सादर केली. उस्मानाबाद जिल्हयाने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास विभागातील सर्व जिल्ह्याने मोठ्या प्रमाणात दाद दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूञसंचलन  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  श्रीमती वृषाली  तेलोरे  यांनी  केले.
खेळामध्ये  तहसिलदार  अभय मस्के, उमरगा तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार केलूकर यांनी  बॅडमिंटन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला. 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत श्रीमती कदम यांनी पहिला क्रमांक मिळविला. श्रीमती उंबरे यांनी बॅडमिंटन महिला गटामध्ये  प्रथम क्रमांक पटकावला. श्रीमती  एतवाडे व श्रीमती कुंभार यांनीही बुध्दिबळ व बॅडमिंटन या महिला गटाच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला.
उस्मानाबाद जिल्हयाने सादर केलेल्या सांस्कृतिक  कार्यक्रमाचे तसेच पारितोषिक प्राप्त सर्व खेळाडूचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे,अपर जिल्हाधिकारी  अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिराशे, तहसिलदार सुजित नरहरे आदींनी अभिनंदन केले.
***** 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील कामांवर स्वेच्छा निधीतून खर्च करण्यास दिनांक 21 डिसेंबर पासून निर्बंध


उस्मानाबाद,दि.30:- कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूकीमध्ये संबंधित स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या तीन महिने आधीपासून किंवा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून लोकप्रतिनिधींना  त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामांवर स्वेच्छा निधीतून खर्च करता येणार नाही, असे निवडणूक विभागाने आदेश दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेची निवडणूक दि.20 मार्च 2017 रोजी संपत असल्याने जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार त्यांनी पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत-दि.21 डिसेंबर 2016 नंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीला स्वेच्छा निधीतून कोणत्याही प्रकारचे आश्वासन देवू नये किंवा मंजूरीसाठी नव्याने प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करू नयेत, स्वेच्छा निधीतून मंजूर करणाऱ्या, कार्यारंभ आदेश देणाऱ्या किंवा प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुढील बाबीचे कटाक्षाने    पालन करावे, दि 21 डिसेंबर 2016 नंतर कोणत्याही नवीन कामाच्या प्रस्तावास मंजूरी देवू नये, दि. 21 डिसेंबर 2016 पूर्वी प्रस्ताव मंजूर असेल, पण प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली नसेल तर कार्यांरभादेश देऊ नये किंवा कामास सुरूवात करू नये, दि. 21 डिसेंबर 2016 पूर्वी जर प्रत्यक्ष कामाची सुरूवात झाली असेल तर ते काम सुरू ठेवावे.
  वरील निर्बंध न पाळल्यास, ते काम मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे गृहीत धरण्यात येऊन कामास त्वरित स्थगिती देण्यात येईल, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. ****


तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न


उस्मानाबाद, दि.30 : नेहरु  युवा  केंद्र  उस्मानाबाद  व नेहरु  युवा  मंडळ  बावी  तालुका  वाशी  जि. उस्मानाबाद यांच्या  संयुक्त  विद्यमाने  तालुका स्तरीय  क्रीडा  स्पर्धा  घेण्यात  आल्या.  दिनांक 27 डिसेंबर 2016  रोजी  सकाळी 11.00  वाजता  जनसेवा  विद्यालय  प्रांगण  बावी ता.वाशी   येथे या क्रीडा पार पडल्या.
क्रीडाशिक्षक श्री व्ही.व्ही.शिंदे, श्री डी.एस.शिंदे, श्री पी.डी. शिंदे, श्री जे.आर.जाधव, श्री आर.एच.शिंदे, श्री पी.एस.शेळके, श्री बी.एन जगताप, श्री पांडुरंग निमकर, श्री  विक्रम  शिंदे  या  मान्यवरांच्या  हस्ते  शुभारंभ करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये धावणे, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, रांगोळी अशा विविध क्रीडा  स्पर्धा  घेण्यात  आल्या या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये  तालुक्यातील  विविध  गावांमधून  संघ सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने झिन्नर, गोजवडा, बावी, सोनार वाडी ,वाशी , सरमकुंडी, दसमेगाव येथील विविध खेळांडूनी  उत्सफूर्तपणे  आपला  सहभाग  नोंदविला.
यामध्ये  प्रामुख्याने  विजयी  ठरलेले  संघ व  विजेते पुढील  प्रमाणे आहेत- धावणे-प्रथम संकेत शिंदे (सोनारी), व्दितीय शिवप्रसाद शिंदे(बावी), तृतीय अंगद सरकार सोनारी, रांगोळी स्पर्धा प्रथम रेणूका टेकाळे (वाशी), व्दितीय  सुप्रिया  शिंदे (बावी), तृतीय पूजा शिंदे (बावी) कबड्डी स्पर्धा प्रथम जनसेवा संघ (बावी), जग्गज्योती महात्मा बसवेश्वर संघ (झिन्नर), तृतीय जीवनज्योती संघ(सोनारवाडी), खो-खो प्रथम जनसेवा संघ (बावी), व्दितीय महात्मा  बसवेश्वर संघ (झिन्नर), तृतीय क्रांती संघ (गोजवडा) व्हॉलीबॉल प्रथम जीवनज्योती संघ (सोनारवाडी), व्दितीय भगवान महावीर संघ (सरमकुंडी) तृतीय क्रांती संघ गोजवडा.
विजेत्या संघांना व स्पर्धकाना प्रथम, व्दितीय, तृतीय  बक्षीस  व प्रमाणपत्र मुख्याध्यापक श्री बाबासाहेब शिंदे व श्री मुख्याध्यापक जनसेवा विद्यालय बावी , एस.आर.कावळे महात्मा बसवेश्वर विद्यालय झिन्नर  यांच्या  हस्ते  देण्यात  आले व आधुनिक कृषी क्रांतीचे शिल्पकार-शरद  पवार  या  विषयावरील  निबंध  स्पर्धेत जिल्हयात प्रथम क्रमांक  आलेली यादव रुतुजा बालाजी व  वरील संघांना  बक्षिस वितरण  करण्यात  आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय युवा स्वंयसेवक विरेश गायकवाड, आर.एस. उमरदंड व सामाजिक  कार्यकर्ते  श्री.  विक्रम  शिंदे  त्याचबरोबर  प्रशांत शिंदे  व  जनसेवा  विद्यालय  बावी यांचे  सर्व  शिक्षक  व  कर्मचारी  यांनी  परिश्रम घेतले.
*****




Thursday, 29 December 2016

अवयवदान जीवनातील आशेचा किरण!

लेख

अवयवदानाबाबत समाजात जागरुकता वाढत असली तरी अवयव दानाबाबतीत सर्वसामान्यांच्या मनात काही शंका आहेत.अवयवदानामुळे काहींच्या जीवनात आशेचा किरण निर्मा झाला आहे. त्यामुळे समाजात अवयवदानामुळे  अधिकाधिक जागरुकता होणे  गरजेचे आहे.
 
अवयवदान :-जिवंतपणी  किंवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान होय.  अवयवदानाद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयव दान करुन अंतिम स्वरुपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत अशा रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.

अवयव प्रत्यारोपण :- एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करुन तो एखाद्या गरजू रुग्णामध्ये प्रत्योरोपीत करतात.  ज्याचा एखदा अवयव कायमस्वरुपी निकामी झाला आहे अशा रुग्णांसाठी ही प्रमाणित व उपलब्ध अशी उपचार पद्धती आहे.

आपण कोणत्या अवयवांचे दान करु शकतो.
मेंदू स्तंभ मृत्यू :- मृत व्यक्ती जिची हृदयक्रिया चालू आहे.  पण जिचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाला आहे, अशी व्यक्ती बहुतेक प्रमुख अवयवांचे म्हणजे मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत, हृदय, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाची झडप व कानाचे ड्रम यांचे दान करु शकतो.

सामान्य मृत्यू :- मृत व्यक्तीची जिची हृदयक्रिया बंद पडली आहे.  अशी व्यक्ती फक्त डोळे व त्वचा या अवयवांचे दान करु शकते.

जिवंत व्यक्ती :- जीवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठीच अवयवदान करु शकते.  रुग्ण दाताच्या जवळचा नातेवाईक म्हणजे आजी, आजोबा, नातू, मुलगी, मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण अथवा पती किंवा पत्नी यांना करु शकतो.  या व्यतिरिक्त कोणालाही रुग्णासाठी अवयवदान करायचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते.  जिवंत व्यक्ती कांही मर्यादित अवयवाचे दान करु शकते. उदा :- मुत्रपिंड अथवा यकृताचा कांही भाग दान करु शकतात.

ब्रेन डेड मृत्यू :-
एखाद्या व्यक्तीची चेतना व श्वासोच्छवास कायमस्वरुपी बंद झाल्यास त्याला मृत घोषित केले जाते.  चेतना व श्वासोच्छवास या दोन्हीचे केंद्र आपल्या मेंदूतील मस्तिष्क स्तंभ या भागात असतो. अपघातात डोक्याला मार लागल्यास मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तिष्क स्तंभास कायम स्वरुपी इजा झाल्यास या व्यक्तीचा मस्तिष्क स्तंभ (ब्रेन डेंड) मृत्यू होवू शकतो.

