Friday, 14 October 2016

न्यायालयातील प्रलंबित खटले सामोपचाराने मिटवावेत -न्यायाधीश आर.आर.देशमुख

                   

उस्मानाबाद,दि.14:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्य न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुबंई यांच्या निर्देशानुसार दिनांक 12 नोव्हेंबर 2016 रोजी उस्मानाबाद जिल्हयाचे प्रमुख न्यायाधीश श्री.आर. आर. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हयात एकाच वेळी लोक अदालत संपन्न होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर  न्यायालयातील प्रलंबित खटले सामोपचाराने मिटवावेत,असे आवाहन जिल्हयाचे प्रमुख न्यायाधीश श्री.आर. आर. देशमुख यांनी केले आहे.

या लोक अदालतीमध्ये मोटार अपघात/कामगार नुकसान भरपाई प्रकरणे,भू-संपादन प्रकरणे, कौटुंबिक वाद, दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, विद्युत कायद्यातंर्गत प्रकरणे, बॅंकेची प्रकरणे अशी विविध न्यायप्रविष्ठ प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरिता ठेवण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हयातील सर्व विधीज्ञ,पक्षकार त्याचप्रमाणे संबंधित विभागाने दिलेल्या उदंड प्रतिसादाने बरीच प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला सर्वांचे सहकार्य व भरघोस यश प्राप्त झाले आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील सर्व न्यायालयात दिवाणी स्वरूपाची 29 हजार 707 व फौजदारी स्वरूपाची 25 हजार 222 अशी एकूण 54 हजार 929 प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी जास्तीत जास्त प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवून मिटवून घ्यावीत, असे सर्व संबंधीत पक्षकार, त्यांचे विधीज्ञ,भू-संपादन मंडळे बँक अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, महाराष्ट्र राज्य  परिवहन महामंडळ, विद्युत महावितरण, महसूल अधिकारी, जिल्हा परिषद व संबंधित सर्व शासकीय/निमशासकीय संस्था यांना प्रमुख न्यायाधीश श्री. आर. आर. देशमुख यांनी आवाहन केले आहे.