Saturday, 15 October 2016

उस्मानाबाद जिल्हयात वनराई बंधारे अभियानाचा शुभारंभ

     




उस्मानाबाद.दि.14:-  वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून जिल्ह्यात शाश्वत पाणी स्त्रोत निर्माण करण्यासाठी वनराई बंधारे अभियानाचे घाटंग्री येथे दि.15 ऑक्टोबर 2016 रोजी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. आनंद रायते यांच्या हस्ते वनराई बंधारे बांधून शुभारंभ करण्यात आला.

              उस्मानाबाद जिल्हयात गेल्या चार-पाच वर्षापासून दुष्काळाचे सावट होते, यावर्षी दमदार पाऊस झाल्याने जिल्हयातील अनेक प्रकल्प, ओठे, नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्यामुळे हे पाणी वाहून जात असल्याने त्या ठिकाणी जिल्हा परिषद व लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा शुभारंग घाटंग्री येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. सुधाकर गुंड,उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) शिरिष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू पवार, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. टि.एस. देवकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकने, गटविकास अधिकारी चकोर, लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता संजय आमले, तलाठी दिनेश बहिरमल आदीसह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. हे अभियान दि.15 ते 23 ऑक्टोबर 2016 याकालावधीत जिल्हाभर राबविले जाणार असून गेल्या दोन वर्षात दोन हजार 655 वनराई बंधारे बांधून लिमकावर्ड बुक मध्ये नोंद झाली होती यावर्षी त्यापेक्षा जास्त  पाच हजार व वनराई बंधारे बांधून लिमका बुक मध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या वर्षी बांधलेल्या पाच हजार वनराई बंधाऱ्यारत 250 द.ल.घ.फूट पाणीसाठा होऊन कमीत कमी तीन हजार हेक्टर क्षेत्र बागायतीखाली येऊन  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुध्दा सुटण्यास मदत होणार आहे, त्याचबरोबर   जिल्हा टँकर मुक्त, टंचाई मुक्त व दुष्काळ मुक्त होण्यास मदत होणार आहे असे, यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.रायते यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना अभिवादन




उस्मानाबाद,दि.15:-माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.त्यांचा हा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकार यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.  

Friday, 14 October 2016

वाढदिवसाचे औचित्य साधले शंभरांना “लोकराज्य” सदस्य केले


उस्मानाबाद.दि.14 – सध्या शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे. लोकराज्यहे मासिकही असेच  एक माध्यम. सर्वमान्य लोकमान्य असे हे शासनाचे मुखपत्र, सर्वांनाच हवेहवेसे वाटते. चांदयापासून बांदयापर्यंत, तरुणांपासून वृध्दांपर्यंत सर्वांनाच आवडणारे हे मासिक घराघरापर्यंत पोहोचविण्याकरिता माहिती व जनसंपर्क विभाग जोमाने काम करीत आहे.
            आजकाल लोकसहभागातून अनेक शासकीय योजना, अभियाने यशस्वी होत असल्याचे सकारात्मक चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.असेच चित्र उस्मानाबाद जिल्हयातही लोकराज्य च्या  बाबतीत दिसून येत आहे. राज्यातील पहिले लोकराज्यग्राम,पहिली लोकराज्यशाळा, पहिले लोकराज्य शासकीय कृषी महाविद्यालय,पहिले लोकराज्य जीवन विमा योजना कार्यालय, पहिले लोकराज्य कृषी विज्ञान केंद्र, पहिली लोकराज्य महिला सामाजिक संस्था, पहिली लोकराज्य मोबाईल रिपेअरिंग बॅच, पहिला लोकराज्य शेतकरी प्रशिक्षण वर्ग, पहिले लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र, अशा वैविध्यपूर्ण पध्दतीने लोकराज्य मासिकाचा प्रचार व प्रसार  उस्मानाबाद जिल्हयात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने धडाक्यात सुरु आहे.
शासनाच्या अशा या प्रयत्नांना उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांनी स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधून 100 सामाजिक कार्यकर्त्यांना व पक्ष कार्यकर्त्यांना लोकराज्य मासिकाचे वार्षिक सभासदत्व  भेट  म्हणून दिले आहे.त्यांनी नुकताच 100 सभासदांच्या  वार्षिक सभासदत्व शुल्काचा धनादेश जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी श्री. नितिन काळे म्हणाले की, मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहका-यांच्या सहकार्याने समाजोपयोगी, सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहेत.त्यांच्या या कार्याबद्दलचे लेख स्वरूपातील विवेचन,विविध योजनांचे माहितीपर लेख लोकराज्यच्या  माध्यमातून गावागावात पोहोचायला हवेत, त्याकरिता आधी सामाजिक कार्यकर्ते,पक्ष कार्यकर्ते हे स्वत: योजनांच्या बाबतीत साक्षर व्हायला हवेत, हाच उद्देश डोळयांसमोर ठेवून मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्य करणाऱ्या ,पक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना लोकराज्य चे वार्षिक सभासद करुन घेतले आहे.
ते पुढे म्हणाले, मला खात्री आहे की, हे कार्यकर्ते शासनाच्या योजना,त्यांचे महत्तव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतील. माझा हा वाढदिवस ख-या अर्थाने सार्थक झाल्याचे मला मनोमन वाटते व मी त्याकरिता या उपक्रमाची माहिती मला दिल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी श्री.सानप  यांचा आभारी आहे.