एखाद्या व्यक्तीचे अतिदक्षता विभागात उपकरणांच्या सहाय्याने हृदय कृत्रिमरित्या क्रियाशील ठेवले असेल तसेच कांही ठराविक प्रमाणित चाचण्यांच्या आधारे जर तिचा मस्तिष्क स्तंभ मृत झाल्याचे निश्चित झाले तर त्या व्यक्तीस मृत घोषीत करता येते.  अशा व्यक्तीचे हृदय जास्तीत-जास्त 16 ते 72 तासापर्यंत कृत्रिमरित्या क्रियाशील ठेवता येते.  याच कालावधीत प्रमुख अंतर्गत अवयवांचे दान होवू शकते.  यासाठी त्या रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांची संमती आवश्यक असते.  असे अवयवदान फक्त शासनाने मान्यता दिलेल्या प्रतिरोपण रुग्णालयातच करता येते.

मस्तिष्क स्तंभ मृत्यू घोषित करणे व अवयवदान कायदेशीर बाबी :-
      1. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार मस्तिष्क स्तंभ मृत्यू व अवयवदान या दोन्हींना खालील बाबीला अनूसरुन कायदेशीर मान्यता आहे.
      अ) मस्तिष्क स्तंभ मृत्यूला मान्यता देणे जेणे करुन मृत्यूनंतर अवयवदान होवू शकेल.
      ब) रुग्णांच्या उपचारासाठी मृत व्यक्तीचे अवयव काढणे साठवणे व प्रतिरोपण करणे यावर नियंत्रण ठेवणे.
      क) मानवी अवयवांच्या व्यापारावर प्रतिबंध घालणे, कायद्याने अवयव विकणे व विकत घेणे, त्यासाठी जाहिरात करणे  किंवा अवयव मिळवून देण्यासाठी व्यापारी तत्वावर मध्यस्त करणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
            
 अवयवदान करायचे असल्यास काय करायला हवे.
एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर आपले अवयवदान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमतीपत्र भरणे आवश्यक आहे.  संमतीपत्रावर जवळच्या सज्ञान नातेवाईकांची सही घेणे देखील आवश्यक आहे. 

संमतीपत्र भरुन दिल्यानंतर त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाते व हे कार्ड दात्याने सतत आपल्या जवळ बाळगणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्याच्या नातेवाईकाला अथवा मित्र परिवाराला त्याच्या अवयवदान करण्याच्या इच्छेविषयी माहिती होईल. जरी आपण डोनर कार्डवर सही केली असली तरी आपल्या मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीशिवाय अवयवदान होवू शकत नाही. म्हणून आपल्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे आवश्यक आहे.

अवयवदानाविषयी असणारे गैरसमज दूर करून अवयवदान करा.  ज्यामुळे मृत्यू पश्चात काहींच्या जीवनात आशेचा किरण येवू शकतो.

                                                                              विलास माळी
                                                                         आंतरवासिता विद्यार्थी,
                                                                         जिल्हा माहिती कार्यालय,

                                                                                उस्मानाबाद.

आश्रमशाळेच्या सोयीसुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविण्यपूर्ण योजनेतून प्रस्ताव सादर करावेत-सहकार मंत्री सुभाष देशमुख


उस्मानाबाद,दि.29:-  जिल्ह्यातील  आश्रमशाळेसाठी सोयी सुविधा  उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविण्यपूर्ण योजनेतून  प्रस्ताव सादर करावेत  अशा सूचना सहकार , पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिल्या .
यमगरवाडी  येथील एकलव्य निवासी  आश्रमशाळेच्या समस्या सोडविण्याबाबत  आयोजित बैठकीत मंत्री महोदय बोलत होते .
 या बैठकीस  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , उप जिल्हाधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर , उप जिल्हाधिकारी  श्री. सचिन बारवकर ,  शिक्षणाधिकारी (प्रा) श्री. सचिन जगताप ,  जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, सहायक आयुक्त समाज कल्याण यांचे प्रतिनिधी  श्री. अमित घवले ,  जिल्हा उप निबंधक श्री. वाबळे ,  तहसिलदार  श्री. सुजित नरहरे , जिल्ह्यातील आश्रमशाळेचे  मुख्याध्यापक  यावेळी उपस्थित होते . 
यावेळी बैठकीस मार्गदर्शन करताना मंत्री महोदय म्हणाले की , राज्य  शासनाच्या सर्व क्रीडा योजना  आश्रमशाळांसाठी राबवून  क्रीडा सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना दिल्या . या सुविधेबरोबर क्रीडांगणात मल्टीपर्पज हॉल, अत्याधुनिक  सोयी सुविधांनी युक्त व्यायाम शाळा ,  खेळासाठीचे सर्व साहित्यही  उपलब्ध  करुन देण्यात येईल तसेच निधी कमी पडू दिला जाणार नाही , असे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले .
*****


