शारदीय
नवरात्र महोत्सव-2016
नवरात्रौत्सवाकरिता
नऊ दिवस भाविकांची अलोट गर्दी
शासन
यंत्रणांचे यशस्वी नियोजन व समन्वय
उस्मानाबाद,दि.10:- महाराष्ट्राची
कुलस्वामिनी आणि शक्तीदेवता श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर
येथे शनिवारी दि.
1 ऑक्टोबर रोजी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे
पारंपारिक पध्दतीने श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.
मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पूजाविधी करण्यात आले.
यावेळी
मंदिरातील पहिल्या दिवसाची मुख्य पूजा पार पडली. त्यानंतर घटकलशांची पारंपरिक
पध्दतीने पूजा करण्यात आली आणि गोमुख तीर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात
आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदीमाया
आदीशक्ती या मंदिरांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे आणि
त्यांच्या पत्नी प्रियंका भगत-नारनवरे यांच्या हस्ते
घटस्थापना करण्यात आली. यानंतर दुसऱ्या , तिसऱ्या, चौथ्या दिवशी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली .
पाचव्या
माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींची ललित पंचमीनिमित्त नित्योपचार पूजा
झाल्यानंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.
ललित पंचमीनिमित्त रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान सूर्यनारायण
यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार
पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
गुरुवारी
सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. पाचव्या
माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री
देवीजींची पूजा मांडण्यात आली होती.
गुरुवारी सातव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा
मांडण्यात आली. श्री तुळजाभवानीची सातव्या दिवशी नित्योपचार पूजा आणि अभिषेक
पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू
क्षिरसागरामध्ये शेषशय्येवर विश्राम घेत असताना मातेने नेत्रकमळात जावून विश्राम
घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलापासून (मळ) दोन
दैत्य उत्पन्न झाले, त्यांची नावे शुंभ व निशुंभ होती, ते उत्पन्न होताच शेषशय्येवर
विष्णूवर आक्रमण करण्यासाठी जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव
यांनी विष्णूच्या नेत्रकमलात विश्राम
घेणाऱ्या देवीची स्तुती करुन श्रीस जागविले व विष्णूवर आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा
वध श्री तुळजाभवानी मातेने केला, म्हणून
विष्णूने आपली शेषशय्या श्रीस विश्राम करण्यासाठी दिली. त्यामुळे ही शेषशाही
अलंकार महापूजा मांडण्यात येते,अशी आख्यायिका सांगितली जाते.
आठव्या
दिवशी म्हणजे शनिवारी
दि.8 ऑक्टोबर रोजी श्री
तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली.
श्री
तुळजाभवानीची आठव्या दिवशी नित्योपचार आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती
शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार
देऊन आशिर्वाद दिला होता,म्हणून या दिवशी
श्रींस महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे, अशी ही अवतार पूजा
मांडण्यात आली होती.
शासनाच्या विविध विभागांनी घेतली
भाविकांची विविध प्रकारे काळजी
नवरात्र महोत्सवानिमित्त जिल्हा
प्रशासन, मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन,
नगरपालिका, तहसिल कार्यालय यांच्यासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा,
एस.टी. महामंडळ, आपत्कालीन विभाग आदि
विभागांनी भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या. भाविकांनी या
सुविधांचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात
आले होते.
जिल्हा प्रशासन :-
जिल्हा
प्रशासन आणि मंदिर संस्थान यांच्या
मार्गदशर्नाखाली सर्व विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या यात्रेकरिता आलेल्या भाविकांना उत्तम प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या . जिल्हा सूचना
–विज्ञान केंद्राच्या ऑनलाईन राष्ट्रीय
सूचना विज्ञान केंद्राच्या (NIC) मदतीने जिल्ह्याच्या संकेतस्थळावरुन जनतेसाठी
विविध विभागाच्या ऑनलाईन सेवा पुरविण्यात जिल्हा प्रशासनाने एन. आय. सी.
मार्फत महत्वाचा वाटा उचलला, नवरात्र
महोत्सवात बहुतांशी भाविकांना घरबसल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा लाभ
देण्यासाठी http://osmanabad.nic.in या संकेतस्थळावर ई-लाईव्ह दर्शन ही सुविधा पुरविण्यात आली .
पोलीस विभाग :-
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने
देशातील दहशतवादी घटनांच्या
पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या देखरेखीखाली श्री
तुळजाभवानीच्या मंदिरात कडेकोट
सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. देवीच्या दर्शनासाठी
25 लाखांपेक्षा जास्त
भाविकांची संख्या ग्राह्य धरुन प्रत्यक्ष
उत्सव सुरु होण्यापूर्वी 15 दिवसांपासून चोख पोलीस बंदोबस्त
तैनात करण्यात आला होता . सुरक्षेकरिता बॉम्बशोधक पथकही सज्ज होते.वृध्द,
अपंग भाविकांना पोलीस कर्मचारी विशेष मदत करीत होते. साधारणत:
2 हजार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची या
ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती . येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक भाविकांवर प्रत्यक्ष
पोलिसांकडून , सामान्य वेषातील पोलिसांकडून
तसेच सीसीटीव्हीमधून बारकाईने
लक्ष दिले जात होते. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही, यातच
जिल्हा व पोलीस प्रशासनाचे यश आहे.