            या निमित्ताने श्री. काळे यांनी उस्मानाबादकरांना आवाहनही केले आहे की, त्यांनी मोठया संख्येने लोकराज्य मासिकाचे सभासदत्व स्वीकारावे, शासकीय योजना जाणून घेण्यासाठी या मासिकाचे नियमित वाचन करावे, शासनाच्या योजनांचा स्वत: अभ्यास करावा, इतरांनाही त्याची माहिती दयावी त्यातून गावाचा शहराचा विकास साधावा, स्वावलंबी व्हावे आणि आपल्या उस्मानाबाद जिल्हयाची मागासलेला,दुष्काळी,आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून जी ओळख आहे ती कायमची पुसून टाकावी.

न्यायालयातील प्रलंबित खटले सामोपचाराने मिटवावेत -न्यायाधीश आर.आर.देशमुख

                   

उस्मानाबाद,दि.14:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्य न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुबंई यांच्या निर्देशानुसार दिनांक 12 नोव्हेंबर 2016 रोजी उस्मानाबाद जिल्हयाचे प्रमुख न्यायाधीश श्री.आर. आर. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हयात एकाच वेळी लोक अदालत संपन्न होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर  न्यायालयातील प्रलंबित खटले सामोपचाराने मिटवावेत,असे आवाहन जिल्हयाचे प्रमुख न्यायाधीश श्री.आर. आर. देशमुख यांनी केले आहे.

या लोक अदालतीमध्ये मोटार अपघात/कामगार नुकसान भरपाई प्रकरणे,भू-संपादन प्रकरणे, कौटुंबिक वाद, दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, विद्युत कायद्यातंर्गत प्रकरणे, बॅंकेची प्रकरणे अशी विविध न्यायप्रविष्ठ प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरिता ठेवण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हयातील सर्व विधीज्ञ,पक्षकार त्याचप्रमाणे संबंधित विभागाने दिलेल्या उदंड प्रतिसादाने बरीच प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला सर्वांचे सहकार्य व भरघोस यश प्राप्त झाले आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील सर्व न्यायालयात दिवाणी स्वरूपाची 29 हजार 707 व फौजदारी स्वरूपाची 25 हजार 222 अशी एकूण 54 हजार 929 प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी जास्तीत जास्त प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवून मिटवून घ्यावीत, असे सर्व संबंधीत पक्षकार, त्यांचे विधीज्ञ,भू-संपादन मंडळे बँक अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, महाराष्ट्र राज्य  परिवहन महामंडळ, विद्युत महावितरण, महसूल अधिकारी, जिल्हा परिषद व संबंधित सर्व शासकीय/निमशासकीय संस्था यांना प्रमुख न्यायाधीश श्री. आर. आर. देशमुख यांनी आवाहन केले आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उत्पादक उद्योजकांसाठीच्या विशेष प्रोत्साहन योजनेचा लाभ घ्यावा-

वृत्त क्र.784                                              दिनांक : 14 ऑक्टोबर 2016
         
