Tuesday, 27 December 2016

माहिती अधिकार अधिनियम 2005 चा वापर अनुभव लेखन स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धा-2016


उस्मानाबाद,दि.27:- माहिती अधिकार कायद्याबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती व्हावी,शासनव्यवस्थेत माहीतगार  नागरिकांचा सहभाग वाढावा तसेच पारदर्शक प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी माहिती अधिकार कायद्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे मार्फत माहिती अधिकार वापराचे,अंमलबजावणीचे अनुभव लेखन व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
            माहिती अधिकाराचा समाजहितासाठी उपयोग करताना आलेले चांगले अनुभव, तसेच प्रतिकूल अनुभव यासाठी अनुभव लेखन स्पर्धेसाठी विषय       1)माहिती अधिकार अर्ज व अनुषंगिक उपलब्ध माहिती आणि माहितीचा उपयोग, 2) महाराष्ट्र शासकिय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियमन 2005 आणि माहितीचा अधिकार अधिनियमन-2005 3) माहिती अधिकार अधिनियमन कलम 4 चे प्राधिकरणाने करावयाचे स्वयंप्रकटीकरण सद्य:स्थिती.

 निबंध लेखन स्पर्धेसाठी विषय 1) माहितीचा अधिकार अधिनियमन-2005 चा  वापर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संदर्भ तुलनात्मक आढावा,         2) डिजिटल इंडिया (माहिती तंत्रज्ञान) पार्श्वभूमीवर माहिती अधिकार 2005    3) माहिती अधिकार अधिनियमन 2005 संबंधित परिणामकारक महत्वाचे न्यायनिवाडे इत्यादी. स्पर्धेकरीता 1 हजार शब्दांपर्यंत हस्तलिखित अथवा टंकलिखित केलेले अनुभव व निबंध स्विकारले जातील. आपले अनुभव लेखन व निबंध लेखन दि.15 जानेवारी 2017 पर्यंत प्रकल्प अधिकारी, माहिती अधिकार केंद्र, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे-411007 येथे पाठवावेत. यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.yashada.org या संकेतस्थाला भेट द्यावी किंवा (020) 25608130 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन संचालक , माहिती अधिकार केंद्र तथा निबंधक  यशदा श्री. मिलिंद टाकसाळे यांनी केले आहे.                                      *****