कृषी पतपुरवठा सहकारी संस्था , विविध कार्यकारी सेवा संस्थांची सभासद नोंदणी 31 मार्च 2017 पर्यंत पूर्ण करा -सहकार मंत्री सुभाष देशमुख




उस्मानाबाद,दि.29:- लातूर विभागातील प्रत्येक गावातील पात्र खातेदारांना प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था , विविध कार्यकारी सेवा संस्थांचे  सभासद नोंदणी 31 मार्च 2017 पर्यंत 100 टक्के करावेत , अशा स्पष्ट सूचना  राज्याचे सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष  देशमुख  यांनी आज विभागीय आढावा बैठकीत दिल्या.
उस्मानाबाद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित विभागीय आढावा बैठकीस  लातूर विभागाचे विभागीय सह संचालक श्री. श्रीकांत देशमुख ,  मंत्री महोदयांचे सचिव श्री. संतोष पाटील , लातूर विभागातील उस्मानाबाद , बीड ,लातूर  आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक , सह जिल्हा निबंधक ,  जिल्हा विशेष लेखा  परीक्षक वर्ग-1 ,  लातूर विभागातील सर्व कृषी उत्पन्न  बाजार समित्यांचे  सभापती , उपसभापती या बैठकीस उपस्थित होते .
बैठकीस मार्गदर्शन करताना सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की , लातूर विभागातील  अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात आपल्या जिल्ह्यात डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन  करण्यासाठी प्रयत्न करावेत .
श्री. निशिकांत  गुळवे आणि श्री. दादाराव या दोन शेतकऱ्यांच्या जमीनी उस्मानाबाद जिल्ह्यातील  सावकारांच्या पाषातून  सोडवून  या शेतकऱ्यांना यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते शेत जमिनी परत केल्याबाबतचे प्रमाणपत्र व पुष्पहार घालून  यावेळी गौरविण्यात आले.
यावेळी सहकार विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागणींकडे लक्ष वेधताना मंत्री महोदय म्हणाले की , सहकार विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या  मागण्यांगबाबत सहानुभूती पूर्वक विचार करुन येणाऱ्या काळात त्यांचे प्रश्न निकाली काढण्यात येतील असेही त्यांनी आश्वासन दिले .
या बैठकीमध्ये  जिल्हा उप निबंधकांनी  30 सप्टेंबर अखेर  खरीप पीक कर्जवाटपाची माहिती , रब्बी पीक  कर्ज वाटपाची माहिती , शासकीय कर्ज , भाग भांडवल , थकहमी  शुल्क , थकीत लेखा परीक्षण  शुल्क ,  शासकीय वसुलीचा आढावा , सावकारी  कायदा कलम 18(1) अन्वये दाखल  प्रकरणांकरिता  कार्यवाहीचा आढावा ,  सहकारी  खरेदी  विक्री संघाचे बळकटीकरण,  शेतमाल तारण  योजनेची अंमलबजावणी ,  तोट्यात गेलेले खरेदी विक्री संघ , अडचणीतील नागरी सहकारी बँकांच्या कामकाजाचाआढावाही यावेळी मंत्री महोदयांनी घेतला .  *****


Wednesday, 28 December 2016

सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा


उस्मानबाद,दि.28:-सहकार,पणन व  वस्त्रोउद्योग मंत्री सुभाष  देशमुख हे उस्मानाबाद  जिल्ह्याच्या  दौऱ्यावर  येत  असून,  त्यांचा  दौरा  कार्यक्रम  पुढीलप्रमाणे  आहे-
गुरूवार  दि. 29  डिसेंबर 2016 रोजी  सकाळी  10-00 वाजता  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक,उस्मानाबाद  येथे आगमन. 10.15 ते 2-15 पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक, उस्मानाबाद  येथे  लातूर  विभागाच्या  आढावा  बैठकीस  उपस्थिती.
दुपारी 2-15 ते 2-45  वाजे पर्यत राखीव. जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी 3-00 ते 3-30 पर्यंत  एकलव्य  निवासी  आश्रम शाळा, यमगरवाडी  यांच्या  समस्याबाबत  बैठक. दुपारी 3-30 वाजता  जिल्हाधिकारी  कार्यालय, उस्मानाबाद  येथून  शासकीय वाहनाने सोलापूरकडे प्रयाण.