उस्मानाबाद,दि.14:- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीमधील उत्पादक उद्योगासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष प्रोत्साहन राबविली जाते या योजनेची वैशिष्टे पुढीलप्रमाणे-100टक्के अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योजकांच्या सर्व प्रकारच्या उत्पादन उद्योगांच्या घटनेसाठी लागू,सर्व उत्पादक उद्योग आणि तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2015 च्या परिच्छेद 4 मधील घटकांसाठी लागू, एमआयडीसी क्षेत्रात उपलब्ध प्लॉटपैकी 20 टक्के प्लॉट उद्योजकांसाठी राखीव, एमआयडीसी तसेच अन्य भागातील उद्योगाला लागणा-या भूखंडावर अनुक्रमे 30 टक्के (अधिकतम रु.10 लाख ) आणि 20 टक्के ( अधिकतम रु.5 लाख ) भूखंड अनुदान शासकीय भूखंड दराच्या किंमतीच्या मर्यादेत  (Ready  Reckoner ) अनुज्ञेय, अनुसूचित जाती/अनुसूचित उद्योजकांसाठी सामूहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गत अनुज्ञेय प्रोत्साहने वाढीव दराने, सामूहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गत अ,ब,क,ड व ड + क्षेत्रातील  गुंतवणुकीच्या 15 ते 30 टक्के भांडवली अनुदान रु.15 ते 30 लाखाच्या  मर्यादेत 5 समान वार्षिक हप्त्याने,उस्मानाबाद जिल्हयाकरिता 25 टक्के रु.25 लाखाच्या मर्यादेत, नवीन उद्योजकांना विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयांसाठी रु.2/-प्रति युनिट आणि उर्वरित राज्यासाठी रु.1/- प्रतियुनिट विद्युत शुल्क अनुदान 5 वर्षासाठी अनुज्ञेय,नविन उत्पादन उद्योजकांना स्थावर मालमत्ता संपाद करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर कमाल 5 टक्के प्रतिवर्ष व्याज अनुदान वापरलेल्या वीज बिलाच्या दुप्पट रकमेच्या मर्यादेत देय, राज्य दरवर्षी दोन औद्योगिक समूहांचा विकास करेल व  पुढील 5 वर्षामध्ये 10 समूह विकसित करण्यात येतील. औद्योगिक समूहामध्ये 50 टक्यांपेक्षा जास्त अनुसूचित जाती/अनुसूचित उद्योजक असल्यास पायाभूत सुविधांच्या विकासाअंतर्गत 100टक्के अर्थसहाय्य,विशेष प्रयोजन संस्थेच्या ( SPV) माध्यमातून उबदन केंद्राची ( Incubation Center) स्थापना करण्यात येईल, तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्यातील एक अनुसूचित जाती व एक अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना उत्पादन उद्योग उभारणी व त्यापुढील कालावधीसाठी सहाय्य व लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृतीदल निवड समिती स्थापन झाली आहे.

कौशल्य विकास योजनेअंतर्गत 1 ते 3 महिन्यांच्या कालावधीचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम ,प्रादेशिक विकास मंडळाच्या कार्यालयात प्रदर्शन विक्री केंद्राची स्थापन. अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या उत्पादक उद्योजकांचे उत्पादनासाठी शासनाच्या विभागांसाठी लागणा-या मालाच्या पुरवठयातील 4 टक्के कोटा राखीव .अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीतील उद्योग करु इच्छित लाभार्थ्यांनी  जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज करुन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे. 

जिल्हयात वनराई बंधारे अभियानाचे आयोजन

वृत्त क्र.786
                   
उस्मानाबाद.दि.14:-  जिल्हात शाश्वत पाणी स्त्रोत निर्माण करुन जिल्हा टँकर मुक्त, टंचाई मुक्त व दुष्काळ मुक्त  करण्यासाठी दि. 15 ते 23 ऑक्टोबर 2016 दरम्यान कंत्राटदार व लोकसहभागातून वनराई बंधारे अभियान राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. आनंद रायते यांनी केले आहे.

              उस्मानाबाद जिल्हा गेल्या चार-पाच वर्षापासून दुष्काळाचे सावट होते, यावर्षी दमदार पाऊस झाल्याने जिल्हयातील अनेक प्रकल्प, ओठे, नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्यामुळे हे पाणी वाहून जात असल्याने त्या ठिकाणी कंत्राटदार व लोकसहभागातून वनराई बंधारे बांधले तर शाश्वत पाणी स्त्रोत निर्माण होऊन जिल्हा टंचाई व टँकरमुक्त  व दुष्काळमुक्त होईल. त्यामुळे जिल्हयात दि.15 ते 23 ऑक्टोबर दरम्यान पाच हजार वनराई बंधारे बांधण्याचे उदिष्ट असून यामुळे 250 द.ल.घ.फूट पाणीसाठा होऊन कमीत कमी तीन हजार हेक्टर क्षेत्र बागायतीखाली येऊन  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुध्दा मिटण्यास मदत होणार आहे.त्यामुळे दि.23 ऑक्टोबर 2016 पर्यंत वनराई बंधारे अभियान राबवून उदिष्टपूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी  आनंद रायते यांनी केले आहे.