या यात्रेच्या निमित्ताने महाद्वारासमोर उस्मानाबाद
पोलीस दलाच्या वतीने पोलीस दलातील
समाजपरिवर्तनात्मक निवडक
फोटोंचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
आरोग्य
विभाग :-
महाराष्ट्रासह
परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने त्यांच्याकरिता तात्काळ आरोग्यसेवा पुरविण्यात आली
होती. गर्दीत काही अघटित घटना
घडल्यास जखमी व्यक्तीला
तात्काळ आरोग्य सेवा मिळावी
या दृष्टीने आरोग्य विभागातर्फे भाविकांच्या सेवेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एकूण 14
प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आली होती.
या
केंद्रांसाठी 12 वैद्यकीय अधिकारी , 146 आरोग्य कर्मचारी , चार 108
क्रमांकाच्या विशेष सुसज्ज रुग्णवाहिका तुळजापूर येथे तैनात होते. याशिवाय 108
क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची मदत भाविकांना मिळावी यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन
कक्षही येथे सुरु करण्यात आला होता.जिल्हा परिषदेच्या आरोग्य
विभागाकडून या यात्रेसाठी एकूण 16ग्रामीण
क्लिनिक्स उभे करण्यात आले होते . आजपर्यंत
11 हजार 756 व्यक्तींनी येथे उपचार
घेतले , शहरी भागासाठी एकूण 6 अधिकारी व
34 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली
होती.
एस.टी.महामंडळ:-
महाराष्ट्र
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 28 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2016 या
कालावधीत 1 हजार 785 ज्यादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे .
नवरात्रौत्सव
काळात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एस.टी. महामंडळाच्या उस्मानाबाद
विभागाकडून 505, औरंगाबाद विभागाकडून 505, पुणे विभागाकडून 450, कर्नाटक राज्याकडून 325 ज्यादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.उस्मानाबाद
विभागाच्या कर्नाटक राज्याच्या हुमनाबाद व गुलबर्गा व इतर वाहतुकीसाठी 85 ज्यादा
गाड्या , सोलापूर व इतर मार्गासाठी
वाहतुकीसाठी 100 बसेस अशा एकूण 185 ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत .
नगरपालिका:-
नगरपालिकेने
या यात्रा महोत्सव काळात विविध कामांचे नेटके नियोजन केले. सफाई विभागात-11 टॅक्ट्रर, 2
टिप्पर,9 टमटम,सफाई मजूर (स्थाई)-30 व ठेका यांच्याकडील एकूण 290 मजूर, इतर नगरपालिकांचे 22 कर्मचारी
कार्यरत होते. लातूर रोड,वेताळ ते बारालिंग रोड, उस्मानाबाद रोड, घाटशीळ रोड पार्किंग,मोबाईल
टॉयलेट-12, फॉगिंग मशिन-2,मंदिरामागील आराधवाडी भागातील 70 ते 80 ट्रिप कचरा
उचलण्यात आला होता व आवश्यतेनुसार जंतुनाशके शहरात विविध ठिकाणी वापरण्यात आली
होती. शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाडयात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
नगरपालिकेकडून एकूण 8 प्रथमोपचार केंद्रे निश्चित करण्यात आली होती. भाविकांना
पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यात येत होता.
उस्मानाबाद रोड हायवे रोडवरील पथदिवे संपूर्ण दुरुस्त करुन चालू करण्यात आले होते.
शहरात आवश्यक ठिकाणी हॅलोजन लावून विद्युत व्यवस्था करण्यात आली होती. अग्निशमन
विभागाकडून 4 वाहनांची ठिकाणे निश्चित करण्यात आली होती.
आपत्ती व्यवस्थापन विभाग :-
जनतेला आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता शांत
राहावे, गडबड गोंधळ करू नये,सैरावैरा
पळायला लागू नये, प्रशासन करीत असलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करावे असे
आवाहन करण्यात आले होते. तर आपत्ती व्यवस्थापनासंबंधी काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या की,
आपत्ती व्यवस्थापन साखळीतील लहानापासून मोठया सर्व घटकांनी, परिस्थितीचे गांभीर्य
ओळखून अत्यंत तत्परतेने आपआपली भूमिका चोख बजावावी, एकमेकांशी योग्य तो समन्वय राखून आपले कर्तव्य
बजावावे,शेवटी भाविकांची सुरक्षा ही आपली
सर्वांत प्रथम जबाबदारी आहे.
या विभागाकडून घेण्यात आलेल्या मॉक ड्रीलमुळे
निश्चितच जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी हे
कोणत्याही आपत्तीस तोंड देण्यास, यात्रेनिमित्त
येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेकरिता सर्व प्रकारे सज्ज असल्याचे सिध्द झाले होते.
जिल्हा माहिती कार्यालय :-
या कार्यालयाकडून दररोज श्री
देवीजींच्या बातम्या व छायाचित्रे प्रसारमाध्यमांना
त्यांच्या मागणीनुसार पुरविण्यात आल्या तसेच सोशल मिडियावरही सर्वांना उपलब्ध करुन देण्यात
आल्या. नवरात्र महोत्सवासंबंधीच्या बातम्या व छायाचित्रे “महान्यूज” या शासकीय वेबपोर्टलवरही
प्रसारित करण्यात आल्या. तसेच “छायाचित्र दालन”
या सदरात नवरात्रौत्सवासंबंधीची छायाचित्रे
प्रसारित करण्यात आली.
****