                                          ***

Tuesday, 27 December 2016

जिल्हा कोषागार कार्यालय आयोजित ई-पेमेंट व कॅशलेस व्यवहारासंबंधी कार्यशाळा संपन्न


    उस्मानाबाद,दि.27:- येथील  स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्हा कोषागार कार्यालयाकडून ई-पेमेंट व कॅशलेस व्यवहारासंबंधी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
        सुरुवातीस प्रास्ताविकात जिल्हा कोषागार अधिकारी श्री. विशाल पवार यांनी उपस्थितांना पूर्वी होणाऱ्या शासकीय व्यवहार पध्दती व भविष्यात  होणाऱ्या व्यवहार पध्दतींविषयी माहिती दिली.
         या कार्यशाळेत ॲक्सिस बॅंकेच्या सहकार्याने भविष्यातील शासकीय निधी हस्तांतरीत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम  आणि डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड,आर. टी. जी. एस., नेट बॅकींग इत्यादी विषयी श्री. देवांग भाटीया , श्री. घाग आणि ॲक्सिस बॅंक व्यवस्थापक          श्री. किशोर पाटील यांनी  यू.पी.आय. अंतर्गत ॲक्सिस पे  याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन  केले.
           या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी,  अप्पर कोषागार अधिकारी श्री. आप्पासाहेब पवार,श्री.एस.बी शिंदे, डी. ए. संकपाळ हे उपस्थित होते.
****


दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत “ आम्ही झालो लोकराज्य महिला बचतगट”





उस्मानाबाद.दि.27:- नगर परिषद, उस्मानाबाद दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील सामाजिक विकास व पायाभूत सुविधा या उपांगांतर्गत महिला बचतगटातील सदस्यांच्या क्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या मासिक बैठकीत त्यांना शासनाच्या विविध योजनेची माहिती मिळावी, या दृष्टीने लोकराज्य मासिकाचे प्रति महा अंक एकूण ११३ महिला बचतगटांची प्रति वर्ष रु.१००/- प्रमाणे एकूण रु.११ हजार ३०० चा धनादेश उस्मानाबाद नगर अध्यक्ष श्री.मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते श्री.मनोज शिवाजी सानप जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. सानप यांनी या बचतगटाच्या महिलांना  बचतगटांचा सामाजिक विकास होण्यात कसा हातभार लागू शकतो , "लोकराज्य"  या मासिकाच्या माध्यमातून बचतगटांना  शासन नेमके काय काम करते तसेच  शासनाच्या  कोणकोणत्या योजना आहेत याबद्दलची माहिती  कशाप्रकारे   मिळू शकते , माहिती व जनसंपर्क विभाग व जिल्हा माहिती कार्यालय  नेमके काय काम करते ,  विविध शासकीय  योजनांच्या माहितीकरिता शासनाच्या कोणकोणत्या वेबसाईटस उपलब्ध आहेत,शासनाच्या विविध विभागांनी एकमेकांना पूरक व एकत्रित काम केल्यास जनतेला  कशाप्रकारे लाभ होऊ शकतो, अशा विविध विषयांबाबत सह उदाहरण मार्गदर्शन केले .

 त्यावेळी शिवसेना जिल्हा अध्यक्ष श्री.सुधीर आण्णा पाटील ,सदस्य श्री.राजाभाऊ पवार, श्री.बाळासाहेब काकडे, तुषार राजेनिंबाळकर, श्री.रवी वाघमारे, मुख्याधिकारी श्री.बाबासाहेब मनोहरे, स्वामिनी वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा सुरेखा भोजगुडे, सचिव मीना गायकवाड, महिला आर्थिक  विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री.सोमनाथ लामगुंडे, श्री.धीरज इर्गट, श्री.अमोल खवले, श्रीमती वनमाला सावंत, श्री.शेख युसुफ समुदाय, श्री.विक्रम समुद्रे, श्री.सतीश सांगळे, सामाजिक विकास व पायाभूत सुविधेचे व्यवस्थापक श्री.महारुद्र गालट आदी उपस्थित होते.****

रिक्त पदासाठी अर्ज मागणी



उस्मानाबाद.दि.27:- जिल्हयातील जिल्हा परिषद सेवेतील उपक्रमशिल तज्ञ शिक्षकांना DIECPD मध्ये रिक्त पदे प्रतिनियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. दि.30 डिसेंबर 2016 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. हे अर्ज जिल्हयात कार्यरत असलेल्या शिक्षकानीच करावेत, भरलेल्या माहितीच्या आधारे आपली मुलाखतीसाठी निवड केली जाईल, ज्यांची मुलाखतीसाठी निवड केली आहे, त्यांनीच हजर राहावे, अर्ज मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत करावा. गणितासाठी-2, आयसीटीसाठी - 1, विज्ञानासाठी- 1, या रिक्त पदाच्या उपलब्धतेनुसार विषयासाठी www.tinyurl.com/applydiecpd या ऑनलाईन लिंकवर अर्ज करावेत, असे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ.के.ए.शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.**** 

एक पाऊल सशक्त राष्ट्र उभारणीसाठी….!