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल व सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धाचे उस्मानाबाद येथे आयोजन

                
उस्मानाबाद,दि 14:- राज्यस्तरीय शालेय फुटबॉल व सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा वयोगट 14,17 व 19 वर्षाखालील मुले व मुलींची राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा स्टेडिअम उस्मानाबाद येथे दि. 19 ते 28 ऑक्टोबर 2016 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
 दि. 21 ऑक्टोबर 2016 रोजी सिकई मार्शल आर्ट स्पर्धेचे उदघाटन पुष्पक मंगल कार्यालय येथे होणार आहे तर समारोप दि. 22 ऑक्टोबर 2016 रोजी होणार आहे, फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे उदघाटन श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमवर दि. 23 ऑक्टोबर 2016 रोजी तर समारोप दि. 28 ऑक्टोबर 2016 रोजी होणार आहे.
या स्पर्धेसाठी सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेत वयोगट 14,17 व 19 वर्षांखालील एकूण 512 खेळाडू सहभागी होणार असून 98 संघ व्यवस्थापक  उपस्थित राहणार आहेत. तर फुटबॉल स्पर्धेत संघ व्यवस्थापक, निवड समिती सदस्य असे एकूण 1 हजार 380 खेळाडू व संघ व्यवस्थापक सहभागी होणार आहेत.
सिकई मार्शल आर्ट या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा गोवा व दिल्ली तर फुटबॉल स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना इंफाळ, श्रीनगर,पोर्टब्लेअर येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता पाठविण्यात येणार आहे.

Thursday, 13 October 2016

कोजागिरी पोर्णिमेच्या तयारीबाबत महत्वाची आढावा बैठक संपन्न


उस्मानाबाद,दि.13:-कोजागिरी पोर्णिमेनिमित्त तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीजींच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना कोण्त्याही प्रकारचा त्रास होणार नाही याकरिता संबंधित प्रत्येक अधिकाऱ्यांने अत्यंत चोखपणे आपआपली जबाबदारी पार पाडावी,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज दिले.
कोजागिरी पोर्णिमेच्या निमित्ताने सोलापूर, कर्नाटक, तेलंगणा आदी भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक तुळजापूरला येतात त्यांच्या सोयी सुविधांसाठी नियोजनपूर्व आढावा बैठक तुळजापूर येथील सर्किट हाऊस येथे जिल्हधिकारी तथा मंदिर संस्थानाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी प्रकाश व्यवस्था,रस्ते दुरूस्ती ,पार्किग व्यवस्था, गर्दीवर नियत्रंण ठेवण्यासाठी बॅरेगॅटींग, दर्शन रांगेकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रथोमचाराची केंद्र सूरू करण्याची सूचना करण्यात आली.
पोर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करत असल्याने रस्त्यावर दुकाने लावू नये, पाणपोई, चप्पल स्टँड, घाटशीळला जाणाऱ्या रस्त्यावर जाणारे व येणाऱ्यासाठी फलक लावावे, पाण्याचे डबके, तलावाच्या ठिकाणी, धोकादायक ठिकाणाचा फलक लावावा,अन्न छत्राच्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवूण स्वच्छता राखावी व अन्नछत्र रस्त्याच्या बाजुला लावावे, यामुळे रस्ता बंद होणार नाही याची काळजी घ्यावी.
त्याचबरोबर निश्चित केलेल्या मार्गांवरून गाड्या सोडाव्यात, सर्व मार्गांवरील स्वच्छता कटाक्षाणे पाळावी. ग्रामपंचायतींनी देखील स्वच्छतेबद्दल फलक लावावेत असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी बैठकीत देण्यात आले.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी,अभयसिंह मोहिते,तहसिलदार तथा मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक सुतिज नरहरे, तहसिलदार दिनेश झांपले, नगरपालिका मुख्याधिकारी राजीव बुबने, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोरूडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा अरोग्य अधिकारी डॉ.वडगावे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्र.पाटील, सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकावाडी आदी उपस्थित होते. 

मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
(ठळक मुद्दे)
·       आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईबीसी) विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी अधिक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारचा क्रांतिकारी निर्णय.
·       बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या ईबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख करण्याचा राज्य शासनाचा निर्णय.यापूर्वी ईबीसी सवलतीसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख इतकी होती.
·       ईबीसी वर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिक्षण शुल्कापोटी 50 टक्के रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात येते.
·       याशिवाय अडीच लाखापेक्षा जास्त परंतु सहा लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या गुणवंत मुलांनाही या सवलतीचा लाभ मिळणार असून त्यांचे निम्मे शिक्षण शुल्क राज्य शासनाकडून भरण्यात येणार आहे. यासाठी मात्र संबंधित विद्यार्थ्यास बारावी परीक्षेत किमान 60 टक्के गुण प्राप्त असावेत.
·       उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ईबीसी धारक विद्यार्थ्याना सध्या देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठीही वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाख इतकी वाढविण्यात आली आहे.
·       राज्य सरकारने आज घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे इतर मागासवर्गीय (OBC), विजा-भज (VJNT) आणि विमाप्र (SBC) या वर्गातील विद्यार्थ्यांना प्राप्त होणाऱ्या शिक्षण शुल्कातील 50 टक्के प्रतिपूर्तीची सवलत आता खुल्या गटातील आर्थिक मागास घटकांनाही मिळणार.(सुधारित निर्णयानुसारसहा लाखापर्यंत वार्षिक उत्‍पन्न असणारे पालक)
·       शासकीय, शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठांसह) आणि खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयातकेंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेणारे विद्यार्थी सवलतीस पात्र. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणारे तसेच खाजगी अभिमत विद्यापीठे व स्वयंअर्थसहाय्य विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी या सवलतीसाठी पात्र ठरणार नाहीत.
·       वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शिक्षण (MBBS & BDS) घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीयकृत अथवा शेल्युल्ड बँकेतून घेतलेल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज शासन भरणार.
-----०-----



डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
(ठळक मुद्दे)
·       ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी अथवा नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना मोलाची ठरणार.
·       या योजनेत शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय अथवा तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता मिळणार.
·       या योजनेत महानगरात (मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, औरंगाबाद, नागपूर) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा तीन हजार रुपये (वार्षिक 30 हजार रुपये) तर या शहरांव्यतिरिक्त अन्य शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा दोन हजार रुपये (वार्षिक 20 हजार रुपये) वसतिगृह निर्वाह भत्ता मिळणार.
·       या योजनेची अंमलबजावणी 2016-17 या शैक्षणिक वर्षापासूनच. यापूर्वीच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही या वर्षापासून लाभ मिळणार.

·       राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या दोन्ही योजनांचा लाभ राज्यातील सात लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार असून राज्य शासनावर सातशे कोटींचा भार पडणार आहे.

-----०-----




पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना
(ठळक मुद्दे)
·       शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना राबविण्याचा निर्णय.
·       या योजनेंतर्गत 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्यासाठी थेट मदत मिळणार.
·       जिल्हा, विभागीय मुख्यालय व मोठी शहरे या ठिकाणच्या शिक्षण संस्थांमध्ये चालू वर्षी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या20 हजार विद्यार्थ्यांना, तसेच 2017-18 पासून कमाल 40 हजार 500 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार.
·       या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही मदत थेट जमा होणार.
·       मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार, महसुली विभागीय शहरांसाठी 5100 आणि इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी 4300 रुपये मदत देण्याचा निर्णय.
·       यासाठी शासनावर प्रतिवर्षी 107 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
·       याव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार आणि इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष दोन हजार रुपये शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी दिले जाणार.
-----०-----


मंगळवारी पहाटे (दि. 11ऑक्टोबर) रोजी पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला


Monday, 10 October 2016

शारदीय नवरात्र महोत्सव-2016
नवरात्रौत्सवाकरिता नऊ दिवस भाविकांची अलोट गर्दी
शासन यंत्रणांचे यशस्वी नियोजन व समन्वय

        उस्मानाबाद,दि.10:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि शक्तीदेवता श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे शनिवारी दि. 1 ऑक्टोबर रोजी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारिक पध्दतीने श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पूजाविधी  करण्यात आले.
          यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाची मुख्य पूजा पार पडली. त्यानंतर घटकलशांची पारंपरिक पध्दतीने पूजा करण्यात आली आणि गोमुख तीर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदीमाया आदीशक्ती या मंदिरांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे आणि त्यांच्या पत्नी प्रियंका भगत-नारनवरे यांच्या हस्ते  घटस्थापना करण्यात  आली.  यानंतर दुसऱ्या , तिसऱ्या, चौथ्या  दिवशी देवीची नित्योपचार  पूजा करण्यात आली .
पाचव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींची ललित पंचमीनिमित्त नित्योपचार पूजा झाल्यानंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.
          ललित पंचमीनिमित्त रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.   
             गुरुवारी सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. पाचव्या माळेपासून  विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात आली होती.
गुरुवारी सातव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानीची सातव्या दिवशी नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेषशय्येवर विश्राम घेत असताना मातेने नेत्रकमळात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलापासून (मळ) दोन दैत्य उत्पन्न झाले, त्यांची नावे शुंभ व निशुंभ होती, ते उत्पन्न होताच शेषशय्येवर विष्णूवर आक्रमण करण्यासाठी जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी  विष्णूच्या नेत्रकमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तुती करुन श्रीस जागविले व विष्णूवर आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी  मातेने केला, म्हणून विष्णूने आपली शेषशय्या श्रीस विश्राम करण्यासाठी दिली. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते,अशी आख्यायिका सांगितली जाते.
आठव्या दिवशी  म्हणजे शनिवारी दि.8 ऑक्टोबर  रोजी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली.
श्री तुळजाभवानीची आठव्या दिवशी नित्योपचार आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार  अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी श्री तुळजाभवानी  मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आशिर्वाद  दिला होता,म्हणून या दिवशी श्रींस महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे, अशी ही अवतार पूजा मांडण्यात आली होती. 
         
