Monday, 26 December 2016

कायाकल्प उपक्रम: आसू आरोग्य केंद्रास प्रथम पुरस्कार


उस्मानाबाद,दि.26:- कायाकल्प उपक्रमांतर्गत परंडा तालुक्यातील आसू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पटकाविला  आहे. 'एसएमओ' डॉ.गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी वाळके यांना प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात दि.23 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम झाला.
              यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे, डॉ. मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. आरोग्य सेवेअंतर्गत गुणवत्ता वर्धनासाठी राज्यातील सर्व आरोग्य संस्थेमध्ये कायाकल्प हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाची अंमलबजावणी करणे प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी बंधनकारक करण्यात आले होते. ज्या आरोग्य केंद्राकडून हा उपक्रम सक्षमपणे राबविला जातो, त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या माध्यमातून रुग्णालयीन स्वच्छता, नियमित आरोग्य सेवा, आरोग्यविषयक विविध उपक्रम, रुग्णांना सौजन्याची वागणूक देण्याच्या सूचना देण्यात आल्य होत्या.
             दरम्यान, मध्यंतरीच्या काळात जिल्हाभरातील सर्व आरोग्य केंद्राची राज्य तसेच जिल्हास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात आली होती. तपासणीअंती परंडा तालुक्यातील आसू येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हयातून अव्वल ठरले आहे. या केंद्रास दि.23 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी वाळके यांनी   हा पुरस्कार     स्वीकारला. या कार्यक्रमास परंडयाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अबरार पठाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय    अधिक्षक डॉ. संजय वाळके यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.