       दिनांक 7 डिसेंबर 2016 चा तो दिवस नेहरु युवा केंद्र उस्मानाबाद मध्ये झालेल्या मासिक बैठकीत आम्हाला युवा नेतृत्व व सामाजिक विकास प्रशिक्षण या शिबिराची माहिती नेहरु युवा केंद्राचे श्री रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली. सर्व स्वयंसेवकांना खूप उत्सुकता होती. या प्रशिक्षणांमध्ये आम्हाला काही नवीन शिकण्यासाठी व मिळविण्याच्या प्रशिक्षणाची आमच्या जीवनात आणि समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी चांगलीच मदत होणार होती.
          सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षणाची सुरुवात  बुधवार 14 डिसेंबर  रोजी साधारणपणे ठीक 10.00 वाजता झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखाधिकारी श्री रामचंद्र कुलकर्णी यांनी केले आणि सकाळच्या सत्रात श्री पांडूरंग मोरे (MCED चे प्रमुख)  यांनी आम्हाला जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती दिली. या योजना खूप लाभदायक  आणि फायदेशीर ठरणार आहेत, याची खात्री झाली.  या प्रशिक्षण  वर्गात विविध चार समित्यांची स्थापना करण्यात आली व त्यांच्या कार्याची रुपरेषा आखून देण्यात आली , जलसंधारण-भविष्याची गरज या विषयावर गटचर्चा झाली आणि आम्हाला समजले की, जलसंधारण हे भविष्याच्या दृष्टीने किती महत्वाचे व जरुरीचे आहे. यावरुन आम्हाला समजले की विविध प्रकारे जल पुनर्भरण करता येऊ  शकते. दुसऱ्या दिवशी मिळालेले मार्गदर्शक म्हणजे श्री विनायकजी धेंडे सर (जिल्हा युवा समन्वयक) यांच्याकडून  आम्हाला शिकायला मिळालं की देशाचा जर विकास करावयाचा असेल तर तो आधी आपण स्वत:पासून करायला हवा, त्याचबरोबर त्यांनी सांगितले की,शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांमध्ये सहभागी नसलेल्या लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम एन.वाय.व्ही (राष्ट्रीय युवा स्वयंसेवक) चे आहे. त्याचबरोबर त्यांनी  काही स्वानुभव आमच्याशी शेअर केले. त्यातून आम्हाला समजले की , युवकांना जर ध्येय प्राप्ती करावयाची असेल तर कशा प्रकारे जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जायला हवे.
          दुपारच्या सत्राची सुरुवात श्री.सुधीर  कुलकर्णी (कवी-लेखक) यांनी केली, एक कवी मनाचा माणूस जीवनामध्ये आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज परिवर्तन व मनपरिर्वन कशाप्रकारे करु शकतो, हे कुलकर्णी सरांकडे  पाहिल्यावर आमच्यापैकी काही जणांनाही  वाटलं की आपण ही कविता करायला हवी, कवी व्हावं.
आला विचार मनात कवी व्हावं
आला विचार मनात कवी व्हावं
नंतर समजलं आधी
विचारवंत व्हावं,आधी विचारवंत व्हावं..
          श्री प्रसन्नकुमार कोंडो(भांडार अधिकारी राज्य परिवहन महामंडळ,उस्मानाबाद) यांनी निर्णयक्षमता Decision ,Dream, Decipline, knowledge, presentation प्रक्रिया कशी करावी, आयुष्यात निर्णय चुकतात पण चुकलेले निर्णय सुध्दा ध्येयप्राप्तीकडे घेऊन जातात व चुकलेल्या निर्णयातून सुध्दा शिकायला मिळतं. याबद्दल आमचे  प्रबोधन  केले. अशाप्रकारे दुस-या दिवसाची सांगता झाली.
          युवा नेतृत्व व सामाजिक विकास प्रशिक्षण या प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात प्रा.श्री अशोक गोरे (व्यंकटेश महाजन महाविद्यालय, उस्मानाबाद) यांच्या  मार्गदर्शनातून सामाजिक जाणीव व संवेदनशीलता ही आजच्या तरुणामध्ये कशी असली पाहिजे. प्रत्येक तरूण हा संवेदनशील असायला हवा व सामाजिक बांधिलकी आपणही जपली पाहिजे, आपणही समाजासाठी काही केलं पाहिजे हे शिकायला मिळाले .