शासनाच्या विविध विभागांनी घेतली
भाविकांची विविध प्रकारे काळजी
नवरात्र महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन,  मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, नगरपालिका, तहसिल कार्यालय यांच्यासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, एस.टी. महामंडळ, आपत्कालीन विभाग  आदि विभागांनी भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या. भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते.
जिल्हा प्रशासन :-
जिल्हा प्रशासन आणि  मंदिर संस्थान यांच्या मार्गदशर्नाखाली सर्व विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  या यात्रेकरिता आलेल्या  भाविकांना उत्तम प्रकारे  सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या . जिल्हा सूचना –विज्ञान केंद्राच्या  ऑनलाईन राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या (NIC) मदतीने जिल्ह्याच्या संकेतस्थळावरुन जनतेसाठी विविध विभागाच्या ऑनलाईन सेवा पुरविण्यात जिल्हा प्रशासनाने एन. आय. सी. मार्फत  महत्वाचा  वाटा उचला, नवरात्र महोत्सवात बहुतांशी भाविकांना घरबसल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी http://osmanabad.nic.in या संकेतस्थळावर ई-लाईव्ह दर्शन ही सुविधा पुरविण्यात आली .
पोलीस विभाग :-
नवरात्रौत्सवाच्या  निमित्ताने  देशातील  दहशतवादी  घटनांच्या  पार्श्वभूमीवर  पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख यांच्या देखरेखीखाली   श्री  तुळजाभवानीच्या  मंदिरात  कडेकोट  सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. देवीच्या  दर्शनासाठी  25 लाखांपेक्षा  जास्त भाविकांची  संख्या ग्राह्य  धरुन  प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्यापूर्वी 15 दिवसांपासून चोख पोलीस  बंदोबस्त  तैनात  करण्यात  आला होता . सुरक्षेकरिता बॉम्बशोधक पथकही सज्ज होते.वृध्द, अपंग  भाविकांना  पोलीस कर्मचारी विशेष मदत करीत होते. साधारणत: 2 हजार  पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची या ठिकाणी  नेमणूक  करण्यात आली होती . येणाऱ्या व जाणाऱ्या  प्रत्येक भाविकांवर  प्रत्यक्ष  पोलिसांकडून , सामान्य  वेषातील पोलिसांकडून तसेच  सीसीटीव्हीमधून  बारकाईने  लक्ष दिले जात होते. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही, यातच जिल्हा  व पोलीस प्रशासनाचे यश आहे.
          या यात्रेच्या निमित्ताने महाद्वारासमोर  उस्मानाबाद  पोलीस दलाच्या  वतीने  पोलीस दलातील  समाजपरिवर्तनात्मक निवडक  फोटोंचे  प्रदर्शनही भरविण्यात  आले होते.  
आरोग्य विभाग :-
महाराष्ट्रासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने  त्यांच्याकरिता तात्काळ आरोग्यसेवा पुरविण्यात आली होती. गर्दीत काही अघटित घटना  घडल्यास  जखमी व्यक्तीला तात्काळ  आरोग्य  सेवा मिळावी  या दृष्टीने आरोग्य विभागातर्फे भाविकांच्या सेवेसाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एकूण 14 प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आली होती.
या केंद्रांसाठी 12 वैद्यकीय अधिकारी , 146 आरोग्य कर्मचारी , चार 108 क्रमांकाच्या विशेष सुसज्ज रुग्णवाहिका तुळजापूर येथे तैनात होते. याशिवाय 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची मदत भाविकांना मिळावी यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन कक्षही येथे सुरु करण्यात आला होता.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून  या यात्रेसाठी एकूण 16ग्रामीण क्लिनिक्स उभे करण्यात आले होते . आजपर्यंत  11 हजार 756 व्यक्तींनी  येथे उपचार घेतले , शहरी भागासाठी एकूण 6 अधिकारी  व 34  कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
एस.टी.महामंडळ:-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 28 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2016 या कालावधीत 1 हजार 785 ज्यादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे .
नवरात्रौत्सव काळात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एस.टी. महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाकडून 505, औरंगाबाद विभागाकडून 505, पुणे विभागाकडून 450, कर्नाटक  राज्याकडून 325  ज्यादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.उस्मानाबाद विभागाच्या कर्नाटक राज्याच्या हुमनाबाद व गुलबर्गा व इतर वाहतुकीसाठी 85 ज्यादा गाड्या , सोलापूर व इतर  मार्गासाठी वाहतुकीसाठी 100 बसेस अशा एकूण 185 ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत .
नगरपालिका:-
नगरपालिकेने या यात्रा महोत्सव काळात विविध कामांचे  नेटके नियोजन केले. सफाई विभागात-11 टॅक्ट्रर, 2 टिप्पर,9 टमटम,सफाई मजूर (स्थाई)-30 व ठेका यांच्याकडील  एकूण 290 मजूर, इतर नगरपालिकांचे 22 कर्मचारी कार्यरत होते. लातूर रोड,वेताळ ते बारालिंग रोड, उस्मानाबाद रोड, घाटशीळ रोड पार्किंग,मोबाईल टॉयलेट-12, फॉगिंग मशिन-2,मंदिरामागील आराधवाडी भागातील 70 ते 80 ट्रिप कचरा उचलण्यात आला होता व आवश्यतेनुसार जंतुनाशके शहरात विविध ठिकाणी वापरण्यात आली होती. शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाडयात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नगरपालिकेकडून एकूण 8 प्रथमोपचार केंद्रे निश्चित करण्यात आली होती. भाविकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यात येत होता. उस्मानाबाद रोड हायवे रोडवरील पथदिवे संपूर्ण दुरुस्त करुन चालू करण्यात आले होते. शहरात आवश्यक ठिकाणी हॅलोजन लावून विद्युत व्यवस्था करण्यात आली होती. अग्निशमन विभागाकडून 4 वाहनांची ठिकाणे निश्चित करण्यात आली होती.
आपत्ती व्यवस्थापन विभाग :-
 जनतेला आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता शांत राहावे, गडबड गोंधळ करू नये,सैरावैरा  पळायला लागू नये, प्रशासन करीत असलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करावे असे आवाहन करण्यात आले होते. तर आपत्ती व्यवस्थापनासंबंधी काम करणाऱ्या अधिकारी  कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या की, आपत्ती व्यवस्थापन साखळीतील लहानापासून मोठया सर्व घटकांनी, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अत्यंत तत्परतेने आपआपली भूमिका चोख बजावावी, एकमेकांशी  योग्य तो समन्वय राखून आपले कर्तव्य बजावावे,शेवटी  भाविकांची सुरक्षा ही आपली सर्वांत प्रथम जबाबदारी आहे.
 या विभागाकडून घेण्यात आलेल्या मॉक ड्रीलमुळे निश्चितच जिल्हा  प्रशासन,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी हे कोणत्याही आपत्तीस तोंड देण्यास, यात्रेनिमित्त  येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेकरिता सर्व प्रकारे सज्ज असल्याचे सिध्द झाले होते.
जिल्हा माहिती कार्यालय :-
या कार्यालयाकडून दररोज श्री देवीजींच्या  बातम्या व छायाचित्रे प्रसारमाध्यमांना त्यांच्या मागणीनुसार पुरविण्यात आल्या तसेच  सोशल मिडियावरही सर्वांना उपलब्ध करुन देण्यात आल्या. नवरात्र महोत्सवासंबंधीच्या बातम्या व छायाचित्रे  महान्यूज या शासकीय वेबपोर्टलवरही प्रसारित  करण्यात आल्या. तसेच  छायाचित्र दालन या सदरात नवरात्रौत्सवासंबंधीची छायाचित्रे  प्रसारित  करण्यात आली.
****


