लेख
अवयवदानाबाबत समाजात जागरुकता
वाढत असली तरी अवयव दानाबाबतीत सर्वसामान्यांच्या मनात काही शंका आहेत.अवयवदानामुळे
काहींच्या जीवनात आशेचा किरण निर्मा झाला आहे. त्यामुळे समाजात अवयवदानामुळे अधिकाधिक जागरुकता होणे गरजेचे आहे.
अवयवदान :-जिवंतपणी किंवा मृत
झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान होय. अवयवदानाद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयव दान
करुन अंतिम स्वरुपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत अशा रुग्णांचे प्राण वाचवू
शकतो.
अवयव प्रत्यारोपण :- एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा अवयवाचा
काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करुन तो एखाद्या गरजू रुग्णामध्ये प्रत्योरोपीत
करतात. ज्याचा एखदा अवयव कायमस्वरुपी
निकामी झाला आहे अशा रुग्णांसाठी ही प्रमाणित व उपलब्ध अशी उपचार पद्धती आहे.
आपण कोणत्या अवयवांचे दान करु शकतो.
मेंदू स्तंभ मृत्यू :- मृत व्यक्ती जिची हृदयक्रिया चालू आहे. पण जिचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाला आहे, अशी
व्यक्ती बहुतेक प्रमुख अवयवांचे म्हणजे मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत, हृदय, आतडी,
डोळे, त्वचा, हृदयाची झडप व कानाचे ड्रम यांचे दान करु शकतो.
सामान्य मृत्यू :- मृत व्यक्तीची जिची हृदयक्रिया बंद पडली आहे. अशी व्यक्ती फक्त डोळे व त्वचा या अवयवांचे दान
करु शकते.
जिवंत व्यक्ती :- जीवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठीच
अवयवदान करु शकते. रुग्ण दाताच्या जवळचा
नातेवाईक म्हणजे आजी, आजोबा, नातू, मुलगी, मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण अथवा पती
किंवा पत्नी यांना करु शकतो. या
व्यतिरिक्त कोणालाही रुग्णासाठी अवयवदान करायचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी
लागते. जिवंत व्यक्ती कांही मर्यादित
अवयवाचे दान करु शकते. उदा :- मुत्रपिंड अथवा यकृताचा कांही भाग दान करु शकतात.
ब्रेन डेड मृत्यू :-
एखाद्या व्यक्तीची चेतना व
श्वासोच्छवास कायमस्वरुपी बंद झाल्यास त्याला मृत घोषित केले जाते. चेतना व श्वासोच्छवास या दोन्हीचे केंद्र
आपल्या मेंदूतील मस्तिष्क स्तंभ या भागात असतो. अपघातात डोक्याला मार लागल्यास
मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तिष्क स्तंभास
कायम स्वरुपी इजा झाल्यास या व्यक्तीचा मस्तिष्क स्तंभ (ब्रेन डेंड) मृत्यू होवू
शकतो.
एखाद्या व्यक्तीचे अतिदक्षता
विभागात उपकरणांच्या सहाय्याने हृदय कृत्रिमरित्या क्रियाशील ठेवले असेल तसेच
कांही ठराविक प्रमाणित चाचण्यांच्या आधारे जर तिचा मस्तिष्क स्तंभ मृत झाल्याचे निश्चित
झाले तर त्या व्यक्तीस मृत घोषीत करता येते.
अशा व्यक्तीचे हृदय जास्तीत-जास्त 16 ते 72 तासापर्यंत कृत्रिमरित्या
क्रियाशील ठेवता येते. याच कालावधीत
प्रमुख अंतर्गत अवयवांचे दान होवू शकते.
यासाठी त्या रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांची संमती आवश्यक असते. असे अवयवदान फक्त शासनाने मान्यता दिलेल्या
प्रतिरोपण रुग्णालयातच करता येते.
मस्तिष्क स्तंभ मृत्यू घोषित करणे व अवयवदान कायदेशीर बाबी :-
1. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार मस्तिष्क स्तंभ
मृत्यू व अवयवदान या दोन्हींना खालील बाबीला अनूसरुन कायदेशीर मान्यता आहे.
अ) मस्तिष्क स्तंभ मृत्यूला मान्यता देणे जेणे करुन मृत्यूनंतर
अवयवदान होवू शकेल.
ब) रुग्णांच्या उपचारासाठी मृत व्यक्तीचे अवयव काढणे साठवणे व
प्रतिरोपण करणे यावर नियंत्रण ठेवणे.
क) मानवी अवयवांच्या व्यापारावर प्रतिबंध घालणे, कायद्याने अवयव विकणे
व विकत घेणे, त्यासाठी जाहिरात करणे किंवा
अवयव मिळवून देण्यासाठी व्यापारी तत्वावर मध्यस्त करणे यावर बंदी घालण्यात आलेली
आहे.
अवयवदान
करायचे असल्यास काय करायला हवे.
एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर
आपले अवयवदान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमतीपत्र भरणे आवश्यक
आहे. संमतीपत्रावर जवळच्या सज्ञान
नातेवाईकांची सही घेणे देखील आवश्यक आहे.
संमतीपत्र भरुन दिल्यानंतर
त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाते व हे कार्ड दात्याने सतत आपल्या जवळ बाळगणे
आवश्यक आहे. जेणेकरुन त्याच्या नातेवाईकाला अथवा मित्र परिवाराला त्याच्या अवयवदान
करण्याच्या इच्छेविषयी माहिती होईल. जरी आपण डोनर कार्डवर सही केली असली तरी
आपल्या मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीशिवाय अवयवदान होवू शकत
नाही. म्हणून आपल्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे आवश्यक आहे.
अवयवदानाविषयी
असणारे गैरसमज दूर करून अवयवदान करा.
ज्यामुळे मृत्यू पश्चात काहींच्या जीवनात आशेचा किरण येवू शकतो.
विलास माळी
आंतरवासिता
विद्यार्थी,
जिल्हा माहिती कार्यालय,
उस्मानाबाद.