          गोरे सरांकडून माहिती मिळाली की, जगात 102 कोटी गरीब जनता आहे त्यातील 34 कोटी जनता ही एकटया भारतात आहे.ही समाजातील दरी आम्हाला जाणवली. नेहरु युवा केंद्राच्या  माध्यमातून आम्ही ही दरी  कमी करण्याचा प्रयत्न निश्चितच करु असा संकल्प यावेळी सर्व  प्रशिक्षणार्थींनी केला .
          श्री राजेंद्र अत्रे(साहित्यिक व कवी) यांनी आम्हाला सांगितले की,
योग कर्मसु कौशल्यमकोणतेही काम करताना काम जाणून करणे , कोणतेही काम नीट केलं पाहिजे व ते वेगात केलं पाहिजे. संध्याकाळच्या सत्रात श्री व्ही.के.देशमुख सरांकडून आम्हाला ज्ञानाची शिदोरी मिळाली, खरोखरच आम्हाला समजलं की , उपदेशाने माणूस कधीच बदलत नसतो तर तो स्व-निरिक्षणाने बदलत असतो. त्यामुळे आम्हांला कळलं की, आपण स्वत:च  स्वत:चे निरीक्षण करायला हवे व झालेल्या चुका सुधारायला हव्यात, त्याचबरोबर इतरांचं मन दुखावेल असं बोलू नये . भले ते सत्य जरी असेल तरी देखील म्हणजेच सत्यम भ्रयात,भ्रयात अप्रियम सत्य अशा प्रकारे अशा  अनोख्या  ज्ञान प्राप्तीने  या दिवसाची सांगता झाली.
          दिनांक 17 डिसें 2016 या प्रशिक्षणाच्या चौ्थ्या दिवशी आम्हाला जे मार्गदर्शक लाभले त्यांचे नाव श्री.गुरुनाथ कुलकर्णी ते जिल्हा सैनिक विभागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून आम्हाला सैन्य भरती कशा प्रकारे पार पाडली जाते, त्याविषयीचे समज-गैरसमज,भविष्यातील संधी,विविध पदांसाठी असणारी धारणा (पात्रता) व पदे याविषयी विस्तृत अशी माहिती मिळाली. सैन्यात जावून देशाचे व देशातील लोकांचे रक्षण करणे ही एक देशाची व समाजाची सेवा आहे, याबाबत आमचा निश्चय  दृढ निश्चयात परिवर्तीत  झाला .
          यानंतर दुपारच्या सत्रात क्रीडाधिकारी श्री. अशोक बनसोडे यांनी शासनाच्या क्रीडाविषयक विविध योजनांची माहिती आम्हाला दिली जी की,आमच्या दृष्टीने खूप महत्वाची व जरुरीची होती. नंतर याच सत्रामध्ये श्री मनोज  शिवाजी सानप साहेब(जिल्हा माहिती अधिकारी) यांनी राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान या विषयावर आम्हाला सांगितले की,युवक कसा असला पाहिले ? युवक कोणाला म्हणावे?  जो विचारांनी आणि कृतीने तरुण व तत्पर अशा 90 वर्षाच्या लोकांना देखील युवक म्हटले. त्याचबरोबर युवकांच्या विचारात जर स्पष्टता असेल तर बोलण्यात व वागण्यात स्पष्टता येते खूप खेळीमेळीच्या  वातावरणामध्ये  युवक व युवकांची उद्दिष्टेच  काय असली पाहिजेत  हे आम्हाला समजले  सशक्त राष्ट्र उभारणीत  युवकांनी  सर्वच प्रकारे योगदान द्यायला हवे.
          त्याचबरोबर  या सत्रामध्ये श्री शिरीष शेळके(महिला व बालकल्याण अधिकारी) मार्गदर्शन करताना म्हणाले की,  आज समाजात महिला व बालकांवर अत्याचार होतात. मात्र प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रशासनाचा आधार घेऊन ते आपल जीवन सावरु शकतात व सुधारु ही शकतात, शेळके साहेबांनी  याबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी सामाजिक योजनांचीही माहिती दिली.
          जिल्हा माहिती अधिकारी  सानप साहेबांनी  आपल्या मार्गदर्शनपर  व्याख्यानात असे  सूचविले होते की ,  आजच्या  या पीढीला शासकीय कार्यालयांचीही माहिती होणे  आवश्यक आहे, जेणे करुन ते स्वत:ला व   इतर गरजूंनाही मदत करु  शकतील . त्याप्रमाणे  आम्ही  विविध विभागांच्या कार्यालयांना भेटी देऊन व कामकाजाची माहिती घेतली. (कृषी विभाग,हिवताप विभाग,वन विभाग,माहिती कार्यालय,कौशल्य भारत विभाग) प्रशिक्षणामधून आम्हाला खूप काही मिळाले,परंतू आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळेस ते मिळतेच असे नाही परंतु नकळत ब-याच वेळा आपल्याला असं काही तरी मिळत ज्याची कधीच अपेक्षा नसते  तसेच काही या प्रशिक्षणाबद्दल घडले प्रशिक्षणामधून आम्हाला विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या ओळखी व त्या त्या विभागाचे कामकाज कशा प्रकारे चालते हे आम्हाला समजले. कृषी विभागातील श्री जी.