वैदिक होमहवनास विधीवत पूर्णाहुती

                        शारदीय नवरात्र महोत्सव-2016      




उस्मानाबाद, दि. 10:-शारदीय नवरात्र महोत्सवात आज रविवारी श्री तुळजाभवानी मंदिरात  वैदिक होमहवन कार्यक्रम झाला. या सर्व धार्मिक विधी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे आणि त्यांच्या पत्नी सौ.प्रियंका नारनवरे  यांनी पूर्ण केले.विधीवत पूजेनंतर या होमास पुर्णाहुती देण्यात आली. सप्तपदीपाठ करुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पुर्णाहुती देण्याची प्रथा आहे. त्यानुसार सर्व विधी पार पाडण्यात आले.

          यावेळी सुनित उर्फ बंडू गणेश पाठक (सरकारी उपाध्ये), ऋषिकेश दादेगावकर,अनंताचार्य कांबळे, नागेश अम्बुलगे, राजन पद्माकर पाठक, सुमेध सुनिल पाठक, धनंजय सुधाकर पाठक, विश्वनाथ ढोले, अशोक घाडगे, विश्वनाथ राजाराम प्रयाग, मकरंद कमलाकर प्रयाग, भालचंद्र रामचंद्र पाठक, श्रीराम अपशिंगेकर, किशोर दासराव कुलकर्णी, बाळासाहेब दीक्षीत, गजानन भानूदास लसणे, मंगेश नारायण घंटे, सिलोत्तम जेवळीकर, गिरीष देवळालकर, बाळासाहेब कराडे, सुनिल दुर्गादास लसणे, सुरेश लक्ष्मण पाठक, अशोक पाठक, प्रल्हाद पैठणकर यांनी मंत्रोचारात हे सर्व विधी पूर्ण करून केले. 