टी. गोरे  , जिल्हा निबंधक श्री.के. आर. कुलकर्णी व कौशल्य विकास व रोजगार कार्यालयातील   श्री गुरव व माहिती कार्यालयातील श्रीमती आशा बंडगर यांनी आम्हाला खूप चांगल्या पध्दतीने माहिती दिली . जी आम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे.भविष्यामध्ये इतर विभागांशी संपर्क साधून त्या  त्या विभागांचीही कार्य प्रणाली जाणून घेऊन ग्रामीण भागातील गरजू लोकांपर्यंत माहिती पुरवण्याचे काम या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थी कडून निश्चितपणाने केले जाईल. समाज सेवेचा हा घेतलेला वसा व मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी ही आमच्या जीवनातील एक अमूल्य ठेवा असणार आहे.
          युवा नेतृत्व सामाजिक विकास प्रक्षिणाचा पाचवा व शेवटचा दिवस होता खरं परंतू आम्हाला ते संपावे असे वाटतचं नव्हते . या दिवशी प्रेरणा घ्या व प्रेरित व्हा या विषयावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांना व विर्द्यार्थ्याना मार्गदर्शन करणारे.श्री अशोक चव्हाण सर यांनी  युवकांना प्रेरित करुन मंत्रमुग्ध केले,या मार्गदर्शनातून आम्हाला समजून आले की,Decission, Dream, discipline , Presentation  हे जर असेल तर युवक यशस्वी नक्कीच होतो.
            प्रशिक्षणाचा समारोप हा आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर साहेब(आमदार विधानपरिषद) यांच्या मार्गदर्शनाने झाला. त्यांनी सांगितले की जीवणात येणाऱ्या आपत्तीचे रुपांतर हे इष्टापत्तीत करता आले पाहिजे, त्याचबरोबर प्रत्येक काम हे सामाजिक जाणिवेतून केले पाहिजे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच प्रगती होते व माणूस मोठा होतो,या कार्यक्रमाला श्री नितिनजी काळे, प्रदेश  कार्यकारिणी सदस्य भाजपा , श्री दत्ता कुलकर्णी जिल्हा अध्यक्ष्‍ उ,बाद भाजपा हे ही उपस्थित होते. आ. ठाकूर साहेबांच्या हस्ते  प्रशिक्षार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या शिबिरातील या पाच दिवसात विविध भागातील 15 मार्गदर्शकांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
            शिबीर यशस्वी करण्यासाठी कु. प्रतिभा जाधव ,अशोक बराते,सायली सलगर,अश्विनी थोरात,  रविकांत सुरवसे,प्रविण माने,वैभव लांडगे यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणामध्ये पाचही दिवसांची भोजन,चहा व नाष्टा इत्यादीबाबतची व्यवस्था आयोजकांकडून उत्कृष्ट पध्दतीने करण्यात आली होती. तसेच सर्वानी शिबिराबद्दलचे मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रुपेश उमरदंड यांनी केले .
            शेवटी या प्रशिक्षणातुन खूप काही मिळालं. सामाजिक जाणीव दृढ झाली  आणि एका सशक्त राष्ट्राच्या  उभारणीसाठी  उस्मानाबाद  जिल्ह्यातील नेहरु युवा केंद्राची ही तरुण मुलामुलींची एक फळी सज्ज झाली …
संपू दे अंधार सारा
उजळू दे आकाश तारे
गंधाळलेल्या पहाटेस येथे
वाहू दे आनंद वारे
स्वच्छ सारे मार्ग व्हावे
अन् मनेही साफ व्हावी
मोकळया श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी
          कु.सायली शशिकांत सलगर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक  , उस्मानाबाद (7038684129)
     कु.रुपेश सुनिल उमरदंड , राष्ट्रीय युवा स्वयंसेवक  , उस्मानाबाद (9764047537)
                        
*****