राज्यातील पहिले “लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र” उस्मानाबादचे

     आम्ही झालो लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र

उस्मानाबाद,दि,10:- राज्य शासनाच्या लोकराज्य मासिकातील माहितीचा ग्रामीण भागातील जनतेला व विद्यार्थ्यांना लाभ व्हावा  यासाठी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आम्ही झालो लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र या  उपक्रमास प्रतिसाद देत येरमाळा येथील  येडाई व्यसनमुक्ती केंद्राने राज्यातील पहिले लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र होण्याचा बहुमान पटकाविला आहे. याकरिता या व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक, यश मेडिकल  फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच राज्य व्यसनमुक्ती संघटनेचे  सचिव  डॉ. संतोष तांबारे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी  या व्यसनमुक्ती केंद्रातील  100 रुग्ण  आणि  व्यक्ती यांना  लोकराज्यचे  वार्षिक सभासद  करुन घेतले.
या  व्यसनमुक्ती केंद्रातील  महात्मा गांधी  व्यसनमुक्ती   सप्ताहाच्या  समारोप प्रसंगी  व्यसनमुक्त  होण्यासाठी  प्रयत्नशील  असणाऱ्या  रुग्णांना  प्रोत्साहनपर  व्याख्यान  देण्याकरिता  जिल्हा माहिती  अधिकारी  मनोज शिवाजी सानप  हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या केंद्रात  उपस्थित होते .
लोकराज्य मासिकाचे  महत्व  पटवून  देताना श्री. सानप म्हणाले,लोकराज्य या मासिकामधील शासकीय लेखांविषयीच्या माहितीचा निश्चित उपयोग  या रुग्णांना होणार आहे. या व्यसनमुक्त व्यक्तींना  पुढील  आयुष्याच्या यशस्वी वाटचालीकरिता  लोकराज्य मासिकाचा  नक्कीच फायदा होईल , त्यामुळे  व्यसनमुक्ती केंद्रातील व्यक्तींनी लोकराज्यचे नियमित वाचन करावे , असे आवाहन  श्री. सानप यांनी या व्यसनमुक्ती केंद्रातील  रुग्णांना  केले.  
राज्यातील  पहिले लोकराज्य  व्यसनमुक्ती केंद्र बनण्याचा  संकल्प बनल्यानंतर डॉ. संतोष तांबारी , त्यांचे  सहकारी आणि व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णांनी या व्यसनमुक्ती केंद्रात आता यापुढे दररोज  लोकराज्य मासिकातील  एक लेख वाचला जाईल अशी प्रतिज्ञा केली.
.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी  म्हणून येरमाळा येथील  सहायक पोलीस  निरीक्षक  सचिन चव्हाण , डॉ.  सारीपुत भोसीकर , डॉ. भागवत  राऊत हे उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  अजिनाथ शेरकर  यांनी केले तर आभार उत्तम शिंदे यांनी मानले .   *** 

Sunday, 9 October 2016

श्री तुळजाभवानी देवीजींची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा


          उस्मानाबाद,दि.9: शारदीय नवरात्र महोत्सवात रविवारी दुर्गाष्टमी दिवशी तुळजापूरात श्री तुळजाभवानी देवीची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. शेवटची माळ असल्याने भाविकांनी दर्शनासाठी आणि  देवीचे व महिषासूराचे रुप पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. 
          श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. ज्यावेळी महिषासूराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला. साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता ही सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासूराचा वध केला व सर्व देवतांना स्वर्गप्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते,अशी आख्यायिका सांगितली जाते. 
भाविकांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे-घाटे, व्यवस्थापक (प्रशासन)  सुजित नरहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
          दरम्यान काल रात्री दि.8 ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या सोमवार (दि.10 ऑक्टोबर) रोजी श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा दुपारी 12 वाजता होमावर धार्मिक विधी,घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक हे विधी करण्यात येणार आहेत.

वैदिक होमहवनास विधीवत पूर्णाहुती

          शारदीय नवरात्र महोत्सवात आज रविवारी श्री तुळजाभवानी मंदिरात  वैदिक होमहवन कार्यक्रम झाला. सर्व विधीवत पूजेनंतर या होमास पूर्णाहुती देण्यात आली.. सप्तसतीचा पाठ करुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पूर्णाहुती देण्याची प्रथा आहे त्यानुसार आज सर्व विधी पार पाडण्यात आले.